दहावी फ : वस्तुस्थितीपासून फारकत घेणारा सकारात्मक पलायनवादी
२००२ साली जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा मी नापास होण्याच्या तिसऱ्या वर्षात होतो (एकूण पाच वर्ष नापास होतो.). सिनेमा बघितला असता तर कदाचित त्यातील कथानकाला भारावून जाऊन रडलो सुद्धा असतो. नंतर जेव्हा बीएस्सी सोडून बीए केलं तेव्हा आपण किती भयानक अनुभवातून गेलो आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली. तसेच आजूबाजूची परिस्थिती या चित्रपटात दाखवलेली आहे तशी खचितच नाही हे पण लक्षात आलं. एमए नंतर हे अनुभव लिहून नापास मुलांची सद्यस्थिती काय आहे हे मांडावं म्हणून लातूर पॅ टर्न नावाची कादंबरी लिहिली. काल रात्री जेव्हा मी हा सिनेमा बघितला तेव्हा मी ज्या अनुभवातून गेलो त्याचं पडद्यावर दर्शन होईल अशी इच्छा होती पण सिनेमाने खूप म्हणजे खूपच निराशा केली. हा सिनेमा मला सकारात्मक पलायनवादी वाटला. यातील दाखवलेली गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते हे मान्य पण दिग्दर्शक-कथा-पटकथाकारांचा दृष्टीकोन शिक्षण घेणं हे किती गरजेचं आहे या वर भर देणारा वाटला. उदा. पट्या नावाचं एक पात्र आहे जे की त्याच्या काकाकडे राहत असतो. तो शाळा झाली की काकाला त्याच्या व्यवसायात मदत करत असतो. हा व याच्या तुकडीतले...