टाईमपास 2 : गणित मांडून दुसऱ्यांदा केलेला 'टाईमपास'
नया है वह, चल हवा आने दे सारखे संवाद, ही पोरगी
साजूक तुपातली सारखं सर्वत्र वाजवलं जाणारं गाणं असणारा दीड वर्षांपूर्वी आलेला टाईमपास
सिनेमा निर्माता-दिग्दर्शकांच्या अपेक्षेपेक्षा खूपच प्रेक्षक प्रतिसाद मिळवून
गेला. वरील संवाद तर येता जाता वापरात यायला लागले. शाकाल उर्फ माधव लेले उर्फ
वैभव मांगले यांच्या फोटोशिवाय मराठीतल्या इंटरनेट मेमेजची कल्पना होईनाशी झाली
इतकी त्याची व त्याच्या संवादाची प्रसिद्धी झाली. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुलेंच्या
संवादांनंतर अशा प्रकारे एखाद्या नटाच्या संवादाला सर्व थरातून दाद मिळाल्याचं बघण्यात
नाही. मराठीत असं सिनेमातले संवाद दररोजच्या आयुष्यात वापरलेले कधी ऐकण्यात
नव्हते.
जरी सिनेमाला प्रसिद्धी वारेमाप मिळाली असली ती
विशिष्ट वयोगटातल्या प्रेक्षकाकडनं. सिनेमात मूळ संकल्पनेपासून सादरीकरणापर्यंत
उघड दोष होते. अभिनय बेतास बात होता; वैभव मांगलेंचा अपवाद सोडल्यास. पटकथा सदोष
होती. सुचलेली कल्पना पुनर्लेखन करुन निर्दोष करावी असा विचार न करता घाई गडबडीत
चित्रीकरण उरकून सिनेमा प्रदर्शित केलाय असं वाटत होतं.
आता दगडू शांताराम परब (प्रियदर्शन जाधव) मोठा
झालाय. कोळीवाड्यातल्या साईनाथ नगरमध्ये तो सर्वांसाठी अॅम्ब्युलंस सेवा उपलब्ध
करतो. तरीही त्याच्या मनातून पराजू उर्फ प्राजक्ता लेले (प्रिया बापट) ही गेलेली
नसते. घरी वडिलांनी लग्नाचा काढलेला विषय तो उडवून लावतो. मित्रांच्या संगतीने
कोकणात तिच्या गावी जातो. तिच्या वडिलांना माधव लेलेंना (वैभव मांगले) आपण भाभा
अॅटोमिक रिसर्च सेंटर (बार्क) मध्ये वैज्ञानिक आहोत अशी बतावणी करतो. त्याच्या
बतावणीला भुलून प्राजक्ताचे वडील तिचा विवाह याच्याशी लावायची तयारी करतात.
त्यासाठी तिला भेटायला मुंबईत येतात आणि वेगळ्याच गोष्टी त्यांच्यासमोर उघड्या
होतात. दगडू आणि माधव लेले हादरून जातात.
पहिल्या सिनेमात माधव लेले हे पात्र खलनायक
म्हणून दाखवण्यात आलं त्यामुळे दगडूच्या प्रेमाला संघर्षाची किनार होती. ते प्रेम
सफल होत नाही पण त्यांच्या मनात असणाऱ्या प्रेमाला पुढे नेता येऊ शकतं हे शेवटी
लक्षात येत होतं. दगडू आणि प्राजक्ताचं वय सिनेमा बघणाऱ्या त्या वयाच्या आणि
इतरांना सुद्धा भावलं होतं कारण कुठे ना कुठे प्रेक्षक त्यांच्याशी तादात्म्य
पावले होते. त्यामुळे त्याला मिळालेला प्रतिसाद अपेक्षेबाहेरचा होता.
यावेळी पटकथाकारांची गोची झाली आहे ती म्हणजे
खलनायक कुणाला करायचा. माधव लेले जरी काही काळ आपल्या आडमुठ्या स्वभावाला अनुसरून
वागतात तरी त्यांना खलनायक म्हणता येणार नाही कारण ते मुळात प्राजक्तावर नाराज
असतात. खलनायकच नसल्यामुळे आणि अर्ध्यावर नायक-नायिकेला त्यांचं लहानपणीचं प्रेम
परत मिळाल्यावर पुढे संघर्षच उरत नाही. संघर्षच नाही म्हटल्यावर पात्रांनी काय
करायचं. त्यांना सदा सर्वकाळ गाणी म्हणताना किंवा एकमेकांशी कुठे निवांत स्थळी
बोलताना तरी किती दाखवायचं. तीच तीच गोष्ट सारखी समोर दिसायला लागली की त्याचा
कंटाळा यायला लागतो. त्यामुळे मध्यंतरानंतर तर कथेत काहीच घडत नाही.
पटकथाकारांनी दगडूचं नायकत्व सिद्ध करायची एक
छान संधी यात सोडली. प्राजक्ताच्या गावी कॅलिफोर्निया डिजिटल फोटो स्टुडिओ
चालवणारा एक फोटोग्राफर असतो. तो प्राजक्तावर एकतर्फी प्रेम करत असतो. त्याला
खलनायक केला असता तर दगडूला प्राजक्ताला मिळवणं हे एकमेव उदिष्ट राहिलं असतं. ती
त्याच्या प्रेमाला नकार देते म्हणून त्याने तिचे फोटो फोटोशॉपच्या मदतीने अश्लील
बनवून ते इंटरनेट प्रसारित केले असते. तर दगडूला ते शोधून काढून त्याचा नायनाट
करता आला असता. सिनेमाच्या कळसाध्याय उत्कंठावर्धक झाला असता. तसेच लेलेंना आपली
मानसिकता बदलता आली असती. एक ‘सामाजिक संदेश’ पण यातनं देता आला असता. पण
पटकथाकारांनी या शक्यतेचा पुरेसा खोलात जाऊन विचार केला नसल्याने ती फुकटच वाया
गेली आहे.
सिनेमात प्रिया बापट आणि वैभव मांगलेंचा अभिनय
सोडला तर बाकीच्यांना अभिनयाला वाव नसल्यामुळे त्यांना काही प्रसंगांपुरती
हजेरी लावावी लागली आहे. खासकरून सुप्रिया पाठारे, संदीप पाठकसारख्या
अभिनेत्यांना. प्रियदर्शन जाधव यांचा नायक म्हणून पहिलाच सिनेमा त्यामुळे
त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्समध्ये आत्मविश्वास दिसतो पण बऱ्याच प्रसंगात ते
गांगरलेत हे ओळखू येतं. एकुणात विशिष्ट प्रेक्षक वर्ग डोळ्यांसमोर ठेवून गणित
मांडून तयार केलेला सिनेमा इतकंच म्हणता येईल.
पूर्वप्रसिद्धी : दि. ३/५/२०१५ दै. मराठवाड़ा नेता, लातूर.




Comments