सायोनारा
चित्रपट समीक्षक
होणे माझा कधीच उद्देश नव्हता. पुण्यात शिकायला गेलो ते वेगळीच स्वप्ने डोक्यात
घेऊन. जे ठरवलं होतं ते काही जमलं नाही. स्वप्ने काही पूर्ण करता आली नाहीत. नोकरीसारख्या
नसत्या फंद्यात पडलो. तिथं पण फार चमक दाखवू शकलो नाही. लहानपणापासून सिनेमे बघणे
कोणत्याही भाषेतले असो हिंदी, मराठी, कन्नड, इंग्लिश, किंवा हिंदी डब केलेले एवढाच
उद्देश होता. वाचायला यायला लागल्यापासून पेपर वाचणे हा नित्यक्रम असायचा त्यातही
चित्रपट समीक्षा वाचायला आवडायचं. चित्रपटावर घरात चर्चा ऐकायचो. त्या चर्चा कुठल्या
तरी पेपरातील चित्रपट समीक्षेवर वा दिवाळी अंकातील लेखांवर आधारित असायची. त्यातनं
किस्से वजा गॉसिपचं जास्त असायचं. मला आठवतंय माझा एक आतेभाऊ रेंचा गणशत्रू की आगंतूक बघून आला होता तेव्हा त्यावर बरंच बोलत होता. कोणत्या तरी फिल्म क्लब की
सोसायटीत त्याने बघितला होता. रे हा मोठा दिग्दर्शक आहे एवढं त्याच्या बोलण्यावरून
कळलं होतं.
घरात चर्चा
असायच्या त्या हिंदी, मराठी गाण्यांची व संगीताची कारण त्यावेळी आम्ही व आत्याचं
कुटुंब एकत्र राहत असू. त्यामुळे सगळे मिळून टीव्हीवर सिरीअल्स, सिनेमे बघायचो.
तसेच माझी आई, आत्या व दोन आतेभाऊ गायन, तबला शिकणारे त्यामुळे दररोज किंवा
आठवड्याला गाणी, तबला, पेटी यावर मैफिल ठरलेली असायची. त्यात शास्त्रीय संगीतातील
ख्यालासोबत गाणी असायची. मला तबला शिकवण्याचा निष्फळ प्रयत्न आईने करून बघितला होता.
दादरा ताल बऱ्यापैकी वाजवायला शिकवलं होतं. रियाज करत नव्हतो. नंतर त्याचा कंटाळा
आल्यावर भांडून बंद करून टाकलं. बरं झालं शिकलो नाही कारण गायन, वादन अथवा नृत्य असो
त्याचे उपजत गुण असणं गरजेचं आहे. उगाच मारून मुटकून कला शिकता येत नाही. शरद नेरूळकरला
हे कळायला खूप उशीर झाला मी वैतागून सोडून दिलं तेच बरं झालं.
घरात पूर्वीपासून
कलेचं वातावरण होतं. त्यात हौशीपणाच जास्त. त्याला व्यावसायिक स्वरूप द्यावं ही
मानसिकता कुणाचीच नव्हती. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत औरंगजेब असलो तरी त्याचे
संस्कार होण्यापासून मात्र दूर राहू शकलो नाही. घरात सतत मैफिली चालू असायच्या.
त्याचा कळत नकळत प्रभाव राहिलेलाच. पुढे तर बीएची पहिली दोन वर्ष सरस्वती संगीत
महाविद्यालयात घालवली. एवढं सविस्तर सांगायचं कारण सिनेमा संगीत हा आपल्या
जगण्याचा अविभाज्य भाग. त्याच्याविषयी असणारं आकर्षण, त्यातील माधुर्य याची पेरणी
लहान वयातच झाली. पुढे चित्रपटा विषयी अधिक वाचायला लागल्यावर त्याचं अनन्यसाधारण
महत्त्व समजायला लागलं. भारतीय सिनेमाने स्वतःची पटकथेची शैली तयार केली जी आजही
जगात युनिक आहे. पटकथेचे काही ट्रेंड्स असतील तर भारतीय सिनेमाला त्याची भनक
सुद्धा नाही. आपण अजूनही मसाला इंटरटेनमेंट या फॉर्म्युल्यातून बाहेर
पडलेलो नाही.
