कॉपीचा लातूर पॅटर्न
आज लोकसत्तेच्या पहिल्याच पानावर ही बातमी वाचली. यात
आश्चर्य वाटण्यासारखं काहीही जाणवलं नाही. लोकसत्तेला का त्यात वेगळेपणा दिसून आला
काय माहिती. कदाचित कधीकाळी लातूर पॅटर्नमुळे इथल्या विद्यार्थ्यांचं नाव
महाराष्ट्रात आदरानं घेतला जात होतं म्हणून असेल कदाचित. ही मुलं खरंच हुशार असतात
का (हुशारी कशावरून जोखतात त्याचं त्यांनाच माहित.) याची चौकशी या पेपरने केलेली
ऐकिवात नाही. तरीही कॉपीचा लातूर पॅटर्न असं हेडिंग देऊन किती शर्मानक बात है अशा
पद्धतीचं वगैरे त्यात लिहिलेलं आहे. ‘गुणवत्तेचा’ (परीक्षेत भरमसाठ मार्क्स घेणे
जर गुणवत्ता असेल तर धन्यच गोष्ट आहे.) लातूर पॅटर्न निर्माण करून राज्यातून इथे
स्थलांतरित व्हायला लोकांना भाग पाडलं होतं म्हणे. पण एकूणच ही बातमी वाचून बऱ्याच
वर्षांपूर्वीचे काही किस्से आठवले.
वर्ष : १९९६
परीक्षा : १० वीची
स्थळ : देशिकेंद्र विद्यालय,
लातूर
या वर्षी मी दहावीत होतो.
वरील शाळेत वार्षिक परीक्षेचा नंबर आलेला. लातूर पॅटर्नचा
भरभराटीचा काळ. मी ज्या वर्गात बसलो होतो त्याच वर्गात सदानंद प्राथमिक व माध्यमिक
विद्यालय, लातूरचे विद्यार्थी होते. या शाळेत मी सातवीपर्यंत होतो. पूर्वीचे ओळखीचे विद्यार्थी मित्र होते तर बाकीचे नवीन. शाळा
तेव्हा पूर्ण अनुदानित झाली नव्हती. पेपर बहुतेक गणित, विज्ञान किंवा इतिहास-भूगोल
पैकी एकाचा होता. पेपर लिहायला सुरुवात झाल्यावर सदानंद शाळेतले काही शिक्षक
वर्गात आले व त्यांनी त्या विषयाचं ‘नवनीत गाईड’ त्यांच्या विद्यार्थ्यांना
द्यायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकच आनंदाने देतायत म्हटल्यावर हव्या
त्या प्रश्नांची उत्तरं शोधून लिहिली. मलाही उबळ आली होती त्यांच्याकडून गाईड मागवून
उत्तरं लिहायची पण हिंमत झाली नाही. माझ्यासारखेच ते विद्यार्थी पण पास झाले. कुणी
मेरीटमध्ये आलं नाही. त्यांना गाईड पुरवायचं कारण शाळा १००% अनुदानित होणं गरजेचं
होतं. त्यासाठी शाळेचा रिझल्ट १००% लागणं गरजेचं होतं. ते झालं नसतं तर अनुदान
मिळालं नसतं. अनुदान मिळालं नसतं तर शिक्षकांना पर्मनंट होतं आलं नसतं. कदाचित
पुढे त्यांच्या आयुष्याची वाताहत झाली असती अशी भीती त्यांना असावी.
-----------------------------------------------------------------------
वर्ष : २००२-०३-०४ किंवा त्याच आसपास
परीक्षा : १० वी किंवा
१२ वी
स्थळ : लातुरातली
परीक्षा केंद्र म्हणून कुठलीही शाळा
त्यावर्षी आमच्या
भाडेकरूचा मुलगा नापास झाला होता. दहावीतच बहुतेक. वडील बीएसएनएलमध्ये इंजिनिअर.
त्यामुळे मुलाने आपल्यासारखच हुशार असावं अशी अपेक्षा. मुलगा पहिलीत असल्यापासून
कमी मार्क्स घेणारं. इंजिनिअर बापाचं म्हणणं मी विपरीत परिस्थितीत (म्हणजे गरिबीत.
ह्या अशा बापांना अशावेळी स्वतःच्या भूतकाळाचं भांडवल करायला बरं सुचत असतं खासकरून
जे डॉक्टर/इंजिनिअर/शिक्षक/प्राध्यापक/वकील/तत्सम वगैरे पदावरील बाप असतात ते.) असताना सुद्धा खूप अभ्यास
(!) करून इथपर्यंत आलोय. त्यावेळी साधं पाटी-पुस्तकं नव्हती आम्हाला आणि आता
तुम्हाला सर्व काही देत आहे तर अभ्यास करत नाहीत. यथावकाश मुलगा नापास झाला. तो
नापास होणारे हे त्याला माहीतच होतं. पण बापाच्या गळ्यात घंटी कोण बांधणार.
