हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे?

{२०१०-२०१९ या दहा वर्षांचा लेखाजोखा मांडावा म्हणून फेसबुकला पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्यावेळी लिहिताना जे मनात होतं ते उतरवलं आहे. कदाचित आज माझ्यात बदल झाला असेल. पण म्हणून यात काहीही बदल केलेला नाही.}

हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे हा प्रश्न आम्हाला एमएला विचारला जायचा. कारण इतर शोकांतिकेतील नायकांचे ट्रॅजिक फ्लॉज लख्खपणे समोर दिसतात. मकबईथचा त्याच्या सत्तापिपासू वृत्तीत आहे. किंग लिअरला माणसांची पारख नाही. तर ऑथेल्लो संशयी आहे. त्यामुळे हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे म्हटलं कि आपण त्याच्या इतकेच अंतर्मुख होतो. हा प्रश्न आठवण्याचं कारण माझा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे हा पडलेला प्रश्न. प्रश्न निर्माण झाला तो २०१० ते २०१९ दशक संपल्यावर. ह्या दहा वर्षात आपण काय केलं किंवा आपल्या आयुष्यात काय काय झालं याचं सिंहावलोकन करायला बसल्यावर लक्षात आलं आपल्यात व हॅम्लेटमध्ये फारसा फरक नाही. निदान विचार करण्यापुरता तरी आपल्यात व हॅम्लेटमध्ये साम्य आहे असं वाटायला लागलंय. पण त्याचं ते सुप्रसिद्ध स्वगत कितपत लागू होतंय याची मात्र शंका आहे.

गेल्या दशकाचा विचार करू जाता सुरूवात २०१० पासून करावी लागेल. त्यावर्षी माझं फिशर्सचं ऑपरेशन झालं. फिशर्स म्हणजे मूळव्याधीची अगदी सुरूवातीची स्टेज. २००६ पासून पुण्यातल्या विविध मेसचं जेवण व रस्त्यावरचं खाल्ल्यामुळे व्याधी उद्भवलेली. ऑपरेशन सक्सेसफूल झालं पण वडिलांना ते आवडलं नाही. त्यांची एक अतिशय भंपक गांडू फिलॉसोफी आहे कि तरूणपणात कसलेच रोग होता कामा नये. अगदी सर्दी सुद्धा. आम्ही कसे दंड बैठका काढत होतो, विहिरीवर पोहायला जात होतो वगैरे त्यांच्या लहानपणीच्या माणिकनगरच्या गोष्टी सांगत बसतात. आमची वाढ विशिष्ट पद्धतीने झाली आहे हे ना त्यांना समजून घ्यायचय ना स्वतः काही विचार करून काळानुसार बदलायचं आहे. आणि एकदा सांगितलंत ना व्यायाम करणे गरजेचे असते तेव्हा परत परत स्वतःचं उदाहरण का देतात ही मंडळी. तुम्ही केला असाल व्यायाम म्हणून आम्ही पण जिमफिम/दंड बैठका काढायच्या का? मी आपलं नेहमीसारखं शांतपणे त्यांच्या भंपक फिलोसॉफ्या ऐकून घेतल्या. ऑपरेशनमधून सावरून पुण्याला परत गेलो. एका कंपनीत जॉबला लागलो. एमए झाल्यावर शुक्रवार पेठेतल्या शिवाजी मराठा लॉ कॉलेजमध्ये काहीतरी सात आठ दिवस उदयोन्मुख वकिलांना शिकवलं होतं. ते फोल ठरलं. त्यामुळे या कंपनीत टिकेन का नाही याची माझी मलाच शंका होती. माझ्या अर्ध कच्च्या इंग्रजीला (एमए केलं असलं तरी.) सांभाळत त्यांनी मला सामावून घेतलं. वडिलांना किंवा घरच्यांना कंटेंट रायटर हा काय जॉब असतो पर्यायाने यात पर्मनंट होता येतं का किंवा किती पगार वाढ होणार वर्षाला असे प्रश्न पडायला लागले. नापास होतो तेव्हा ती काळजी असायची अन् कंपनीत होतो तर तिथली.

एक तर नापास झाल्यापासून माझ्यावर कायमच अविश्वास दाखवलाय घरच्यांनी. घरचे कशाला सर्वांनीच. शिक्षणाला अति महत्त्व दिल्यामुळे व त्यातून आलेल्या खोट्या प्रतिष्ठेच्या मानसिकतेमुळे अविश्वास दाखवला जातो. कारण शैक्षणिक अचिव्हमेंट म्हणजेच हुशारी; बाकी सगळं गेलं गाढवाच्या गांडीत.

कंपनीत कामाला लागलो असलो तरी तिथे मनोवस्था व्यवस्थित नव्हती. एमएला असताना मानसोपचारतज्ञ डॉ. संजय वाटवेंकडे गेलो होतो. त्यांनी तू डिप्रेशनमध्ये आहेस म्हटलं व नेक्स्ट सिटींगपासून आपण ट्रीटमेंट चालू करू म्हणाले. काही गोळ्या लिहून दिल्या. तिथे त्यांनी एक लेख वाचायला दिला होता. त्यांनी सकाळमध्ये एक सदर चालवलं होतं त्यापैकी एक होता. लेखात त्यांच्याकडे येणाऱ्या तरूणांमध्ये लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील तरूणांचा भरणा जास्त होता. मुख्य कारण होतं डॉमीनेटिंग आई-वडिलांमुळे निर्माण झालेला विसंवाद व आर्थिक ओढगस्ती. त्यावेळेस मी ‘लातूर पॅटर्न’ लिहीत होतो. त्या लेखाने एकूणच आमच्या प्रॉब्लेमवर चांगलाच प्रकाश टाकला. आमच्या समस्येचं मूळ कळलं. आज जेव्हा बऱ्याच मित्रांच्या घरात आई-वडिलांशी असणारे संबंध बघतो/ऐकतो तेव्हा त्या लेखाची आठवण होते.

