लातूर पॅटर्न कादंबरी का दुर्लक्षिली गेली?

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मित्र भारत निलखने मराठीतील दुर्लक्षित लेखक अशा अर्थाची पोस्ट टाकली होती व इमॅन्युलने मला टॅगलं होतं. त्या पोस्टमुळेच मला हे लिहावंसं वाटलं.

पार्श्वभूमी

२०११ मध्ये कादंबरीचं प्रकाशन झालं. यावर्षी दहा वर्ष होतील कादंबरीला. प्रकाशन झाल्यावर वाटलं होतं लवकरच सर्व थरातून तिची दखल घेतली जाईल. या विषयावर लिहिणारे पहिले आपणच म्हटल्यावर उत्साहाने वाचक त्याचं स्वागत करतील. समीक्षा होईल. पुरस्कार मिळतील. असं किमान वर्षभर तरी वाटत होतं. बऱ्याच पुरस्कारांसाठी पाठवली. राज्य ते विविध ठिकाणच्या स्थानिक पुरस्कारांना पाठवली. अगदी पुण्याच्या नगर वाचन मंदिराच्या पुरस्कारासाठी स्वतः तिथे जाऊन देऊन आलो होतो. तसेच साहित्य अकादमी युवा पुरस्कार देते ३५ वर्षांखालील लेखकांच्या पहिल्या साहित्यकृतीला. मला आता नीटसं आठवत नाही पण अक्षरमानवने किंवा की मी त्यांचा फॉर्म भरून पाठवला होता बहुदा नाही सुद्धा. त्यामुळे तो मिळेल निदान वयाच्या अटीत बसत होतो म्हणून. पण कुठून कसलाच प्रतिसाद आला नाही.

कादंबरी प्रकाशित झाल्यावर पेपरात परीक्षणे/समीक्षा छापून येईल म्हणून महिनाभर प्रत्येक पेपरची रविवारची पुरवणी बघत होतो. राजन खाननी सांगितलं होतं कादंबरी सर्व पेपर व साप्ताहिकांना पाठवली आहे. खरं-खोटं त्यांनाच माहिती. कुठल्याच पेपरात किंवा साप्ताहिकात पुस्तक परिचय पण छापून आलं नाही. मला वाटलं आपण एका महत्त्वाच्या विषयावर कादंबरी लिहिलीय म्हटल्यावर लगेच त्यावर परीक्षणे यायला चालू होतील. ‘लातूर पॅटर्न’ ही लोकप्रिय गोष्टय म्हटल्यावर त्यावर कादंबरी लिहिली म्हटल्यावर सर्वजण कौतुकाने त्याचं स्वागत करतील.

मी कुठल्याही साहित्यिक वर्तुळात नव्हतो किंवा एखादा आमचा ग्रुप होता ज्यात साहित्यावर चर्चा केली जायची. कथा, कविता लिहिणाऱ्यांच्या ग्रुपमध्ये मी नव्हतो. त्यामुळे असेल कदाचित पण कुणीच त्यावर काहीच लिहिलं नाही. कदाचित लातूर पॅटर्न विषयाचा आवाका मोठा नाही अशी सर्वांची समजूत झाली असणार. त्यामुळे अशा क्षुल्लक विषयावर लेखन करतोय म्हणजे कादंबरी काही खास नसेल असेच सर्वांना वाटलं असणार. (पुढे २०१४ मध्ये पंकज भोसलेने 'लातूर पॅटर्न' व ‘अनरउबिक’ वर लेख लिहिला होता. त्यात त्याने या कादंबऱ्या दुर्लक्षित का राहिल्यात याचं विवेचन केलं होतं. पण प्रस्थापित समीक्षकांनी कादंबरीला महत्त्व दिलं नाही.)

