एक जुनी बातमी

1. ही एक जुनी बातमी. पाच वर्षांपूर्वीची. आज एका निमित्ताने याची आठवण झाली. लातूरच्या निखील गटागट नावाच्या मुलाने आपलं अपहरण झालंय व चोरट्यांनी जवळचे साठ हजार रूपये, मोबाईल, लॅपटॉप चोरून चोप देऊन वाशी पुलावरून पाण्यात टाकले असं पोलिसांना सांगितलं. तो पुण्यात सीओइपीला तिसऱ्या वर्षाला होता. पोलिसांनी पुण्यातली केस म्हणून पुणे पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यांनी त्याला मार लागलंय म्हणून लातूरला पाठवलं. तोपर्यंत त्याचं अपहरण झालंय पण तो वाचलाय हे घरच्यांना कळलं. काही दिवसांनी पोलिसांनी परत एकदा चौकशीसाठी त्याला बोलावलं. त्यानं सांगितलेल्या घटनात संगती लागत नव्हती म्हणून त्यांनी त्याला विचारलं तो क्लासेस का अटेंड करत नाही व पाचव्या-सहाव्या सेमिस्टरचे रिझल्ट्स पण सांगितले. तेव्हा त्याने आपण खोटच सांगितलंय असं कबूल केलं. तसेच हा सगळा बनाव त्यानेच रचलाय असंही कबूल केलं. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात तो नापास झाला होता व त्याला अभ्यासक्रम झेपत नव्हता. त्या दरम्यान इंग्रजी क्राईम थ्रिलर्स वाचायची सवय लागली होती. ते वाचून आपणही लेखक व्हावे असं त्याला वाटायला लागलं. पण घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता ताण वाढायला लागला म्हणून सेमिस्टरची फीस भरायला दिलेले पैसे घेऊन त्याने आत्महत्या करण्यासाठी वाशीचा खाडी पूल गाठला. पैसे फेकून देऊन पाण्यात उडी मारली पण कोळ्यांनी त्याला वाचवला. तो लातुरातल्या एका सुप्रसिद्ध पुस्तक दुकानदाराचा मुलगा.

2. अशीच दुसरी अजून एका मुलाच्या तोंडून ऐकलेली कथा. लातुरात खूप वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी सातवीत शिकणाऱ्या त्या मुलाने वडिलांनी रागावलं म्हणून घर सोडलं. दिवसभर इथे तिथे भटकल्यावर त्याने रात्री सिनेमाचा शेवटचा शो बघितला. एव्हाना घरचे त्याला शोधायला बाहेर पडलेच होते. पोलिसात पण सांगितलं गेलं होतं. तो रात्री उशिरा घरी परतला. चौकशी केल्यावर एका मुलं उचलून नेणाऱ्या टोळीने त्याला उचललं होतं पण कसाबसा तो त्यांच्या व्हॅनमधून पळून आला होता असं सांगितलं. घरच्यांना मुलाच्या धाडसाचं कौतुक वाटलं. पण पोलिसांना त्यात लूपहोल्स दिसत होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला प्रेमाने जवळ घेऊन एकांतात विचारलं नेमकं काय झालं त्यानं सांगितलं वडिलांनी रागावलं म्हणून तो पळून गेला व अपहरणाची खोटी गोष्ट सांगितली. गोष्ट खोटी असली तरी खरी वाटली सर्वांना कारण त्याला हिंदी सिनेमांचा असणारा नाद. कुठल्या सिनेमातून त्याला प्रेरणा मिळाली माहित नाही पण मालमसाला लावून सांगितलेल्या एखाद्या खोट्या गोष्टीवर लोकांचा चटकन विश्वास बसतो. त्याचे आई-वडील पेशाने नोकरदार आहेत.