काम जरी करत असलो तरी मी माझ्या भूतकाळाला विसरलो नव्हतो. उलट तो मानगुटीवर बसल्यासारखा दररोज आठवायचा. रात्री उशिरापर्यंत झोप यायची नाही. सकाळी उठलो कि अचानक सगळ्या गोष्टी आठवायच्या. त्यातील सर्वात प्रकर्षानं आठवणारी गोष्ट म्हणजे त्याच्या एक वर्षापूर्वीच वडिलांनी बहिणीच्या लग्नात बोललेली. ही गोष्ट आईने अशा पद्धतीने सांगितली जणू मी गुन्हा केला होता. वडील म्हणाले होते माझा मुलगा इंजिनीअर नाही झाला पण जावई इंजिनीअर हवा. विशेष म्हणजे पहिलच स्थळ इंजिनीअरचं आलं तेच फायनल झालं. हे नेमकं देव ब्राह्मणा दिवशी कळलं. त्यामुळे स्त्री-पुरूष नातेसंबंधावरील विश्वासच उडाला. ग्रॅज्युएशन व पोस्ट-ग्रॅज्युएशन मिळून एकूण दहा वर्ष गेल्यावर पण वडिलांना वाटत असेल कि आपला मुलगा इंजिनीअर झाला नाही यासारखं गांडू नशीब नसावं कुणाचं! इंजिनीअर असण्यातली प्रतिष्ठा ही मुलाने नापासाचे पाच वर्ष सहन करून परत जोमाने शिक्षण पूर्ण केल्यापेक्षा मोठी बाब असते. तसेच मुलगा जे शिकला एमए इंग्लिश ते काही खास नसतं किंवा बीए-एमए करणे हे ज्यांना इंजिनीअर-डॉक्टर होता येत नाही ती वाया गेलेली मुलं करतात अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे जॉब करताना वरकरणी जरी मी नीट काम करत होतो तरी मनातून मी खूप निराश होतो. कसलं टुकार आयुष्य जगतोय आपण असं वाटत होतं. आम्हाला जो ईमेल आयडी दिला होता कामासाठी त्याच्या चॅट स्टेटसमध्ये मी एकदा ‘meaningless life’ असं टाकलं होतं तेव्हा त्याबद्दल कलीग्जमध्ये कुजबुज चाललेली ऐकली होती.

तिथेच पुढे माझ्यावर प्लेजरिझमचा आरोप झाला होता. जो खरा होता. माझं एक आर्टिकल विकीपेडियावरून जसंच्या तसं घेतलेलं होतं. गुगल बेस्ड बिझनेसमध्ये अशा पद्धतीने लेखन करणे गुन्हा असतो. नशिबाने कंपनीने मला पोलिसांच्या हवाली न करता माझा पगार अर्ध्यावर केला. त्या आर्टिकलसहीत इतर आर्टिकल्स री-राईट करायला लावले. माझ्यासोबत इतर बरेच जणांचे मेडीनिक.कॉम साईटचे आर्टिकल्स प्लेजरीझममध्ये सापडले. त्यांनाही शिक्षा म्हणून त्यांचा पगार अर्ध्यावर आणून ते री-राईट करायला सांगितले. मधल्या काळात मला सर्व्हायकल स्प्रेनचा आजार जडला. पिंपळे सौदागरमध्ये डॉ. काटेंकडे माझी ट्रीटमेंट चालू होती. आयटी क्षेत्रात हात, पाय व पाठीच्या दुखण्याचे पेशंट्स जे वाढलेत त्याचं कारण एकाच ठिकाणी बसून विशिष्ठ पोझिशनमध्ये काम करणे. माझा उजवा हात जवळपास निकामी झाला होता. हातातून वीज जावी अशी टिंगलींग सेन्सेशन्स निर्माण झाले होते. एका अर्थाने उजवी बाजू लुळी पडली होती. तत्पूर्वी मी दर शनिवार-रविवार केसरी पेपरच्या लायब्ररीत जाऊन जोशी-अभ्यंकर खून प्रकरणावरील माहिती गोळा करत होतो. त्या घटनेवर आधारित कादंबरी लिहायची होती. केसरीने खटल्याची इत्यंभूत माहिती छापलेली आहे. जक्कल-सुतार ह्या खुनाच्या मुख्य सूत्रधारांच्या नजरेतून ती कादंबरी लिहायची होती. पण तिथे सर्व माहिती हाताने लिहून काढायला लागायची. पण हाताचा त्रास वाढला तसा माझा त्यातील रस कमी झाला. कंपनीतील शिक्षेच्या काळात तर प्रेशर खूप वाढलेलं. तेव्हा जॉब सोडला.

२००९ मध्ये राजन खानच्या अक्षर मानवला ‘लातूर पॅटर्न’ चं हस्तलिखीत दिलेलं. एकतर त्यांच्याबद्दल जो आदर होता तो पहिल्याच भेटीत कमी झाला. त्यांच्या ‘ईह’ नावाच्या पुस्तकात ‘बाईला बाप हवा असतो’ नावाचा लेख आहे. त्यांना भेटल्यावर त्याबद्दल मी म्हटलं कि इंग्रजीत इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आहे त्याच्याशी हे मिळतंजुळतं आहे. त्यांनी ते नाकारलं. ते म्हणाले ते वेगळं आणि हे वेगळं. त्यातील फरक कसा आहे हे त्यांनी एक्स्प्लेन केलं नाही. त्यांची दोनच पुस्तके मला आवडतात. ‘सत ना गत’ कादंबरी आणि ‘पिढी’ हे लेखसंग्रहाचं पुस्तक. ‘पिढी’मुळे खूप प्रभावित झालो होतो. पुढे दोन वेळा त्यांचं बोलणं मनाला लागलं. पहिल्यांदा त्यांनी अवधूत डोंगरेच्या ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या कादंबरीशी केलेली तुलना. माझी कादंबरी प्रिटींगला जाण्याच्या बेतात होती तेव्हा डोंगरेची कादंबरी नुकतीच तिथे आलेली. त्यांचं वाचन चालू होतं. ते म्हणाले लेखन करावं तर असं. हे म्हणजे लहानपणी घरातील लोकं म्हणायचे बघ शेजाऱ्याचं पोरगं किती हुशारय. ते पोरगं आपल्यापेक्षा किमान दोन वर्ग पुढे असणारं असायचं. राजन खानची मानसिकता त्याच पातळीची वाटली.


अक्षर मानवनी काढलेल्या पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ 

मला भयंकर राग आला होता. एक तर दोन्हींचा बादरायण संबंध नाही. डोंगरेंची मुल्यदृष्टी, जडणघडण, अनुभव, विचारसरणी ही माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे त्यांनी जो विषय हाताळलाय तो आणि मी हाताळलेला विषय यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. मी घेतलेले अनुभव, माझी जडणघडण, विचारसरणी, वैचारिक झेप यावर ती आधारित आहे. अशी तुलना म्हणजे विजय तेंडुलकरांची वसंत कानेटकरांशी करण्यासारखं आहे. दोन परस्पर विरोधी नाटककारात याच्यापेक्षा तो श्रेष्ठ म्हणण्यासारखं आहे हे.