सिनेमा विषयक वाचन
शाळेत असताना घरी मटा यायचा त्यातनं सुरू झालं. तेव्हा कमलाकर नाडकर्णी हिंदी
सिनेमाची समीक्षा करायचे. ते न चुकता वाचायचो. मला आठवतंय त्यांनी स्पीड
सिनेमावर लिहिताना हा सिनेमा हिंदीवाल्यांनी तयार केला असता तर त्यात तू चीज़ बड़ी है
फ़ास्ट फ़ास्ट गाणं घातलं असतं
असं लिहिलं होतं. तेव्हापासून पेपरातील समीक्षा वाचणे हा नित्यक्रमच झालेला. पुढे
मुकेश माचकर, लोकप्रभाचे अभिजीत देसाई आणि सरतेशेवटी साप्ताहिक सकाळमध्ये लिहिणारे
गणेश मतकरी अशी चित्रपट समीक्षा वाचनाची वाटचाल चालू झाली. पण निव्वळ यांच्यावरच
अवलंबून होतो असं नाही. दिवाळी अंकात सिनेमाविषयक जे जे छापून येई ते वाचत असे.
गीता दत्तवर एक प्रदीर्घ लेख बाबू मोशायनी लिहिल्याचं आठवतं. तसेच कॉलेजला आल्यावर
शिवछत्रपती ग्रंथालयात भरणाऱ्या दिवाळी अंक प्रदर्शनाला आठी दिवस भेट द्यायचा
शिरस्ता मी पाळत होतो. तिथेच चंदेरी च्या २००० च्या दिवाळी अंकात मेट्रिक्स
सिनेमा समजावून सांगणारा लेख वाचला. गणेश मतकरी हे नाव तेव्हा माहिती झालं. त्या
लेखाने सिनेमाकडे बघण्याचा तीनशे साठ अंशात दृष्टीकोनच बदलून टाकला. गणेश मतकरी
रत्नाकर मतकरींचा रिलेटिव्ह असेल या साधर्म्याने पण लक्षात राहिलं.
बीएला एकदा असंच
साप्ताहिक सकाळ घेतलं असताना त्यात एक लेख स्टार वॉर्स व हॅरी पॉटरवर
असल्याचं दिसलं. नाव गणेश मतकरी. मग दर आठवड्याला साप्ताहिक सकाळ घेणे कार्यक्रमच
झाला. बारावीत असतानाच पेपरमधील महत्वाचे लेख कात्रण काढून फाईल करायची सवय लागली
होती. मुकेश माचकर, अभिजीत देसाई यांचे लेख आजही आहेत माझ्याकडे. तीच सवय
मतकरींच्या लेखांबाबतही ठेवली. साधारण २००३ ते २००९ पर्यंत त्यांचे हॉलीवूड-बॉलीवूड
सदरातील २०२ लेख मी एका बॉक्स फाईलमध्ये काढून ठेवले होते. पुढे पुण्यात गेल्यावर
सर्व लेख त्यांना देऊन टाकले. ते त्याचं पुस्तक करतो म्हणाले होते. तसेच त्यांनी
कधीच स्वतःचे लेख जपून ठेवले नव्हते. त्यामुळे हा एक मोठा ऐवजच माझ्याकडे जमा झाला
होता.
याच काळात कधीतरी
आल्फ्रेड हिचकॉकवरचं द मॅन हू न्यू टू मच हे चरित्रात्मक पुस्तक बघण्यात
आलं. त्याच्या विषयी पूर्वीच यशवंत रांजणकरांच्या अपूर्व चित्रलेणी
पुस्तकात सायकोवरील लेखात वाचलं होतं. त्यामुळे हिचकॉकवरील पुस्तक विकत घेतलं.
