एअरलिफ्ट : दिग्दर्शनातील नवखेपणा शौर्यकथेच्या मुळाशी

१ ऑगस्ट १९९० ला इराकने कुवैतवर अचानक हल्ला केला. कारण उघड होतं दुसऱ्या महायुद्धानंतर कच्च्या तेलाला आलेलं अनावश्यक महत्व, जागतिक सत्ता हवी असेल तेलावरील सार्वभौमत्व अंगीकारणं गरजेचं होतं सोबत अमेरिकेला शह देणे सुद्धा. त्याचाच एक भाग म्हणून सद्दाम हुसैननी कुवैतवर हल्ला केला. पुढे अमेरिका त्यात सामील झाली जे आज गल्फ वॉर म्हणून परिचीत आहे. त्याच काळात कुवैतमध्ये असणाऱ्या काही लाख भारतीयांनी जीव मुठीत घेऊन तिथनं निघायचा प्रयत्न केला. या प्रयाणात इंडिअन एअरलाईन्सने खूप मोठी जबाबदारी घेऊन जवळ जवळ सर्व भारतीयांची सुटका केली. त्यांना यासाठी एकोणसाठ दिवस व चारशे अठ्ठ्याऐंशी फ्लाईट्स कराव्या लागल्या. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली. एअरलिफ्ट त्याच शौर्याची कथा एका कुटुंबाला केंद्रस्थानी ठेऊन दाखवतो.

रणजीत कटीयाल (अक्षय कुमार) हा भारतीय पण स्वतःला कुवैती समजणारा श्रींमंत उद्योगपती त्याच्या आयुष्यात खुश आहे. कुवैती सरकार मधल्या वरिष्ठांशी जवळकीचे संबंध ठेऊन तो उद्योगधंदा वाढवण्यात मश्गुल आहे. त्याला भारतीयांचा व भारतातील भ्रष्टाचाराचा तिटकारा आहे. त्याची पत्नी अमृता कटीयाल (निम्रत कौर) ही त्याच्या वागण्याला कंटाळली आहे. तिच्यात व त्याच्यात सतत धुसफूस चालू असते. एके रात्री इराक कुवैतवर हल्ला करतं ते नेमकं रणजीत राहत असलेल्या शहरात. रात्रीतून कुवैत सरकार पळून जाते. तिथे राहणाऱ्या कुवैती व इतरांना बेवारस सोडून. इराकी मेजर खलाफ बिन झायद (इनामुलहक) तिथे येतो. तो रणजीतला ओळखत असतो. तो त्याला एक ऑफर देतो. रणजीतचं कुटुंब व त्याच्या ड्रायव्हरचं कुटुंब यांना घेऊन तो जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतो पण त्याची घसघशीत किंमत चुकती करूनच. त्याच्या कंपनीचे कर्मचारी व इतर भारतीय यांना सोडून जाणे त्याला योग्य वाटत नाही. तो त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतो.

कथा-दिग्दर्शन राजा कृष्ण मेननचं आहे. त्यांनी सुरेश नायर, राहुल नांगिया व रितेश शाह सोबत पटकथा लिहिली आहे. मूळ घटनेत कुणा एकाची अशी भूमिका नव्हती कारण त्यावेळी सर्वच भारतीयांनी त्यांच्या पातळीवर काम करून ही अशक्य बाब तडीस नेली होती. दिग्दर्शक-पटकथाकारांनी रणजीत कटीयाल हे काल्पनिक पात्र तयार केलं. त्यामुळे सिनेमाला एक कथेचा आकार व निश्चित दिशा मिळाली. प्रेक्षक शेवटपर्यंत त्याला धरून राहतात. त्याच्या दृष्टीकोनातून कथा पुढे सरकते. तसेच संपूर्ण सिनेमा त्याच्याभोवती असल्यामुळे शेवट माहित असताना सुद्धा उत्सुकता टिकून राहते.

