पीजी - अ पेईंग घोस्ट : न पटणारी भूतं
दिवंगत ज्येष्ठ लेखक व. पु. काळे हे मराठीतले
वाचकप्रिय लेखक. वाचनाच्या टप्प्यामध्ये एक महत्वाचा पडाव असणारं नाव. त्यांनी
शेकडो कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या आणि स्वतःच्या कथांचे कथाकथनाचे कार्यक्रम
केले. त्यांच्या असंख्य कथांमध्ये एक असणारी बदली ही कथा. ज्यांनी त्यांचे
कथाकथनाचे कार्यक्रम ऐकले किंवा बघितले असतील त्यात ते नेहमी बदली या कथेचं वाचन
करायचे हे लक्षात येईल. याच बदली या कथेवर आधारित प्रस्तुत सिनेमा आहे.
माधव माटेगावकर (उमेश कामत) मुंबईतल्या
कोणत्याश्या खाजगी कंपनीत कामाला म्हणजेच चाकरमाना. तो ज्या चाळीत राहतो तिथे
त्याच्या खोलीत पाणी येत नाही कारण बाजूच्या खोलीत राहणाऱ्या गणपुलेंमुळे (समीर
चौघुले) त्याच्या नळाला पाणी येत नाही. त्यांना ते विचारण्याचं धाडस याच्याकडे
नाही. तो कुणालाच नाही म्हणू शकत नाही. त्याच्या ऑफिसात असणाऱ्या माधवी मिरजकरवर
(स्पृहा जोशी) त्याचं प्रेम आहे पण ते सुद्धा तिला स्पष्टपणे सांगणं त्याला जमत
नसते. एकूणच त्याच्या आयुष्यात तडजोडी करत जगणे हेच लिहिलेले असते. अशातच कुठून
तरी गजानन एकबोटे (पुष्कर श्रोत्री) नावाचं भूत अवतरतं. त्याच्यासोबत त्याची बायको
गामिनी (शर्वाणी पिल्लई) आणि त्यांच्या सहा मुली येतात. तो माधवला त्याच्या घरात
राहण्यासाठी परवनागी मागतो. माधव परवानगी देतो पण त्या बदल्यात त्याला कोणताही
त्रास होऊ नये याची एकबोटेकडून हमी घेऊन. एकबोटे त्याच्या न दिसण्याच्या आणि
चमत्कार वाटतील अशा सिद्धी दाखवून माधवचं जीवन सुसह्य करतो.
वपुंच्या मूळ कथेत फँटसीचा भाग होता का नाही हे
लक्षात नाही पण या कथेत पटकथाकार आणि दिग्दर्शकांनी स्वातंत्र्य घेतलेलं आहे.
त्यामुळे नेमकी कथा कोणती आणि पाणी घालून त्यात कुठे बदल केलाय हे वाचकाला
संभ्रमित करायला पुरेसं आहे. सिनेमा बघताना बरेच प्रश्न पडतात. माधव जर आजच्या
काळातला एका मोठ्या ऑफिसात काम करणारा असेल तो इतका बावळट कसा? त्याला ऑफिसातलं
सगळं काम चोख येत असेल तर माधवीला प्रेमाबद्दल सांगायला त्याला एकबोटेची मदत का घ्यावी
लागते? तो जर चाळीत राहत असेल तर तिथं त्याला कसं वागायचं हे कळत कसं नाही? एकबोटे
त्याला जे भूताबद्दल आणि त्याच्या दिसण्याबद्दल स्पष्टीकरण देतो ते पुरेसं योग्य
वाटत नाही? एकबोटे स्वतःच्या पत्नीला ती मेल्यानंतर का नाही भेटत? ती जरी
मनुष्ययोनीत त्याची पत्नी असेल तर भूतयोनीत सुद्धा असायला हवी. तिच्यासाठी तो बरीच
वर्ष वाट पाहत का थांबत नाही? माधवीला माधवचं घरातलं चमत्कारिक वागणं चटकन का समजत
नाही? त्यानं बोलण्याच्या नादात एकबोटेचा केलेला दोन-तीन वेळचा उल्लेख तिला का
खटकत नाही? अशी असंख्य प्रश्न सिनेमाच्या सुरुवातीपासून पडायला लागतात आणि
संपेपर्यंत पडतच राहतात. प्रेक्षक हतबुद्ध होतो त्यातील न उद्भवणाऱ्या विनोदावर
हसावं की पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत या साठी.
एखादा गंभीर विषय विनोदाच्या अंगाने मांडणं अवघड
असतं. त्यातलं गांभीर्य तर प्रेक्षकांच्या गळ्यात उतरायला पाहिजे पण विनोदाची
मात्रा मात्र कमी पडता कामा नये. अशावेळी महत्व येतं ते निर्दोष आणि प्रभावी पटकथेला.
पटकथेत जेवढे जास्त दोष तेवढा प्रेक्षकांवरचा त्याचा प्रभाव उतरत्या भाजणीत राहतो.
सिनेमा कंटाळवाणा व्हायला लागतो. प्रेक्षक चुळबुळ करायला लागतात, मोबाईल किंवा
हातातल्या घड्याळाकडे बघायला लागतात. हे होऊ द्यायचं नसेल तर पटकथाकार आणि
दिग्दर्शकाने थेट विषयाला हात घालणारे प्रसंग लिहावेत आणि पडद्यावर दाखवावेत.
सिनेमा कंटाळवाणा होऊ नये हा प्राथमिक धडा इथे बाजूला ठेवला गेलाय. त्यामुळे एकदा
पात्रांची ओळख झाली आणि ती पुढे काय करू शकतील हे समजलं की प्रेक्षक पुढचा अंदाज
घ्यायला लागतो. तसेच कळसाध्याय नसल्यामुळे शेवट पटत नाही.
दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांची सिनेमा अथ पासून
इतिपर्यंत नेण्यासाठी दमछाक होतेय हे जाणवतं. निश्चित कळसाध्याय नसणारी पटकथा कशी
धकवून न्यायची याची त्यांना चिंता पडली असावी कारण कित्येक प्रसंग परत परत चित्रित
केल्यासारखे वाटतात खासकरून चाळीचे दिवस आणि रात्रीचे विहंगम दृश्य दाखवणारे चित्र.
तसेच एका दृश्यात तार्किकतेला पूर्ण फाटा दिला आहे. एकबोटे पहिल्यांदा जेव्हा
माधवला दर्शन देतो तेव्हा एकबोटेच्या मागे पाऊस पडत असतो. त्या आधी माधव टॅक्सीचं
भाडं चुकवून वर येईपर्यंत पावसाचं नामोनिशान नसतं मग एकबोटेच्या दर्शनावेळीच नेमका
पाऊस का असतो. तसेच इतर बऱ्याच दृश्यात/प्रसंगात दोष दाखवायला जागा आहे.
दिग्दर्शकाचं व्हीएफक्सचा वापर कृत्रिम वाटतं. उलट ते जितकं कमी आणि ओळखू न येण्या
इतकं ठेवलं असतं तितकं ते जास्त प्रभावी राहिल असतं.
सरतेशेवटी उमेश कामतचा उत्तम अभिनय सोडला तर ही
बदली आणि त्यातली न पटणारी भूतं पचनी पडणं अवघड आहे.
रेटिंग : २/५
पूर्वप्रसिद्धी : दै. मराठवाड़ा नेता ३१ मे २०१५




Comments