आईस प्रिंसेस : चांगली सक्सेस स्टोरी

आई-वडिलांना नेहमी वाटत असतं की आपल्या मुलाने/मुलीने आपण सेट केलेला गोल अचिव्ह करावं. भारतीय पालकांच्या बाबतीत तर त्यांच्या अपेक्षा ह्या तीव्र व अघोरी स्वरुपाच्या असतात. दरवर्षी दहावी-बारावीची निकाल लागला की आपल्या इथल्या मुलांनी अपेक्षित मार्क्स घेतले नाही तर किंवा पालकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत की आत्महत्या केली असं वाचतो. जर अशा मुलांना त्यांच्या पालकांनी वेळीच समजून घेतलं किंवा त्यांच्या शिक्षकांनी योग्य दिशा दाखवली तर ते वाट्टेल त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.

हीच गोष्ट उत्तम कथे व भक्कम पटकथेद्वारे डिस्ने स्टुडिओनी दाखवली आहे. केसी कार्लाईल (मिशेल ट्रॅकटेनबर्ग) ही शाळेत शिकणारी मुलगी सायन्समध्ये चांगले मार्क्स घेते म्हणून तिचे शिक्षक तिला एक प्रोजेक्ट करायला सांगतात ज्याद्वारे तिला पुढील शिक्षणासाठी हार्वर्ड विद्यापीठाकडून स्कॉलरशिप मिळेल. तिच्या स्त्रीवादी आईला (जॉन क्युसॅक) आपण जे काही आपल्या मुलीला देऊ शकलो नाही ते या संधीद्वारे मिळेल म्हणून आनंद वाटतो. ती तिच्यासाठी वाट्टेल कष्ट उपसत असते. केसी प्रोजेक्टसाठी फिगर स्केटिंग निवडते कारण तिला त्यात फिजिक्सचे नियम आढळतात. ज्यांनी सायन्स केलं आहे त्यांना फिगर स्केटिंगमधील फिजिक्सचे नियम माहिती असतील. ती त्या नियमांचा वापर करून प्रोजेक्ट तयार करते पण हे करत असताना ती ते काही प्रमाणात समजून घेण्यासाठी शिकत असते. यथावकाश ती त्या खेळाच्या प्रेमात पडते. ती स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवते जे पुढे घडणाऱ्या संघर्षाला कारणीभूत ठरते.

२००९-१० साली जेव्हा मी हा सिनेमा बघितला तर मला यात आपल्या इथली परिस्थिति दिसून आली. अमेरिकेसारख्या बलाढ्य आणि श्रीमंत देशात पालक त्याच प्रकारे वागतात ज्याप्रकारे इथले पालक वागतात. तीच स्वतःच्या स्वप्नांना मुलांवर लादण्याची असोशी, मुलांच्या लहानसहान गोष्टींत मिळणाऱ्या आनंदाचा घोटलेला गळा, त्यांच्या खाजगी आयुष्यावर बंधनं आणून हुकूमशाही वृत्तीने वागण्याची पद्धत हे इथे तिथे एकच आहे हे बघून आश्चर्य वाटलं. या सिनेमात टीनाची (केसीची कोच) भूमिका हुकूमशाही वृत्तीची द्योतक आहे. ती स्वतः केलेल्या चुका लपवून टॅलेंटेड नसलेल्या आपल्या मुलीला नंबर वन स्केटर बनवण्यासाठी प्रसंगी नको तो मार्ग वापरते तेव्हा पालकसुद्धा किती हीन पातळी गाठू शकतात हे दिसून येतं.

केसीची आई आणि कोच टीना या व्हिलन होऊ शकल्या असत्या पण पटकथा त्यांना मानवी पातळीवर ठेऊन त्यांच्या वागण्याचा विचार करून त्यांना समजूतदार बनवतो. त्यामुळे दोघीही वास्तववादी आया वाटतात.

सिनेमा हॉलीवूडचा असल्यामुळे कथा सांगण्यावर भर देणारा आहे. प्रेक्षकांनी यातून काय ते शिकावं हा उद्देश. मेलोड्रामाला फाटा देऊन उत्तम संवादाद्वारे कुठेही कंटाळवाणा न होऊ देता चांगल्या पटकथेद्वारे कळसाध्याय गाठतो.

ती यशस्वी होते का नाही हे महत्वाचं नाही तर आपल्या इच्छांचा बळी न देता स्वतः वर विश्वास ठेऊन जर मेहनत घेतली तर त्याचं फळ आपल्या बाजूचे असते असा सकारात्मक संदेश हा सिनेमा देतो. पालकांनी व त्यांच्या पाल्यांनी एकत्र बसून आवर्जून पहावा असा सिनेमा. आपण भारतीय यातनं काही शिकू हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न.

Comments