आम्ही साहित्य शिकत होतो ते फक्त परीक्षेत मार्क्स घेण्यासाठी ना की साहित्य शिकून त्यापासून प्रेरणा घेऊन लेखक होण्यासाठी. त्यामुळे लेखनातून समाज बदलावा, प्रबोधन करावं वगैरे असली कसलीच भावना नव्हती. शेक्सपिअर-हार्डी-वर्ड्सवर्थसारखे प्रतिभावंत नसल्यामुळे आपण लेखन करू शकणार नाही अशी धारणा होती. तसेच आपल्या इथे साहित्य शिकवताना प्रतिभावंतांचच ते काम असतंय हे इतकं बिंबवलं जातं किंवा लेखन हे हॅम्लेट-मकबइथसारखं असेल तरच ते लेखन असतं असं सतत सांगितलं जातं. त्यामुळे लेखन करणे हे आपलं काम नाही ही धारणा विद्यार्थ्यात मूळ धरते जी त्यांच्या लेखक होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला मारून टाकते. पुढे लिहावं वाटलं तरी ते लिहू शकत नाही कारण वरील धारणा भीतीत रूपांतरित झालेली असते. जे कॉलेजच्या वार्षिक विशेषांकात चारोळी-कविता लिहून तेवढ्या पुरते साहित्यिक म्हणून कॉलेजात मिरवत राहतात त्यांचं पुढे काय होतं माहिती नाही. ते नंतर जास्तीकरून कॉलेजातले सुप्रसिद्ध लेखक म्हणूनच राहतात.

बीए थर्ड ईयरला असताना मी लेखक व्हायचं ठरवलं. ते फक्त एका मित्रालाच सांगितलं होतं. तसेच तोपर्यंत शाळा-कॉलेजातले पेपर्स सोडवणे या पलीकडे लेखनाचा संबंध नव्हता. एमएला पुण्याला गेल्यावर लेखन कसं करायचं याची कसलीच माहिती नव्हती. लिहिताना काय व कसं लिहायचं माहिती नसल्यामुळे काही पानं लिहिल्यावर देखील मी कॉन्फिडन्ट नव्हतो. मग अजून दोन-तीन वेळा प्रयत्न केल्यावर ते लेखन घेऊन मी एका प्रकाशकांना भेटली होतो. त्यांनी राजन खानकडे जा ते नवीन लेखकांना लेखनात मदत करतात म्हणून सल्ला दिला. खानला भेटलो. त्यांनी काही सूचना केल्या. जे लिहिलं होतं त्यावर मत दिलं. आता जे लिहिलंय त्याची प्रेरणा त्यावेळी मिळाली. २००९ मध्ये ती पूर्ण झाली. खानला दाखवली. त्यांना आवडली नाही बहुदा. त्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. लेखन नवीन आहे. मराठी प्रकाशक तुम्हा नवीन लेखकांचं लेखन छापत नाहीत. त्यामुळे जर निर्मितीखर्चाचे पैसे आणलास तर कादंबरी छापतो म्हणाले. कादंबरी प्रकाशित झाली. पण तत्पूर्वी त्यांनी कादंबरी फसलेली आहे असा त्यांचा अभिप्राय दिला. मी हिरमुसलो. मलाही स्वतःला त्याचं विश्लेषण करता येत नव्हतं त्यामुळे मी कादंबरीचा उद्देश काय, कशासाठी लिहिलंय याचं स्पष्टीकरण दिलं नाही.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

गेल्या दहा वर्षात यावर चिंतन करताना बऱ्याच गोष्टी नव्याने जाणवल्या. त्याआधी भारतातील शिक्षणव्यवस्थेवर बोलावं लागेल. १८३५ मध्ये ‘इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट’नुसार ब्रिटिशांनी भारतात शिक्षणव्यवस्था भक्कम करायला सुरु केली. १८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास इथे ब्रिटीश अमलाखालील भारतातल्या अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. सोबतच विविध ठिकाणी शाळा-कॉलेज स्थापण्यात आले. महाराष्ट्रा पुरता विचार केला तर १८४८ साली फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी पुण्यात शाळा सुरु केली. महाराष्ट्रातल्या सुधारणावादी चळवळीला सुरूवात झाली. पुढे शाहू-आंबेडकर व इतरांनी शिक्षणाच्या महत्त्वाला जनसामान्यांपर्यंत नेलं. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात पहिली प्रायोरिटी शिक्षण सर्वांपर्यंत पोचवणे राहिली. सार्वभौम देशाची निर्मिती करणे गरजेचे होते. ब्रिटीशांच्या काळात शिक्षणाचा हळूहळू होणारा प्रसार स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढला. खेड्यापाड्यात शाळा सुरू झाल्या. शिक्षण घेणारा एक मोठा वर्ग निर्माण व्हायला लागला.

