वजीर : एक डाव वजिराचा

बुद्धिबळात कशाला महत्व असते चालींना की प्रतिचालींना! चाली खेळणारा शेवटी चेकमेट म्हणतो की प्रतिचाली खेळणारा. ज्याने कुणी पहिल्यांदा चेकमेट म्हटले त्याने खेळ जिंकला असा बुद्धिबळाचा सरळ हिशोब असतो. हाच हिशोब प्रत्यक्ष आयुष्याला लावता येईल. बुद्धिबळाच्या चाली आयुष्यातल्या घटनांचा मागोवा काढण्यासाठी वापरता येतील. बुद्धिबळात खेळ जिंकणे इतकेच अंतिम असते तेव्हा त्यासाठी केल्या गेलेल्या चाली-प्रतीचालींना महत्व ते किती राहते. प्रतिस्पर्धी असणाऱ्या भिडूची मानसिकता याने भेदता येते. या प्रश्नांची उत्तरे कदाचित प्रत्यक्ष आयुष्यातल्या घटनांना लावता येणार नाहीत. आयुष्यातील कटू प्रसंग इतके सहजासहजी सुटणार नाहीत तरीही ते शक्य होऊ शकतं जर त्याचा विचार केला गेला असेल तर. निदान विधू विनोद चोप्रा व बिजॉय नाम्बियार यांनी तसा विचार केलेला दिसतो.

दानिश अली (फरहान अख्तर) हा एटीस ऑफिसर आपली बायको रुहाना अली (आदिती राव हैदरी) व मुलगी यांना घेऊन गाडीतनं निघाला आहे. एके ठिकाणी रुहानाच्या तुटलेल्या घुंगरांना शिवण्यासाठी एका संगीत वाद्ये विकणाऱ्या दुकानासमोर थांबतात. दानिशला तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडे रहीम नावाचा अतिरेकी दिसतो. तो बायकोला सोडून त्याच्या मागे जातो. एके ठिकाणी रहीम हल्ला करतो. दानिश प्रतिहल्ला करतो. धुमश्चक्री झडते. रहिमचे काही लोक मारले जातात पण दानिशची मुलगी जिवंत राहत नाही. दानिश रहीमच्या तळावर जाऊन त्याला यमसदनास धाडून सूड घेतो. या आततायी कृत्याची किंमत त्याला नोकरी गमावून द्यावी लागते.

रुहाना दानिशवर ठपका ठेऊन त्याच्या आयुष्यातून निघून जाते. आयुष्यातून उठलेला दानिश मुलीच्या कबरीसमोर स्वतःला मारणार तेवढ्यात एक कुणीतरी येऊन त्याला ते न करायला भाग पाडतो. तो असतो पंडित ओंकारनाथ धर (अमिताभ बच्चन). पंडित गुडघ्यातून दोन्ही पाय गमावलेला बुद्धिबळपटू आहे. त्याची मुलगी एका नेत्याच्या घरी पायऱ्यांवरून पडून मृत्यू पावलेली आहे. तिचा मृत्यू न होता तो एक खून आहे यावर त्याचा ठाम विश्वास असतो. यासाठी तो दानिशची मदत मागतो. त्यासाठी त्याला बुद्धिबळ शिकवतो का तर बुद्धीबळातल्या चालींप्रमाणे चाली खेळून आपल्याला सूड घेता येईल असं त्याला वाटत असतं.

या सिनेमाची सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर सुरुवात व शेवट. सुरुवात स्लो-मोशन प्रसंगांमध्ये दानिश व रुहानाच्या आयुष्याचा पट मांडते. त्यांचं लग्न ते त्यांची मुलगी असा क्रम घेत ती त्या दिवसाला येते जिथे दानिश रहीमच्या मागे जातो. शेवट सुद्धा खास; ज्यात सुरुवातीपासून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे यथायोग्यपणे दिली जातात. त्यात संदिग्धता ठेवली जात नाही. सारं काही प्रेक्षकांसमोर घडत असल्यामुळे नेमकं काय झालंय याची खात्री पटते. तिच्यात तार्किकता नाही असं वाटायला लागतं. त्यामुळे विधू विनोद चोप्रा व अभिजात जोशींनी लिहिलेली ही पटकथा प्रभावी वाटते, सकृतदर्शनी तरी. तरीही मधला भाग म्हणावा तितका खोलवर त्याच्या उद्देशाचा विचार करत नाही असं जाणवतं.

यात बुद्धिबळाचा असणारा संदर्भ व पंडितजीचं परिस्थिती पुढे हतबल होऊन सुद्धा आपल्या उद्देशाकडे जाण्यासाठी आपल्यासारख्याच एकाची निवड करणे, त्याच्या मानसिकतेला खतपाणी घालणे वगैरे पटते. पण पंडितजी व दानिश यांच्या विचारात असणारी तफावत त्यांच्यात संघर्ष घडवत नाही. समोर उभे राहिलेल्या प्रश्नांना चुटकीसरशी उत्तरे काढून त्यावर उपाय सुचवले जातात. पटकन निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जाते. वादी-प्रतिवादी समोर आल्यावर उडणारे खटके इथे येत नाहीत तर एकाने दुसऱ्याला चुचकारणे इतकच उरतं. त्यामुळे पटकथा खूप प्रभावी आहे अशी चर्चा प्रदर्शनाच्या आधी झाली होती ती तितकी नाही असं म्हणावं लागेल.

वजीर या शब्दाचे इथे दोन संदर्भ आहेत. पहिला बुद्धिबळाशी निगडीत तर दुसरा प्रत्यक्ष वजीर या नावाने असणाऱ्या पात्राशी. हे पात्र सिनेमाचं रहस्य आहे. म्हटलं तर ते आहे म्हटलं तर नाही. पटकथाकार व दिग्दर्शकांनी त्याचं कथानकातलं स्थान धक्क्याच्या स्वरुपात ठेवलं आहे. प्रेक्षकांना त्याच्या रहस्योद्घाटनाकडे लक्ष ठेवायला लागतं.

बिजॉय नाम्बियारचा दिग्दर्शक म्हणून हा तिसरा सिनेमा. शैतान सिनेमामुळे चर्चेत आलेल्या बिजॉयने दोन वर्षाखाली डेव्हिड नावाचा काळाच्या पटावर एकाच नावाच्या नायकांच्या तीन कथा सांगण्याचा प्रयोग केला होता. पण प्रेक्षक प्रतिसाद म्हणावा तितका नव्हता. इथे मात्र त्यांनी फार प्रयोग करण्याच्या फंद्यात न पडता सिनेमा सरळपणे पेश केला आहे. दिलेल्या पटकथेत कदाचित त्यांचा सहभाग नसावा. त्यामुळे असलेल्या अभिनेत्यांकडून काम करून घेणे व सफाईदारपणे चित्रीत करणे इतकेच त्यांच्या हातात उरले आहे.

फरहान अख्तर आणि अमिताभ बच्चन यांच्यात जुगलबंदी होईल अशी अपेक्षा असेल तर ती फोल ठरते. अमिताभना व्हीलचेअरवर जायबंदी असणाऱ्या म्हाताऱ्याची भूमिका देऊन निर्मात्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे. मुद्रभिनयाचे जितके काही पैलू असतील ते ते अगदी सहजरित्या दाखवतात. त्याला तोड नाही. शेवटी पटला न पटला तरी वजिराची ही हुशारी बघायला हरकत नसावी.

रेटिंग ३/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाइव्ह १०/०१/२०१६

Comments