डोंगरेंना त्यासाठी राज्य पुरस्कार ही मिळालाय बहुदा. याचा उघड अर्थ होता त्यांना ‘लातूर पॅटर्न’ मध्ये जे लिहिलेलं होतं ते बिलकुल आवडलं नव्हतं. हे त्यांनी कादंबरीचं प्रकाशन झाल्यावर मी एकदा भेटायला गेलो होतो तेव्हा म्हटलेलं. ते म्हणाले, “ही फसलेली कादंबरी आहे.” ती का व कशी फसलेली आहे याचं स्पष्टीकरण नाही दिलं. मी नाराज झालो पण काही बोललो नाही. राजन खानना बोलायचं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटी बांधायचा कार्यक्रम असतो. कादंबरी का फसलेली आहे याचं कारण पुढे स्वतःहूनच त्यांनी दिलं. राजन खानना बोलताना त्यांचं ‘मी हे केलं, मी ते केलं’ हे खूप ऐकावं लागतं. त्यातच एकदा त्यांनी कौतुकाने म्हटलं कि कुठल्यातरी कार्यक्रमात त्यांच्या मित्राने त्यांची ओळख करून देताना त्यांनी पीएचडी केलेली आहे असं सांगितलं. ही बाब ऐकल्या ऐकल्या मला त्यांच्या फसलेली कादंबरी म्हणण्या मागील कारण लक्षात आलं. पीएचडी झालेल्या माणसाला माझी कादंबरी फसलेली आहे हेच वाटणार. ८० च्या दशकापासून शिक्षणामुळे आपल्यात खूप बदल झालाय हेच कुणालाही पटत नाही. खासकरून ग्रॅज्युएट्सना ती आवडतच नाही. कारण आपला वाचक पदवीधर. तसेच कितीही नाही म्हटलं तरी शिकलेल्या माणसाच्या नेणीवेत एक सूक्ष्म ‘आपण शिकलेले किंवा ग्रॅज्युएट आहोत’ याचा माज असतो. ईगो असतो. स्वतःची प्रतिष्ठीत अशी प्रतिमा असते जिला तो/ती नेहमीच कौतुकाने गोंजारत असतो/असते. भलेही तो/ती तोंडदेखलं म्हणत नसले तरी. तसेच ज्यांनी ज्यांनी कादंबरीचं नाव ऐकून ती कौतुकानं वाचली त्यांनी नंतर एक चकार शब्द त्याबद्दल काढला नाही. त्यामुळे राजन खाननी फसलेली आहे म्हणणं हे त्यांच्या वैचारिक दृष्टीकोनाला साजेसं.

२०११ मध्ये ‘लातूर पॅटर्न’ चं प्रकाशन झालं. त्यानंतर २०१२ च्या मकरसंक्रांती दिवशी ‘अनरउबिक’ लिहून संपवली. उत्साहात राजन खानना सांगितलं. त्यांनी पस्तीस हजार घेऊन या व पुस्तक घेऊन जा म्हणून सांगितलं. विषय रुचला नाही त्यांना. नेहमीप्रमाणे मी काय लिहावं यावर लेक्चर दिलं. मी काही बोललो नाही. मी कादंबरी पॉप्युलरला पाठवली. सोबत माझ्याबद्दलची थोडी माहिती एका पत्रात लिहिली. त्यात ‘लातूर पॅटर्न’ बद्दल लिहिलं. त्यानंतर एके दिवशी राजन खाननी बोलावलं. मी काय लिहिलंय म्हणाले. मी सांगितलं नेमाडे, वास्तववादी कादंबरी, पुलं-वपू, इंदिरा-राजीव गांधी, नरसिंहराव-मनमोहन सिंग, बाबरी मस्जिद-किल्लारी भूकंप वगैरे गोष्टींवर लिहिलंय म्हटलं. ते ऐकून ते एकदम जे चढायला लागले माझ्यावर त्याला काही सुमारच नव्हता. मुळात पॉप्युलरच्या अस्मिता मोहितेंनी त्यांना काय सांगितलं माहिती नाही पण तुझी लेखनातली लायकी काय आहे ते मला माहितेय, जर नेमाडेंवर भाष्य करायचं असेल तर ते माझ्यासारख्याने असं स्वतःच्या पार्श्वभागाकडे बोट करून म्हणाले. तसेच लेखकाने नेमाडेंसारख्यावर न लिहिता जरा मोठं, मानवी आयुष्यावर लिहावं म्हणाले. त्यांचा नेमाडेंवर राग असण्याचं कारण कुठल्यातरी महत्त्वाच्या पुरस्काराच्या समितीवर नेमाडे होते म्हणे. त्यांच्यामुळे त्यांना तो पुरस्कार ‘सत ना गत’ कादंबरीसाठी मिळाला नव्हता. हे त्यांनीच एकदा बोलता बोलता सांगितलं होतं. मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं.

मी नेहमीच त्यांच्यासमोर शांत असायचो. त्या दिवशी पण होतो. मला ते चढले याचं काहीच वाटलं नाही. कारण ज्यांनी कादंबरी वाचलीय ते चकार शब्द नाही काढत त्याबद्दल किंवा भाष्य करतात. मी त्यांचं बोलणं सहन केलं कारण त्यांनी फक्त एकदा म्हटलं असतं आधी हस्तलिखीत आण, मी वाचतो अन् मगच यावर बोलतो पण त्यांनी मागितलच नाही. पॉप्युलरच्या त्यावेळच्या संपादक अस्मिता मोहितेंना प्रमाण मानून ते जे चढले त्याला काही मर्यादाच नव्हत्या. आणि मी असला चाहता नव्हतो कि साहित्यिकाने न मागताच त्यांना गुरु मानून बघा, जरा वाचून अभिप्राय द्या म्हणणारा. मी निघून आलो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी कसली तरी मिटिंग होती अक्षर मानव कार्यकारणीची त्याला गेलोच नाही. बेंद्रे कि कुणीतरी होते त्यांचा फोन आला. राजन खान बोलतच असतात, इतकं नाराज व्हायची काय गरजय वगैरे म्हणाले. मी काहीच म्हणालो नाही. ज्या लेखकाला दुसऱ्याच्या लेखनाची किंमत नाही त्याच्याकडे वरचेवर जाऊन स्वतःचा अपमान करून घेण्यात काय हशील! कधी काळी त्यांचा डाय हार्ड फॅन असणारा मी आज जेव्हा कुणीतरी राजन खान असा उल्लेख करतं तेव्हा मी ‘कोण राजन खान?’ असा प्रश्न करतो. मी जे लिहिलंय ते चुकीचं असलं तरी ते न वाचता माझ्यावर तोंडसुख घेण्याचा कसलाही अधिकार राजन खानसारख्या लेखकांना किंवा कुणालाच नाही. न वाचता त्यावर बोलणारे सतराशे साठ लोकं सापडतात. राजन खान त्यांच्या पंगतीत बसलेले दिसतात मला. आणि गमतीचा भाग म्हणजे हा माणूस उभ्या महाराष्ट्राला माणुसकीचे धडे देत फिरत असतो.