लातूर पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग असल्यामुळे इथली पहिली शाळा आताच्या उस्मानाबाद जिल्ह्यात हिप्परगा येथे १९२१ साली सुरु झाली. यावर्षी त्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण होतात. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अध्वर्यू बाबासाहेब परांजपे व स्वामी रामानंद तीर्थ तिथे शिक्षक म्हणून १९२९ ला रूजू झाले. पुढे चाकूर (१९३७), उदगीर (१९३७) प्रत्येकी एक व लातूर (१९३७ व ४९) येथे दोन शाळा सुरू झाल्या. तर १९४२ मध्ये ‘महिला विद्या मंदिर’ ची स्थापना सौ. सुशीलाबाई दिवाण यांनी लातुरात केली. १९४६ मध्ये तिचं रूपांतर ‘गोदावरी कन्या पाठशाळेत’ झालं. १९६१ ला दयानंद कॉलेजची स्थापना झाली कारण तोपर्यंत लातुरात उच्चशिक्षण देणारी एकही संस्था नव्हती. ७० साली म. बसवेश्वर व राजर्षी शाहू कॉलेज चालू झाले तर ८३ साली निलंगा व लातुरात इंजिनिअरींग कॉलेज सुरू झाले. लातूर पॅटर्नचा विचार करता लातूरच्या शिक्षणाला असा ऐतिहासिक वारसा आहे. लातुरात पाण्याची बोंब आहे पण ज्ञानाची गंगा दारोदारी वगैरे म्हणतात ती अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहते आहे.

ऐंशीच्या दशकाच्या शेवटी शाहू कॉलेजातील विद्यार्थी राज्यात बारावीत मेरीट यादीत पहिल्या क्रमांकात यायला लागली. त्यांनी परीक्षेत भरमसाठ मार्क्स घ्यायचं मॉडेल विकसित केलं ते महाराष्ट्रातल्या शाळा-कॉलेजेसनी बिनदिक्कतपणे कॉपी करायला सुरू केली. त्यातच १९९१ ला मनमोहन सिंगांचं सुप्रसिद्ध भाषण पार पडलं. भारताची कवाडे जगासाठी खुली झाली. आर्थिक उदारीकरणाला सुरूवात झाली. सुरूवातीला फक्त कॉलेजपुरता असणारा ‘शाहू पॅटर्न’ शहर व जिल्ह्याचा अभिमान म्हणून ‘लातूर पॅटर्न’ झाला. लातूर शहराची ‘शिक्षणाचा हब’, ‘विद्येचं माहेरघर’ म्हणून वाटचाल सुरू झाली. आमची पिढी ऐंशीच्या दशकात जन्मलेली लातूर पॅटर्नचे थेट परिणाम वागवणारी ठरली. लातुरात शिक्षण घेणं प्रतिष्ठेचं झालं. बाहेरून विद्यार्थी व पालक लातूरला यायला लागले. लातूरची लोकसंख्या वाढायला लागली. इंजिनीअर, मेडिकलला जाणे प्रत्येक घरातील विद्यार्थी/विद्यार्थिनीचं आयुष्याचं उद्दिष्ठ झालं.

यात मी कुठे होतो?

९६ साली माझी दहावी झाली. ९८ साली बारावी. लातूर पॅटर्न त्याच्या उच्च शिखरावर होतं तेव्हा. आपण मेडिकलला जाऊन डॉक्टर व्हावं असं वाटलं होतं. त्यामुळे अकरावीला सायन्स घेतलं. बारावीत पुरेसे मार्क्स मिळाले नाहीत म्हणून सीए व्हावं म्हणून बीकॉमला अॅडमिशन घेतलं. (तेव्हा जेम्स रसेल लोवलचं ‘नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम’ सुविचार नेहमी सांगितलं जायचं म्हणून सायन्स घेतल्यावर डॉक्टर व्हायचा उद्देश तर बीकॉमला सीए. आलतूफालतू स्वप्न कधी बघायचीच नाहीत असं बाळकडूच मिळालेलं.) तिथं नापास व्हायला सुरूवात झाली ते पार २००३ सालापर्यंत. सुद्बुद्धी सुचली म्हणून बीए केलं. पुण्यातून एमए केलं. एमएला तोपर्यंत घडलेल्या सर्व घटनांचा विचार करत होतो सोबतच पेपरात लातूर पॅटर्नबद्दल वाचत होतो. एक प्रश्न सतत पडायचा आपण घेत असलेलं शिक्षण का घेतोय? तोपर्यंत शिक्षणविषयक जेवढं वाचलं होतं त्यात व मी प्रत्यक्ष बघितलेली शिक्षणव्यवस्था यात तफावत जाणवत होती. शिक्षणा विषयी केले गेलेले संस्कार आणि व्यवहारात त्याबद्दल असणारी नाराजी हा विरोधाभास सातत्याने दिसत होता. त्याविषयी कुणी बोलताना दिसत नव्हतं. शिक्षण घेऊन नोकरी करणे एवढी एकच गोष्ट मी त्या वर्षात ऐकलेली, बघितलेली. बाकी शिक्षणाच्या अनुषंगाने जी फिलॉसॉफी बिंबवण्यात येत होती ती अनुभवत होतो. माझ्या पूर्वी शिकून नोकरी करणारे सतत निगेटिव्ह का बोलत होते हे समजत नव्हतं. आशादायक किंवा सकारात्मक असं कधीच ऐकल्याचं आठवत नाही. नोकरी करणे ही सकारात्मक बाब सोडली तर एकुणात निराशाजनक वातावरण होतं.

