पिकु : सहजसुंदर ‘बद्धकोष्टता’
इटालियन नव-वास्तववादी सिनेमाची सुरुवात झाली
तेव्हा त्यातल्या आशयाबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली. चर्चा करणाऱ्यांचा मुख्य रोख
त्यात मांडलेल्या आशयाबद्दल होता. नव-वास्तववादी शिलेदारांचं म्हणणं होतं की
सिनेमाची कथा ही नेहमी भव्य दिव्य असावीच असं नाही तर आपल्या दररोजच्या आयुष्याकडे
निरखून बघितलं तर खूप कथा बघायला मिळतील. त्या वेळची आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी
अश्या प्रकारचा सिनेमा पुढे येण्यासाठी कारणीभूत ठरली.
शुजित सरकार (विकी डोनर, मद्रास कॅफे) या
दिग्दर्शकाचा पिकू हा सिनेमा इटालियन नव-वास्तववादी सिनेमाशी पूर्णतः साधर्म्य
दाखवत नसला तरी तो त्यातल्या आपल्या आयुष्यातल्या दररोजच्या घटनांकडे पुरेश्या
खोलात पाहिलं तर त्यात एखादं छानसं नाट्य मिळेल या विचाराशी मिळतंजुळतं कथानक
मांडतो.
भास्कोर बॅनर्जी (अमिताभ बच्चन) हा सत्तरीला
पोचलेला निवृत्त गृहस्थ आपल्या पिकू (दीपिका पदुकोण) नावाच्या मुलीबरोबर राहत
असतो. भास्कोर जरी निवृत्त असला तरी त्याचे मुख्य दोन दुखणे आहेत. पहिलं : पिकुने
लग्न करण्याआधी खूप विचार करून हा निर्णय घ्यावा. दुसरं : त्याला बद्धकोष्टतेचा
त्रास आहे. ज्यामुळे सकाळी उठल्यापासून शौच, बद्धकोष्टता आणि त्याच्याशी निगडीत
सर्व बाबी आपण कुठे आहोत, कुणाशी बोलत आहोत, आपल्या बोलण्याने समोरच्याला त्रास
होतो का याचा विचार न करता बोलत असतो. त्यामुळे बऱ्याच प्रसंगात पिकूची अवस्था
केविलवाणी होते. जरी हे मुख्य म्हणावे असे विषय असले तरी त्याला अजून एका
उपकथानकाची जोड दिलीय. भास्कोर बॅनर्जीला भीती आहे ती त्याचं वडिलोपार्जित असणारी
चंपाकुंज ही हवेली पिकू विकणार असते. त्याला ते करायचं नसतं. त्यासाठी ते दोघं
चंपाकुंज म्हणजे कोलकत्त्याला जायचा निर्णय घेतात.
पिकूची सर्वात चांगली गोष्ट काय तर त्याची
पटकथा. जुही चतुर्वेदीनी या आधी विकी डोनर आणि मद्रास कॅफेच्या पटकथा लिहिलेल्या
आहेत. त्या पैकी विकी डोनरची पटकथा किती प्रभावी होते हे सांगणे न लागणे. वीर्यदानसारख्या
आजही न बोलल्या जाणाऱ्या विषयावर कुठेही बोजड न वाटता प्रेक्षकांना आपलसं वाटेल
अशा पद्धतीने ती लिहिलेली होती. त्याला शुजितच्या उत्तम दिग्दर्शनाची जोड होतीच.
तोच धागा धरून त्यांनी यावेळी हा विषय हाताळला आहे.
वीर्यदान निदान न बोलला जाणारा
विषय होता इथं तर संपूर्ण सिनेमात बद्धकोष्टता हा विषय शेवटपर्यंत वापरलेला.
बद्धकोष्टता हा घराघरात चर्चिला जाणारा आणि लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना
त्रास देणारा विषय. त्यामुळे असा विषय प्रभावीपणे मांडणे जितकं गरजेचं होतं तितकंच
तो लेखनात प्रभावीपणे उतरणं गरजेचं होतं. जुही चतुर्वेदींची पटकथा कुठेही रेंगाळत
नाही, कुणालाही खलनायक किंवा तत्सम ठरवत नाही. ती पिकू या आजच्या काळातल्या
स्वतंत्र विचारांच्या स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून एका सर्वसामान्य भारतीय
कुटुंबाचं चित्र उभे करते. नुसते उभे करते असं नाही तर ते ही दररोज घडणाऱ्या
घटनांना ‘अति झालं हसू आलं’ अशा पद्धतीचा दृष्टीकोन ठेवते. त्यामुळे लिहिलेले संवाद
असोत की प्रसंग ते अजागळ किंवा ओंगळवाणे वाटत नाहीत. सहज आणि नैसर्गिकपणा त्यात
जाणवतो. पटकथाकाराचा हा दृष्टीकोन दिग्दर्शक अचूकपणे पडद्यावर मांडतो. दिग्दर्शक
आणि पटकथाकार एकाच दृष्टीकोनातनं कथानकाकडे बघत असतील तर तयार होणारं चित्र
प्रभावी असतं.
पटकथाकार आणि दिग्दर्शकाचा दृष्टीकोन पडद्यावर
योग्य आणि प्रभावीपणे येणं अभिनेत्यांच्या हातात असतं. इथे इरफान खान, दीपिका
पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांची निवड किती योग्य आहे हे त्यांच्या दिल्ली ते
कोलकत्ता दरम्यानच्या प्रवासात घडणाऱ्या प्रसंगात दिसून येतं. इरफान खान आणि
दीपिका पदुकोणचा समंजस अभिनय त्यांच्या पात्रांना आक्रस्ताळे रूप देत नाही.
अभिनयोत्तमाचा अभिनय बघणं ही पर्वणीच असते.
शब्देविण संवादू असं म्हणतात पण समजा अभिनयोत्तमाला संवाद दिले तर काय बहार येईल
हे यातील कोणत्याही प्रसंगावरनं लक्षात यावे. हृषिदांच्या आनंदमधील त्या
सुप्रसिद्ध प्रसंगापासून ते भूतनाथमधल्या भूतापर्यंत अभिनयोत्तमाच्या अभिनयाचे
सर्व पैलू बघत आलोय. यात सुद्धा सत्तरीचा म्हातारा ज्या झोकात त्यांनी पेश केलाय
तो बघून अभिनयाचे अजून कितीतरी पैलू त्यांच्यात छुपे आहेत हे जाणवत राहतं.
एकुणात या उन्हाळ्यात रसाळ आंबे खाता खाता
पिकुच्या आयुष्याची छोटीशी झलक बघायला काही हरकत नाही.
पूर्वप्रसिद्धी : दै. मराठवाड़ा नेता दि. रविवार ९ मे २०१५



Comments