मदारी: चेहरा नसलेल्याची असहाय्यता

हिंदुस्तानी सिनेमातला भ्रष्टाचाराला विटलेला म्हातारा नायक सेनापती हातात हत्यार घेतो तर नायक सिनेमातला न्यूज रिपोर्टर शिवाजी राव राजकारणांच्या कोडग्या वृत्ती विरुद्ध लढण्यासाठी एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याला तयार होतो जेणेकरून व्यवस्थेच्या आतून त्याची स्वच्छता करता येईल. दोन्हीकडे भारतातील सरकारी यंत्रणेतला सर्वच पातळीवर होणारा भ्रष्टाचार हा विषय केंद्रस्तानी होता. त्यातील नायकांना त्यांच्या कुवतीनुसार ते करायचं होतं. सिनेमाच्या काळाच्या चौकटीला झुकारून अशक्य वाटतील असे अवास्तववादी कृत्यही त्यांनी केलेले आहेत. दोन्ही सिनेमे किंवा या आधी या विषयांवर आलेले सिनेमे भ्रष्टाचारच्या मुळाशी न जाता वरवर त्यावर चित्र चौकटीला शोभतील असे उत्तर देऊन कथा मांडायचे. निशिकांत कामत दिग्दर्शित मदारीमध्ये हाच विषय थोड्या अधिक नीट पद्धतीने आलाय असं म्हणता येईल.

देहरादूनमधून रोहन गोस्वामीचं (विशेष बन्सल) अपहरण होतं. रोहन केंद्रीय गृहमंत्री प्रशांत गोस्वामींचा (तुषार दळवी) मुलगा असतो. केंद्रीय मंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर संपूर्ण सरकारी यंत्रणा त्याला शोधण्यासाठी कार्यान्वित केली जाते. मंत्री सक्षम पोलिस ऑफिसर नचिकेत वर्माकडे (जिमी शेरगील) केस सोपवतात. नचिकेत लवकरच त्याच्यापर्यंत पोचतो. कुणी निर्मल कुमार (इरफान खान) नावाच्या माणसाने त्याचं अपहरण केलेलं असतं. त्याने ते का केलं, कशासाठी केलं, त्याचा नेमका उद्देश काय असतो याची उत्तरं तोच देऊ शकणार असतो. त्यासाठी प्रशांत व नचिकेत त्याला जंग जंग पछाडत असतात.

शैलजा केजरीवाल यांच्या कथेवर रितेश शाह व रितेश शाही यांनी पटकथेचे संस्कार केले आहेत. त्यांनी संस्कार करताना सुरुवातीला उल्लेखलेल्या ढोबळ गोष्टींना फाटा देऊन कथा सांगण्यावर भर दिलाय त्यामुळे निर्मल कुमारच्या भूतकाळाला आलेलं महत्व इथे त्याच्या कृतीची कारणमीमांसा म्हणून येतं. त्यांनं घेतलेला निर्णय का व कसा योग्य आहे हे बिंबवण्यात ते यशस्वी झाले आहेत. पूर्वीच्या कथानकात नायकाने थेट भाषणबाजी करून चटकन कृती करण्यावर भर देत जेणेकरून प्रेक्षक त्याला भारावून जाऊन टाळ्या पिटत असे. हे तात्पुरतं भारावून जाणं प्रेक्षकांना आवडून गेलं होतं. इथे पटकथाकार व दिग्दर्शक सर्वसामान्य असणाऱ्या निर्मल कुमारला त्याची मानसिकता तशी का झाली हे दाखवतात वरतून तो एक वडील असल्याने त्याचा प्रेमळपणा पण अधोरेखित करतात.

जी गोष्ट व्यवस्थेत होत नाही त्यासाठी सर्वसामान्य माणसाने हातात शस्त्र घेणं गरजेचं आहे असा संदेश सिनेमा द्यायचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो थ्रिलरचा आधार घेतो. तरीही डीजेच्या गँगने भ्रष्टाचाराविरुद्ध रक्तरंजित क्रांतीचा आधार घेणं किंवा मुन्नाभाईने गांधींचा आधार घेणं जितकं प्रभावी ठरतं तितकं हे ठरत नाही. कारण कथानकाचा सूर सुरुवातीला सांगितलेल्या सिनेमांच्या आक्रस्ताळी मांडणीला संयत मांडणीत केल्यामुळे आहे. निर्मल कुमार काही चांगले प्रश्न उपस्थित करतो पण ते प्रेक्षकांपर्यंत न पोचता भाषणबाजीला टाळून; विषय न समजणाऱ्या विद्यार्थ्याने उपस्थित केलेल्या प्रश्ना इतपतच राहतात. त्यामुळे हिंदुस्तानी व नायक सिनेमे दाक्षिणात्य भडकपणा सोडला तर कसे पेश गेले असते तसा मदारी राहतो. दिग्दर्शक निशिकांत कामत यांची रॉकी हँडसममध्ये अप्रभावी ठरलेली कामगिरी इथे थोडी सुधारली आहे. ते त्यांच्या सुरुवातीच्या सिनेमांपासून कोसो दूर आलेत हे पण तितकंच खरं आहे.

सर्वच अभिनेत्यांचा उत्तम अभिनय व अविनाश अरुणचं सुंदर छायाचित्रण ही सिनेमाची जमेची बाजू. सुरुवातीपासून सतत वाजणारं पार्श्वसंगीत थोडं नियंत्रणात ठेवता आलं असतं तर प्रेक्षकांना पात्र काय बोलतायत ते कळलं असतं. पण दिग्दर्शक याकडं साफ दुर्लक्ष करतो. तरीही सिनेमा खिळवून ठेवतो.

चेहरा नसलेल्या सर्वसामान्य माणसाची असहाय्यता ही चर्चेचा विषय होऊन बसलेल्या काळात तयार उत्तरं देणारा सिनेमा थ्रिलर रुपात मनोरंजन करतो इतकंच म्हणता येईल.

रेटिंग: ३/५ 

Comments