पुण्यात नोकरीचे प्रयत्न चालू असतानाच कादंबरी लिहायला सुरु केली. खरंतर एमएला असतानाच लेखन चालू होतं. सुरुवातीचे प्रयत्न अत्यंत बाळबोध होते. कादंबरी, कथा किंवा ललित लेखनाचा कसलाच अनुभव नव्हता. लिहायला बसल्यावर सुचायचंच नाही. तसेच मला गाईड करेल असं कुणी विश्वासातलं जवळ नव्हतं जो मला कथा, तंत्र, पात्र, नरेटीव्हबद्दल सांगेल. इंग्रजी साहित्य, कादंबरी साहित्य प्रकार शिकून पण बोंब होती कारण साहित्याचा अभ्यास करायचा हे शिकवलेलं, लेखन कसं करतात हे कुठं शिकवलेलं. त्यामुळे लिहितोय ते बरोबर आहे की चुकीचं हे समजावून सांगणारं कुणी नव्हतं. जोपर्यंत मनासारखं लिहून होत नव्हतं तोपर्यंत लिहून काढलं. नंतर राजन खानना दाखवलं. अगदी सुरुवातीचं लेखन त्यांना आवडलं होतं. त्याबद्दल काही सूचना त्यांनी केल्या होत्या. पण त्या सूचना मला जे लिहायचं होतं त्याला सूट होणाऱ्या नव्हत्या. तसेच मी ज्या दृष्टीकोनातून शिक्षणव्यवस्थेकडे बघत होतो आणि ते बघत होते यात तफावत होती.

माझा दृष्टीकोन एकूण शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेवर होता ना की लातूर पॅटर्नचा गवगवा केला जात होता त्याबद्दल. ही गोष्ट राजन खानना सांगू शकत नव्हतो कारण ते शब्दात कसं मांडायचं माहिती नव्हतं. बरं राजन खानना बोलायचं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटी बांधायचं काम. बिलकुल ऐकून घेणार नाहीत. माझाच मुद्दा खरा हा खाक्या. कादंबरी वाचल्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती दिली अवधूत डोंगरेची कादंबरी ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ वाचल्यावर की कादंबरी प्रकाशित झाल्यावर मला नेमकं आठवत नाही. ते म्हणाले कादंबरी फसली आहे. का फसली आहे? कशी फसली आहे? कशामुळे फसली आहे? याचं स्पष्टीकरण नाही. खानना नुसती विधानं करायची सवय. स्पष्टीकरण विचारलं की टाळणार. त्यांना का आवडली नाही ते पुढे कळलं. ते पीएचडी केलेले आहेत. पीएचडी केलेल्या माणसाला माझी कादंबरी आवडणे सुतराम शक्य नाही. का ते खालील विवेचनात ते कळेलच.

कादंबरीचं कथानक, नरेटिव्ह, पात्र, संवाद या तांत्रिक गोष्टींबद्दल मी काही बोलणार नाही. माझा मुद्दा हा शिक्षणाचे झालेले परिणाम व आमच्या पिढीने आमच्या कुवतीनुसार त्याचा काढलेला अर्थ याच्याशी निगडीत आहे. कादंबरीत नायक नितीन वगदाळे जेव्हा त्याच्याचसारख्या, त्याच्याच वयाच्या मुलांना भेटतो तेव्हा कादंबरीतला एकसुरीपणा जाऊन कथानक अजून खोलात जायला लागतं. प्रत्येक जण आपापले शिक्षणाबद्दलचे अनुभव शेअर करतो. त्यातच एके ठिकाणी दीपक गायकवाड हे पात्र एक वाक्य म्हणतं. जर शिक्षण घेऊन पैसेच कमवायचे असतील तर डिग्री घ्यायची काय गरजय? आणि शिक्षण न घेता सुद्धा पैसे कमावता येतातच की. त्यावर नितीन डिग्री घेण्याबद्दल काही प्रश्न उपस्थित करतो. तेव्हा पैसे कमावण्यासाठी डिग्रीची काय गरजय हे अजून एका मुलाच्या हवाल्याने तो बोलतो. मला वाटतं दीपक गायकवाडच्या या वाक्याने घात केला. कादंबरीबद्दल सार्वत्रिक नाराजी या वाक्यामुळे झाली असणार असं मला वाटतं.