‘अनरउबिक’ लिहिल्यावर ती कुणीच स्वीकारणार नाहीत हे माहिती होतं मला. पॉप्युलर प्रकाशन नंतर पुढे वर्षभर पुण्यातल्या महत्त्वाच्या सर्वच प्रकाशकांनी ती घ्यायचं टाळलं. कारण एकच त्यातून येणारी वादग्रस्तता. पॉप्युलरनी तर मला हस्तलिखीत परत करताना एक चिठ्ठीच लिहून दिली. फक्त गोल्डन पेजच्या प्रदीप खेतमरनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पण मी घाबरून गेलो होतो आपल्या हातून हे काय लिहिलं गेलंय म्हणून. कारण देशमुख अँड कंपनीला एका मित्राच्या आग्रहाखातर कादंबरी दिली होती. त्याचे सर्वेसर्वा विनय हर्डीकरना ते रूचणार नाही हे मी मित्राला सांगून देखील त्याने देऊन यायला सांगितलं. हर्डीकरना रूचणार नव्हती कारण ‘कोसला’ ची पहिली आवृत्ती देशमुख अँड कंपनीने काढलेली. त्यांनी फोनवर ‘घेऊन जा’ इतकंच बोलून त्याची बोळवण केली (अर्थात वाचूनच.). माझ्या माठ मित्राला जो त्यांना गुरु मानतो सांगून ही फरक पडला नाही. कादंबरी घेऊन त्यांच्याकडे जायचं नाही असं मी आधीच ठरवलं होतं. पण मित्रामुळे उगाच त्यांची भर प्रकाशित न करणाऱ्या प्रकाशकांच्या यादीत पडली.

पॉप्युलरचा रिप्लाय


२०१३ मध्ये मात्र या सगळ्याचा जाच व्हायला लागला. कादंबरी कोणी घेणारच नाही ही भावना दृढ होत चालली होती. नोकरीचे प्रयत्न चालू होते पण मिळत नव्हती. लहानपणापासूनच्या गोष्टी आठवायला लागल्या. शाळेत झालेलं लैंगिक शोषण. पुढे आठवीपासून झालेली मार्कांची अधोगती म्हणजे सातवीत ८०% घेतलेला मी आठवीत ७०% वर आलो होतो. तर दहावीला ६४% वर. बारावीत ५०% तर बीकॉम फर्स्ट ईअरला सर्व विषयात नापास. त्यानंतर पुढे सलग चार वर्ष घेतलेला नापासाचा अनुभव. पुण्याला गेल्यावर एमएत उद्भवलेलं डिप्रेशन, कंपनीतील आरोप, लातूर सोडून पुण्याला जायचं म्हणजे काहीतरी भव्यदिव्य करायचं असं ठरवलेलं होतं जे हातून घडलंच नव्हतं, वडिलांनी इंजिनीअर नाही झाला म्हणून केलेला मानसिक बलात्कार तर याच्या उलट पुण्याने दिलेला वास्तवाचा चटका यामुळे स्वतःबद्दलच्या प्रतिमेला धक्का बसून ते फुटून गेलं होतं. डोकं भंडावून गेलं होतं. त्यातच एके दिवशी मी काही मित्रांना मेल केला की हा ईमेल वाचेपर्यंत मी जगात नसेन. आत्महत्या करावी म्हटलं. पण रूमवर आलो आणि रडत बसलो. काही वेळात एक मैत्रीण व दोन मित्र रूमवर आले. मला घेऊन त्यांच्या घरी गेले. दुपारून लातुरातील मित्रांचे कॉल आले. त्यांनी यथेच्छ शिव्या घातल्या. पण कुणाला काही स्पष्टीकरण द्यायच्या मनस्थितीत नव्हतो. कारण ते देऊन ही उपयोगाचं नव्हतं. माझी मनोवस्था अशी का झालीय हे सांगूनही त्यांना विश्वास वाटायचं नाही. ते नेहमी एकच म्हणायचे इतक्या चांगल्या घरात वाढला आहेस, सुखवस्तू आहेस, प्रेमळ आई-वडील आहेत, जबाबदारीची कसलीही चिंता नाही तुला तेव्हा असलं कसं तुझ्या डोक्यात येऊ शकतं. मुळात डॉक्टर-इंजिनीअर, बँक मॅनेजर किंवा तत्सम आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लब्धप्रतिष्ठीत आई-वडीलांच्या घरात सामाजिक प्रतिष्ठेला खूप महत्त्व असतं. कारण ही घरं सुखवस्तू असतात. मध्यमवर्गीयांची असतात. कॉलनीसारख्या सर्व सुखसोयींनी युक्त वातावरणात त्यांचं आयुष्य जात असतं. त्यामुळे ते मुलांवर लहानपणापासून जगाचा एक बागुलबुवा उभा करतात कि जग किती वाईट लोकांनी भरलेलं आहे म्हणून. खूप मेहनत केली कि आपल्याला सुखासीन आयुष्य मिळेल हे लहानपणापासून बिंबवत असतात. पावलोविअन कंडीशनिंगचाच एक प्रकार असतो तो. त्यामुळे समाजात ज्या गोष्टींना अतोनात महत्त्व आहे त्या गोष्टींबद्दल नेहमीच सकारात्मक बोललं जातं. अशा लोकांच्यात उठबस करवली जाते. ते ही सर्व करिअर, सेटलमेंट वगैरेच्या मार्गाशी समांतर. त्यामुळे जेव्हा मुलांना कॉलेजात गेल्यावर त्यांच्या मर्यादांची ओळख व्हायला लागते तोपर्यंत उशीर झालेला असतो. आपण आपल्या मनाला पटेल ते न करता इतरांना काय वाटेल यासाठी आयुष्यपणाला लावतो. तिथेच सर्व सुटायला लागतं. फ्रस्ट्रेशन, नैराश्य, डिप्रेशन वा इतर मानसिक आजार जडायला लागतात. नोकरी किंवा शिक्षणासाठी स्थलांतरित झाल्यावर माझ्यासारख्यासारखं ते सर्व आठवयाला लागतं. याचा परिणाम म्हणजे कमी व उमेदीच्या वयात आत्महत्येचे विचार मनात यायला लागतात. काही जण यशस्वी होतात माझ्यासारखे होत नाहीत. द्रव पदार्थाचा उत्कलनांक असतो. तसाच हा माझा उत्कलनांक होता. त्यानंतर डोक्यावरील ओझं उतरलं असं वाटत होतं.

