प्रतिमा संवर्धनाचा सोस
चरित्रपट किंवा कुठल्याही गंभीर विषयावर सिनेमा
लिहिताना त्यातील वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवूनच लिहायला हवेत असा एक गैरसमज
आपल्या इथे आहे. त्यामुळेच उडता पंजाबसारख्या सद्यस्थितीवर आधारित सिनेमाला विरोध
करताना अनावश्यक मुद्द्यांची चर्चा केली जाते. प्रसंगी बंदी घालण्याची भाषा केली
जाते. आक्षेपार्ह गोष्टी काढून टाकव्यात म्हणून बालिश सूचना केल्या जातात. राजकीय
दबावतंत्राचा वापर केला जातो. खरंतर हे आपल्या समाजातूनच येतं जिथे प्रतिमा संवर्धन
ही इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची. लहानपणापासून याचे बाळकडू दिले
जातात किंवा लहान मुले याच वातावरणात वाढत असल्यामुळे आजूबाजूला बघूनच शिकतात.
हयातभर प्रतिमा संवर्धन करण्यातच या संस्कृतीतल्या लोकांची ऊर्जा खर्ची होते.
त्यामुळे सिनेमासारख्या माध्यमातून जेव्हा चरित्रपट येतात तेव्हा किमानपक्षी
त्रयस्थ भूमिकेतून मांडत असणारा विषय त्याच्या सर्व पदरानिशी येणं अपेक्षित आहे.
एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा चरित्रपट त्याला अपवाद ठरत नाही.
रांचीमध्ये जन्मलेला महिन्द्रसिंग धोनी (सुशांत
सिंग राजपूत) हा पानसिंग धोनी (अनुपम खेर) यांचा मुलगा शाळेच्या फुटबॉल संघात गोलकीपर
असतो. त्याचे क्रिकेटचे शिक्षक बॅनर्जी (राजेश शर्मा) त्याला विकेटकीपर होशील का
म्हणून विचारतात. तो सुरुवातीला नकार देतो पण शाळेच्या टीमसाठी विकेटकीपरची निवड
करण्यात येत असते तेव्हा ते त्याला तिथे हजार राहायला सांगतात. त्याची निवड होते. तो
घरच्यांच्या खासकरून वडिलांच्या विरोधाला जुळवून घेऊन क्रिकेटचा सराव करायला जातो.
विकेट कीपिंग करता करता त्याला फलंदाज व्हायचे असते असे तो शिक्षकांना सांगतो.
फलंदाज म्हणून त्याचं कौशल्य एका सामन्यात शिक्षकांना दिसून येतं व ते त्याला अजून
प्रोत्साहित करतात.
धोनीच्या आयुष्याचे तीन टप्पे पडतात.
- शाळेत असताना फुटबॉल टीमचा गोल कीपर असणे. शिक्षकांनी त्याचे गुण हेरून त्याला क्रिकेटमध्ये विकेट कीपर म्हणून करिअर करण्यासाठी उद्युक्त करणे. धोनीने अभ्यासात कुचराई न करता खेळात प्राविण्य मिळवावे म्हणून आई, बहिण व मित्रांनी प्रोत्साहन देणे जेणेकरून त्याच्यातला खेळाडूची चांगली मशागत होईल.
- टीसी म्हणून खरगपूर स्टेशनवर काम करणे. ही नोकरी त्याला रेल्वेत वरिष्ठ पदावर असणारे पण स्वतः अशा गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेली असणे. तिथे आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचा प्रश्न पडणे. त्यासाठी नोकरी सोडावी लागली तरी हरकत नाही पण क्रिकेटर म्हणूनच आयुष्याला आकार द्यायचा या ठाम निर्णयाला येणे.
- राष्ट्रीय संघात वर्णी लागणे व त्या नंतर संघाचा कर्णधार होणे. ज्यात वरिष्ठ खेळाडूंपासून ते नुकतेच संघात आलेल्या खेळाडूंशी असणारं त्याचं वर्तन कसं राहिलं. टीमच्या कोचसोबत त्याचे कसे संबंध होते. निवड समितीतल्या किंवा बीसीसीआयमधल्या लोकांसोबत तो कसा होता. हे येतं. तसेच त्याच्या याच भूमिकेत असताना भारतीय संघाने विश्वचषक जिंकून दाखवलं होतं त्यामुळे त्याचं भारतीय क्रिकेटमधील स्थान अनन्यसाधारण राहिलेलं.