भारतीय समाज आज आर्थिक उदारीकरणाची फळे चाखतोय. खासकरून शिक्षित वर्ग स्वकष्टाने (?) शिकून नोकरी, व्यवसायात जम बसवून संपत्ती निर्मिती करतोय त्याचं सर्व श्रेय शिक्षणाला जातं. २०११ च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ८२.३४ % लोकं शिक्षित आहेत तर त्यात ८८.३८ % पुरुष व ७८.५७ % स्त्रिया एज्युकेटेड आहेत. ‘एज्युकेटेड’ हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. २०१८-१९ च्या The All India Survey of Higher Education (AISHE) च्या सर्व्हेनुसार सोबत दिलेल्या फोटोत विविध कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा दिला आहे. हा आकडा लेटेस्ट आहे. आपल्या इथे शिक्षणाचा प्रसार निम-शहरी व खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात वाढायला लागला तो सत्तर-ऐंशीच्या दशकात. वर मी लातुरात कधी शाळा चालू झाल्या हे सांगितलंच आहे. मग विचार करा दीपक गायकवाड जे म्हणतो ते मिरची झोंबल्यासारखं झोंबणारचं ना!



सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह काय म्हणतं?

वर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी दिलीय. ऐंशीच्या दशकापासून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तत्पूर्वीच्या संख्येपेक्षा नक्कीच जास्त आहे. ती वाढतच चालली आहे. अधेमधे शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी मांडली जाते पण इथल्या चर्चे पुरतं तो मुद्दा बाजूला ठेवावा लागेल. तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या कलेक्टिव्ह कॉन्शिअसनेसचा विचार केला तर एक गोष्ट ठळक दिसते ती म्हणजे शिक्षण घेणं नितांत गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण त्यातून आर्थिक, सामाजिक स्थैर्य प्राप्त होतं असं सर्वसामान्यांचा समज आहे. हा समज शिक्षणव्यवस्थेने शालेय स्तरापासून सतत बिंबवून पक्का केला आहे. त्यामुळे कॉलेजात जो नोकरीच्या पलीकडे काही करण्याचं म्हणतो त्याची टर उडवली जाते. वेड लागलंय म्हटलं जातं. इथे मी पारंपारिक व्यवसाय करणारा गुजराती, मारवाडी, कोमटी (लातुरातील एक समाज) समाजाबद्दल बोलत नाही. कारण शिक्षण घेऊन यांची मुले शक्यतो व्यावसायिकच होतात. हा वर्ग सोडून उर्वरित मोठा वर्ग आहे तो मात्र नोकरी एके नोकरी या मानसिकतेचा झाला आहे. शिक्षणात कधीही नोकरीची चाकोरी सोडून इतर गोष्टींची चर्चा केलेली आठवत नाही. त्यामुळे आपल्या कलेक्टिव्ह कॉन्शिअसनेसमध्ये ही गोष्ट इतकी पक्की बसलीय की त्या विरोधात बोललं तरी त्या वर्गाला राग येतो. तो हमरीतुमरीवर येतो.

