अभिजात भाषा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आनंदाची गोष्टय. मला खूप आनंद झालाय अशातला भाग नाही. त्याचं कारण मला भाषेचं एक्पोजर जरी मराठीचं असलं तरी निव्वळ मराठीच माझी भाषा आहे असं मी म्हणू शकत नाहीत. किंवा माझ्यासारख्या बॉर्डर इलाख्याच्या जवळ जन्मणाऱ्या व पालनपोषण झालेल्याला भाषेबद्दल कट्टरता, अस्मिता किंवा वर्चस्व पण दाखवता येत नाही. खरं बोलायचं तर त्यासाठी माझ्या भूतकाळात व मी ज्या भौगोलिक वातावरणात वाढलो ते समजून घेणं गरजेचं आहे.
माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं १९७९ साली. वडिलांचं आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण लातूरच्या राजस्थान शाळेत झालेलं. नंतर इंजिनिअरींगचा डिप्लोमा त्यांनी गुलबर्ग्याच्या (आताचा कर्नाटकातली कलबुर्गी) कॉलेजातून केलं. पुढे काही दिवस हैदराबादेत जॉबसाठी ट्राय केल्यावर मराठवाड्यात एके ठिकाणी लेक्चरर म्हणून काम केलं. त्याचवेळी एमएसईबीत जागा निघाल्या. जॉब लागला सब-इंजिनिअर म्हणून. पहिली पोस्टिंग बहुतेक नांदेडला झाली कारण आईचे मामा (आत्याचे मिस्टर) आईचं स्थळ घेऊन त्यांना भेटायला आले होते ते तिथेच. तेव्हा वडील स्वतःच स्वैपाक करायचे. त्यांनी आईच्या मामांना व सोबत आलेल्यांना चहा करून दिला. मामा प्रचंड प्रभावित झाले. चहा कुणी केला म्हणून आतल्या खोलीत डोकावले होते म्हणे. नवरा मुलगा स्वतः स्वैपाक करतो म्हणजे बराच स्वावलंबी आहे ही गोष्ट त्यांना प्रचंड आवडली. सोबत एमएसईबीत नोकरी म्हणजे सोने पे सुहागा.
वडील मुळचे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद
तालुक्यातील माणिकनगरचे. माणिकनगर दत्ताचे चतुर्थावतार माणिकप्रभूंचं स्थान. तिथे
कानडी बोलली जाते. मराठी सुद्धा बोलली जाते पण कानडी प्रभावाखालील. माणिकनगर,
बिदर, गुलबर्गा या परिसरात मराठी बऱ्यापैकी बोलली जाते. व्यवहारात कानडी. हा भाग
महाराष्ट्राला जोडलेला असल्यामुळे मराठीचा प्रभाव आहे. तसेच या सोबतच उर्दू भाषा
बोलली जाते. त्यातले कितीतरी शब्द मराठी, कानडीत इथे ऐकायला मिळतात. माझ्या आईचे
वडील, ज्यांनी स्थळ आणलं ते मामा व वडिलांचे तिन्ही मामा उर्दू शिकेलेले कारण
निजामाच्या काळात शालेय शिक्षण उर्दूत होतं. पुढे भाषावार प्रांतरचना झाल्यावर
वडिलांचे एक मामा महाराष्ट्रात आले. लातूरला सेटल झाले. ते कोर्टात होते कामाला.
लग्नानंतर आई-वडील काही दिवस हिंदीत बोलायचे का तर आईला वाटायचं
वडिलांना कन्नडच येते फक्त आणि वडिलांना वाटायचं आईला फक्त मराठी येते. नंतर पुढे त्यांनी मराठीतच बोलणं चालू
केलं. वडिलांचं सुरूवातीला शालेय शिक्षण कर्नाटकात झालेलं त्यामुळे त्यांना कानडी लिहिता,
वाचता यायची. माझी आत्या, (घरी फक्त ते पण जेमतेम. घरात भाषा मराठीच. त्या पण
आमच्या घराजवळच राहतात.) वडिलांकडील सर्व नातेवाईक कानडीच बोलतात. तरीही लातुरात
मराठी शिकल्यामुळे व पुढे नोकरी नांदेड-उस्मानाबाद (धाराशिव)-लातूरमध्ये केली
असल्यामुळे मराठीच जास्ती करून बोलणं व्हायचं. लातूरला सेटल झाल्यावर कानडीचा
संबंध फक्त नातेवाईकांशी व माणिकनगरच्या स्मरणरंजनापुरता राहिला.
