साला खडूस : उत्तम होता होता राहिलेला...
खेळाला केंद्रस्थानी ठेवणारे बरेच सिनेमे यापूर्वी आलेले
आहेत. ते विषयाला कसे हाताळतात यावरनं त्यांची वर्गवारी करता येईल. लगानसारख्या
सिनेमात त्याची वासाहतिक, सामाजिक व राजकीय बाजू दाखवण्यात आली. क्रिकेटला
प्रतीकात्मक लढ्याचं स्वरूप दिलं गेलं. मेरी कोम, भाग मिल्खा भाग व पान सिंग
तोमरमध्ये त्याची चरित्रात्मक बाजू दाखवण्यात आली. इक्बाल व चक दे इंडियामध्ये
राजकारणाने खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांवर होणारे परिणाम याला महत्व होतं. मिथुन
चक्रवर्तीच्या बॉक्सरमध्ये सर्वसामान्य घरातला मुलगा बॉक्सिंग चँपियन कसा होतो असा
विषय होता. जो जीता वही सिकंदरमध्ये सायकल स्पर्धा महाविद्यालयीन तरुणांसाठी
स्वतःला सिद्ध करण्यासाठी महत्वाची असते. जन्नतमध्ये क्रिकेटमधील सामना निश्चिती व
त्या अनुषंगाने एका नायकाचा उदयास्त दाखवला होता. त्याचप्रमाणे साला खडूस महिला
बॉक्सिंगमधील गुरु-शिष्य नात्याकडे बघतो.
अदि तोमर (आर. माधवन) हा पूर्वाश्रमीचा बॉक्सिंग चँपियन
खेळातल्या राजकारणामुळे त्यातनं बाहेर फेकला गेला आहे. तो आता प्रशिक्षक म्हणून
काम बघतो. देव (झाकीर हुसेन) राष्ट्रीय महिला बॉक्सिंग फेडरेशनचा अध्यक्ष आहे.
त्याच्यात आणि अदित विस्तव जात नसतं कारण एका सामन्यात त्याच्यामुळे एका
पुढाऱ्याच्या भाच्याकडून अदि सामना हरलेला असतो. त्यातच हिसारमध्ये एका हॉटेलात
देवबद्दल गरळ ओकताना एक पत्रकार मोबाईलवर त्याचं चित्रीकरण करतो. देव त्याच्यावर
लैंगिक शोषणाचा (खोटा) ठपका ठेवून त्याची रवानगी चेन्नईला करतो. चेन्नई
बॉक्सिंगसाठी शिक्षा असते कारण तिथनं चांगले खेळाडू कधीच येत नसतात व तिथे खेळासाठीच्या संसाधनांची कमतरता असते. बॉक्सिंग
मे से पॉलिटीक्स निकाल दो तो गली गली में चँपियन्स मिलेंगे हे तत्वज्ञान जगणारा
अदि चेन्नईला कलंक पुसून काढण्यासाठीची आयुष्यातली एक संधी असं बघत असतो. त्याच्या
विश्वासाला सार्थ ठरवणारी बंडखोर, क्षणाक्षणाला तापट स्वभावाचं दर्शन घडवणारी मधी
(रितिका सिंग) त्याला सापडते. ती लक्ष्मी (मुमताझ सोरकार) या त्याच्याच हाताखाली
शिकणाऱ्या बॉक्सरची बहीण असते.
सुधा कोंगरा लिखीत व दिग्दर्शित या सिनेमात दोन बाजूंवर
प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली आहे खेळातील राजकारण. खेळातील राजकारण
हे भारतीय खेळांसाठी किती लांच्छनादास्पद गोष्ट आहे हे वेळोवेळी त्यातील
भ्रष्टाचार, सामना निश्चिती, डोपिंगचे आरोप वगैरे बाबींमुळे नेहमीच चर्चेचा विषय
ठरलेले आहेत. इथे देव ही व्यक्तिरेखा त्याचं प्रतिनिधित्व करते. ही व्यक्तिरेखा
प्रातिनिधिक असली ती क्लिशे आहे. अशा पद्धतीच्या व्यक्तिरेखा काय करू शकतात हे या
आधी असंख्य वेळा येऊन गेलं असल्यामुळे त्याच्या वागण्यामागचं ठोस कारण देण्यात येत
नाही. त्यामुळे ती खलनायकाची भूमिका पार पाडत असली तरी एकांगी व एकसुरी झाली आहे.