तसेच आपल्या इथे नोकरी करणे प्रतिष्ठा असते. नोकरी सुरक्षितता देते. सोबतच महिन्यातील चार आठवड्याच्या हक्काच्या सुट्ट्या, पगार, वार्षिक पगारवाढ, पॅकेज यामुळे आर्थिक उत्पन्न वाढून आपण वरच्या वर्गात जात असतो. जे लोअर मिडलक्लास आहेत ते मिडलक्लास होतात, जे मिडलक्लास आहेत ते अप्पर मिडलक्लास होतात, जे गरीब आहेत ते कष्टाने एक तर लोअर, मिडल किंवा अप्पर मिडलक्लास होतात. त्यामुळे अशा कोणत्याही एका आर्थिक उत्पन्न गटात गेल्यावर जी प्रतिष्ठा वाढते त्याचं आकर्षण सर्वांनाच असतं. आर्थिक उदारीकरणामुळे भारतीयांना आपण यशस्वी होतोय याची स्वप्न पडतायत त्यात शिक्षण हे एक मोठं कारण आहे. म्हणूनच बघा इंजिनिअर/डॉक्टरचा मुलगा मेकॅनिक किंवा गवंडी होत नाही तर तो इंजिनीअर, डॉक्टर, एमबीए, सीए, बँक मॅनेजर किंवा तत्सम शिक्षण घेतो ज्यातून त्याचं ज्या आर्थिक उत्पन्न गटातून तो आलाय ते स्थान अबाधित राहावं किंवा वरच्या स्तरात जाता यावं म्हणून. एकुणात सामाजिक प्रतिष्ठा तशीच रहावी. त्याला गवंडी किंवा मेकॅनिक व्हायला आवडत नाही कारण ही लोकं ज्या लोअर मिडलक्लास किंवा त्या खालच्या गटात आयुष्य जगतात ते त्याला जगायचं नसतं. आर्थिक ओढगस्तीचा सामना त्यांना सतत करावा लागतो. तडजोडीचं आयुष्य असते ते. लाजिरवाणी गोष्ट असते ती. त्यात प्रतिष्ठा नसते. या मंडळींना परदेश प्रवास करता येत नाही. इंजिनीअर किंवा तत्सम शिक्षण घेणारा वर्ग कुटुंबकबिल्यासहित परदेश भ्रमण करून येऊ शकतो. आल्या नंतर प्रवासवर्णनं छापू शकतो. मेकॅनिक किंवा गवंडी वर्गातील लोकं कुठून इतकं आलिशान आयुष्य जगणार.

शिक्षणाविषयी विचार करता फ्रॉइड म्हणतो ते भारतीयांना लागू होतं. भारतीय लोकं इगो (ego) व सुपरइगो (superego) या अवस्थांच्या सीमारेषेवर जगतात असं दिसतं. शिक्षणाचं नको इतकं माजवलेलं अवडंबर, आर्थिक उदारीकरणामुळे हाती आलेला पैसा, जगाशी चटकन संपर्क साधणाऱ्या डिजीटल सुविधा, जातीयता-धार्मिकता यातून निर्माण झालेल्या प्रतिष्ठेच्या कल्पना लोक धारणेत घट्ट बसलेल्या. तसेच शिक्षणातून आलेली ‘मग्रुरी’ हा एक ठळकपणे दिसून येणारा गुण भारतीयांमध्ये दिसतो. खेदाने म्हणावे लागतंय की याला अपवाद असणारी एकही व्यक्ती मला अजून तरी आढळली नाही.

पदवीधरांशी बोलताना एक कॉमन वाक्य ऐकण्यास येतं ते म्हणजे ‘मी डिग्री घेताना खूप कष्ट घेतलेत.’ समजा एका क्लासमध्ये डिग्रीच्या शेवटचा वर्षाला १०० विद्यार्थी (प्रत्येकी ५० मुलं-मुली) आहेत. ती बॅच पास झाली तर तिचा रिझल्ट १००% लागला असं म्हणावं लागेल. त्या १०० जणांनी कष्ट घेतलेच असतील ना की फक्त चार-दोन विद्यार्थ्यांनीच कष्ट घेतले? आर्थिक उत्पनाच्या खालच्या गटातून आले असल्यास नंतर ते आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यावर जी देहबोली दाखवतात ती कष्ट घेऊन शिकलो म्हणण्याला छेद देणारी असते. त्यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे सतत ठसवण्याचा पदवीधरांचा अट्टहास पचनी न पडणारा. सर्वजण एकच प्रकारचं शिक्षण घेत असू तर ‘मी खूप कष्ट घेतले’ या वाक्याला अर्थच उरत नाही. समूहभावनेपेक्षा व्यक्तिगत भावनेला आपल्या इथे खूप महत्त्व आहे.