लगेचच काही दिवसांनी बुकगंगावर ईबुक स्वरुपात ‘अनरउबिक’ प्रकाशित केली. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्याच वर्षी आज्जी वारली. वडिलांची आई. तिचं जाणं फार दुःखदायक वाटलं नाही. त्याच्या एक वर्ष आधीच फडके सर गेले. त्यांच्या प्रेतावर डोकं टेकवून ढसाढसा रडलो होतो. पण आज्जीबद्दल कसलीही भावना नव्हती. एकतर लहानपणापासून तिचा सहवास असा नव्हताच. म्हणजे घरात होती तरी खूप प्रेमळ स्वभावाची नव्हती. कर्नाटकी ब्राह्मण उपजतच कुजकट असतात असं माझं निरीक्षण आहे. एक प्रकारे समोरच्याबद्दल किंवा एकूणच सर्वांबद्दलच कुजकटपणे बोलण्याची सवयच असते. त्यात हजारो वर्ष चातुर्वर्ण्य पद्धत राबवणारे उच्चवर्णीय म्हटल्यावर तर काय बोलावं! इतक्या वर्षांनंतर मी ही तसाच झालोय असं वाटायला लागलंय. पण नापास झालो त्यावेळी सर्वांची जी नजर बदलली त्यात आज्जीचा नंबर वरचा. सतत तिचं त्याबद्दल भाष्य करणं असहनीय होतं. त्यामुळे वारल्यावर मी रडलो नाही. ज्या घरात अभ्यास व शिक्षणावरून सतत टोचून बोलणारी माणसे असतील तर त्यांच्याबद्दल भावनिक ओलावा राहत नाही.

२०१४ मध्ये वर्ष श्राद्धासाठी लातूरला आलो असताना वडिलांना पेमफिगस वल्गॅरीस रोग झाल्याचं आढळून आलं. यात शरीरातील उष्णता त्वचे द्वारे बाहेर पडते. त्यामुळे चिमटीत पकडता येतील अशी फोडं तयार होतात. पण त्यांच्या सर्वागांवर फोड येऊन ते फुटायचे व पसरायचे. आयुर्वेद याला अंगातील उष्णता असं कारण सांगतं. ती उष्णता तीन मार्गाने बाहेर पडते. मुळव्याधीच्या स्वरुपात, आतड्यांना भोकं पडतात किंवा अशा प्रकारे. तर अॅलोपथी किंवा मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये यावर उत्तर नाही. ते म्हणतात फक्त आजार कंट्रोल करता येईल पण पूर्ण बरा होणार नाही. तसेच उपचार नाही घेतले तर प्राणांवर बेतण्याची शक्यता असते. तसं ते झालं होतं. वेळेत उपचार झाल्यामुळे तो कंट्रोलमध्ये आला. याचा परिणाम मात्र वडील डिप्रेशनमध्ये गेले. काहीही बरळायला लागले. त्यातच एके दिवशी रागाच्या भरात ‘मी तुझ्यामुळे आजारी पडलो’ म्हणाले. मला वाटतं नवरात्रीचे दिवस होते बहुदा. खरंतर मुख्य कारण वडिलांचं आयुष्यभर दारू अन् सिगरेट पिणं होतं. त्याचाच परिणाम होता तो. डॉक्टरांनी एकदा सांगितलेलं. वडिलांनी दुर्धर आजार कधी अनुभवला नव्हता. आपण आयुष्यभर केलेल्या चुका दुसऱ्यावर थोपवण्याची भारतीय गांडू पद्धत मात्र वाखाणण्यासारखीच. मला आता घरात बोलायला जागाच उरली नाही. त्यामुळे इतके दिवस जे काही बोलत होतो ते बंदच केलं. एकीकडे इंजिनीअर नाही हे ऐकलेलं त्यात आता याची भर पडलेली.

२०१६ मध्ये एमएला असताना जिला आयुष्यात पहिल्यांदा प्रपोज केलं होतं तिचा फोन आला. तिचा घटस्फोट झाला होता म्हणून माझी आठवण आली तिला. मी सर्व ऐकून घेतलं. नंतर व्हाट्सअॅपवर तिला म्हटलं मी येतो ठाण्याला कायमचा पण एकाच अटीवर ते म्हणजे आपलं रिलेशन हे फक्त आणि फक्त सेक्सपुरतं राहील. तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली लग्नानंतर आपसूकच तसं राहील ना! मी म्हटलं माझी इच्छा नाही. त्यावेळी मला रिजेक्ट करून एका आयटी इंजिनीअरशी लग्न केलीस ना त्याची शिक्षा ही तुला, असा सूड घ्यायचा होता मला. आठ वर्षानंतर फोन करून त्यावेळच प्रेम राहिलं आहे का विचारतेस का? मी कसा जगतोय, माझ्या आयुष्यात काय झालं वगैरे काहीही विचारलं नाही. जणू मी स्वर्गातच जगत होतो. तिच्या स्वार्थीपणाला काही शेंडा बुडखाच नव्हता. तिचा माजोरडेपणा पण बराच सहन करायचो मी. तो रागही मनात होताच. त्यानंतर तिने मेसेज किंवा कॉल केला नाही.

त्याचवर्षी काही कॉपीज पाहिजेत म्हणून अक्षर मानवला कॉल केला. चार वर्षांनी कॉल केलेला. तर राजन खान म्हणाले पुण्याला या व सर्व कॉपीज घेऊन जा. एकूण २०० कॉपीज राहिले होते. ८०० ची विक्री झाली होती. घ्यायला गेलो. त्यांनी पाठीमागच्या गोष्टी बोलायला चालू केलं. अनरउबिक, आत्महत्या वगैरेवर बोलायला लागले. यावेळी पण त्यांनी कादंबरीत वाचायला दे म्हणाले नाहीत. तेच ते लेखन असं हवं, त्यात हे हवं ते नको, वगैरे रटाळ लेक्चर द्यायला लागले. मी ऐकून घेतलं. कॉपीज घेतल्या ताब्यात. हिशोब केला. ते दुसरी आवृत्ती काढणार नव्हते. पण हा व्यवहार नुकसानीत गेला होता. मी दिलेले १५००० व त्यांनी घातलेले ८००० अशा २३००० मध्ये एकूण १००० प्रती छापलेल्या. त्यामुळे एक साधी अपेक्षा होती कि पुण्यात कादंबरी सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल तर ती नव्हती. मला कुणी पुस्तक कुठं मिळेल असं विचारलं तर शरमेनं राष्ट्रभूषण चौकातील अक्षर मानवचा कार्यालयाचा पत्ता सांगावं लागायचं. वाचकांना पुस्तक पुस्तकाच्या दुकानात नाही मिळालं तर तो काय प्रकाशकाच्या कार्यालयात जाणार का? पण पुण्यातील पुस्तक विक्रेते व राजन खान यांच्यात वितुष्ट होतं. त्यामुळे पुण्यातील कोणत्याच पुस्तकाच्या दुकानात अक्षर मानवचं एकही पुस्तक दिसायचं नाही. नाही म्हणायला साधना मिडिया सेंटरमध्ये होती पण एखाद दोनच. त्यात ‘लातूर पॅटर्न’ कधीच दिसलं नाही. त्याची विक्री अक्षर मानव जेव्हा कुठे कार्यक्रमासाठी जाई तिथल्या स्टॉलवर होई. तरीही पाच वर्षात ८०० प्रती विकल्या गेल्या होत्या. इतका वेळ लागायला नकोच होता. फार फार तर एखाद वर्ष ते ही डोक्यावरून पाणी. मुळात अक्षर मानवकडे वितरणाची कसलीही सोय नाही. तरीही ही मंडळी पुस्तके छापतातच. लेखकाचं पर्यायाने प्रकाशनाचं किती नुकसान होतं याची जाणीवच नाही. धंदा करायचा नाही अशा उदात्त हेतूने व्यवसाय केल्यावर बाजारपेठ व विकत घेणारा वाचक उपलब्ध असून पुस्तकांची विक्री होत नाही हे दुर्दैवाचं आहे.