आईचं मूळ उदगीर. आईकडील सर्व नातेवाईक उदगीर परिसरातील. तर माझ्या दोन माम्यांची गावे अट्टरगा व भंडारकुमठा अनुक्रमे कर्नाटकातील आहेत. त्यामुळे तिकडची ग्रामीण मराठी-कानडी मिश्रपणा बोलण्यात आलेला. मी लहानपणापासून कानडीचे कित्येक शब्द बोलतो. कारण गुलबर्गा, बिदर परिसरात वडिलांचे नातेवाईक असल्यामुळे. पण कानडी भाषा शिकलो नाही. शिकवण्याचा प्रयत्न केला गेला पण तो प्रयत्नच राहिला. शब्द मात्र तोंडात राहिले. माझे तिकडचे बहिण-भाऊ बऱ्यापैकी मराठी बोलतात. आम्ही लहानपणी हिंदीत बोलायचो. थँक्स टू हिंदी सिनेमा. कानडी-मराठी-हिंदी अशी भेळ असताना आम्हाला कधीच भाषेची अडचण आली नाही. उलट भाषेचे इतके मर्डर केलेत की कुणी त्यावेळी ऐकलं असतं तर चक्कर येऊन पडला असता. संवाद साधणे जास्त महत्त्वाचे होते आमच्यासाठी. त्यात अभिनिवेश, अभिमान, गर्व, अस्मिता, प्रतिष्ठा असं काहीही नव्हतं.
शाळेत इंग्रजी पाचवीपासून शिकायला मिळाली. पुढे अकरावीला सायन्स इंग्रजीतून. बारावीत कमी मार्क पडले म्हणून बीकॉमला अॅडमिशन. तिथं इंग्रजी माध्यमात शिक्षण का तर त्यामुळे नोकरी चटकन मिळेल. बीकॉमला दोन वर्ष नापास झाल्यावर उलटं फिरून बीएस्सीला अॅडमिशन घेतलं. त्यातील सर्व विषय इंग्रजीत. तिथं तीन वर्ष नापास झाल्यावर बीएला अॅडमिशन घेतलं. समाजशास्त्र, लोकप्रशासन विषयांसोबत इंग्रजी भाषा घेतली कारण ती नोकरी मिळवून देते. भाषेचं ज्ञान, अभ्यास, लिटरेचर वगैरे चावटपणाला फाटा देऊन.
भाषेची अडचण जाणवायला लागली पुण्यात गेल्यावर. आमचे उच्चार मराठवाडी. (मराठवाड्यातले ब्राह्मण पुणेरी ब्राह्मणांसारखे बोलत नाहीत. ते मराठवाडी उच्चार व शब्दांचा वापर करूनच बोलतात. वर म्हणल्याप्रमाणे आमच्या बोलण्यात मराठीवाडी व कानडी शब्द असतात. उच्चारही मिश्र स्वरूपात.) त्यामुळे स्थानिक पुणेकर चटकन ओळखायचे मराठवाड्याचा गावठी माल आलाय म्हणून. सोबतच फर्गसनमध्ये इंग्रजी बोलायला लागायची. सवय नसल्यामुळे व मराठीत शिक्षण झाल्यामुळे लिहिता यायचं पण बोलता यायचं नाही. टाटा स्काय कॉल सेंटरला जॉब करताना इंग्रजीवरील प्रभूत्व असणं गरजेचं वाटायला लागलं. भाषेचे अत्याचार होतायत वाटायला लागलं. कारण मित्रांसोबत मराठवाडी शैलीत मराठी, स्थानिक पुणेकरांसोबत त्यांच्या शैलीत मराठी आणि नोकरीसाठी वणवण करताना इंग्रजीत. इंटरव्ह्यू देऊन येताना पीएमटीत बस कंडक्टर किंवा ऑटोरिक्षावाल्याला मराठीत बोलायचं. त्यामुळे आतल्याआत भाषेची प्रचंड सरमिसळ व्हायची. कित्येकदा अत्यंत चुकीचं इंग्रजी मी बोलायचो. समोरचा चटकन ओळखून घ्यायचा. तसेच व्हर्नाक्युलर एज्युकेशन झाल्यामुळे व्यावहारिक इंग्रजी बोलायला जड जायचं. पुण्यात राहायचं म्हटल्यावर इंग्रजी येणं क्रमप्राप्त होतं.