आपला वाचक व समीक्षक हा पदवीधर. त्यातही मिडलक्लास वर्ग कथा, कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात वाचतो. त्यामुळे पदवीधर असणारा हा वाचक जेव्हा दीपक गायकवाडचं वाक्य वाचतो तेव्हा त्याचा इगो दुखावतो. प्रतिष्ठेला ठेच लागते. त्याला राग येतो कारण त्याने ‘खूप कष्ट’ घेऊन डिग्री मिळवलेली असते. त्याच्यासाठी ती मोठी प्रतिष्ठा झालेली असते. घरात व बाहेर कोडकौतुक होत असतं. त्यामुळे मग तो त्यावर बोलतच नाही. तीच गोष्ट समीक्षेची. समीक्षक सुद्धा पदवीधरच. कादंबरीवर लिहायचं म्हणजे थोडक्यात त्यातील आशयाचं समर्थन केल्यासारखं होणार. त्यामुळे त्यावर न लिहिलेलंच चांगलं. उलट माझा दृष्टीकोन किती चुकीचा आहे हे समीक्षकांनी माझ्या लेखनाचे वाभाडे काढून सप्रमाण सिद्ध करायला हवं होतं. त्यांनी केलं नाही म्हणजेच मी मांडलेला मुद्दा योग्य आहे असा अर्थ होतो. कादंबरीवर न लिहिता एक प्रकारे तिचं मूक समर्थन त्यांनी केलंय असाही अर्थ मी घेऊ शकतो.

मराठी समीक्षेत एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे जर लेखन आवडलं नाही तर त्यावर चर्चा करत नाहीत, परीक्षणं लिहीत नाहीत. त्यावर बोलायचंच नाही. यापुढची पायरी म्हणजे लेखक व लेखनाला अनुल्लेखाने मारायचं. मला वाटतं माझ्या कादंबरीबद्दल हे घडलंय. लेखक म्हणून माझ्याबद्दल पण झालं असणार. एकुणात आपल्या इथलं वातावरण पाहता मला अनुल्लेखाने मारणे नाविन्यपूर्ण वाटत नाही.

साहित्याचे निकष

आपल्या इथे साहित्य लेखन कसे असावे याचे निकष विसाव्या शतकातील साठ्ठोतरी साहित्यावर आधारित आहेत. कोणतंही लेखन जीवनविषयक सूत्र, कोऽहंशी निगडीत असावं असं अपेक्षित आहे. एका ज्येष्ठ नाटककारांनी दिलेला अभिप्राय काहीसा असाच होता. ‘कादंबरीत जी मानवी जगण्याची सखोल जाण अपेक्षित असते, ती बाब मागे पडलेली आहे. एखादी 'सुधारणा' अशी दॄष्टी न ठेवता जगण्याचा पूर्ण आवाका...’ (मी फक्त अभिप्रायातला महत्वाचा भाग घेतलाय.)

लेखन याच सूत्राशी निगडीत असण्याची का गरजेचं आहे आपल्या इथे? इतर बाबी लेखनात आणायच्याच नाहीत का? हा एक मुद्दा असेल समीक्षकांनी कादंबरीची दखल घेतली नसल्याचा. हे प्रश्न मला पडले कारण मी बीए-एमएला अँग्लो-सॅक्सन पिरिअडपासून ते विसाव्या शतकातल्या मॉडर्निझम, पोस्ट-मॉडर्निझमपर्यंतचं जवळपास सर्व साहित्य शिकलोय पण आम्हाला शिकवताना साहित्याची निर्मिती ही वरील सुत्रांशीच निगडीत असते असं कधीच शिकवलं गेलं नाही. तसेच साहित्याची समीक्षा, ऍप्रिसिएशन करताना त्यात जीवनविषयक सूत्र आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करा नसेल तर ते साहित्यच नाही असं कोणत्याच प्राध्यापकाने शिकवलं नाही. शेक्सपिअरने सुरूवातीला सुखांतिका लिहिल्या नंतर आयुष्याच्या उत्तरार्धात शोकांतिका लिहिल्या यात त्याच्या मुल्यदृष्टीत झालेला फरक अभ्यासायचा की त्याच्या जीवनविषयक सूत्र मांडणाऱ्या शोकांतिकाच तेवढ्या महत्त्वाच्या म्हणून त्यांचा अभ्यास करायचा अन् सुखांतिकांना डस्टबीनमध्ये टाकायचं!

