अनरउबिक आणि प्रकाशक
परवा मंगळवारी सकाळी देशमुख आणि कंपनीच्या विनय हर्डीकरांना फोन लावला. त्यांना म्हणालो, "मागच्या महिन्यात एक हस्तलिखीत दिले होते. त्याबद्दल अभिप्राय हवा होता." ते म्हणाले, "मी ते वाचलंय. तू ते कार्यालयात येउन घेऊन जा." बुधवारी सकाळी कार्यालयात जाऊन हस्तलिखीत घेऊन आलो. देशमुख आणि कंपनी (पुणे) हे तिसरे प्रकाशक ठरले ज्यांनी अनरउबिक नाकारली. पहिले दोन म्हणजे पॉप्युलर प्रकाशन (मुंबई) आणि अनुबंध प्रकाशन (पुणे). यानंतर मेनका प्रकाशन (पुणे), सायन प्रकाशन (पुणे), अनुबंध प्रकाशन (पुणे), गोल्डनपेज प्रकाशन (पुणे), जनशक्ती वाचक चळवळ (औरंगाबाद) यांनी सुद्धा नाकारली किंवा काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना स्वीकारता आली नाही. लोकवाङ्मय गृह (मुंबई) नी वेळेअभावी प्रकाशित करायची असमर्थता दर्शवली.
गेल्या एक ते दोन वर्षांपासून मी प्रकाशकांना भेटतोय पण एकही जण त्याबद्दल ना बोलायला तयार आहे ना अभिप्राय द्यायला. त्यामुळे छापील आवृत्ती निघण्याचे दिवस मागे-मागे पडत चाललेत. काय करावे ते कळत नाही.
- मी चांगला लेखक आहे का? असेन तर मग प्रकाशक का छापत नाहीत?
- मी वाईट लेखक असेन का? असल्यास कशा प्रकारचा? किंवा माझ्या लिखाणात काही चूक आहे का?
- मला वाटायला लागलय की माझ्या मूल्यदृष्टीत काही दोष तर नाही. जर असेल तर नेमकं काय आहे?
- मी जर माझ्या मनात असेल त्या पद्धतीने मांडत असेन तर ते चुकीचं आहे का?
- या पुढचे लिखाण करावे की न करावे!!! की लेखक होण्याला तिलांजली द्यावी?
- आजपर्यंत बऱ्याच परदेशी अन् देशी लेखकांचे वाचन केले आहे आणि शिकलो पण आहे मग माझा साहित्याकडे बघण्याचा दृष्टीकोण चुकीचा आहे का?
- साहित्यामध्ये आजूबाजूच्या परिस्थितीचं प्रतिबिंब पडावं किंवा त्यातील त्रुटी दाखवून त्यावर चिकित्सा करावी किंवा भाष्य करावं असं कुठंतरी वाचल्याचं आठवतं मग मी जे लिहिलंय ते नेमकं काय आहे त्रुटी, चिकित्सा की भाष्य?
- साहित्य हे अभिजातच असावं असा प्रवाद आहे का? प्रत्येक कुठल्याही साहित्याची निर्मिती ही दर्जेदारच असावी का? जर समजा एखाद्या लेखकाला काही गोष्टींचं स्वरूप हे वेगळ्या पद्धतीने दिसत असेल तर अन् त्याने ते प्रामाणिकपणे मांडले असेल तर त्यास विरोध का व्हावा?
- लिहिलेली प्रत्येक गोष्ट छापली गेलीच पाहिजे असं नसतं तरी लिहिलेल्या संहितेतून काही प्रिय/लोकप्रिय गोष्टींवर भाष्य केलं असेल तर ते न छापून आपण लेखकाच्या प्रामाणिक मेहनतीला व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालतोय असं नाही का वाटत?
- लेखकाने परखडपणे लिहिले असेल तर ते न छापता आपण दर्जेदार साहित्यालाच व्यासपीठ देतोय हा प्रकाशकांचा दावा फोल ठरत नाही का? आजही प्रकाशक स्वतःवर अन् लेखकावर रिस्क घ्यायला का तयार नसतात?
- आजच्या तरुणांनी लेखन करायला हवे असं ज्येष्ठ लेखक अन् प्रकाशक म्हणतात मग माझ्यासारख्या तरुणाने पोटतिडकीने लिखाण केल्यावर ते छापायला, अभिप्राय द्यायला हे ज्येष्ठ म्हणवणारे लेखक अन् प्रकाशक टंगळमंगळ का करतात?
इतक्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मला कधी मिळतील माहित नाही. ही कादंबरी वाचल्यावर माझा एक लातुरातील मित्र म्हणाला होता, "या कादंबरीबद्दल विसरून जा. तू मेल्यावरच ही कादंबरी प्रकाशित होईल कदाचित नाही सुद्धा." त्याचे शब्द खरे न ठरोत ही सदिच्छा.


Comments