क्या कूल है हम ३ : अबघणीय

काही सिनेमे का बनवले जातात याला उत्तर नाही. आर्थिक ताकत आहे म्हणून की सृजनशीलता ओसंडून वाहतेय म्हणून. याचं नेमकं उत्तर मिळणं अवघड आहे. कारण सृजनशीलता असली तरी तिला योग्य दिशा असणं अपेक्षित आहे. तिच्यात गांभीर्य हवं भलेही मांडला जाणारा विषय विनोदी असला तरी. निर्मात्याच्या विचारात गांभीर्य नसेल तर ते बाळबोध होतं. ते एकतर स्वतःच्या प्रेमात पडलेत असं म्हणता येईल किंवा आपण ज्यांच्यासाठी सिनेमा बनवलाय त्यांना त्यांनी गृहीत धरलंय असं म्हणता येईल. यातल्या दोन्हीही शक्यता नाकारता येत नाही. एकता कपूर व शोभा कपूर निर्मीत व उमेश घाडगे दिग्दर्शित क्या कूल है हम ३ हा अशाच सृजनशीलतेचं उत्तम उदाहरण ठरावा असा सिनेमा आहे.

कथेनुसार कन्हय्या (तुषार कपूर) व रॉकी (आफताब शिवदासानी) हे दोन मित्र त्यांचा मित्र मिकी (कृष्णा) याच्या अडल्ट सिनेमात हिरोचं काम करत असतात. कन्हय्याचे त्याच्या वडिलांशी (शक्ती कपूर) जमत नसते. इकडे सिनेमात काम करता करताच तो शालूच्या (मंदना करिमी) प्रेमात पडतो. तिचं प्रेम मिळवण्यासाठी तो त्याच्या सिनेमातील अभिनेत्यांना घेऊन एक नाटक रचतो तिच्या बापावर सूर्या करजात्यावर (दर्शन जरीवाला) इम्प्रेशन मारण्यासाठी. त्यात तो यशस्वी होतो का ते पडद्यावरच बघायला हवं.

उमेश घाडगेंनी केलेला हा दिग्दर्शकीय प्रयत्न कथा-पटकथा-संवाद यांच्या पातळीवर किमान काही हसू फुलवतो असं म्हणावं तर ते होत नाही. कथाच नसल्यामुळे निदान पटकथा तरी असावी अशी अपेक्षा फोल ठरते. उथळ पात्र व त्यांना दिलेले तितकेच उथळ संवाद उबग आणतात. संवादात मागील काही वर्षातल्या हिंदी सिनेमांचे डायलॉग्ज वापरून वेळ मारली जाते. याने प्रेक्षकाला कंटाळा यायला लागतो. कथा नसली तरी किमान काही घटना, प्रसंगांमधून ते पुढे सरकणं अपेक्षित आहे ते होत नाही कारण पटकथाकार-दिग्दर्शक शाब्दिक विनोदावर भिस्त ठेवून कथेचा आभास तयार करतात. त्यामुळे कधी एकदा सिनेमा संपतो अशी अवस्था प्रेक्षकांची होते.

जी गोष्ट कथेची तीच अभिनयाची. तुषार कपूर व आफताब शिवदासानी हे कधीच अभिनयासाठी नावाजले गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवणे गैर आहे. शक्ती कपूर, दर्शन जरीवाला व सुश्मिता मुखर्जीला मात्र वाया घालवले आहे. शक्ती कपूरसारखा अभिनेता इतकी वर्ष कामे करून सुद्धा अशा पद्धतीच्या सिनेमात का काम करतात हे कळायला मार्ग नाही. पोटासाठी करावं म्हटलं तर त्यांना आता त्याची गरज नाही. तेव्हा सिनेमा निवडताना किमान विचार केला जायला हरकत नसावी. अर्थात हिंदीत या वयात चांगल्या, दर्जेदार व गंभीर भूमिका मिळणे मृगजळासारखं आहे.

२००५ साली आलेल्या क्या कूल है हमचा हा तिसरा भाग. हिंदी व्यावसायिक सिनेमात अॅडल्ट कॉमेडीचा एक प्रकार सुरु झालाय त्याची सुरुवात इथनं झाली असं म्हटलं जातं. ते योग्यच आहे. दुर्दैवाने अॅडल्ट कॉमेडीच्या नावाखाली जे बाष्कळ व वाह्यात विनोद यात पेश करतात त्यावरनं किती अॅडल्ट प्रेक्षक इकडे फिरकतो हा संशोधनाचा विषय आहे. कारण अशा सिनेमांचा प्रेक्षकवर्ग हा शाळा-कॉलेजात जाणारा आहे जो याकडे चटकन आकर्षित होतो आहे त्यावरून तर याला अॅडल्ट कॉमेडी म्हणणं सुद्धा अवघड आहे. तसेच जो प्रेक्षकवर्ग येतो त्यांना तरी किमान काही समजेल अशा पद्धतीने ते मांडणं इथे अपेक्षित आहे. इथे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत होत नाही. वर विचारात गांभीर्य असावं म्हटलं ते याच साठी. माकडचेष्टा एका टप्प्यापर्यंत सहन केल्या जातात त्या नंतर त्यांना कचऱ्याची टोपली दाखवावी लागते.

आज हिंदी व्यावसायिक सिनेमा काही कोटींच्या आर्थिक गुंतवणुकीची भाषा करतो तेव्हा त्यांनी किमान त्या गुंतवणुकीचा मान राखून तरी सिनेमे बनवणं अपेक्षित आहे. आपल्याला तंत्र कळत तसेच आपल्याकडे आर्थिक ताकत आहे म्हणून वाट्टेल ते बनवत असतील तर त्यांनी स्वतःचा व ते वापरत असणाऱ्या माध्यमाचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. प्रेक्षकांना हेच आणि असंच आवडतं म्हणून जर सिनेमे बनवले जात असतील तर ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे असं म्हणावं लागेल. कारण उद्या सिनेमाचा परतावा नाही मिळाला तर प्रेक्षकांच्या निर्बुद्धतेवर खापर फोडलं जातं. जे की योग्य ठरणार नाही.

एकुणात न बघायच्या सिनेमांची यादी असेल त्यात या सिनेमाचं नाव सर्वात वर ठेवावं लागेल.

रेटिंग ०/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २४/०१/२०१६

Comments