मला उद्धवस्त व्हायचंय् व इतर आत्मकथने
आत्मकथन हा मराठीतला स्थिरावलेला साहित्यप्रकार. आयुष्य जगताना आलेले अनुभव,
विशिष्ट विचारसरणी घेऊन केलेलं काम अशा असंख्य विषयांच्या अनुषंगाने लेखन झालं
आहे. त्यातही दलित आत्मकथन जास्त प्रमाणात चर्चिले गेले. त्यावर अभ्यास केला
जातोय. दलित साहित्य सर्वदूर पसरण्याचं व प्रभावित करण्याचं काम आत्मकथनांनी मोठ्या
प्रमाणात केलं हे तर सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर इतरांनी सुद्धा आपल्या वाट्याला
आलेले सुख-दु:ख कुठंतरी लिहून ठेवण्यासाठी आत्मकथन या साहित्यप्रकाराचा वापर केला.
त्याला प्रतिसाद चांगला मिळालाय हे पण बघण्यात आलंय.
आत्मकथानाला मर्यादा असते. ज्या व्यक्तीचे आत्मकथन आहे त्याने त्याच्या
आकलनातून जगाकडे बघून ते लिहिलं असल्यामुळे त्याच्या नजरेला, दृष्टीकोनाला मर्यादा
पडतात. सांगत असणाऱ्या वस्तुस्थितीचं सम्यक चिकित्सा होईलच याची शक्यता कमी असते.
आत्मकथन म्हणजे अन्याय झालेला असणं (सर्वच अर्थाने) हा प्रमुख विषयवस्तू असणं हे
सुद्धा दिसतं. काही काही आत्मकथन ही कंटाळवाणी तसेच आपल्याला व्यक्त व्हायचच आहे
या अट्टाहासाने लिहिलीयत असं जाणवतं. त्यामुळे गेल्या काही वर्षात आत्मकथनांची
पीछेहाट झालीय असं दिसतं.
खाली काही आत्मकथने गेल्या बऱ्याच वर्षात वाचण्यात आली त्याबद्दल थोडक्यात
लिहायचा प्रयत्न आहे.
मला उद्धवस्त व्हायचंय् – मलिका अमर शेख
मला उद्धवस्त व्हायचंय् बद्दल सन २००५-०६ साली थर्ड ईअरला
असताना एका मित्राने सांगितलं. सांगताना खूप तारीफ करत होता. ते आत्मकथन कसं
दुर्मिळ आहे व लातुरात मी कसं इथनं तिथनं शोध घेत वाचलं असं सांगून त्यानं उत्सुकता
वाढवली. पुस्तक मिळवायचच या इर्षेनं ज्या दोन ग्रंथालयांचा वर्गणीदार होतो तिथे
शोधाशोध केली. मिळालं नाही. कॉलेजच्या लायब्ररीत बघितलं तर कॅटलॉगला दाखवत होतं पण
प्रत्यक्षात ज्यांनी कुणी नेलं होतं त्यांनी वापस केलेलं नव्हतं. पुस्तक मिळणार
नाही याची आशा सोडून दिली होती.
अचानक काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एकाने पोस्ट टाकली की
दुसऱ्या आवृत्तीतनं पुस्तक परत येत आहे. दोनेक दिवसांपूर्वी सध्या चालू असलेल्या
पुस्तक प्रदर्शनात पुस्तक मिळालं. त्याच रात्री जवळपास संपूर्ण वाचून काढलं. एकूण
ऐकलेल्या गोष्टींपेक्षा पुस्तकाने वेगळच विश्व दाखवलं. शाहीर अमर शेखची मुलगी नंतर
नामदेव ढसाळची पत्नी ते स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणारी कवयित्री असा प्रवास यात
दिसतो. असं असलं तरी हा प्रवास असंख्य अडचणी व अनपेक्षित घटनांचा आहे. नामदेव ढसाळांसोबत
झालेलं लग्न पुढील आयुष्यासाठी प्रचंड मनस्तापाचं ठरलं. दलित पँथर व नामवंत कवी
असणारा हा व्यक्ती खाजगी आयुष्यात मात्र बायकोला समाजमान्य प्रतिष्ठा देताना
कचरतो. का कचरतो याची कारणं मलिका देतात पण मीमांसा न करता. ती कारणच राहतात
त्यांच्या पाठीमागं असणाऱ्या माणसाची मानसिकता जोखायाचा प्रयत्न करत नाहीत.
त्यामुळे नामदेव ढसाळ हा जगासाठी मोठ्या असणाऱ्या माणसाचं खाजगी आयुष्य कसं होतं
इतकंच वाचकाला कळतं.
