मस्तीजादे : अजीर्ण

ऐंशीच्या दशकात हॉंगकॉंग सिनेमांनी कात टाकायला सुरुवात केली तेव्हा सॅमो हंग, जॅकी चॅन वगैरे प्रभूतींनी अॅक्शनला विनोदाची जोड देऊन अॅक्शन कॉमेडी या सिनेप्रकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर या सिनेमांची लाटच आली मराठीतल्या तमाशा व विनोदीपटांसारखी. जरी अॅक्शन कॉमेडी असली तरी त्यात विनोदाला ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं ते खचितच योग्य होतं असं म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ सॅमो हंग दिग्दर्शित घोस्ट पंटिंग, पेडीकॅब ड्रायव्हर किंवा विनर्स अँड सिनर्स मालिकेतले पहिले दोन सिनेमे हे यासाठी बघता येतील. यातील विनोद हा विनोदाच्या नावाखाली काय दाखवू नये याचे आदर्श उदाहरणे ठरावेत. बाळबोध, अश्लील व चावट विनोदांची पखरण यात करून त्याला सुरुवातीला व शेवटाकडे उत्तम अॅक्शन दृश्यांची जोड दिलेली. त्यामुळे सिनेमे निव्वळ कथानकावर धकवून नेलेत असा प्रकार क्वचितच दिसलेला. हिंदीत सेक्स व अॅडल्ट कॉमेडीच्या नावाखाली जे दाखवलं जात आहे ते बघून वरील सिनेमांची आठवण होते.

सनी केले (तुषार कपूर) व आदित्य चोटीया (वीर दास) हे मित्र एका जाहिरात कंपनीत काम करत असतात. जाहिराती बनवणं झालं की ते त्यांच्या चीक्स रेच्या सहाय्याने गादीतल्या शौर्याला अनुकूल असणाऱ्या स्त्रियांच्या शोधात असतात. शौर्य करता करता ते सेक्स अॅडिक्टस् बनलेले असतात. ते कमी करण्यासाठी म्हणून अशा ग्रुप्सना जाऊन त्यावर उपाय शोधतात. असाच एक ग्रुप चालवणाऱ्या जुळ्या बहिणी लिली व लैला लेले (सनी लिओनी) त्यांच्या नजरेस पडतात. त्यांचं त्यांच्यावर प्रेम बसतं. त्यांना मिळवण्यासाठी ते त्यांच्या बापावर (असरानी) इम्प्रेशन मारायला पटायाला जातात. तिथे देशप्रेमी (शाद रंधवा) व दास (सुरेश मेनन) त्यांचे शत्रू म्हणून समोर येतात.

वरील परिच्छेद कथानक म्हणून वाचण्यात आला असेल तर तो गैरसमज ठरावा. हे दाखवलेल्या गोष्टींवरून निश्चित काही कळावे म्हणून दिलेले आहे. व्यक्तीरेखेंना नावं असण, त्यांनी काहीतरी काम केलेले दाखवणे इतकेच कथानकाला साजेसे असेल तर ते इथे नाही असंच म्हणावे लागेल. ज्या पद्धतीने एका नंतर एक प्रसंग जोडून त्यांना विनोदाच्या नावाखाली सादर केले जाते ते सहन होत नाही. कुठल्याच गोष्टीचा एकमेकांना पाचपोच नसणे इथे पदोपदी होत राहते. म्हणायला एकरेषीय कथा आहे पण तिला तार्किकता, चढ-उतार, वास्तविकता यांची जोड दिली जात नाही. कमालीचा बाळबोधपणा सुरुवातीपासून शेवटापर्यंत ठेवलेला आहे. संवादात कंटाळवाणेपणा भरून राहिलेला.

जी गोष्ट कथा-कथानकाची तीच विनोदाची. विनोदी सिनेमांनी थोडं सुद्धा गंभीर होऊ नये असा अलिखित नियम असावा असं बघून वाटतं. एकही प्रसंग, वाक्य, अभिनेत्यांचे हावभाव थोड्याफार गांभीर्याने म्हटले जातात असं होत नाही. सेक्स कॉमेडी म्हटल्यावर प्रत्येक पंचेस, वाक्य, शब्द यांच्यावर अश्लील विनोद हवाच हा अट्टाहास सिनेमाला कंटाळवाणा बनवतो. ऑक्सिजन सुद्धा जास्त प्रमाणात घेतला तर माणूस मारतो तसं काहीसं इथे तेच तेच थुकरट दर्जाचे विनोद करून त्याला अजीर्ण बनवतात. अभिनेते सुद्धा विनोद करण्याचा प्रयत्न करतात पण कथा-पटकथा अशी नसल्यासारखीच असल्यामुळे त्यांच्या विनोदाला, टायमिंगला दाद देता येत नाही. विनोद ही असंख्य पद्धतीने दाखवतं येतं हे कथा-पटकथाकार-दिग्दर्शक मिलाप झवेरीला मान्य नसावं. त्यामुळे शाब्दिक कोटी केलेल्या प्रसंगांची मालिकाच असं याचं स्वरूप राहतं.

अभिनयात वीर दास, सुश्मिता चटर्जी व असरानीच काय ते प्रभावी वाटतात. तुषार कपूरची उर्वरित कारकीर्द अशाच सिनेमात वाया जाणार हे पाठोपाठ येणाऱ्या सिनेमांवरून वाटतं. त्याने वेळीच थोडं गांभीर्याने स्वतःकडे लक्ष दिलं तर काही खरं आहे नाही तर त्याच्यावर बेरोजगार होण्याची पाळी येईल. 

सनी लिओनी ही ज्या कारणांसाठी हिंदीत आणली गेली ते तिचे सिनेमे बघून वाटत नाही. ती पोर्न स्टार आहे म्हटल्यावर तिला एक तर कमीत कमी कपड्यात किंवा बिकिनीमधेच का दाखवण्यात यावं याला उत्तर नसावं. तिला विनाकपड्यात दाखवणे तिच्यावर अन्याय केल्यासारखं होईल असा काही निर्माता-दिग्दर्शकांचा समज असावा. बरं सेक्सी, मादक, एरॉटिक वगैरे दाखवणं म्हणजे कमीत कमी कपड्यात वावरणे, क्लीवेजचं प्रदर्शन करणे किंवा चित्रविचित्र आवाज काढून ते ठसवणं इतपतच आपली मर्यादा आहे असं वाटतं. एक दोन प्रसंगात ती संपूर्ण कपड्यात दाखवली आहे तेव्हाच जास्त सेन्स्युअस वाटते. पण दिग्दर्शकाच्या ठार गैरसमजामुळे तो हे संधी वाया घालवतो. सनीच्या अभिनयाबद्दल फार बोलावे असे नसते. कॅमेरासमोर संवाद म्हणणे व इतर वेळी दगडी चेहऱ्याने वावरणे हे ती उत्तमपणे करते.

हॉंगकॉंग सिनेमांसारखं विनोदाला सेक्सचा आधार देऊन प्रेक्षक खेचण्याचा हा प्रयत्न आणखी किती दिवस चालणार हा मोठा प्रश्नच आहे. मागच्याच आठवड्यात आलेल्या क्या कूल है हम ३ ने आपण कुठल्या दिशेने मार्गक्रमणा करत आहोत हे दाखवले होते. हिंदी सिनेमाने यातनं लवकरात लवकर बाहेर पडावं हीच सदिच्छा.

रेटिंग ०/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह ३१/०१/२०१६

Comments