ऑक्टोबरला प्रयत्न केला त्यानं पण रिझल्ट आला नाही. मग परत मार्चला प्रयत्न करताना
त्याने कॉपी केली. गाईडची पानं झेरोक्स सेंटरवर रिडक्शन करून खिशात लपवून नेऊन
त्याने ‘उत्तीर्ण’ असा किताब मिळवला. गंगेत घोडं न्हालं म्हणून बाप खुश. पुढे
पोराने कसंतरी (अभ्यासाची बोंबच नाही तरी.) एमबीए करून बेंगळूरूमध्ये नोकरी धरली.
लातुरात शिकून बेंगळूरूत नोकरी धरली म्हणून इंजिनिअर बाप खुश जीवन सार्थकी
लागल्याच्या अविर्भावात.
--------------------------------------------------------------------------
वर्ष : २००२-०३
परीक्षा : बीएस्सीच्या वार्षिक
परीक्षेच्या काही महिने आधी.
स्थळ : आमचं घर.
मी तेव्हा बीएस्सीला
संपूर्ण विषयात नापास होतो. ते तिसरं वर्ष होतं. माझा घराबाजूला राहणारा एक मित्र
तेव्हा औरंगाबादच्या माणिकचंद पहाडे महाविद्यालयात वकिलीचा अभ्यास करत होता. तो
लातूरला कशासाठी तरी आला होता. नेहमीप्रमाणे भेट झाली. त्याने बीएस्सीच्या
रिझल्टबद्दल विचारलं मी वर्ष रिपीट करतोय म्हटलं. त्यानं लगेच म्हटलं, “कॉप्या कर.
मार्क्समेमोवर पास असं छापून आलं की झालं. कॉपी करून पास झाला काय अन न झाला काय
रिझल्ट महत्वाचा.” मी नाही म्हटलं. (कारण लई प्रामाणिक ना.) तर प्रेमळपणे म्हणाला
हवं तर मी परीक्षेच्या वेळी येऊन कॉप्या पुरवतो पण असं वर्ष वाया घालवू नकोस. मी
नाही म्हणजे नाही म्हटलं. त्यावर्षी पण रिझल्ट सर्व विषयात नापास. मग त्याच वर्षी बीए फर्स्ट
इअरला अॅडमिशन घेतलं. बीए पास झालो न कॉपी व विषय मागे ठेवता.
--------------------------------------------------------------------
वर्ष : २००७-०८
परीक्षा : १० वीची
स्थळ : फर्गसन कॉलेज व
नांदेड जिल्ह्यातील एका खेडेगावातील परीक्षा केंद्र.
फर्गसनला एमएच्या शेवटच्या
वर्षाला असताना सोबतचा एक नांदेडचा मित्र म्हणाला गावाकडे जाऊन येतो. आमची वार्षिक
परीक्षा महिन्याभरावरच आली होती. मी म्हटलं अभ्यास कधी करणार. तो म्हणाला अरे चार
पाच दिवसाचीच तर गोष्ट आहे. यूँ गया और यूँ आया। आल्यावर
त्यानं सांगितलं गावातल्या दहावीच्या पोरांसाठी कॉप्या टाकून आलो. सगळी पोरं
मागच्या वर्षी नापास झालेली. त्यांच्या घरच्यांना काळजी लागलेली. “काळजी मिटवून
आलो.” मी म्हटलं फुकट केलास का काम. नाही चांगले ५००० रुपये मिळाले म्हणाला. ते
पैसे आता एमपीएससीच्या परीक्षेच्या फीससाठी जपून ठेवतो. बोलता बोलता म्हणाला
तेवढीच आपली समाजसेवा. परमार्थातून स्वार्थ साधायचा.
--------------------------------------------------------------------
कॉपी का करतात विद्यार्थी याचं मुख्य कारण आहे
शिक्षण, रिझल्ट याबद्दल असणारी भीती जी गोबेल्स प्रचार यंत्रणेसारखी आपल्या इथे
शिक्षक-आई-वडील-नातेवाईक-शेजारीपाजारी लहानपणापासून भरवत असतात. त्यामुळे बहुतांश
विद्यार्थी कॉपी करून चटकन रिझल्ट लागावा व या दुष्टचक्रातून बाहेर पडावं या
उद्देशानेच ते करतात. दुर्दैवाने शिक्षणाबद्दल भीती घालवण्याची कसलीही सुविधा आपल्या
इथे नाही. वरील किस्से प्रातिनिधिक असले तरी खरे आहेत.
भारत महासत्ता होणारे असं
म्हणणारे अशा पद्धतीच्या शिक्षण-समाजव्यवस्थेचं काय करणारेत काय माहिती.
Comments