निवेदन शैली सुद्धा संज्ञा प्रवाहासारखी तुकड्या तुकड्यात
चित्र उभं करणारी. घटना, प्रसंग कधी घडले याचा तपशील मिळत नाही. त्याला ढसाळांचा
स्वभाव सुद्धा कारणीभूत ठरतो कारण खूप गोष्टी बायकोशी शेअर करायच्या नाहीत किंवा
तिला विश्वासात घ्यायचं नसल्यामुळे मलिकाला नेमकं बाहेर काय झालं याचा पत्ता
नसायचा. त्याचं प्रतिबिंब तपशिलाच्या कमतरतेत राहतं. तरीही हे आत्मकथन महत्वाचं
ठरतं ते काळाचा पट उलगडून दाखवण्यासाठी.
नाच ग घुमा – माधवी देसाई
मला उद्धवस्त व्हायचंय् वाचायला मिळालं नाही पण ज्या
ग्रंथालयांचा वर्गणीदार होतो तिथे हे मिळालं. तेव्हा त्याला दमाणी पुरस्कार
मिळाला होता. एका बैठकीत वाचून काढलं. ही सुद्धा एका लेखकाच्या पत्नीची कहाणी.
त्यातही दुसऱ्यांदा लग्न झालेल्या. रणजीत देसाई मराठीतलं मोठं नाव. त्यांची पत्नी
होण्याचं भाग्य लाभलं असं त्यांना सुरुवातीला वाटतं पण देसाईंचा तुटक स्वभाव
आपल्याला समजून घ्यायला कमी पडतोय असं माधवींना वाटत राहत. पहिल्या लग्नापासून
झालेली मुले व देसाईंना पहिल्या लग्नापासून झालेल्या मुली यांना सांभाळत स्वतःचं
अस्तित्व टिकवायचं की शोधत बसायचं या कात्रीत त्या सापडलेल्या.
हे सर्व सांगण्याची शैली मात्र एखाद्या सिनेमाला शोभेलशी.
वर्तमान व भूतकाळाची सरमिसळ करण्यासाठी फ्लॅशबॅक तंत्राचा वापर खूपच सुंदर. यामुळे
एकरेषीय कथानक सांगण्याची पद्धत असणाऱ्या आत्मकथानांपेक्षा हे वेगळं ठरतं. याचा
परिणाम म्हणजे सांगितलेल्या घटना, प्रसंग दीर्घकाळ स्मरणात राहतात.
दोन्ही आत्मकथनात असणारे सामाईक गोष्ट म्हणजे आधीच
स्व-कर्तृत्वाने मोठ्या झालेल्या माणसाची पत्नी होताना समाजाकडून असणाऱ्या
अपेक्षांबरोबर त्या व्यक्तीच्या न उलगडणाऱ्या स्वभावाला तोंड देत सगळं सहन करणं
अत्यंत जिकरीचं व मनस्तापाचं काम त्यांना करायला लागणं. इथे वसंत कानेटकरांच्या हिमालयाची
सावली नाटकाची आठवण येते. नाटकात एका महर्षी धोंडो केशव कर्वे सदृश माणसाने
उपसलेल्या कष्टामुळे त्याच्या पत्नीला उचलाव्या लागलेल्या कष्टाची व काही प्रमाणात
अवहेलनेची कहाणी येते. माधवी देसाई व मलिका अमर शेख त्यातील स्त्रीच्या
वास्तवातल्या आवृत्ती भासतात. खासकरून मलिका अमर शेख जास्तीच त्या व्यक्तिरेखेच्या
जवळ गेलेल्या वाटतात. एकुणात लेखकाच्या काल्पनिकतेला वास्तवाने दिलेला पुरावाच
ठरतात हे.
आपुला चि वाद आपणांसी – चंद्रकांत
वानखडे
एका कार्यकर्त्याचे
आत्मकथन असं वानखडेंच्या आत्मकथनाच्या नावासोबत लिहिलेलं आहे. ते
कोण होते व त्यांनी काय प्रकारचं कार्य केलं असेल याची चटकन ओळख ते करून देतं. हिंदी सिनेमात शीर्षकासोबत
टॅग लाईन असते (जी अनावश्यक व निरर्थक असते.) तसं इथे आहे. त्याने पुस्तकाबद्दलची
उत्सुकता कमी होते. मराठी कादंबऱ्यांच्या ब्लर्ब वाचला की कादंबरी वाचल्याचं
समाधान मिळत कारण कादंबरी वाचून जो निष्कर्ष वाचकांनी काढलेला असतो तोच
ब्लर्बमध्ये लिहिलेला असतो त्यामुळे बऱ्याचदा कादंबरी वाचण्याचे कष्ट कमी होतात. आपुला
चि वाद आपणांसी या शीर्षकावरून वाचकांनी फार उत्सुकता दाखवू नये असा कयास
प्रकाशक/लेखकाचा असावा म्हणून ते टॅग लाईन दिली असणार.