त्याची पारायणं केली. बीएला असताना सत्यजित रेंवरील चिदानंद दासगुप्त यांनी
लिहिलेलं द सिनेमा ऑफ सत्यजित रे हे पुस्तक वेद प्रतिष्ठान लायब्ररीत
मिळालं. ते मराठीत होतं. मी तोपर्यंत रेंचा एकही सिनेमा बघितला नव्हता. पण
पुस्तकाने रेंचं विश्व डोळ्यांसमोर उभं केलं. पुढे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात त्यांचे
सिनेमे बघितले.
पुण्यात एमएला गेल्यावर सिनेमाचा जागतिक अवकाश कवेत आला. एकीकडे मल्टीप्लेक्समध्ये नेहमीची कमर्शिअल सिनेमे बघत असतानाच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पब्लिकसाठी दाखवण्यात येणारे सर्व फिल्म्स बघायचा झपाटा लावला. ती फुकट असायची. तसेच २००७ ला पहिल्यांदा पिफ अर्थात पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अटेंड केलं. ज्या सिनेमांविषयी पूर्वी फक्त वाचलं होतं ते बघायला मिळाले. उदा. सिटी ऑफ गॉड आणि क्रिस्तोफ किजलॉजस्कीचा अ शॉर्ट फिल्म अबाऊट किलिंग. अ शॉर्ट फिल्म अबाऊट किलिंग माझी ऑल टाईम फेव्हरीट फिल्म आहे. त्याच्यासारखी एखादी तरी फिल्म डिरेक्ट करावी अशी इच्छा आहे. सोबतच बर्गमन आणि कासारवल्लीसारखे दिग्दशक बघायला मिळाले. त्यामुळे कमर्शिअल सोबत आर्ट सिनेमा म्हणतात तो बघितल्यामुळे वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं.
साधारण २०१२ मध्ये आऊट ऑफ फ्रस्ट्रेशनमधून माझ्या फेसबुक वॉलवर बघितलेल्या सिनेमांवर लिहायला लागलो. तसेच मुव्ही रिव्ह्यूज बाय फ्रेंड्स नावाच्या ग्रुपवर शेअर करायला लागलो. या लेखनात सातत्य होतं. कमर्शिअल सिनेमा पद्धतशीरपणे बघण्याची शिस्त लावली. माझा एक मित्र हडपसरहून मनपाला यायचा. तिथं आम्ही मंगलाला सकाळी आठचा शो बघायचो. त्याला रविवारी सुट्टी असल्यामुळे रविवारी सिनेमे बघायचो. पुणे सोडेपर्यंत हाच कार्यक्रम होता. लातुरात आल्यावर २०१५ मध्ये अमोल गोवंडेंमुळे दै. मराठवाडा नेता ला सिनेमा परीक्षण/समीक्षा करायला लागलो. पहिला सिनेमा होता चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट. शेवटचा सिनेमा होता सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णीचा शटर. यामुळे सिनेमा समीक्षा करण्याची प्रॉपर पद्धत मला विकसित करता आली. कारण लगेचच २०१६ च्या जानेवारीत वजीर सिनेमाची समीक्षा करून मी मी मराठी लाईव्ह नावाच्या आता बंद पडलेल्या मराठी पेपरात समीक्षक म्हणून कामाला सुरूवात केली.