मला एका समीक्षकांचा मेल आला कादंबरीवरील अभिप्राय म्हणून. त्यांनी बरेच मुद्दे मांडताना एके ठिकाणी कादंबरीची तुलना कोसलाशी केली होती. मला हसावं की रडावं ते कळलं नाही. हे म्हणजे जॉर्ज बर्नार्ड शॉची तुलना शेक्सपिअरशी करण्यासारखं आहे. ‘कोसला’ ६३ साली प्रकाशित झाली व माझी कादंबरी २०११ मध्ये. काय बादरायण संबंध आहे दोन्हींचा? दोन्हीत ४८ वर्षांचं अंतर आहे. ४८ वर्षात लातुरात नसलेल्या नदी खालून बरंच पाणी वाहून गेलंय. एवढ्या काळात भारतात ठळक बदल घडलेत. आणीबाणी, बाबरी मशीद, आर्थिक उदारीकरण व किल्लारी भूकंपासारख्या घटना घडल्यात. तरीही ‘कोसला’शी तुलना का? कळायला काही मार्ग नाही. (मोठे समीक्षक आहेत. कुठं पंगा घ्या उगाच. तसेच त्यांनी पण राजन खानसारखं ‘लेखन कसं असावं’ यावर लंबाचवडा लेक्चर देऊ नये या भीतीने रिप्लायला रिप्लाय मिळू नये म्हणून नाही केला रिप्लाय.) पण कादंबरीची सुरूवात ‘मी कोण’ या शब्दप्रयोगाने होते म्हणून त्याची तुलना पांडुरंग सांगवीकरच्या सुप्रसिद्ध वाक्यांशी करायची का?

समीक्षा म्हणून जर शंभर वर्षांपूर्वीच्या एखाद्या साहित्याकृतीशी आपण तुलना करत असू तर कुठंतरी आपल्या वैचारिक बैठकीत पाणी मुरतंय हे नक्की. तसेच कादंबरीतलं व त्या बाहेरचं बदललेलं वास्तव स्वीकारायची आपली तयारी नाही असाच अर्थ निघतो यातून. तसेच मी अतिशय गंभीर प्रकृतीचा लेखक आहे. माझं आतापर्यंतचं सर्व साहित्य वाचलं तर प्रत्यय यावा. त्यामुळे त्या समीक्षकांनी मी हे असं का लिहिलंय, माझं शिक्षण किती झालंय, मी नापास झालो होतो का, माझा असा दृष्टीकोन का आहे असे प्रश्न मला विचारावेसे वाटले नाहीत. रोलंड बाथ्स म्हणतो तसं साहित्यकृतीच्या निर्मात्याची पार्श्वभूमी साहित्यकृतीच्या आस्वादाला मर्यादा आणते. तसा काही उद्देश त्यांचा होता का माहिती नाही. पण नियमाला अपवाद म्हणून त्यांनी मला विचारायला हवं होतं असं मला वाटलं.

लातूर पॅटर्नमध्ये कादंबरीच्या निकषात बसणार नाहीत अशा तांत्रिक अंगाच्या बऱ्याच चुका असतील पण त्याचा आशय हा नक्कीच विचार करायला लावणारा आहे असं मला वाटतं. त्यातील पात्रे ही मर्यादित विचारसरणीची आहेत. त्यामुळे ‘जगण्याचा पूर्ण आवाका...’ वगैरे बद्दल त्यांनी बोलावं ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांना जीवनविषयक सूत्रावर भाष्य करण्यापेक्षा शिक्षणामुळे, आई-वडिलांच्या वागण्यामुळे जे नैराश्य, वैताग, फ्रस्ट्रेशनला सामोरं जावं लागतंय त्याबद्दल बोलावं वाटतंय. त्यांच्यासाठी तीच मोठी गोष्ट आहे. दुर्दैवाने पात्रांची ही मर्यादा खूप कमी जणांच्या लक्षात आली.

समारोप

आज ‘लातूर पॅटर्न’ वर फारसं बोललं जात नाही याचं वैषम्य वाटतं. मागच्या वर्षी लातूर जिल्हा ग्रंथोत्सवात ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. सुर्यनारायण रणसुभे सरांनी एका परिसंवादातील अध्यक्षीय भाषणात विवेक कुलकर्णी या तरूण लेखकाची ‘लातूर पॅटर्न’ कादंबरी दुर्लक्षित राहिलीय असा उल्लेख केला. त्यांनी हे व्यासपीठावर म्हणावं याचं कारण दयानंद महाविद्यालयात ते हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून ६५ साली रूजू झाले होते. शिक्षणामुळे झालेले अंतर्बाह्य बदल त्यांनी जवळून बघितले आहेत. त्यामुळे त्यांना कादंबरीबद्दल ममत्व आहे. पण लातुरात सुद्धा यावर बोललं जात नाही. उर्वरित महाराष्ट्रात तर लेखक म्हणून माझा उल्लेख सुद्धा केला जात नसेल इतका मी दुर्लक्षित ठरतो. नापास झाल्यापासून खूप गोष्टी आपल्या विरोधात गेल्यात हे अनुभवत आलोय. कादंबरीमुळे ही बाजू पण अनुभवतोय.

Comments