नटसम्राट असा नट होणे नाही : प्रभावी पण...

साहित्य किंवा नाट्यकृती सिनेमात रुपांतरीत करताना असंख्य गोष्टींचं भान ठेवायला लागतं. आपण सिनेमा करतोय व त्यानुसार पटकथा लिहायला हवी असं अपेक्षित आहे. साहित्य असो की नाट्यकृती त्यात सिनेमाला साजेसं कथानक येण्यासाठी कमी जास्त बदल सुद्धा स्वागतार्ह. तो बदल नुसता सिनेमॅटीक बदल न वाटता विश्वसनीय वाटायला हवा तरच प्रेक्षक सिनेमाला खिळून राहिल. तसेच हा बदल विश्वसनीय आहे म्हणून भागत नाही तर दिग्दर्शकीय कौशल्याने ते पडद्यावर प्रभावी वाटणं गरजेचं असतं. जेव्हा नाट्यकृती किंवा साहित्यकृती ही अजरामर असं नामाभिधान घेऊन तेव्हा त्याचं रुपांतर हे त्याच्या मूळ संहीतेसोबत तुलनात्मक दृष्ट्या बघितलं जातं. त्याला रुपांतरीत करताना काय बदल केले यापेक्षा ते कितपत प्रभावी ठरलं याचीच जास्त उत्सुकता असते कारण मूळ कलाकृती ही बघणाऱ्याच्या मनात ठसलेली असते तेव्हा त्या ठसलेल्या प्रभावाची परत आठवण करून देणं प्रेक्षकांसाठी क्रमप्राप्त ठरतं.

नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकरांनी लिहिलेलं नाटक एका नटाच्या आयुष्याची होणारी शोकांतिका दाखवतं. रंगभूमीवर अजरामर पात्र उभं करणारा गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर हा नट प्रत्यक्ष आयुष्यात मात्र वास्तवातली भूमिका कशी निभावू शकत नाही याची कथा म्हणजे नाटक. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागूंनी बरीच वर्ष ही भूमिका केली. त्यामुळे त्यांच्या अभिनय शैलीचा ठसा यावर राहिला. पुढे बऱ्याच नटांनी अप्पासाहेब बेलवलकर साकारलं. मुख्य अभिनेत्याच्या अभिनय क्षमतेची कसोटी पाहणारं हे नाटक त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीला पार्श्वभूमी म्हणून वापरून त्याला एका काळाची किनार देतं. अप्पासाहेब बेलवलकरच्या तोंडी असणारी स्वगत शेक्सपिअरच्या लेखनाची आठवण करून देतात. त्यामुळे अभिनेता कोणीही असला तरी अप्पासाहेबाच्या सशक्त व्यक्तिरेखेला ते न्याय कसा देतात हेच बघणं आलं.

नुकताच प्रदर्शित झालेला नटसम्राट असा नट होणे नाही हा सिनेमा त्याला नाटकाच्या अवकाशातून काढून सिनेमाच्या अवकाशात ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो यशस्वी होतो का तर याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण.

अप्पासाहेब बेलवलकर (नाना पाटेकर) एका हॉटेलात चहा द्यायचं काम करतायत. तिथे एक सिद्धार्थ नावाचा एमटेक केलेला तरुण परदेशातली मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतात नाटकाच्या ध्यासामुळे वापस आलाय. त्याला अप्पासाहेब बेलवलकर माहित आहेत. तो त्यांना त्यांच्या कामाबद्दल विचारतो. अप्पासाहेब धुडकावून लावून निघून जातात. तो त्यांचा पाठलाग करतो. ते एका पुलाखालच्या झोपडपट्टीत राहत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पासाहेबांना एका पेपरात एक नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्याचं वाचायला मिळत. ते तडक तिकडे जातात तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्याची शोकांतिका झालीय याची जाणीव होते. त्यांना जुन्या गोष्टींची आठवण यायला लागते. इकडे अप्पासाहेबांचा मुलगा मकरंद (अजित परब), सून नेहा (नेहा पेंडसे), मुलगी विद्या (मृण्मयी देशपांडे) व जावई (सुनील बर्वे) त्यांना शोधत शोधत तिथे आलेले असतात. त्यांना अप्पासाहेबांना वापस न्यायचं असतं. सुनेच्या स्वभावामुळे अप्पासाहेब व त्यांची पत्नी कावेरी (मेधा मांजरेकर) घर सोडून मुलीकडे राहायला जातात. तिथे पण एके क्षणी मुलीकडून अपमान सहन न होऊन घर सोडून आपल्या मूळ गावी मोरवाडीला जायला निघतात.

