लत्तलूर ते लातूर

अतो वक्ष्यामि ते तात भूत्वा चैकमनाः शृणु |
सिध्दक्षेत्रस्य नामानि तीर्थानां चरितानि च  || ५ ॥

अर्थ : सिद्धक्षेत्राची नावे व त्यांची वर्णने तू ऐक. हे क्षेत्र चक्राकार असूनएक योजना एवढा त्याचा विस्तार आहे.

कृते सत्यपुरं नाम त्रेतायां मधुपुरं स्मृतम |
रत्नापुरं तु द्वापारे लातनुरं कलियुगे विदुः || ||

अर्थ : या क्षेत्राला कृतयुगात सत्यपुरत्रेतायुगात मधुपूरद्वापरात रत्नापूर तर कलियुगात लातनुर म्हणून ओळखतात.

लातूर रेल्वे स्टेशन
रत्नापूर माहात्म्याच्या सहाव्या अध्यायात लातूरच्या स्थानाबद्दल व त्याच्या वेगवेगळ्या नावांबद्दल उल्लेख येतो. याच पुस्तकाच्या म्हणजे लातूरचा इतिहास आणि रत्नापूरमाहात्म्य च्या मलपृष्ठावर लातूरच्या अकरा ग्रामनामांची यादी येते. ते नाम असे आहेत : 
  1. लत्तलूर (इ. स. ८१२-१३) 
  2. लत्तलूर (इ. स. ८६६) 
  3. लत्तलूर (इ. स. १०४०) 
  4. लत्तलौर (इ. स. १०८७) 
  5. लत्तनूर (इ. स. ११२३)  
  6. लत्तलौर (इ. स. ११२८) 
  7. लत्तनूर (इ. स. ११८८) 
  8. लत्तनूर (इ. स. १२०४) 
  9. लत्तनूर (इ. स. १२०८) 
  10. लत्तनौर (इ. स. १२५८)
  11. लातनुर (इ. स. १३५०-१४००)
पहिलं नाव हे शिरूर शिलालेखात शके ७३४ मध्ये सापडते. नावाचा वेगळेपणा आपल्याला लगेच लक्षात येतो कारण अशा प्रकारचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सापडत नाही. नावात जरी वेगळेपणा असला तरी मांजरा नदी व खरोसा लेण्यांच्या परिसरात किमान अडीच हजार वर्षांपासून मानवी वस्तीचे अस्तित्व सापडते. पण रत्नापूरमाहात्म्य साधारण इसवी सनाच्या नवव्या ते बाराव्या शतकात लिहिले गेले आहे. त्या आधीचा इतिहास वाचण्यासाठी शिलालेख व ताम्रपटांचा आधार घ्यावा लागतो. हे शिलालेख व ताम्रपटसुद्धा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळे सलग असा कालखंड अभ्यासता येत नाही. तरी उपलब्ध सामग्रीवरनं बरीच माहिती सलग मांडायला मदत झाली आहे पण तुकड्या तुकड्यात.

गंज गोलाई शहराच्या केंद्रस्थानी असणारी महत्त्वाची वास्तू.
ही वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळात निजामाच्या राजवटीत बांधण्यात आली.
इथे एकूण सोळा रस्ते येउन मिळतात.
त्या नुसार लातूरची स्थापना राष्ट्रकूट घराण्याचा राजा अमोघवर्ष याने इसवी सनाच्या नवव्या शतकात केली. या राजाने म्हणे चौसष्ट वर्ष राज्य केले पण पहिले काही वर्ष लातूरच्याजवळ मांजरा नदीकाठी याचा वाडा किंवा गढी नाहीतर किल्ला होता. हा परिसर आजच्या लातूर रोडजवळ जिथे एक ब्रॉडगेजचे रेल्वे स्थानक आहे तिथे येतो. तिथे जवळच एक टेकडी होती जिथे या राजाचा महाल/गढी/वाडा किंवा तत्सम काहीतरी होते. पण आज त्याचे अवशेष सापडत नाहीत. पुरातत्व खात्याने उत्खनन केले तर यावर प्रकाश पडेल. अमोघवर्षाने नंतर इतर राजांच्या आक्रमणांना किंवा अंतर्गत बंडाळींना किंवा सततच्या दुष्काळाला कंटाळून हे शहर पर्यायाने जी त्याच्या राज्याची राजधानी होती ती सोडली व गुलबर्ग्याजवळ मान्यखेटला राष्ट्रकूटाची नवीन राजधानी वसवली. त्याचे अवशेष आजही तिथे पाहायला मिळतात. मग अमोघवर्षाने लातूर सोडण्याचे नेमके कारण काय होते? गंमत म्हणजे तो स्वतःला लत्तलूरपुरवराधीश्वर म्हणवून घ्यायचा. लत्तलूरपुरवराधीश्वर म्हणजे लत्तलूर नगरीचा अधिपती. पण त्याच्या स्थलांतराबद्दल व अस्तित्वाबद्दल ठोस पुरावे इतिहास देत नाही.