त्यांना विक्रीचा हिशोब विचारला असता काहीतरी साडे चारशे रूपये अक्षर मानवने मला द्यायचे होते. त्या हिशोबात विक्री, निर्मिती खर्चाची रक्कम, मी घेतलेल्या प्रती सुरूवातीच्या ५० आणि नंतर २०० अशा एकूण २५० यांची रक्कम वजा केली. बरं मला परत द्यायच्या रकमेचा हिशोब करताना त्यांनी प्रोडक्शन कॉस्ट लावली. निर्मिती खर्चाची रक्कम होती २३०००. प्रती छापल्या १०००. एका प्रतीची किंमत १०० रू. म्हणजे हजार प्रतींची किंमत झाली १००००० रू. मला प्रतींचा हिशोब देताना कितीचा आकडा धरला प्रत्येकी २० रू. प्रत. म्हणजे फक्त २०००० रू. झाले. खरंतर २३ रू. प्रोडक्शन कॉस्ट धरायला हवी होती पण त्यांनी राउंड फिगर म्हणून २० केलं. माझ्याकडील २५० प्रती वजा केले तर १५००० रू. होतात. त्याचा हिशोबच नाही सांगितला. ह्या वीस हजारातून निर्मिती खर्चाची रक्कम वजा केली. बरं ते विक्री करताना अर्ध्या रकमेत विकायचे. ते धरलं तर साडे सात हजार होतात. मग शंभरच्या हिशोबाने ७५० प्रतींची विक्री केली त्याचे ७५००० कुठे गेले. अर्ध्या किमितीत विकले तरी साडे सदोतीस हजार होतात. त्याचा हिशोबच नाही. तोच कदाचित अक्षर मानवचा फायदा. मी हा माझ्या दृष्टीकोनातून केलेला हिशोब आहे. त्यांचा हिशोब काही वेगळाच असेल. बरं राजन खानना काही बोलायचं नाही किंवा विचारायचं नाही कारण आपली कादंबरी फसलेली. फसलेल्या कादंबरीचे कसले आलेत हिशोब. आम्ही करार वगैरे केलेला नव्हता. सगळच तोंडी. त्यामुळे मला बोलायला काही मुद्देच नव्हते. मी गपगुमान २०० प्रती व त्यांनी दिलेल्या हिशोबाचा कागद घेऊन लातूरला आलो. आजही प्रती माझ्याकडे आहेत. प्रकाशन व्यवसायातील व्यवहारांचे वाभाडे काढणारे राजन खान माझ्या बाबतीत मात्र फार फलदायी ठरले असं म्हणायला कसलीच जागा नाही. एवीतेवी मी हे नुकसानीतच धरून चाललो होतो कारण हा विषय कुणीच छापणार नाही हे माहितीच होतं. फडके सरांनी एकरकमी पंधरा हजारांचा चेक दिला म्हणून कादंबरी प्रकाशित तरी झाली. नाही तर ती कपाटात पडून राहिली असती. तो माणूस आज हयात नाही. त्यांचे पैसे सुद्धा मी परत करू शकलो नाही. पण आयुष्यभराचं ऋणाईत करून गेला तो. आज अक्षर मानव हे न पचलेलं प्रकरण म्हणून त्याकडे बघतो मी. अक्षर मानवचा त्यानंतर संबंध संपला तो कायमचा.



भारतीय समाजात लग्नाला अतोनात महत्त्व असतं. इतकं कि तुम्ही शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असता तेव्हापासून घरात लग्नाबद्दल सर्वजण बोलायला लागतात. मुलाची उमेदवारी जाहीर केली जाते. मग मुली बघणे सुरू होते. एक स्थळ आलं मला. त्या मुलीने नकार दिला. त्या नंतर अजून काही स्थळ बघितले पण नकार मिळाला. वडिलांच्या आजारपणात लातूरला आलो. मग परत एकदा लग्नाच्या विषयाने उचल खाल्ली. यावेळी मात्र मुलींच्या व त्यांच्या वडिलांच्या अपेक्षा मात्र खूप वाढलेल्या दिसल्या. मुलगा इंजिनीअर हवा, पुण्यात स्वतःच्या नावावर फ्लॅटसहीत सेटल हवा, पगार किमान साठ ते सत्तर हजार हवा, सोबत डस्टबीन नकोत. आई-वडिलांच्या अपेक्षा मुलाला शेती असावी. पुण्यात नोकरी करणाऱ्या मुलाला लातुरात शेती कशी असेल व असेल तर तो ती सोडून नोकरी का करतोय? हे विचारायचं नाही कारण मुलगी तुमच्याकडे असते. समाजाची बदललेली मानसिकता अनुभवायला येत होती. ब्राह्मण मुली माजोरड्या झाल्यामुळे व घटस्फोटीत करायची नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळे इतर जातीतल्या मुली बघायला आई-वडील नाईलाजाने तयार झाले. लातुरात एक वधू-वर सूचक मंडळ आहे. ते आंतरजातीय विवाह करवतात. त्यांनी स्थळ दाखवायला सुरूवात केली. मला कोणत्याही जातीतली मुलगी चालणार होती. मुळात लग्न फक्त आई-वडिलांना समाजाला दाखवायला सून हवीय म्हणून मी करत होतो. पण वडिलांनी त्यांना मराठा, लिंगायत फार फार तर माळी समाजातील मुली दाखवायला सांगितलं. कारण या तीन जातीतल्या मुली सोडल्या तर इतर जातीतल्या मुली संस्कारी नसतात असं त्यांचं म्हणणं होतं. तसेच अनुसूचित जातीतील नको असं स्पष्ट सांगितलं. तरी एका मुलीचं स्थळ त्या माणसाने दाखवलं. तिला एका सहकारी बँकेत जॉब होता. मला फरक पडणार नव्हता. पण वडिलांनी वाद घालून असले स्थळ नकोत म्हणाले. मी उगाच प्रतिवाद केला नाही. दगडावर डोकं फोडल्यापेक्षा ते नकोच म्हटलं. गमतीचा भाग म्हणजे अनुसूचित जातीतील खासदार चालतो लातुरातील लोकांना पण अनुसूचित जातीतील मुलगी सून म्हणून नको.

