ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम : वाचनीय पण…

कविता महाजन या गांभीर्याने लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. त्यांच्या ब्र आणि भिन्न या दोन कादंबऱ्या वाचकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. खासकरून ब्र तर सर्वांची आवडती कादंबरी ठरली. बऱ्याचदा चर्चेत आणि स्त्री वाचकांच्या बोलण्यात आपण त्यातल्या प्रफुल्लाशी रिलेट झालो आहोत असा अभिप्राय येतो. 

त्यानंतरची भिन्न एड्स आणि त्या अनुषंगाने समाजाचा उभा छेद दाखवणारी कादंबरी बरीच चर्चिली गेली. नुकतीच प्रकाशित झालेली ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम ही कादंबरी सिनेमा-नाटकात काम करणाऱ्या स्त्रीचं आत्मचरित्र असणारी कादंबरी आहे.

पद्मजा सप्रे असं नायिकेचं नाव. ती लहानपणापासून सिनेमा-नाटकात कामं करत आली आहे. परिस्थितीमुळे तिला पहिल्यांदा सिनेमात काम मिळते. त्यामुळे तिचं घर उभं राहणार असतं. समोर येईल त्या परिस्थितीला तोंड देत पद्मजा आयुष्य जगते. पुढे तिला कुठल्याही पुरुषापासून सुख मिळत नाही म्हणून ती एकट्याने एका मुलीला जन्माला घालते. तिचं पालनपोषण करून स्वतःसारखी स्वतंत्र विचाराची स्त्री बनवते. जन्म दिलेली आई त्रास देते म्हणून समाजाचा रोष पत्करून तिला एका फ्लॅटमध्ये ठेवते. दोन लग्न आणि बऱ्याच पुरुषांना तिच्या आयुष्यात स्थान आहे. त्यांना गुण-दोषासकट मोकळेपणाने स्वीकारते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार न करता आयुष्य जगते. बिनधास्त व्यसनं करते. एकूण चौकटीत जगणे या गोंडस वाक्याला फाट्यावर मारत आयुष्य काढते.

वरील परिच्छेदावरून आशयसूत्राबद्दल एक चित्र तयार होईल पण ते अपुरं आहे कारण यात एक रहस्य आहे. जे की कादंबरीच्या एका टप्प्यावर वाचकाला सांगितलं जातं. रहस्य जरी असलं तरी ते धक्का म्हणून येतं. कादंबरीच्या सुरुवातीपासून वाचकाला तिच्या आयुष्याविषयी कथाबाह्य आणि कथांतर्गत निवेदनाद्वारे सांगितलं जातं. कथाबाह्य-कथांतर्गत निवेदन असलं तरी निवेदकाचं सर्वसाक्षी असणं सुटत नाही. कथानक बऱ्याचदा कोणत्याही संघर्षाशिवाय सरधोपट पद्धतीने कथन करण्यात येते. हा कादंबरीचा मोठा दोष आहे. वाचकाच्या विचारक्षमतेला खुराक द्यावा अशा पद्धतीने कथानकाची रचना करण्यात आलेली नसल्यामुळे निवेदन काही ठिकाणी सपक वाटायला लागतं. नॉन-लिनिअर निवेदन झालं असतं तर कादंबरी वाचकाला खिळवून ठेवता आली असती पण बऱ्याच ठिकाणी तश्या शक्यता दिसत असून सुद्धा लेखिका त्याकडे दुर्लक्ष करून वास्तववादी निवेदनाचा आधार घेते. खरंतर हा कादंबरीचा दोष नसून लेखिकेच्या मूल्यदृष्टीचा दोष आहे असे म्हणावे लागेल. 


अशा पद्धतीचा अवलंब या पूर्वीच्या दोन्ही कादंबऱ्या ब्र आणि भिन्न मध्ये केलेला आहे. या कादंबरीत त्या तेथील चुका टाळतील अशी अपेक्षा होती, जी फोल ठरली. दुसरा दोष म्हणजे पृष्ठसंख्या. चारशे पस्तीस पानांची कादंबरी वाचताना दमवते. तिच्यावर लेखिकेने आणि संपादकांनी कठोरपणे संपादनाचे संस्कार करणे गरजेचे होते. पद्मजा तिच्या मुलीला विना-पुरुषाचं जन्म द्यायचा निर्णय घेते तेव्हा वाचकाला त्यामागील वैज्ञानिक कारण आणि कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या जातात. त्या सांगितल्या नसत्या तरी चालल्या असत्या. कारण वैज्ञानिक आणि कायदेविषयक माहिती वाचक नंतर समजावून घेऊ शकतो. मानवी नात्यातले ताणेबाणे, हेवेदावे, रुसवेफुगवे यात येत नाहीत. यातून त्यांची व्यक्ती म्हणून चित्र उभं करता आलं असतं ते इथं केलं जात नाही तर फक्त निवेदनावर काय वस्तुस्थिती होती हे विषद केलं जातं. अशा पद्धतीने माहिती वाचताना डॅन ब्राऊनच्या द दा विन्सी कोड ची आठवण येते. त्यात प्रचंड माहितीचा डोंगर वाचकांवर लादला जातो अन् कथनाला दुय्यम स्थान मिळतं. कथनाला पूरक म्हणून माहितीचा उपयोग व्हावा नाहीतर वाचक कंटाळण्याची शक्यता असते.

एकुणात ब्र आणि भिन्न नंतर कविता महाजनांबद्दल अपेक्षा वाढलेल्या होत्या त्या यात पूर्ण होत नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. 

Comments