दुसरी गोष्ट आहे गुरु-शिष्य नात्याची. अदि व मधी हे
गुरु-शिष्य म्हणून जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा नोकझोक, समज-गैरसमज वगैरे
नित्याच्या बाबी त्यांना जवळ आणण्यासाठी पुरेश्या ठरतात. अदिला तिच्यात स्वतःला
बघणे व तिच्यासाठी ज्या त्या गोष्टी सहन करून तिला मोठं करण्यासाठी जी जान लावणे
एखाद्या गुरूच्या समर्पण वृत्तीचं द्योतक म्हणून बघता येतं. स्वतःला परत एकदा
सिद्ध करण्यासाठी त्याला मधीची आवश्यकता असते. गुरु ज्या शिष्याच्या शोधात असतो तो
इथे संपला ही सनातन बाब इथे अधोरेखित होते.
दुर्दैवाने पटकथाकार-दिग्दर्शक वरील दोन्ही बाजूंकडे
म्हणावं तितक्या खोलात बघत नाही. त्याला कथानकाची तार्किकता म्हणूनच बघितलं जातं
त्यामुळे धड तो खेळातील राजकारण किंवा त्यातील स्त्रियांचं लैंगिक शोषणसारख्या गंभीर
विषयाला महत्व देत नाही ना की गुरु-शिष्याच्या नाजूक संबंधांच्या विविध पैलूंना.
हे असं दोन्ही डगरींवर पाय ठेवणं कथानकाला मारक ठरलं आहे.
जी बाब विषयाची तीच भाषेची व व्यक्तिरेखांच्या अवकाशाची.
मधी ही चेन्नईत मासे विकणारी पोरगी. ती नेहमी पुरुषी कपड्यात वावरते. ते का याचं
स्पष्टीकरण मिळत नाही. तर तिची बहीण लक्ष्मी पंजाबी ड्रेसमध्ये. जर चेन्नईत एखादं
स्थलांतरित कुटुंब बऱ्याच वर्षांपासून राहत असेल तर त्यांच्या भाषेवर स्थानिक
भाषेचा प्रभाव असावयास हवा, इथे तो नाही. चेन्नईतली सर्व मंडळी एक तर हिंदीत
बोलतात किंवा बम्बैय्या हिंदीत खासकरून मधी. कशासाठी? तिने दोन-चार वाक्ये तामिळीत
बोलले तर प्रेक्षकांना समजणार नाहीत का? तिची झोपडी म्हणून जे दाखवण्यात येतं
त्यावरून ते गरीब वाटत नाहीत. अर्थात स्लमडॉग मिलिनेअरमधल्या वास्तववादी दारिद्र्य
दर्शनाची इथे अपेक्षा नाही तरी निदान कथानकाला साजेसा अवकाश दिसून यावा.
रितिका सिंगची निवड ही जमलेली बाजू. तिचं मिक्स्ड मार्शल
आर्ट्स व किकबॉक्सिंगमधलं नैपुण्य इथे तिची खेळाडू म्हणून प्रतिमा पहिल्या
प्रसंगापासून ठसवतं. दिग्दर्शिकेने तिच्याकडून काम पण चांगलं करून घेतलं आहे. आर.
माधवनने वाढवलेले केस व दाढी तसेच कमावलेलं शरीर त्याच्या सपाट व्यक्तिरेखेला साजेसेचं
आहेत.
एक चांगला या पातळीवरच राहिलेला हा सिनेमा त्यातल्या
शक्यतांना डावलून उत्तम होण्याचा प्रयत्न करत नाही इतकच म्हणायला हवं.
रेटिंग ३/५
पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह ३१/०१/२०१६





Comments