अझर : एक ना धड...

एखादं कथानक हे वास्तव जीवनातल्या व्यक्तीवर आधारित असेल तर ते किमान वास्तविक वाटणे आवश्यक आहे. तसेच तो ज्या काळाचा विचार करून बनवण्यात आला तो काळ नुसतं यथातथ्य उभं करणं अपेक्षित नाही तर बघणाऱ्या प्रेक्षकाला त्यातील संदर्भ लागणे सुद्धा गरजेचं आहे. कथानक नजीकच्या भूतकाळातील असेल तर त्यात तपशीलासोबत सामाजिक संदर्भ येणं योग्य ठरतं. भूतपूर्व क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन यांच्यावर सामना निश्चितीचे आरोप झाले. त्यासाठी त्यांच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली. तो काळ भारतीय क्रिकेटसाठी कसोटीचा काळ होता. ऐंशीच्या दशकापासून क्रिकेट विश्वावर स्वतःची मक्तेदारी स्थापन करणारा भारत देश एकदम सर्वांच्या चर्चेत आला. खेळात सुद्धा भ्रष्टाचार होऊ शकतो हे न पचणारं सत्य भारतीयांना पचवायला लागलं. अशा नजीकच्या भूतकाळावर आधारित सिनेमा बनवण्यात येतो तेव्हा तो वास्तविक घटनांना न्याय देतो का नाही हे बघावं लागतं. मात्र ‘अझर’ त्यांना न्याय देत नाही असं म्हणावं लागतं.

एका खोलीमध्ये एक क्रिकेटर एका पत्रकाराला भारतीय क्रिकेटमध्ये काय चाललंय हे सांगायला त्याच्या कॅमेरासमोर बसतो. त्याच्या म्हणण्यानुसार अझरने (इमरान हाश्मी) काही वर्षांपूर्वी भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात सामना हारण्यासाठी एका बुकीकडून एम. के. शर्माकडून (राजेश शर्मा) एक कोटी रुपये घेतलेले असतात. ही बातमी होते तेव्हा क्रिकेट असोसिएशन त्याच्यावर बंदी घालतात. बंदी उठवण्यासाठी अझर बरेच प्रयत्न करतो. शेवटी न्यायालयाचे दार ठोठावतो. आपला वकील मित्र रेड्डी (कुणाल रॉय कपूर) याला त्यासाठी तयार करतो. त्याच्या विरोधात क्रिकेट असोसिएशन तर्फे उभी असते वकील मीरा शर्मा (लारा दत्ता). ती स्वतः अझरची प्रचंड चाहती असते. पण अझरला शिक्षा ही झालीच पाहिजे यासाठी ती व्यक्तिगत बाबी बाजूला ठेवते.

निर्माती एकता कपूर, दिग्दर्शक टोनी डिसूझा वं पटकथाकार रजत अरोरा यांना मोहम्मद अझरूद्दीनच्या आयुष्यावर चरित्रपट बनवायचा आहे पण तो वास्तववादी करायचा नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडलेल्या नाट्यमय घडामोडी तेवढ्याच घ्यायच्यात. त्यांना कुणालाही दुखवायचं नाही यासाठी ते पळवाट शोधतात. सिनेमाच्या सुरुवातीलाच हा सिनेमा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीच्या जीवनावर आधारित नाही तर काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचं नाट्यमय रुपांतर आहे असं निवेदन देतात जेणेकरून त्यांना चित्रपटीय स्वातंत्र्य घेता यावं. इतकं सगळं दाखवल्यावर सुद्धा पात्रांची नावं अनाकलनीय वाटतील अशी ठेवतात. 

अझर, नौरीन, संगीता, रवी, नवज्योत, कपिल, मनोज, सौरव, सचिन, राहुल अशी प्रत्यक्षातल्या व्यक्तींचीच प्रथम नावे ते वापरतात. जे सुरुवातीच्या निवेदनाला फाटा देणारं ठरतं. तसेच अझरच्या आयुष्यात घडलेल्या जवळपास सर्वच घटनांना पटकथेत स्थान देतात तरी हा चरित्रपट नाही असं सुरुवातीला जाहीर करतात. असा अस्पष्ट संदिग्धपणा का व कशासाठी स्वतःवर लादून घेतात ते स्पष्ट होत नाही. त्या ऐवजी एखाद्या त्याच काळाशी साधर्म्य असणाऱ्या क्रिकेटरवर काल्पनिक कथा मांडली असती तर त्यात एकूण क्रिकेट निगडीत गोष्टींची चिकित्सा करता आली असती.

मुळात आपल्या इथे सन्माननीय व्यक्तींवर सिनेमे बनवतात तेव्हा त्यांच्याशी निगडीत कुठल्याही अशा गोष्टींची चर्चा करायची नाही की त्या कथेत वापरायच्या नाहीत जेणेकरून त्यातनं वादग्रस्तता निर्माण होईल जणू असा अलिखीत नियमच आहे. वादग्रस्तता टाळण्याकडेच भारतीयांचा कल जास्त. त्यामुळे कथानकात उरतं काय तर उथळपणा. हे असं सिनेमाचं एक ना धड... असणं प्रकर्षाने जाणवत राहतं. तसेच कुठल्याही कथानकाला प्रेम, नायक-नायिका यांच्या संबंधांना उगाचच ठिगळ लावल्यासारखं जोडण्याची हौस प्रेक्षकांना आशयापासून दूर ठेवते ही गोष्ट निर्माते-दिग्दर्शक अजूनही मानायला तयार नाहीत. मोहम्मद अझरूद्दीन, क्रिकेटसारख्या विषयात त्यावेळी नेमकं काय झालं याची उत्सुकता सर्वसामान्यांना असणार तीच जर दिसली नाही तर त्याचा हिरमोड होणार. असा हिरमोड करणं आपलं कर्तव्यच आहे या मिषाने हिंदी व्यावसायिक सिनेमांची जडणघडण झाली आहे. ‘अझर’ त्याला अपवाद ठरत नाही.

अभिनयात प्राची देसाई, लारा दत्ता, गौतम गुलाटी, कुणाल रॉय कपूर व इतर मंडळी विश्वसनीय काम करतात. संगीता बिजलानीसारखी न दिसणारी नर्गिस फाकरी ज्या दिवशी अभिनय करेल तो दिन तिच्यासाठी सुदिन ठरावा. इमरान हाश्मी मोहम्मद अझरूद्दीनसारखा बिलकुल दिसत नाही. अझरूद्दीनची मैदानावरची देहबोली तो उत्तमपणे आत्मसात करतो पण मुळात त्याच्या अभिनयाला खूपच मर्यादा असल्यामुळे त्याने कितीही प्रयत्न केले तरी ते तोकडेच वाटतात. तसेच क्रिकेटर्ससारखे दिसणारे अभिनेते भलेही ते नवीन असतील घेतले असते तर कदाचित त्यांचा प्रभाव पडला असता. पण वास्तवाच्या जवळ जायचच नाही असं ठरवल्यावर बाकी मुद्दे रद्दबातल ठरतात.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्वाचा काळ ज्यात एका सर्वसामान्य भारतीयाचा उद्यास्त बघितला गेला त्याला किमान पातळीवर न्याय द्यावा असा कुठलाही अट्टाहास नसणारा हा सिनेमा दारूण अपेक्षाभंग करतो हेच म्हणावे लागते. 

Comments