घटनेचं गांभीर्य बघता सिनेमा प्रभावी असावयास हवा. इथे तो नाही असं म्हणायला वाव आहे. ही बाब दिग्दर्शकाच्या कौशल्यामुळे अधोरेखित होते. राजा कृष्ण मेननचा चित्रिकरणा दरम्यान गोंधळ उडालेला असावा. त्याच्या परिणामस्वरूप प्रसंग वास्तववादी वाटत नाहीत, अभिनयात कृत्रिमता जाणवते खासकरून इराकी सैनिक व कॅम्पमध्ये असणारे भारतीय. काही काही प्रसंगात अक्षय व इतर मुख्य कलाकारांच्यात सुद्धा. काही ठिकाणी ते बाळबोध वाटतं. त्यात सफाईदारपणा येत नाही. अशा विषयासाठी दिग्दर्शनात सफाई हवी. निव्वळ प्रसंग चित्रीत करून संकलनात त्यांची जोड इथे अपेक्षित नाही. स्टिरिओटाईप पात्र, त्यांचे खास वागणे, बोलणे यामुळे त्या दहा-बारा दिवसात जगतो की मारतो याची लागलेली घोर चिंता, ताण वगैरे गोष्टी येत नाहीत. पटकथेवरची अजून थोडी मेहनत प्रसंगांना नेमकं व प्रभावी करता आली असती. अनावश्यक पार्श्वसंगीत हे प्रसंगातलं गांभीर्य कमी करतं. कथेत काही ठिकाणी टप्पे येतात त्याचा विचार पुरेश्या योग्यपणे केला गेला नाही त्यामुळे हे टप्पे सपकपणे मांडले जातात.

सर्व कलाकारांचा अभिनय ही जमेची बाजू असली तरी पटकथेकडून त्यांना आवश्यक साथ नसल्यामुळे मिळालेल्या प्रसंगाचं ते चीज करतात. खासकरून निम्रत कौर, प्रकाश बेलावडी, कुमुद मिश्रा, इनामुलहक, पूरब कोहली व इतर मंडळी. अक्षय कुमारची कारकीर्द दोन भागात विभागलेली आहे. एक अॅक्शन हिरो म्हणून तर दुसरी विनोदी अभिनेत्याची. या व्यतिरिक्त काही सिनेमात त्याने अभिनयाचा कस लावणाऱ्या गंभीर भूमिका केलेल्या आहेत. त्याच्या अभिनयाला मर्यादा आहेत हे या भूमिका बघून लक्षात येतं. हिंदी व्यावसायिक सिनेमात अॅक्शन व विनोदी भूमिका या अभिनयाला खूप वाव देणाऱ्या नसतात त्यामुळे अभिनेत्याचे दोष झाकले जातात. या व्यतिरिक्त भूमिका दिल्या की मर्यादा उघड्या पडायला लागतात. अक्षयची ही भूमिका अशीच त्याच्या मर्यादा उघड करणारी आहे. भूमिका पेलताना त्याची दमछाक होतेय हे स्पष्टपणे जाणवते त्यामुळे ज्या प्रसंगात समजूतदार अभिनय आवश्यक आहे तिथे नेमकं एकतर कमी अभिनय केला गेला आहे किंवा त्यात कृत्रिमता आली आहे. अर्थात यात त्याच्याकडून अभिनय करून न घेणाऱ्या दिग्दर्शकाचा सुद्धा हात हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ज्याच्या खांद्यावर हा डोलारा उभा आहे तो भक्कमपणे उभारलेला नाही असं खेदानं म्हणावं लागतं.

एका देशाच्या लोकांनी आपल्या मायभूमीत परतण्यासाठी केलेले प्रयत्न एका उत्तम होऊ शकणाऱ्या पण चांगल्या सिनेमात आल्यात इतकच म्हणता येईल.

रेटिंग ३/५ 

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २४/०१/२०१६

Comments