झॅक स्नायडर व्हर्सेस स्नायडर कट
‘स्नायडर कट’ ही गेल्या काही वर्षातली सर्वात चर्चिली गेलेली गोष्ट. २०१७ चा ‘जस्टीस लीग’ प्रेक्षकांना न आवडल्यामुळे बॉक्स ऑफिसवर सेन्सेशन निर्माण करू शकला नाही. त्यामुळे ‘स्नायडर कट’ यावा यासाठी ट्विटरवरून चाहते झॅक स्नायडरला मनधरणी करत होते. २०१७ च्या जस्टीस लीगच्या चित्रिकरणा दरम्यान त्याच्या वीस वर्षाच्या मुलीने, ऑटमने आत्महत्या केली. त्या आघातामुळे आपण सिनेमा पूर्ण करू शकणार नाही असं सांगून त्याने सिनेमा सोडला. तोपर्यंत त्याने ७०-७५% काम केलं होतं. सिनेमा रिलीज करणं गरजेचं होतं. म्हणून मग ते काम मार्व्हलमध्ये यशस्वी ठरलेल्या जॉस व्हीडनला निर्माते वॉर्नर ब्रदर्सनी दिलं. लेखाचं शीर्षक स्नायडरशीच निगडीत आहे कारण २०१७ च्या जस्टीस लीगचं डिरेक्टरचं क्रेडिट स्नायडरला देण्यात आलंय. फिल्म बघताना ते दिसून येतं. सिनेमा थिएटरला रिलीज झाला तो व्हीडनने दिग्दर्शित केलेला होता. पण स्नायडरच्या करारात डिरेक्टरचं क्रेडिट देणं बंधनकारक होतं म्हणून ते तसंच ठेवण्यात आलं. व्हीडनने काय बदल केले व स्नायडरने त्याच्या कटमध्ये नेमकं काय केलंय हे जाणून घेण्या अगोदर डिरेक्टर्स कट काय असतं ते जाणून घेऊया. ‘डिरेक्ट...