3. साधारण कॉलेजात असताना असंच एका मुलाबद्दल ऐकलेलं. तो सीएच्या तयारीसाठी बीकॉम झाल्यावर पुण्याला गेला. बरीच वर्ष तेथे अभ्यास वगैरे करून तो परतला ते सीएची डिग्री/सर्टिफिकेट घेऊन. घरच्यांना वाटलं मुलानं नाव काढलं. नंतर कळलं त्याने खोटी डिग्री/सर्टिफिकेट तयार करवून घेऊन दाखवलं होतं. घरच्यांच्या समाधानासाठी. पुढे त्याचा खोटेपणा उघडा पडल्यावर तो वापस पुण्याला गेला नाही तर लातुरातच रोजीरोटीचं काम करत होता. त्याचे आई-वडील निम्न मध्यमवर्गीय घरातले होते. वडील कुठल्याश्या खात्यात क्लर्क असावेत बहुदा.
---------------------------------------------------------------------------------
तिन्ही उदाहरणं ऐकल्यावर/वाचल्यावर त्यावर इतरांशी बोलल्यावर काही सामाईक मुद्दे सर्वांच्या तोंडी होते ते म्हणजे: 
  • मुलांच्या अशा वागण्याने आई-वडिलांनी त्यांच्यासाठी उपसलेले कष्ट वाया जातात. 
  • समाजात त्यांची छी-थू होते. 
  • त्यांच्या कष्टाचं चीज करायचं सोडून आयुष्याच्या उत्तर काळात त्यांना हे बघावं लागतं.
  • अपमान सहन करावे. लोकांच्या चौकशांना सामोरं जावं लागतं.   
  • आई-वडिलांच्या साध्या साध्या अपेक्षा मुलं पूर्ण करू शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे.
  • आई-वडिलांच्या पुण्याईवरच तर यशाची चढती कमान बघायला मिळते असते त्याचीच कित्येकांना जाणीव नसते. असली तरी त्याप्रमाणे वागणे त्यांना होत नाही.     

पुण्याचे डॉ. संजय वाटवे नावाचे मानसोपचारतज्ञ खूप वर्षांपूर्वी सकाळमध्ये एक सदर लिहायचे. त्यातल्या एका लेखात त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थी पेशंट्समध्ये अर्धे अधिक लातूर-उस्मानाबाद परिसरातील असतात व त्यांच्यावर आई-वडिलांच्या अपेक्षांचं एव्हरेस्ट एवढं ओझं असतं असं लिहिलं होतं. ही मुले डिप्रेशनमध्ये असतात. यांचा आई-वडिलांशी विसंवाद असतो. त्यावर काय उपाय करता येतील याची मीमांसा केली होती. पण आई-वडिलांवर ही उपचार व्हायला हवेत असं लिहिलेलं नव्हतं. हे गमतीशीर आहे.

या सर्व उदाहरणात त्या मुलांच्या मानसिकतेचा विचार कुणीच केलेला दिसला नाही. फक्त आई-वडिलांचीच बाजू सर्वांनी उचलून धरली. त्यांच्यावर असणारा प्रचंड ताण त्यामुळे त्याचा परिणाम अभ्यास, करिअर, नोकरीच्या ठिकाणी होतो हे कुणीच समजून घेतलं नाही. नाही तर सरळसरळ दुर्लक्षित केलं गेलं. यामुळे मुलं आई-वडिलांशी जुजबी बोलण्यापलीकडे संबंध ठेवत नाहीत याची कुणाला तमा नसते. त्यांना घरातल्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही. घेतलं तरी सांगितलेला उपाय कसा चुकीचा आहे व पूर्वी कश्या चुका केल्यात हे सर्वांदेखत सांगून अपमान केला जातो. कारण आई-वडील कधीच चुका करत नाहीत. त्यांच्या वागण्याला नैतिक, प्रामाणिक, सामाजिक अधिष्ठान असते.

लातूर-उस्मानाबादमधली मुले जेव्हा पुण्यात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जातात तेव्हा त्यांच्या मनावर, शरीरावर होणारा परिणाम कुणीच नोटीस करत नाही. करत असले तरी चलता है यार असं मित्र म्हणतात तेव्हा ही मुले कसनुसं हसून वेळ मारून नेतात. मनावर उमटलेला ओरखडा मात्र कधीच मिटवला जात नाही. एखाद्या डॉक्टरकडून उपचार करून घेतले असले (!) तरी भूतकाळात असं असं झालं होतं हे कधीच विसरलं जात नाही. आपण तसे वागलो म्हणून आपल्याशी जुजबी संबंध ठेवून सर्वांनी आपल्याला वाळीतच टाकलं होतं हे कधीच मनातून जात नाही. वय वाढत गेलं तसं ते भुतासारखे मानगुटीवर बसून असते हे कुणालाच दिसत नाही. कारण ते बघायचच नसतं कुणाला. वेळ कुठे असतो आजकाल. विशेष म्हणजे हे असं आपल्याही मुलासोबत होऊ शकतं हे कित्येक आई-वडिलांना पटत नाही. दुसऱ्यांचीच मुले वाया जाणारी असतात. आपलं ते बाबा दुसऱ्याचं ते कार्ट असाच खाक्या असतो.

अशी शेकड्यांनी उदाहरणं सांगता येतील. आपल्या आसपास ती असतातही तरी त्याकडे लक्ष देऊन त्यावर विचार करावा यासाठी वेळ थोडीच आहे आपल्याकडे. हेच जास्त क्लेशकारक आहे.

Comments