नावावरून हे खरंच स्वतःशी चालणाऱ्या झगड्याचं आत्मकथन असणार
हे लक्षात येतं. त्या नुसार ते आहेच आहे. चंद्रकांत वानखडेंनी तरुणपणीच
समाजकार्याला वाहून घ्यायचं ठरवलं. घरून विरोध होता. ते राहत असलेल्या
विदर्भातल्या एका खेडेगावातून व आसपासच्या परिसरात जमतील तशी कामे करू लागले.
त्यांच्या विचारांना मानवणाऱ्यांसोबत त्यांची वाटचाल चालू झाली. मधल्या काळात
पत्नी पण अशी मिळाली जिला समाजकार्यात जीवन व्यथित करायचं होतं. आंतरजातीय विवाह
होता तरी समाजाचा रोष पत्करून त्यांनी केला.
आणीबाणीच्या काळात पुण्यातल्या येरवडा तुरुंगाची सैर झाली.
तिथे जक्कल-सुतार जोडगोळीची झालेली ओळख त्यांना त्यावेळच्या भरकटलेल्या तरुणाईबद्दल
खंत वाटणारं वाटली. त्यावेळच्या तरुणाईने काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यासाठी
प्रयत्न करावेत असं त्यांना वाटतं. पुढे समाजकार्य करता करता नेमकं आपलं काय
चुकलं, चळवळीचं फळ काय, चाकोरीबद्ध आयुष्य न पत्करता एका विशिष्ट पद्धतीने
जगण्याचा निर्णय घेतल्यावर आपल्या हातात काय आलं याचा लेखाजोखा ते मांडतात.
यात जवळपास मागील तीस-चाळीस वर्षात घडलेल्या घटनांचा
उल्लेख येतो त्यामुळे चित्र उभं राहायला मदत होते. जे की वरील दोन आत्मकथनात होत
नाही. वानखडे प्रांजळपणे त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांचा आढावा घेतात त्यामुळे एका
काळाचं हे दस्तावेजीकरण ठरतं.
कोल्हाट्याचं पोर – किशोर
शांताबाई काळे
ज्याला इंग्रजीत बिल्डंग्जरोमान म्हणतात अशा अर्थाचं
हे आत्मकथन आहे. बिल्डंग्जरोमान हा इंग्रजी कादंबरीचा प्रकार ज्यात नायकाचं
लहानपणापासून ते वयात येईपर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केलेला असतो. इथे किशोर काळेंनी
त्यांच्या बालपणापासून ते डॉक्टर होईपर्यंतचा प्रवास रेखाटला आहे. एका अर्थाने बिल्डंग्जरोमान
नसला तरी त्याच्या जवळपास जाणारं. कोल्हाटी जातीत झालेला जन्म, वडील कोण याचा
पत्ता नसणे त्यामुळे आईच्या नातेवाईकांकडे अपमानास्पद जगणं त्यांच्या वाटी आलं.
त्यातही वाटचाल करत त्यांनी डॉक्टरी अभ्यासक्रम पूर्ण केलं. हेच त्यांचं यश.
या आत्मकथनाबद्दल बरंच ऐकलेलं व वाचण्यात आलेलं. कोल्हाटी
समाज कसा उपेक्षिताच जीणं जगतोय याचं पहिल्या प्रथम केलं गेलेलं विवेचन असल्यामुळे
त्याला प्रसिद्धी पण मिळालेली. साधारण ९९-२००० सालच्या शैक्षणिक वर्षात बीकॉमला
अडमिशन घेतलेलं. कॉमर्सचा अभ्यास करायचा सोडून अवांतर वाचनाच्या नावाखाली
जे वाचन व्हायचं त्यात हे लक्षात राहण्यासारखं झालेलं वाचन. सामाजिक उतरंडीची म्हणा
किंवा एकूणच जगण्यातली विसंगती ओळखू यायला लागली होती. हे आत्मकथन वाचल्यावर
आपल्या काय पद्धतीच्या वातावरणात राहतोय याचा पत्ता लागायला लागला. त्यामुळं हे
आत्मकथन वाचनातला महत्वाचा पडाव म्हणून नेहमीच लक्षात राहणारं.
काळे व वानखडेंच्या आत्मकथनात त्यांच्या व्यक्तिगत परिघा व्यतिरिक्त
एकूण समाजाचं चिंतन तसेच सजगता दिसून येते. ही सजगता सामाजिक, आर्थिक, राजकीय
अंगाने जाते त्यामुळे त्यातनं एक पूर्ण चित्र उभारल्याचं दिसतं. आयुष्याकडे बघण्याचा
दृष्टीकोन तसेच उत्तम वाचन सुद्धा त्याला कारणीभूत आहे. अर्थात चारी आत्मकथनांना
ते लागू होतं. एकुणात आत्मकथने लिहावीत जेणेकरून त्या त्या व्यक्तीचा परिप्रेक्ष
तर दिसतोस सोबत काळाचा एक पट उभा राहायला मदत होते.



Comments