लातुरातील प्रमुख्य रस्त्यावरील कदाचित सर्वात जास्त रहदारीचा अन गर्दीचा रोड.
जीव गुदमरून जावा अशी अवस्था दिवसा इथे असते फक्त रात्रीची वेळ सोडून.
शिवाजी महाराजांच्या काळापासून ते स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत बऱ्यापैकी माहिती अस्तित्वात आहे. ती माहिती लातूर जिल्हा परिषदेनं प्रकाशित केलेल्या जिल्हा गॅझेटिअरमध्ये आहे पण मला या पलीकडे अडीच हजार वर्षांपासून या परिसरात राहणाऱ्या लोकांबद्दलची माहिती हवीय. अमोघवर्षाच्या काळात खालच्या जातीच्या लोकात आंतरजातीय विवाह व्हायचे असा उल्लेख सापडतो. परंतु एका वरच्या जातीतल्या मुलाचं खालच्या जातीतल्या मुलीशी झालेला विवाह याबद्दल कुठे लिहिले असेल तर ते हवे आहे. यातून त्यांनी त्या काळातल्या समाजाशी कशी टक्कर घेतली ते कळेल किंवा त्या काळी भिकारी हे असतीलच की त्यांच्याबद्दल काहीही वाचण्यात येत नाही कारण आज लातुरात दर शनिवारी सेन्ट्रल हनुमानच्यासमोर भिकारी बसतात. तेव्हा प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही कहाणी असते ती आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती तर देतेच पण या शहरात ते का राहतात व शहराच्या जडणघडणीवर त्यांचा काय व कसा प्रभाव पडतो ते समजते.

मी शाळेत असताना शिवाजी चौक ते नंदी स्टॉप दरम्यान एक माणूस नागवं फिरायचा. आम्ही त्याला न्यूटन म्हणायचो. न्युटनच का माहित नाही पण त्याचा वेडेपणा व नागवं फिरत असल्यामुळे असेल पण तो माणूस आजही लक्षात आहे. अशा माणसाबद्दल सांगायचं कारण म्हणजे एखाद्या गावाचा, शहराचा, महानगराचा दैदिप्यमान इतिहास हा अशा प्रकारच्या सर्वसामान्य माणसांच्या अज्ञात राहण्यामुळे जिवंत होत असतो. अश्या प्रकारच्या माणसांवर एखादा विषादपूर्ण लेख लिहिला जातो. त्यातही या लोकांची अवस्था किती वाईट आहे याची चविष्ट वर्णनं केलेली असतात. मला यात काडीचा इंटरेस्ट नाही. लहानपणी या माणसाबद्दल ऐकलं होतं. हा चांगला वकील होता. घराची परिस्थिती चांगली होती. लग्न होऊन लातूरच्या कोर्टात वकिली करत होता. वकिली जोरात होती. मग काहीतरी बिनसलं. घरात म्हणे बायकोसोबत वाजलं. तिनं घर व पैसा स्वतःच्या नावावर करून घेतलं. त्यानंतर तो वेड्यासारखा फिरायला लागला. नंतर-नंतर तर नागवाच. मला तो नेहमी शिवाजी चौकात दिसायचा. तेव्हा मी केशवराज शाळेत होतो. शाळेला सायकलवर जाता-येता तो माणूस नेहमी दिसायचा. मला वाटायचं इतकी सगळी माणसं आपापल्या घरात राहत असताना यालाच असं घर सोडून हिंडायची काय गरज? इतिहास वाचताना हा प्रश्न नेहमीच पडतो की अश्या लोकांचं स्थान त्यात का नाही.

जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याचे ठिकाण ???
लातूर हे व्यापारी शहर म्हणून ओळखलं जातं. पैसा ही लक्ष्मी असल्यामुळे आज शॉपिंग मॉल, सुपर मार्केट, फूड मार्केट, आडत लाईन, लोखंड गल्ली, ओनरशिप फ्लॅट्स, रो-हाउसेस वगैरे ठिकाणी पैसा मुबलक प्रमाणात बघायला मिळतो. पण अशा एखादा शॉपिंग मॉल बनवताना तिथे जो गवंडी बिल्डरच्या हाताखाली काम करत असतो त्याच्या हाताखाली एक माणूस असतो विटा, वाळू, सिमेंट उचलण्यासाठी किंवा खड्डे खणण्यासाठी आणलेला असतो. तो दिवसभर काम करतो अन संध्याकाळी पैसा घेऊन घरी जातो. घरी गेल्यावर शांतपणे जेवण करून झोपतो. परत दुसऱ्या दिवशी काम मिळवण्यासाठी सकाळी शिवाजी चौकात येतो. हे एखाद्या कादंबरीत शोभावं असं पात्र आहे. जर कोणी या माणसाच्या आयुष्यावर कादंबती लिहिली तर ती त्याच्याबद्दलचा इतिहास ठरेल. तो काय खातो-काय पितो, देशी दारूच्या दुकानाला सदिच्छा भेट देतो का की एखाद्या पॉश बारला, बायको-मुलांवर प्रेम करतो की त्यांना झोडपून काढतो, कामावर निष्ठेनं काम करतो की पाट्या टाकूपणा करतो याची माहिती मिळेल. जेव्हा त्या शॉपिंग मॉलचं  उदघाटन होईल तर त्या संबंधातली एक बातमी पेपरमध्ये छापून येईल. ती बातमी त्याच्यासाठी इतिहास ठरेल कारण काल काय झालं ते आज आपण वाचतो. पण त्या शॉपिंग मॉलला बांधताना जी वाळू ट्रक मधून आणली जाते त्याचा ट्रक ड्रायव्हर हा लातूर जिल्ह्यातलाच कोणीतरी असतो ज्याला या शहरानं काम दिलेलं असतं म्हणून तो इथलाच होतो. त्याची एक कहाणी असते. त्या शॉपिंग मॉलमध्ये वस्तू खरेदी करताना आपण हे सोईस्करपणे विसरतो. नंतर जेव्हा त्या शॉपिंग मॉलबद्दल लिहा असं सांगण्यात येतं तेव्हा आपण त्याच्या वृद्धीबद्दल, त्याच्या मालकाबद्दल जो कुठल्यातरी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष पण असतो व त्याने काय-काय सामाजिक कार्य करून समाज सुधारणा केली याचं रसभरीत वर्णन करतो. आपण म्हणतो त्याने शॉपिंग मॉलसारखी व्यापारी वास्तू बांधून दहा-वीस लोकांना रोजगार देऊन त्यांच्या आयुष्याला दिशा दिली. त्या मॉलच्या जडणघडणीत जे असंख्य हात मदत करत होते ते कुठं गेले. त्यांना त्यांचा दररोजचा मोबदला दिला की काम संपलं का? त्यांच्याबद्दल आपण कधी लिहिणार. त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली असं लिहिल्यावर आयुष्याला दिशा मिळाली म्हणजे काय स्थित्यंतर घडले त्यांच्या आयुष्यात याचं दस्तावेजीकरण करणं नको.

लातुरात असंख्य टी-स्टॉलवाले आहेत. त्या टी-स्टॉलवर खूप माणसे येतात. त्यांच्याबद्दल जर वाचण्यात आलं तर ते खूप चांगलं होईल. किंवा आज महानगरपालिका अस्तित्वात आली. पस्तीस नगरसेविकांच्या हातात प्रशासन आलं. त्यांच्या काय कहाण्या असतील किंवा लातुरातील प्रत्येक स्त्रीची कहाणी काय असेल. नुसतं मुल-बाळ सांभाळणं हे पुरुषी मनाला सोपं वाटतं पण ते सांभाळून भजनी मंडळ, भिशी किंवा बचत गट चालवणे हे वाटतं तितकं सोपं नाही. अश्याच एखाद्या भजनी मंडळावर जर कोणी कादंबरी लिहिली असेल तर त्यात बायकांचे स्वभाव, हेवेदावे, रुसवे-फुगवे याची वर्णनं येतील. हे खूप गंभीरपणे न लिहिता थोडसं नर्मविनोदी शैलीत लिहिलं तर काय बहार येईल.

