बॉम्बे व्हेल्वेट : अनुरागचा बिग शॉट
१९९८ च्या सत्यामध्ये श्रेयनामावलीमध्ये सौरभ
शुक्लासोबत अजून एक नाव होतं ते म्हणजे अनुराग कश्यप. सत्या त्या वेळी वेगळा ठरला
ते त्याच्याकडे एक वास्तववादी कथानक मांडायचं या राम गोपाल वर्माच्या
दृष्टिकोनामुळे आणि पटकथाकार कश्यप-शुक्लाच्या दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनाला पूरक पटकथेमुळे.
पटकथाकार अनुराग पुढे यथावकाश दिग्दर्शक झाला. त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा
आढावा घेतला तर त्याच्या पहिल्या सिनेमापासून ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या
सिनेमापर्यंत काही गोष्टी दिसून येतात. हिंदी सिनेमा, गुन्हेगारी आणि मुंबई शहर.
गँग्ज ऑफ वासेपूरमध्ये कथानक जरी मुंबईपासून दूर असलं तरी त्यातील मुख्य पात्र शेवटी
वासेपूर सोडून मुंबईत येतात. त्यात सुद्धा हिंदी सिनेमाचे संदर्भ आणि गुन्हेगारी
तर मुख्य विषय होता. त्यामुळे वरील तिन्ही गोष्टी तो परत परत वापरताना दिसतो. अर्थात
या व्यतिरिक्त त्याने गुलाल, देव डी, अप्रदर्शित पांच असे सिनेमे केले आहेत. इतकं
विवेचन द्यायचं कारण सत्यामध्ये सुद्धा याच गोष्टी खूप ठळकपणे आल्या होत्या ज्याचा
प्रभाव आजही त्याच्यावर आहे. आजच्या घडीला तरी त्याचे सिनेमे इतरांपेक्षा वेगळे
ठरतात.
१९४९ ची मुंबई. भारताला स्वातंत्र्य मिळून दोन
वर्ष झालेली. गांधींची हत्या केली म्हणून नथुराम गोडसेंना फाशी देण्याचा काळ.
पंजाब मेलने बलराज (रणबीर कपूर) नावाचा छोटा मुलगा कुणा स्त्रीच्या आधारे मुंबईत
येतो. अशा बाहेरून आलेल्या मुंबईकरांना मुंबई आपल्यात सामावून घेते त्यांची फोकलँड
रोडच्या वेश्यावस्तीमध्ये सोय लावून. बलराज तिथे वाढायला लागतो. तिकडे
पोर्तुगीजांच्या गोव्यात आपल्या सुश्राव्य आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी
रोझी (अनुष्का शर्मा) एका शिक्षकाच्या आधारे त्याच्या अत्याचारांना सहन करत मोठी होत
असते. एके दिवशी त्याच्या अत्याचाराला कंटाळून ती गोव्यातनं पळून मुंबईत येते.
आपल्या आवाजाच्या आणि जिमी मिस्त्री (मनीष चौधरी) च्या सहाय्याने तिथल्या बॉम्बे
व्हेल्वेट नावाच्या जॅझ क्लबमध्ये मुख्य गायिका बनते. इकडे एके दिवशी कैझाद खंबाटाचे
(करण जोहर) पैसे चोरण्याच्या नादात बलराज त्याच्या एका ऑफरला नाकारू शकत नाही.
खंबाटा त्याला बलराजचा जॉनी बलराज बनवतो आणि मुंबईत आयुष्य काढायचं तर बिग शॉट
होणं गरजेचं आहे हे तत्व बाळगणारा बलराज खंबाटाच्या स्वार्थी महत्वाकांक्षेला जीव
लावून मदत करायला लागतो.
सिनेमा जरी ४९ सालात सुरु होत असला तरी घडतो
१९६९ साली ज्यावेळी मुंबई शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजकारणी उत्सुक होते. मुंबईचं
महानगर करायचा चंग सर्वांनी बांधलेला. त्यावेळचे श्रीमंत व्यापारी आणि सरकारी
अधिकारी याचा जास्तीत जास्त फायदा उचलण्यासाठी मिळेल ती किंमत मोजायला तयार होते.
त्यासाठी त्यांनी जसे गिरणी कामगारांना देशोधडीला लावले तसेच रस्त्यावरच्या
गुंडांना हाताशी धरून एकमेकाचे गळे चिरले. या पार्श्वभूमीवर बलराज आणि रोझीचं
प्रेम प्रकरण फुलतं. बलराज आणि चिम्मन (सत्यदिप मिश्रा) यांचं स्वतःला प्राप्त
परिस्थितीत सांभाळून ठेवण्याचा संघर्ष असतो. तसेच एका निगेटिव्हचं रहस्य देखील.
पार्श्वभूमी जरी चांगली असली तरी त्यातल्या
आशयापेक्षा प्रभावी काय असेल तर तो यथातथ्य उभा केलेला काळ आणि जॅझची गाणी खासकरून
पार्श्वसंगीत. एका प्रसंगात दोन्ही हातात टॉमी गन घेतलेला बलराज जॅझ संगीताच्या
पार्श्वभूमीवर समोरच्यांना यमसदनास धाडतो, उत्तमच. काळ जरी उभा केला तरी आशयात
सिनेमा काही मजल मारत नाही. एकदा पात्रांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या आयुष्याचं
तत्वज्ञान प्रेक्षकांना कळलं की पुढल्या गोष्टी लक्षात यायला लागतात. कथानक काही गोष्टींचं
स्पष्टीकरण देत नाही. बलराज एके ठिकाणी नेहमी मारामारी करून पैसे कमवत असतो. या
मारामाऱ्या एका पिंजऱ्यात घडत असतात. त्या काळात मुंबईत खरंच अशा मारामाऱ्या
चालायच्या का याचा स्पष्टीकरण प्रेक्षकांना मिळत नाही. त्याचं प्रयोजन काय हे कळत
नाही की दिग्दर्शकाच्या कल्पनेतून हे आलेलं आहे. बलराजच्या नैराश्येला तिथल्या
मारामारीमुळे वाट मिळते असा दिग्दर्शकाचा होरा असावा. पण त्यातल्या मारामाऱ्या
अरेंज करणाऱ्या माणसाचा कथानकात योग्य तो वापर केला आहे.
रणबीर कपूरचा उत्तम अभिनय सिनेमाचा हायलाईट आहे.
त्याला उर्वरित सर्वच कलाकारांची साथ सिनेमाच्या कमकुवत आशयाला तारून नेते. यातील
सरप्राईज पॅकेज आहे करण जोहर. जोहरचा हा पहिलाच सिनेमा असे वाटत नाही इतके चांगले
काम त्याने केले आहे.
हा सिनेमा अनुरागच्या इतर सिनेमांसारखा नसेल
कदाचित पण तुम्ही अनुरागचे चाहते असाल तर तुम्हाला या चर्चेची आवश्यकता नाही.
पूर्वप्रसिद्धी : दै. मराठवाड़ा नेता १७ मे २०१५
.jpg)


Comments