माझा भाच्चा व भाच्ची ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियात राहतात. त्यांची भाषा इंग्रजी आहे. शाळेत इंग्रजीच बोलतात. त्यांचा परिसर इंग्रजी आहे. घरात आई-वडील मराठी बोलले तरी त्यातील खूप कमी त्यांना समजतं. त्यांनी मराठी शिकावी ही अपेक्षा पण आमची नाही. कारण भाषा ही भौगोलिक स्थितीवर अवलंबून असते ना की तुमचे आई-वडील कुठून आले वा त्यांचं मूळ कुठलंय वा त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय का. माझे वडील कर्नाटकी असूनही त्यांनी आम्ही कन्नड शिकावं यासाठी कंपल्शन केलं नाही. मला व माझ्या बहिणीला घराजवळील मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे आम्हाला त्याची गरज भासली नाही. माझ्या परिसरात मराठी बोलली जायची. शाळा, कॉलेज, घर, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, ट्युशन, क्लासेस व इतर व्यवहारातील गोष्टी मराठीच होत्या. त्यामुळे माझी भाषिक जडणघडण मराठीत झाली. पुढे मी इंग्रजी भाषा अजून खोलात जाऊन शिकलो ती व्यावहारिक गरज म्हणून.
आपल्या इथे मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषा येणं गरजेचं असतं. कारण त्यांचा व्यावहारिक उपयोग आहे. मी या सोबत संस्कृत व पाली शिकलोय. पण त्या भाषा फक्त शाळा-कॉलेजात मार्क्स घेण्यासाठी. आज मला त्यातील काहीही आठवत नाही. त्यांचा उपयोग व्यवहारात होत नाही. त्यांचा अभ्यास होतो.
त्यामुळे भाषा ही आमच्यासाठी वा माझ्यासाठी निदान व्यावहारिक कारणांपुरतीच राहिली. मराठीत काही कथा, कादंबऱ्या लिहिल्या का तर लहानपणापासून मराठीत लिहिणं, वाचणं व्हायचं म्हणून. जर कानडी शिकलो असतो अथवा इतर कुठल्या राज्यात लहानाचा मोठा झाला असतो तर त्या भाषेत लिहिलं असतं. माझी एक मैत्रीण महाराष्ट्रीयन आहे. पण तिचं बालपण, शाळा-कॉलेज मध्यप्रदेशात गेलंय. ती उत्तम मराठी बोलते पण तिचं प्रभूत्व हिंदी भाषेवर आहे कारण तिच्या भौगोलिक परिसरात हिंदी जास्त बोलली जाते. व्यवहार हिंदीत होतो. ती लेखन करताना हिंदीत करते.
आमच्या घराजवळ राजीव गांधी चौकात भाजी विक्रेते बसतात. त्यांच्याकडे भाजी घ्यायला गेल्यावर जर मी अभिजात तामिळमध्ये भाजी द्या म्हटलं तर त्या विक्रेत्याला ते कळणार नाही. पण ‘गवार कसं पाव?’ असं मराठीत विचारल्यावर तो चटकन म्हणेल ’२० रू. पाव.’ का? कारण त्याला कळणारी भाषा मराठी आहे. मला त्याला बोलता येईल अशी भाषा मराठी आहे. मी पाव किलो गवार घेऊन त्याला २० ची नोट देतो. तो खुश झालेला असतो कारण व्यवहार कोणत्याही भाषिक अडचणी शिवाय पूर्ण झालेला असतो. तिथे अभिजात वगैरे गोष्टी आडव्या येत नाहीत.
हे सर्व सांगण्याचं कारण भाषा अभिजात असते म्हणतात तेव्हा
त्याला प्रतिष्ठा व अस्मितेचा मुलामा दिलेला असतो. त्यातनं दर्प डोकावतो. भारतीय
लोकांना प्रतिष्ठा व अस्मिता खूप आवडते. कोणत्या गोष्टीत त्यांना या गोष्टी दिसतील
सांगता येत नाही. शेवटी आपण ज्या भौगोलिक परिसरात राहतो तिथली मानसिकता ही ‘आम्हीच
राजे इथले’ अशी असते.



Comments