बागी : मसालेदार कडबोळं

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक गणेश मतकरी काही वर्षांपूर्वी एका साप्ताहिकात ‘हॉलीवूड-बॉलीवूड’ नावाचा सदर चालवायचे. ‘सिनेमा चोरांचा आत्मविश्वास’ या शीर्षकाने त्यांनी ‘चॉकलेट’ सिनेमाची समीक्षा केली होती. सिनेमा हॉलीवूडच्या कुठल्या कुठल्या सिनेमांवरून प्रेरित आहे किंवा थेट प्रभावित आहे याची त्यात उदाहरणं दिली होती. तरीही त्यांना निर्माता-दिग्दर्शकाच्या सिनेअभ्यासाचं कौतुक वाटत होतं. इंटरनेट, अवैध डीव्हीडींचा सुकाळ, इंग्लिश मुव्ही चॅनल्सची वाढती संख्या त्यामुळे जे हॉलीवूड व जागतिक सिनेमे इथे अधिकृतपणे प्रदर्शित होत नाहीत त्यांना बघण्याची, अभ्यासण्याची झालेली खूप मोठी उपलब्धी. पण त्याचा उलटा परिणाम झाला असं त्यांचं म्हणणं होतं. 

हॉलीवूड किंवा कुठल्याही सिनेमाचा प्रभाव असला तरी त्यांची कथा सांगण्याची शैली, सर्व शक्यतांचा विचार करून लिहिलेली पटकथा, त्यानुसार चित्रीकरणात किंवा  तांत्रिक गोष्टीत चोखाळलेली वेगळी वाट वगैरे बाबींमुळे त्यांचे सिनेमे प्रभावी ठरतात. हे न उचलता आपल्याकडे चटकन व्यावसायिक यश मिळवण्यासाठी अनधिकृतरित्या त्यांच्या नकला केल्या जातात याचा त्यांना विरोध होता. हे सविस्तर सांगायचं कारण नुकताच प्रदर्शित झालेला ‘बागी’ हा असाच एक सिनेमा आहे.

रॉनी (टायगर श्रॉफ) हा केरळातल्या करालीपयट्टू स्कूल ऑफ मार्शल आर्ट्समध्ये दाखल झालाय. वाटेत येताना रेल्वेत त्याची सिया खुरानाशी (श्रद्धा कपूर) ओळख होते. बघता क्षणी तिच्या प्रेमात पडतो. करालीपयट्टू शिकण्यासाठी येतो कारण तो लहानपणापासून बागी असतो आणि कुठलीही एक गोष्ट धड शिकत नाही. त्याच्या वडिलांच्या मित्राच्या स्कूलमध्ये काहीतरी शिकून तो माणसात येईल असा त्यांचा कयास असतो. इकडे रॉनीची परत एकदा सियाशी गाठ पडते. 

ते हळूहळू जवळ यायला लागतात. पण तिच्या वडिलांच्या (सुनील ग्रोवर) वागणुकीमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. कराटे शिकवणाऱ्या गुरूंचा मुलगा राघव (सुधीर बाबू) सुद्धा सियाच्या प्रेमात असतो. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो वाट्टेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. त्यासाठी तो विरोध करणाऱ्या वडिलांचा खून करतो. रॉनीसाठी आता बऱ्याच गोष्टींचा उलगडा करणं क्रमप्राप्त ठरतं.

दिग्दर्शक साबीर खान व पटकथाकार संजीव दत्त यांचा हॉंगकॉंग सिनेमाने जागतिक प्रभाव असणाऱ्या मार्शल आर्ट्स सिनेमांचा खूप अभ्यास केलेला असावा कारण प्रेमकथा सोडली तर संपूर्ण कथानक हे अॅक्शन दृश्यांनी भरलेलं आहे. त्यामुळे नेहमीची ढोबळ प्रेमकथा व तिला अॅक्शनचा तडका असं दुहेरी प्रकार इथे आहे. नायक थेट स्वतःला सिद्ध करण्यासाठी करालीपयट्टू शिकायला येत नाही तर वडिलांच्या इच्छेला मान द्यायचा म्हणून. जर वडिलांच्या इच्छेला मान द्यायचा तर त्याला प्रेमकथेची जोड का हवी? याचं कारण भारतीय प्रेक्षक. 

प्रेमकथा असली की प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतात अन्यथा ते कराटेचं प्रशिक्षण बघून कंटाळतील असा कयास पटकथाकार-दिग्दर्शकांना असावा. बरं प्रेमकथा तरी काहीतरी नाविन्यपूर्ण असणारी असावी तर तिथेही कल्पनेचा दुष्काळ. गाणी, प्रेमाच्या आणाभाका वगैरे नेहमीच्या बाबी घुसडलेल्या. कथानकाला खलनायक हवा म्हणून त्याला बंकॉकमधला अवैध गोष्टी करणारा मोठा डॉन केलेला. एवढं पुरेसं नाही तर तो केरळात आल्यावर बोट रेसमध्ये भाग घेऊन ती जिंकतो सुद्धा. त्यामुळे तो नेमका कोण आहे याचा उलगडा होत नाही. सोबत एका मुक्या मुलाचा धागा जोडलेला. जो रॉनीचा स्कूलमधला मित्र. तो तिथे का व कसा आला, त्याचं कथानकातलं स्थान कशासाठी निर्माण केलं याचं उत्तर देणं दिग्दर्शकाला अप्रस्तुत वाटतं. हे मुक्या मुलाचं पात्र थेट गोविंदाच्या ‘हत्या’मधील मुलावर बेतलेलं. त्याचं ‘या, या’ असं उच्चारणं सुद्धा तसंच. प्रत्येक गोष्टीचा भरणा असायलाच हवा या अट्टाहासामुळे सिनेमा कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाही. 