लिंगायताची मुलगी बघायला गेलो. तिला लातुरातील कोर्टात नोकरी होती. मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण काही कारणाने ते जमलं नाही. त्यानंतर अजून काही मुलींचे स्थळ आले. या सर्व गोष्टींना वैतागून मी लग्नच करणार नाही म्हणालो. आई चटकन म्हणाली तुझ्यातच दोष आहे म्हणून तू नको म्हणायलास. मला शॉकच बसला एकदम. म्हणजे इंजिनीअर नाही झालो त्यामुळे यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोचली तो माझाच दोष, वडील आजारी पडले म्हणजे मीच दोषी. लग्न करणार नाही म्हटलं कि मीच दोषी. म्हणजे प्रत्येकवेळी मीच दोषी. आणि हे स्वतः धुतल्या तांदळासारखे स्वच्छ एकदम. एकीकडे मी शिक्षणात काही करू शकलो नाही. त्यामुळे मी हुशार नाही. लग्न करू शकत नाही म्हणजे मला निसर्गाने दोषी स्वरूपातच जन्माला घातलंय. किती गोष्टी सहन करायच्या याला सीमाच नाही राहिली.

बरं आई-वडिलांना चार शिव्या घालाव्या म्हटल्या तर त्या ही घालता येत नाहीत कारण भारतीय संस्कार असतात आपल्यावर. परत श्रावण बाळ आम्ही. कावडीत घालून चार धाम यात्रा करवून आणणारे. आई-वडील कितीदा ही मानसिक बलात्कार करू देत. ते सहन करायचं. यांची प्रतिष्ठा पणाला लागली म्हणून आपल्याला दोष देऊ देत पण तोंडातून ब्र काढायचा नाही. त्यामुळे शिकलेल्या आई-वडीलांच्या पोटी जन्माला येणच चुकीचं आहे. माझं काय किंवा माझ्या नंतर जन्माला आलेल्या पिढीचं नशीबच गांडू आहे. कारण आम्ही सर्वजण शिकलेल्या आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेले. सतत यांच्याशी वाद घालत बसावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. यांची काळानुसार बदलायची तयारीच नाही. तसेच कट्टर भारतीय संस्कारात वाढलेले असल्यामुळे जातपातधर्म व क्षुद्र मानसिकतेत जगायची सवयच लागलेली. माझा एक भाऊ म्हणतो तसं बकचोदी करायची सवय लागलेली. यांच्या पिढीने खरंच काय कर्तृत्व गाजवलंय काय माहिती! बकचोदी करण्यात मात्र सर्वात पुढे असतात. आणि यांना हातपाय चेपायला व वंश वाढवायला सून हवी असते.

मुळात माझा लग्नाला विरोध आहे तो यातून काय फलनिष्पत्ती होते यासाठी. माझे मित्र नेहमी विचारतात तू लग्न का करणार नाहीस? मी त्यांना म्हणतो एखाद्या मुलाने माझं नाव वडील म्हणून लावावं अशी माझी इच्छा नाही. त्यावर ते अति शिकलेले म्हणतात तुझ्या मुलाने तुझं नाही तर कुणाचं नाव लावायचं. काही कसं बोलतोस? मी म्हणतो म्हणूनच मला लग्न करायचं नाही. तरी लग्न झालेले मित्र म्हणतात मुर्खैस तू. असं कुठं असतंय का? मी म्हणतो तेच तर मला नकोय. तरीही त्यांना आश्चर्य वाटतं. नशीब आईसारखं तू मर्दच नाहीस असं म्हणत नाहीत. लग्न व मुलं इतकं अंगवळणी पडलंय आपल्या, कि मला वडील व्हायचं नाही. त्यामुळे लग्न करायचं नाही असं म्हटलेलं कित्येक जणांच्या लक्षात येत नाही. ही सामाजिक वहिवाट इतकी मुरलेली आहे आपल्यात, कि या पलीकडे कुणी विचार करू शकतो हेच मान्य नाही. त्यामुळे मी यावर बोलत नाही. तसेच मला वाटत नाही कुणी मुलगी म्हणेल तुझ्यासाठी मी गर्भाशयाचा त्याग करेन म्हणून. कारण आई होणे नैसर्गिकपेक्षा सामाजिक गरज जास्त आहे आपल्याकडे. मी आजपर्यंत ज्या मुलींच्या सहवासात आलोय त्यांना माझ्याकडून टिपीकल पुरूषाची अपेक्षा होती जो मुलांना वडील म्हणून नाव देईल व त्यांचं पालनपोषण करेल. मी त्याबद्दल बोलत नाही म्हटल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं व राग येतो. त्यांच्या मनात असणाऱ्या टिपीकल पुरूषी प्रतिमेच्या विरोधात असतं ते. पुरूषाने सामाजिक वहिवाटेने घालून दिलेल्या पायवाटेवरून मार्गक्रमणा करावी अशी त्यांची इच्छा असते. मी ते अमान्य करतो म्हटलं कि त्या रागावतात. संबंध तुटतात आमचे. मला भेटलेल्या ह्या परंपरा मानणाऱ्या. स्त्री-पुरूष संबंधाचा विचार फार खोलवर न करता चार लोकं करतात म्हणजे आपणही करायला हवं मानणाऱ्या. त्यातच सुख आहे मानणाऱ्या. टिपीकल मध्यमवर्गीय मानसिकता. त्यामुळे मी मुलींशी हाय-हॅलोच्या पलीकडे बोलत नाही.

या दहा वर्षात दोन पुस्तकांनी माझी मानसिकता पूर्णपणे बदलली. पहिलं ‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ यातील देवेंद्र इंगळेंचा ‘उत्क्रान्तिसिद्धांत, जात आणि जनुके’ हा लेख व आंबेडकरांचं ‘शुद्र पूर्वी कोण होते?’. दोन्हींनी माझा भारतीय समाजाकडे बघायचा दृष्टीकोणच बदलून टाकला. तसेच लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे तयार झालेला माझ्यातील ब्राह्मण यामुळे विरून गेला. ऑक्सफर्डची डिक्शनरी घराघरात दिसून येते तसंच ‘शुद्र पूर्वी कोण होते?’ दिसायला हवं. दिसण्यापेक्षा वाचलं जायला हवं. आपल्यात असणारी जातीची बंधने गळून पडतील. तसेच ‘उत्क्रांतिसिद्धांत, जात आणि जनुके’ या लेखाने वैज्ञानिक दृष्टीकोनातून भारताकडे बघायला लावलं. लेखानुसार भारत हा मिश्रवंशीय देश आहे. इथे ब्राह्मणांसह, वैश्य, क्षत्रिय व शूद्रातिशूद्र जातींमध्ये सुद्धा युरेशिअन जनुकांचे संमिश्रण आढळून येते. त्यामुळे इथला एकही वंश शुद्ध स्वरुपात आढळत नाही. हे संशोधन कित्येक प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देणारं ठरलं. खऱ्या अर्थाने जातीपातीच्या भिंती पाडून टाकण्याचं काम या संशोधनाने केले आहे.