कथानकावरून सिनेमासाठी पटकथेत बरेच बदल केले आहेत हे दिसून येतं. पटकथा महेश मांजरेकर, अभिजीत देशपांडे व किरण यज्ञोपवीत यांनी लिहिली आहे. पहिला बदल म्हणजे सिद्धार्थ नावाची आगंतुक व्यक्तिरेखा. ही उपरी चिकटवलेली व्यक्तिरेखा का तयार केली गेली याची ठोस कारणमीमांसा सिनेमा देत नाही. भस्मसात झालेल्या त्या नाट्यगृहात अप्पासाहेब व ते नाट्यगृह वर्तमानात एकाच पातळीवर आहेत हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं पण त्या पात्रामुळे उगाच लक्ष विचलित होतंय असं वाटत राहतं. तसेच रामभाऊ (विक्रम गोखले) हे दुसरं एक पात्र कथानकात येतं. ज्याचा आगापिछा सांगण्याची तसदी ना पटकथा घेते ना दिग्दर्शक. त्यामुळे अप्पासाहेबांबरोबर असणारा हा नट मधेच येऊन चार व्यवहारातल्या गोष्टी का सांगतो किंवा त्यांनी केलेल्या नाटकातले संवाद जुगलबंदी सदृश का म्हणतो ते कळायला मार्ग उरत नाही.

अप्पासाहेबांना निवृत्त आयुष्यात कटू अनुभवांना जावे लागते तेव्हा पटकथा धरून ठेवते. इतर वेळी ती पात्रांना प्रेक्षकांपासून दूर ठेवते. मग जी स्वगत नटसम्राटांच्या तोंडी येतात ती निर्वातात बोलल्यासारखी वाटतात. चिकटवलेली वाटतात. कथेत मिसळून जात नाहीत त्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येण्याची शक्यता वाढते. पटकथा नाटक वगळून कथेच्या इतर बाबींकडे साफ दुर्लक्ष करते. नाटकाचा अवकाश व सिनेमाचा अवकाश वेगळा. सिनेमाच्या अवकाशात पटकथाकार-दिग्दर्शक नाटकातल्या मर्यादांना ओलांडून प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी दाखवू शकतो. इथे ते होत नाही. सिनेमाला दिलेली मेलोड्रामाची अनावश्यक ट्रीटमेंट त्याच्या विरोधात जाणारी ठरली आहे.

तरीही सिनेमा खिळवून ठेवतो तो सर्व कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने. नाना पाटेकरांचा अभिनय बघण्यासारखा. पटकथेकडून न मिळणारी साथ ते अभिनायातले सर्व पैलू दाखवून भरून काढतात. तीच गोष्ट इतर कलाकारांची. ते सुद्धा नाना पुढे बुजून न जाता स्वतःची उपस्थिती नोंदवतात. संदीप पाठक व जयवंत वाडकर सुद्धा छोट्या भूमिकेत लक्षात राहतात.

एकुणात एका अजरामर नाट्यकृतीचं हे रुपांतर इतर कुठल्याही मराठी सिनेमांसारखच झालंय असं खेदाने म्हणावं लागतंय.

Comments