२०१५ मधेच मला या
पेपरात समीक्षा करण्यासाठी विचारणा झाली होती. मी, मराठवाड्याचा रॉजर एबर्ट अमोल
उदगीरकर, कल्याण शितोळे आणि रणजीत पराडकर सातत्याने मुव्ही रिव्ह्यूज बाय फ्रेंड्स
या ग्रुपवर लिहायचो. तिथनच कुणीतरी आमचं नाव मी मराठी लाईव्ह या नव्यानेच सुरू होणाऱ्या
मराठी पेपरात समीक्षा करण्यासाठी संपादक मुकेश माचकरना सजेस्ट केलं. मला मुकेश
माचकरांचा मेसेज आला. त्यांना फोन केल्यावर त्यांनी लवकरच तुला फोन येईल सिनेमा
पेज सांभाळणाऱ्या संपादकांकडून असं सांगितलं. मी २०१५ मध्ये शक्य होणार नाही
म्हटलं. मी सोडून वरील तिघे तिथे लिहायला लागले. पण नंतर २०१६ ला मी लिहायला
लागलो. पहिला बिजॉय नाम्बियारचा वजीर होता तर शेवटचा टायगर श्रॉफचा बागी.
या काळात खऱ्या
अर्थाने मी खूप विचार करून सिनेमा समीक्षा करायला लागलो. तसेच याचे संपादक मंदार
जोशींनी एक गोष्ट मला शिकवली ती म्हणजे सिनेमा आवडला नसला तरी तो का आवडला नाही हे
सुद्धा लिहायचं. मी फक्त चांगल्या, आशयघन सिनेमांचीच समीक्षा करतो असा अट्टाहास
बाळगायचा नाही. हा धडा मला खूप शिकवून गेला. दुर्दैवाने फार कमी वेळ मी त्या
पेपरसाठी लेखन केलं. पेपरच्या कंपनीच्या मालकाला जेल झाली अन् पेपर बंद पडला.
तसेच सारं जग सिनेमे बनवतंय आणि मी फक्त रसिक नात्याने त्याचा आस्वाद घेतोय हे डाचत होतं मला. तरी पण इतर ठिकाणी माझं लेखन चालूच होतं. वास्तव रूपवाणी, बहुविध.कॉम वगैरे. आतल्या आत हे कधीतरी बंद करावं लागेल ही टोचणी गप्प बसू देत नव्हती. त्यातच मागच्या वर्षी चित्राक्षरेसाठी लेख लिहिले. विषयाचं बंधन नव्हतं. तरी पण १००० शब्दांचे लेख किती वर्ष लिहित बसणार हा विचार काही केल्या मनातून जात नव्हता.
सोबतच गेल्या काही
वर्षात माझ्यातला पटकथाकार गप्प बसलेला नव्हता. दोन पूर्ण लांबीच्या व तीन लघुपटाच्या
स्क्रिप्ट्स लिहून काढल्या होत्या. त्यांना चांगल्या दिग्दर्शकाच्या हाती सोपवावं
यासाठी जमेल तसे प्रयत्न चालू होते. पण यश येत नव्हतं. त्यामुळे कुठेतरी हे
थांबवणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं. कलाकृती मीडियासाठी लिहिताना प्रकर्षाने हे
जाणवत होतं. त्यामुळे मागच्या महिना दीड महिन्यात यावर विचार करून यापुढे चित्रपट
विषयक लेखन कायमचं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वेब पोर्टल्स,
दिवाळी अंक, पेपर/वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक, चित्रपट विषयक कुठलंही नियतकालिक
वा अशा कुठल्याही चित्रपट विषयक प्लॅटफॉर्मवर समीक्षा, परीक्षण, अभ्यासू लेख
लिहिण्याचं थांबवलं आहे. आतापर्यंत जे लिहिलं आहे ते पुरेसं आहे असं वाटतंय. तसेच
काही वेळा सिनेमा, दिग्दर्शक, जॉनर किंवा तत्सम विषयावर पुस्तक लिहिण्याचा विचार
केला होता तो पण बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
अमोल गोवंडे, रामेश्वर
बद्दर, मुकेश माचकर, मंदार जोशी, संतोष पठारे, राम जगताप, कविता दातीर, भूषण
पत्की, सचिन बाबर यांनी मला त्यांच्या व्यासपीठावर लिहिण्यासाठी जागा दिली यासाठी
त्यांचे खूप खूप आभार.
सायोनारा.



Comments