नटसम्राट असा नट होणे नाही : प्रभावी पण...
साहित्य किंवा नाट्यकृती सिनेमात रुपांतरीत करताना असंख्य गोष्टींचं भान ठेवायला लागतं. आपण सिनेमा करतोय व त्यानुसार पटकथा लिहायला हवी असं अपेक्षित आहे. साहित्य असो की नाट्यकृती त्यात सिनेमाला साजेसं कथानक येण्यासाठी कमी जास्त बदल सुद्धा स्वागतार्ह. तो बदल नुसता सिनेमॅटीक बदल न वाटता विश्वसनीय वाटायला हवा तरच प्रेक्षक सिनेमाला खिळून राहिल. तसेच हा बदल विश्वसनीय आहे म्हणून भागत नाही तर दिग्दर्शकीय कौशल्याने ते पडद्यावर प्रभावी वाटणं गरजेचं असतं. जेव्हा नाट्यकृती किंवा साहित्यकृती ही अजरामर असं नामाभिधान घेऊन तेव्हा त्याचं रुपांतर हे त्याच्या मूळ संहीतेसोबत तुलनात्मक दृष्ट्या बघितलं जातं. त्याला रुपांतरीत करताना काय बदल केले यापेक्षा ते कितपत प्रभावी ठरलं याचीच जास्त उत्सुकता असते कारण मूळ कलाकृती ही बघणाऱ्याच्या मनात ठसलेली असते तेव्हा त्या ठसलेल्या प्रभावाची परत आठवण करून देणं प्रेक्षकांसाठी क्रमप्राप्त ठरतं. नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकरांनी लिहिलेलं नाटक एका नटाच्या आयुष्याची होणारी शोकांतिका दाखवतं. रंगभूमीवर अजरामर पात्र उभं करणारा गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर हा नट प्रत्य...