स्लॅम बुक : हृदयची हृदय आठवण
कॉलेजात जाणाऱ्यांसाठी शेवटच्या वर्षी स्लॅम बुक नावाच्या
अत्यंत जिव्हाळ्याच्या संकल्पनेला सामोरं जावं लागतं. कॉलेजात प्रत्येकाचा छोटासा
ग्रुप असतो. जितकं शिक्षण घेऊ तितक्या त्या आठवणी जपण्याच्या प्रयत्न प्रत्येकाचा
असतो. मग त्यात आपण काय काय, कसं कसं केलं किंवा आपल्याला कोण कोण आवडतं किंवा
कुणाशी आपलं पटत नाही वगैरे बाबी असतात. पुढे चालून नॉस्ताल्जिया मूडमध्ये जुन्या
आठवणी काढून त्यावर चर्चा, कमेंट करायला सर्वांनाच आवडतं. भावविश्वाचा भाग असतो
तो. त्यातल्याच आठवणी जपून ठेवण्याचं किंवा दस्तावेजीकरणाचं कित्येक प्रसंगात साथ
देणाऱ्या छोट्याश्या कॅमेरासोबत स्लॅम बुक पण असतं. हृदय नावाच्या अशाच एका
नायकाची ही कथा.
हृदय (शंतनू रांगणेकर) एके सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजातनं
घरी आल्यावर गच्चीवर जातो. कॉलनीत कुठे काही आहे का ते बघायला. तर घराच्या समोरच
एक मोठा ट्रक थांबलेला असतो. त्यातनं सामान उतरवून घेणारे जोडपे असते तसेच एक
सुंदर मुलगी भलीमोठी सुटकेस घरात नेण्यासाठी धडपडत असते. तिचं नाव अपर्णा (रितिका
श्रोत्री). यथावकाश नायक तिच्या प्रेमात पडतो. तिला ठरल्याप्रमाणे लगेच सुटकेस आत
नेण्यासाठी मदत करतो. याचा परिणाम ती त्याची मैत्रीण होते. नायकाला जरी नायिका
आवडली तरी तिला पटवणं गरजेचं आहे, ते कसं करणार? त्याच्या मदतीला येतात विष्णू (कुशल
बद्रिके) आणि त्याचे आजोबा (दिलीप प्रभावळकर). ते त्याला पाठींबाच देत नाहीत तर
प्रसंगी सल्ला, मदत पण करतात. पण काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण
होतो. हा दुरावा नंतर मिटतो का या प्रश्नाचे उत्तर मात्र सिनेमाच देईल.
या सिनेमाची सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर कथानकाची
शेवटपर्यंत कथेपासून फारकत न घेण्याची शैली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डबल सीटने
सुद्धा अशीच शैली अंगिकारली होती. त्यामुळे शेवटपर्यंत त्याला काय सांगायचं आहे त्यासाठी
कथा त्याचा दाखवण्यावर भर होता. उगाच बाष्कळ बडबड, सामाजिक भाष्य, संदेश, अनावश्यक
गाणी वगैरेंना फाटा देण्यात आलाय. याचा अर्थ सिनेमात दोष नाहीत असा होत नाही. संकल्पनेपासून
ते पडद्यावर दाखवण्यात येणाऱ्या प्रसंगांपर्यंत आहेत. तरीही सिनेमा शेवटपर्यंत
धरून ठेवतो ते त्याने विनोदाची झूल पांघरल्यामुळे. सिनेमा अर्ध्या अधिक वेळ विनोदी आहे. हृदय आजच्या काळातून भूतकाळातल्या आठवणी जागी करत असल्यामुळे त्याला थोडी
विनोदाचा टच देण्यात आला आहे. पण प्रसंगी गंभीर व्हायला तो घाबरत नाही. गंभीर
प्रसंगांचं प्रमाण कमी असलं तरी ते कथेला पूरकच आहेत.
या सिनेमाचे दोष आहेत ते पटकथेतले. पटकथा म्हणावी तितकी
खोलात कथेकडे बघत नाही. सिनेमाचा विषय जरी आठवणींच्या स्वरूपाचा असला तरी ही जिवंत
व्यक्तींची कथा आहे म्हटल्यावर त्या त्रिमिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे एका
कॉलनीत एकमेकांसमोर राहणारे हे दोन्ही कुटुंब एकमेकांशी का बोलत नाहीत हा प्राथमिक
प्रश्न प्रेक्षकांना पडतो. असेच बरेच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. कदाचित
एखाद्या चांगल्या पटकथाकाराने पटकथा लिहिली असती तर ती प्रभावी झाली असती. अर्थात
अशा जर तरला अर्थ नसतो.
सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय ही जमेची बाजू.
मुंबई-पुण्याच्या बाहेर असणाऱ्यांना हा सिनेमा चटकन अपील
होईल. कारण कथानक घडतं औरंगाबादमध्ये त्यामुळे जे लोक कॉलनी संस्कृतीत वाढलेत
त्यांच्या हृदय आठवणी नक्कीच जाग्या होतील.




Comments