वरील तीन टप्प्यांपैकी तिसरी कारकीर्द महत्वाची.
धोनीचं कर्तृत्व इथे लखलखीतपणे दिसून येतं. प्रसारमाध्यमांमध्ये त्याची असणारी
प्रतिमा, त्याच्या खाजगी आयुष्याची झालेली चर्चा वगैरे बाबी माध्यमातून
सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेल्या. त्यामुळे पटकथाकार-दिग्दर्शक नीरज पांडे व
दिलीप झा त्याचे हे तीन टप्पे कसे पटकथेत आणतात हे अपेक्षित होतं. दुर्दैवाने ते
हे करत नाहीत कारण प्रतिमा संवर्धन करायच्या नादात धोनीच्या आयुष्याचं सुलभीकरण
करायचं याच उद्देशाने एक चतुर पटकथा लिहितात. ज्यात धोनीचे सचिन तेंडूलकर, सौरव
गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग व इतर वगैरे सहकरी खेळाडूंसोबत
त्याचे संबंध कसे होते, संघाचे प्रशिक्षक, सोबत असणारे कर्मचारी, निवड समिती सदस्य,
बीसीसीआयची अधिकारी वगैरे मंडळींशी तो कसा वागत होता. त्यांच्यात विस्तव जात होता
का नाही, वादविवाद झडले असतीलच अशा बाबींना मूठमाती दिली जाते.
एकाही सामन्याच्या आधी धोनी कर्णधार म्हणून
सामना जिंकण्यासाठी सहकाऱ्यांशी चर्चा करतोय, रणनीती आखतोय हे दाखवलं जात नाही.
त्या ऐवजी तो दर सामनागणिक चौकार, षटकारांची आतषबाजी करून सामना जिंकून देतोय हेच
दाखवलं जातं. धोनीचे हे सर्व सामने तमाम प्रेक्षक वर्गाने अगदी डोळ्यात तेल घालून
बघितले आहेत. तेच परत पडद्यावर दाखवण्यात काय हशील. तो व्यक्ती म्हणून कसा होता हे
कुठंही अधोरेखित केलं जात नाही. त्याच्या अनावश्यक गोष्टींना नको इतकं थारा दिला
जातो. त्याची प्रेमप्रकरणे, जाहिरातबाजी वगैरे बाबींवर वेळ वाया घालवला जातो. शक्यतो
वादग्रस्तता टाळायची याच उद्देशाने नीरज पांडे सिनेमाची रचना करतात. त्यामुळे फार
तर दोन सव्वादोन तासात संपवायचा विषय तीन तास दहा मिनिटात मांडायचा असफल प्रयत्न
करतात.
कर्तृत्वाने मोठ्या झालेल्या खेळाडूंवर जे सिनेमे
आलेत ते त्यांची प्रतिमा भंजन होऊ नये याचीच काळजी घेताना दिसतात. नुकताच आलेला
अझर किंवा काही वर्षांपूर्वी आलेला भाग मिल्खा भाग असेल या सिनेमात हे खेळाडू कमी ठोकळेबाज
पात्रच जास्त वाटतात. जो पर्यंत आपण प्रतिमा संवर्धन करण्यासाठीच सिनेमा बनवत राहू
तोपर्यंत वास्तवातल्या व्यक्तींवर त्रयस्थ भूमिकेतले सिनेमे येणं दुरापास्त आहे.
या उपर कलाकारांचा अभिनय, उच्च निर्मिती मूल्य
वगैरे बाबींबद्दल न बोललेलंच बरं.
सिनेमात धोनी एके ठिकाणी थप्पड शॉट नावाचा शॉट
शिकतो. त्या शॉटमधली थप्पड प्रेक्षकांच्याच गालावर बसलीय असंच याबद्दल म्हणता येईल.




Comments