या बद्दल काही बोलावं असं मनातून वाटत नाही.
मला बऱ्याच दिवसांपासून एका माणसाबद्दल खूप आकर्षण आहे. कॉलेजात असताना मित्रांसोबत तहसील, नगर परिषद, जिल्हा परिषद नाहीतर कुठल्या न कुठल्या सरकारी कार्यालयात जायचो तेव्हा मित्र म्हणायचे हा शिपाई इतका पैसा खातो. तो अधिकारी अमुक रक्कम जास्तीची दिल्याशिवाय फाईलवर सहीच करत नाही किंवा साहेब, तुमचं काम करून देतो. इतकं पर्सेंट नाहीतर कमिशन द्या असं म्हणणारा जो माणूस असतो ज्याला आपण दलाल म्हणतो याची कहाणी वाचायचीय. त्यानं जर स्वतःच्या आयुष्यावर कादंबरी लिहिली तर आपल्या यंत्रणेची चिरफाड करणार. ही चिरफाड काही वर्षानंतर त्या शहराचा इतिहासच ठरेल. खरंतर हे थोडं पोलिटिकली इन करेक्ट आहे किंवा भ्रष्टाचाराचं समर्थन केल्यासारखं आहे. पण आपल्या समाजव्यवस्थेचा घटक म्हणून जर आपण या कडे पाहत असू तर आपल्या डोळ्यासमोर खूप मोठं चित्र उभं राहतं. ही माणसं भलेही अधिकारहीन आहेत पण आतून पोखरलेल्या यंत्रणेची ही कणा आहेत. यांच्याशिवाय यंत्रणा हलत नाही हा आपला अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनाला महत्त्व प्राप्त होतं.

हे गृहस्थ असेच शांतपणे लातुरातील घडामोडी बघत असतात.
त्यांच्या समोरून येत जात असताना लातुरातील परिस्थिती
बघून कधी कधी त्यांची कीव करावी वाटते. 
मी आत्तापर्यंत लातुरात राहणाऱ्या लोकांबद्दल बोलत होतो पण शहरात असणारी भटकी कुत्री-मांजरं, गाई, म्हशी, घराघरातून उच्छाद मांडणारे उंदीर, झुरळं तसेच संपूर्ण शहराला वेठीस धरणारे रक्तशोषक डास यांच्याबद्दल तर बोललच नाही. मला वाटतं डास हा असा प्राणी आहे ज्याला बोलतं केलं तर तो लातूरचा अडीच हजार वर्षांचा इतिहास कीर्तनातून उत्तमरित्या मांडू शकेल. आजच्या लातुरातल्या अस्वच्छतेबद्दल, बकालपणाबद्दल, वाढलेल्या ट्रफिकबद्दल, नियम मोडून चालवणाऱ्या बाईक्स, ऑटोवाल्यांबद्दल भरभरून सांगेल. अश्या प्राण्यांना बोलतं करण्याची काहीतरी यंत्रणा शोधायला पाहिजे. कोणीतरी डासाला केंद्रस्थानी ठेऊन कादंबरी लिहायला पाहिजे म्हणजे आपल्याला निसर्गाकडून न बोलता येण्याचा शाप मिळालेल्या या प्राण्याचा दृष्टीकोन कळेल. तसेच या निसर्गाचा घटक म्हणून अन गेल्या कित्येक कोटी वर्षापासनं या पृथ्वीतलावर अस्तित्वात असल्यामुळे यांचा हक्क बनतो. दुर्दैवाने निसर्गाने बोलण्याची व भाषा निर्माण करण्याची शक्ती न दिल्यामुळे यांचं खूप नुकसान केलय. आपले कान उपटणारा कोणी नसल्यामुळे आपली मिजास हे प्राणी खपवून घेतायत हे आपलं सुदैवच आहे.

लत्तलूर-लातूर असं जेव्हा आपण लिहितो तेव्हा मधला जो हायफन असतो तो जास्त महत्त्वाचा असतो कारण नुसत्या दोन शब्दांमधली एक छोटीशी रेघ असं त्याचं अस्तित्व नसतं तर त्यात गेल्या अडीच हजार वर्षांचा अज्ञात इतिहासातल्या असंख्य गोष्टी दाबून किंवा ठाकूनठोकून बसवलेल्या असतात. त्या बाहेर यायला हव्यात. आपल्यात झालेले बदल आपण स्वार्थापायी मारलेली माणसं, जनावरं किंवा संपत्तीचानिसर्गाचा केलेला नाश या व अश्या खूप गोष्टी ज्यातून काहीतरी शिकायला मिळेल. केलेल्या चुकांवर पांघरूण न घालता परिमार्जन करायला संधी मिळेल. कोणीतरी कृती करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेतला जावा याचा विचार मिळेल. जर या गोष्टी आपल्याला मिळत असतील तर असा इतिहास परिपूर्ण व निपक्षपाती असतो. 

एका दिवाळी अंकासाठी हा लेख लिहिला होता पण अंक आलाच नाही म्हणजे छापला गेला नाही.

Comments