फेसबुकवर लिहिता लिहिता ‘मराठवाडा नेता’, ‘मी मराठी लाईव्ह’ (बंद पडलेला पेपर) व ‘अक्षरनामा’ साठी हिंदी सिनेमांची समीक्षा करायला लागलो. न ठरवता केलं गेलेलं हे काम आनंद देऊन गेलं. ‘अन्वयार्थ’ नावाच्या ऑनलाईन मासिकाची सुरुवात करणे ही माझी आयुष्यातील दुसरी सर्वात मोठी घोडचूक होती. पहिली एमएला असताना टाटा स्काय कॉल सेंटरवर नोकरी करणे. चुकीच्या माणसांसोबत काम करण्याचा अनुभव फार फायदेशीर ठरला नाही.

पाच वर्षांचा भाजपचा केंद्रातला व राज्यातला आणि कॉंग्रेसचा पूर्वीचा कारभार बघून आपली राजकीय भूमिका ठोस असावयास हवी असं ठरवलेलं. त्यामुळे या दोन पक्षांना सोडून मतदान करायचं ठरवलं. यावेळच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून सुरूवात केली पण.

मागील पाच वर्षात माझ्या आई-वडिलांच्या पिढीच्या लोकांची मानसिकता जवळून अनुभवता आली सोबतच माझ्या पिढीतल्या मित्र-मैत्रिणींची मानसिकता पण जवळून बघता आली. दुर्दैवाने त्यांच्यात व यांच्यात फारसा फरक दिसला नाही. तीच कुपमंडूकता, तीच पारंपारिकता, तोच नोकरीतला तोरा, तीच मी शहाणा म्हणण्याची वृत्ती, तीच स्वतःच्या कम्फर्ट झोनमधील कोशातून बाहेर न येण्याची तयारी असं सगळं तेच ते दिसून आलं. माझ्या पिढीतले आधीच्या पिढीतल्यांचीच गादी चालवताना दिसतायत. एकविसाव्या शतकात असं व्हायला नको. मागील पिढी कशीही असली तरी तिची री ओढणे सुदृढ समाजाचं लक्षण नाही. पण पैशांमुळे व नोकरीमुळे आलेली स्वस्थता त्यांना बदलवत नाही असं दिसतं. त्यामुळेच शाळेतील दोन मित्र व बीएचा एक मित्र असं तिघांना माझ्या आयुष्यातून कायमचं हद्दपार केलं. शाळेतील मित्र इंजिनीअर आहेत. इंजिनीअर्सबद्दल माझ्या मनात कटुता निर्माण करण्याचं काम त्यांनी यथावकाश केलंय. त्यांनी म्हणून नाही इतर बरेच जण आहेत. बीएतील मित्राला तुटपुंज्या मिळकतीत माजोरडेपणा करतोय म्हणून सोडचिठ्ठी दिली. बरं हे तिघेही अनअभ्यासू लोकं. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता उचलली जीभ लावली टाळ्याला करण्याच्या यांच्या वृत्तीचा कंटाळा आलेला. यांच्यासोबत राहून आपली मानसिकता बिघडेल अशी भीती वाटायला लागली होती. माझ्या पिढीतले शिकून उथळपणा करणारे जे बघितलेत त्यात हे तिघे आघाडीवर होते. जुनी मैत्री असल्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा पण झाली होती.

गेल्या पाच वर्षात एक चमत्कारिक परिस्थिती दिसून आली. इथे शिकलेल्या मुलींना नोकरी करू दिली जात नाही. ज्या करतात त्या बंडखोर तरी असतात किंवा परिस्थिती खालावलेली असते म्हणून करणाऱ्या. किंवा नवऱ्याची मिळकत कमी आहे म्हणून. त्यामुळे पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेल्या मुलीसुद्धा घरी बसलेल्या दिसतात किंवा लग्न झालेल्या. पुण्यासारख्या ठिकाणी मुली जॉबशिवाय बसणे चर्चेचा विषय असतो तर इथे मुली नोकरी करणे चर्चेचा विषय असतो. तसेच सुनेला नोकरी न करणे या अटीवर घरात घेतलं जातं. माझ्या पिढीतल्या बऱ्याच जणांचं म्हणणं आहे कि आम्ही कमावतो ना मग परत बायकोने का म्हणून नोकरी करायची? मुलं सांभाळावीत. त्यांच्यावर संस्कार करावेत (वडिलांचं ते काम नाही. त्यांनी फक्त मुलं हाळजावेत. मर्दानगी दाखवावी. तेवढंच त्यांचं काम.). सुगरण व्हावं. आम्ही कमावतोच ना! मी त्यांना म्हणतो मग ग्रॅज्युएट किंवा पोस्ट-ग्रॅज्युएट बायको का हवी? तिने पैसा कमावला तर घरातच येणार आहे ना! ती थोडीच तिच्या घरच्यांना देणारे! विशेष म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या पिढीतल्या बायकांना सुद्धा आपल्या सुनेने किंवा मुलीने नोकरी करावी असं वाटत नाही. मुलीने शिकावे पण लग्न झालं कि चूल आणि मुल बघावं असंच नव्वद टक्के घरातल्या स्त्रियांना वाटतं. ‘लातूर पॅटर्न’चा टेंभा मिरवतात इथले लोकं अन् मानसिकता मात्र अठराशे सत्तावनची. त्यामुळे शिकलेल्या व हुशार मुलींना घर सांभाळताना बघताना वाईट वाटतं. हे वाईट वाटणं जास्तच लागतं कारण पुण्यात मुलींना करिअर करताना जवळून बघितलंय. त्यामुळे दोन विश्वातील जमीन-अस्मानाचा फरक व विरोधाभास न पटणारा.

एकुणात गेल्या दहा वर्षांचा ढोबळपणे लेखाजोखा मांडताना व्यक्तिगत व सामाजिक आयुष्यात झालेला बदल, जवळच्या लोकांच्या मनात दडलेली भावना अनुभवता आली. पण हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे याचं उत्तर मात्र आम्ही दिलंच नाही असं लक्षात येतंय.

Comments