ज्युरासिक पार्क ३ डी

शिवाजी महाराजांच्या काळात भारतात पहिल्यांदा गोव्यात पोर्तुगीजांनी प्रिंटींग प्रेस आणली. महाराजांना हे माहीत होतं का नाही माहीत नाही पण त्यांनी नक्कीच स्वतःच स्वतःचं चरित्र लिहून त्यांच्या जन्माविषयीचा घोळ मिटवला असता. 

तंत्रज्ञान हे भूतकाळ जागं करायला नेहमीच कामाला येतं.

इतकं जुनं उदाहरण द्यायचं कारण म्हणजे काल ज्युरासिक पार्क परत एकदा थिएटरमधे बघितला पण थ्रीडीमध्ये वीस वर्षांनतर. आल्फ्रेड हिचकॉकच्या काळातच हे तंत्र निर्माण करण्यात आलं होतं. पण त्याने नाही वापरलं. मला मात्र या चित्रपटाने भूतकाळाची सैर घडवून आणली.

त्या वेळी मी आठवीत होतो. 

पुण्यातून ज्ञान प्रबोधिनी तर्फे छात्र प्रबोधन नावाचं मासिक चालवण्यात येतं. आमच्या शाळेतल्या वैद्य बाई त्याचं लातूरातलं काम बघायच्या. या मासिका तर्फे दरवर्षी व्यक्तिमत्व विकसन शिबीर भरवण्यात येतं. यात पहिल्या प्रथम इच्छुक मुलांना पुण्यात शिबीर कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण देण्यात येतं. मग त्या मुलांनी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिबीर घ्यायचं. मला धुळ्याला पाठवण्यात आलं. पुण्यात प्रशिक्षणासाठी आलो तेव्हा पेठेतून फिरताना ज्युरासिक पार्क चित्रपटाशी निगडीत वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या त्या मी बघत होतो. शिबिरापेक्षा चित्रपट बघायचा हेच डोक्यात होतं. शिबीर मेच्या शेवटी संपलं. 

जूनमध्ये आम्ही आमच्या गावी माणिकनगरला गेलो होतो. माझ्या वडिलांच्या मोठ्या काकांचं निधन झालं होतं. तिथे माझे गुलबर्ग्याचे काका पण आले होते. मी वडिलांच्या मागे लागलो होतो मला चित्रपट बघायचाच म्हणून कारण त्यावेळी लातुरात चित्रपट जवळ-जवळ सहा महिन्यांनी यायचा. तो पर्यंत चित्रपट प्रदर्शित झाला होता. मी अन् माझी बहीण काकांसोबत गुलबर्ग्याला गेलो. 

तिथं संगीता नावाच्या थिएटरमध्ये चित्रपट बघितला. डायनासोर अंगावर आले होते. शेवटाकडे डॉ. सॅट्लर पार्कची वीज चालू करण्यासाठी शेडमध्ये जाते. चालू केल्यानंतर वेलॅसिरॅप्टर तिच्यावर हल्ला करतो तो प्रसंग माझ्या मनात कित्येक दिवस होता. रात्री अपरात्री अन् खासकरून बाथरूममध्ये गेल्यावर तिथल्या एखाद्या कोपऱ्यातून तो वेलॅसिरॅप्टर हल्ला करेल का असं वाटायचं. पुढे कित्येक महिने तो प्रसंग जसाच्या तसा आठवायचा. 

सुरुवातीला मी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं ते यासाठी की या चित्रपटाने माझा भूतकाळ समोर आणला. शाळेत असताना मला कोणी म्हटलं असतं की पुढे चालून तु स्वतःच्या आयुष्यावर बेतलेली कादंबरी लिहिशील (आणि एक अप्रकाशित). स्वतःला एक लेखक म्हणवून घेशील. तर मी म्हणालो असतो, "ए गपे, बुशारीदाना. जास्ती नको बोलू. चल चा पाज." 

गेल्या वीस वर्षात किती गोष्टी घडल्यात. शाळेचा तो काळ असा होता जेव्हा फक्त दिवास्वप्न बघायची असतात. आपण काय आहोत, आपली काय औकात आहे, आपल्या पिढीच्या जाणीवा काय आहेत हे असले पोचट प्रश्न मनाला पडत नाहीत. पुढे बारावी पास झाल्यावर घेतलेला निर्णय माझं आयुष्यच बदलून टाकणारा ठरला याची पुसटशी शंका सुद्धा तेव्हा नव्हती. अगदी एखाद्याने मला क्रिस्टल बॉल आणून त्यात दाखवलं असतं तरी मी त्याला ठोकून काढलं असतं. त्या काळात मला डॉक्टर व्हावं असं वाटायचं. आज जेव्हा आपला रस्ता चुकलाय असं दिसतं तेव्हा आपण किती निर्बुद्ध होतो याची जाणीव होते. आपल्या पिढीचं सँडव्हीच झालय हे लक्षात यायला सुद्धा या वीस वर्षातली दहा वर्षे जायला लागली. हा भूतकाळ मी दडवू पाहत होतो. पण मी जसजसा मोठा होता चाललोय तसतसा तो माझा गळा आवळत चाललाय असं वाटतंय. 

स्पीलबर्गच्या गावी सुद्धा नसेल की आपण व्यावसायिक दृष्टीकोनातून बनवलेला एक चित्रपट दूरदेशी लातूर नावाच्या शहरात राहणाऱ्या एका मुलाच्या आयुष्यावर परिणाम तर करेलच पण त्याच्या तीस वर्षांच्या आयुष्याचा अविभाज्य भागसुद्धा बनेल. म्हणूनच वर म्हणल्याप्रमाणे तंत्रज्ञान हे भूतकाळ जागं करायला नेहमीच कामाला येतं. माझ्यासाठी ११ जून १९९३ आणि ५ एप्रिल २०१३ नेहमीच स्मरणात राहतील. १९९३ मधलं तिकीट आज माझ्याकडे नाही पण २०१३ मधलं मी जपून ठेवलय.

Comments