रॉनी मार्शल आर्ट्स शिकायला येतो तर ते खडतर असतं असं ऐकण्यात आलेलं. मग ती खडतरता इथे दिसणं अपेक्षित. इथे तो फक्त व्यायाम करतोय असंच दिसत राहतं. तो करालीपयट्टूमधील कौशल्य कधी आत्मसात करतो हे दिसून येत नाही. एका प्रसंगी तो जे काही शिकला त्याची आठवण गुरुजी करून देतात पण स्पार्रिंगमध्ये तो लीलया समोरच्याला लोळवतो याचं स्पष्टीकरण मिळत नाही. तीच बाब अॅक्शन दृश्यांची. ‘द थर्टी सिक्स्थ चेंबर ऑफ शाउलीन’ ते ‘द रेड रिडेम्शन’ पर्यंतचे सीन्स/सिक्वेन्सेस जसेच्या तसे कॉपी केलेले किंवा चोरलेले म्हणा हवं तर. गंमत म्हणजे करालीपयट्टू हे भारतीय मार्शल आर्ट्सचा प्रकार शिकणारा नायक मोई थाई, विंग चून, कुंग फू, सिलत, जीत कून दो वगैरे इतर मार्शल आर्ट्स प्रकारातील कौशल्य खलनायकाच्या टोळीला गारद करण्यासाठी अचानक कसे वापरतो याचं कोडं पडायला लागतं. 

तो हे कधी शिकला की आधीच शिकला होता; फक्त करालीपयट्टू शिकण्यासाठी तो केरळात आला होता असा याचा अर्थ होतो. दिग्दर्शक-अॅक्शन कोरिओग्राफर मात्र मस्तपणे याकडे दुर्लक्ष करतात. अॅक्शन दृश्यात आपण जे कला/कौशल्य वापरत आहोत त्याचा यथोचित वापर केला जावा ही साधी गोष्ट लक्षात घेतली जात नाही कारण वर म्हटल्याप्रमाणे चटकन व्यावसायिक यश मिळवणे महत्वाचे. बाकी सब झूट. 

करालीपयट्टूसारखा हजारो वर्षांची परंपरा असणारा मार्शल आर्ट्सचा प्रकार पण आजपर्यंत कधीच वापराला गेला नाही जसं हॉंगकॉंग सिनेमाने कुंग फूला जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे भारतीय सिनेमाला शंभर वर्ष झाली तरी एका विशिष्ट चित्रप्रकारात स्वतःच्या अशी कुठलीही शैली आजपर्यंत आपण निर्माण करू शकलो नाही. सर्व गोष्टींचं कडबोळं असणारा सिनेमा हीच आपली ओळख आजही कायम आहे. इतर सिनेमांचा सकृतदर्शनी प्रभाव आपल्याकडे अजुनही आहे. त्यामुळे त्यातील दृष्टी सौंदर्य उचलणं हेच काय ते वर्षानुवर्षे चालू आहे.

अभिनयासाठी कुणी हा सिनेमा बघणार असेल तर ते फोल ठरेल. अफाट अभिनय प्रतिभा असणाऱ्या बापाची मुलगी असणारी श्रद्धा कपूर अभिनय कसा करू नये याचा वस्तुपाठच घालून देते. शाम्पूच्या जाहिरातीतील मॉडेल्स जश्या असतात तशी ती भासते. टायगर श्रॉफ कमावलेलं शरीर असणारा चेहऱ्यावरील हावभाव दाखवू न शकणारा अभिनेता आहे. शरीर कमावण्यासाठी मेहनत घेणारे हे नट अभिनय पण शिकायचा असतो/शिकता येतो ही गोष्ट जाणूनबुजून दुर्लक्षित करत असावेत. सुधीर बाबू ह्या दाक्षिणात्य अभिनेत्याचा पहिलाच हिंदी सिनेमा. तोच काय ते अभिनय करतो. अॅक्शन दृश्यांमध्ये सुद्धा त्याच्यात लयबद्धता व सफाईदारपणा दिसते जी तुल्यबळ असणाऱ्या श्रॉफमध्ये असणं अपेक्षित होतं. प्रेमकथा म्हटली की गाणी ही हवीतच याच अट्टाहासाने अधेमधे पेरलेली. ती पण चटकन विसरून जाण्याच्या लायकीची.

‘चॉकलेट’ सिनेमा २००५ साली आलेला. गेल्या अकरा वर्षात खूप काही फरक पडलाय असं दिसून येत नाही. जोपर्यंत आपण जे मांडणार आहोत त्यावर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत सोपेपणाकडे आपण झुकत राहणार हेच ‘बागी’ नं परत एकदा अधोरेखित केलं आहे.

रेटिंग २/५

पूर्व प्रसिद्धी : ०१/०५/२०१६ मी मराठी लाईव्ह 

Comments