अविस्मरणीय सिनेमानुभव : पिफ २००७

पुढच्या वर्षीच्या पहिल्या महिन्यात नवव्या व सोळाव्या दिवसाच्या दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरत आहे. या निमित्ताने मी २००७ साली हजेरी लावलेल्या पिफची आठवण झाली. त्यावेळी सर्व डेलिगेट्सना दिलेली चित्रपट माहिती पुस्तिका मी जपून ठेवली आहे.

लातुरात असताना पेपर, साप्ताहिक, मासिक आणि दिवाळी अंकात सिनेमा विषयी अन् फिल्म फेस्टिवलबद्दल खूप वाचण्यात यायचं. दूर एका छोट्याश्या शहरात राहत असल्यामुळे तिथनं फिल्म फेस्टिवलला येणं परवडायचं नाही. त्यामुळे लेख वाचून सिनेमा कसा असेल याचे आडाखे बांधायचो. पण एमएसाठी पुण्यात आल्यावर पिफ अटेंड करायचं असं ठरवलं होतं. पैशाची नेहमीची अडचण होती पण विद्यार्थ्यांसाठी कॉलेज आयडीवर पासेस मिळायचे. मग मनाचा हिय्या करून हॉटेल प्रतीकमधून डेलिगेट पास घेतला आणि एका अद्भुत अनुभवाची सुरुवात झाली. सिनेमा बघण्याचा माझा दृष्टीकोन जसा बदलला तशी नजर बदलली. लातुरात फक्त आणि फक्त हिंदी-मराठी व्यावसायिक सिनेमे बघण्यात पाव आयुष्य गेलं त्याला या निमित्ताने जबरदस्त तडा दिला. ओंजळभर असणारी माझी सिनेमा विषयीची जाण एकदम जागतिक अन् पसाभर झाली. नसलेला पदर फाटून जाईल असे एका पेक्षा एक अप्रतिम चित्रपट बघायला मिळाले.

सोबत मिळालेली पुस्तिका मी जपून ठेवली आहे. त्यात बघितलेल्या सर्व चित्रपटाविषयी माझ्या कुवतीनुसार निरीक्षणं लिहिलेली आहेत. 

ते चित्रपट पुढील प्रमाणे :

Restaurant (२००६) :

Good film to watch, excellent direction which is rare in now a day Marathi cinema. Brilliant performances by lead pairs. Background score is good especially use of guitar pieces. 

मी हे इंग्रजीत का लिहिलं आहे ते लक्षात नाही. कदाचित फर्गसनला एमए इंग्रजी करत असल्यामुळे असेल पण लिहिलं गेलं. मराठीचा जाज्वल्य अभिमान असण्याची शक्यता जास्त आहे म्हणून असेल कदाचित.

सिटी ऑफ गॉड (२००२) :

फेस्टिवलचा महत्त्वाचा सिनेमा. माझा जास्त आवडता. प्रचंड व्हायलंट. दिग्दर्शन एक नंबरचे तसेच तीन दशकांचा काळ उत्तमपणे पडद्यावर आणलेला. काही प्रसंग बघवत नाहीत. हेच दिग्दर्शकाचं यश आहे. हॉलीवूड चित्रपटाचा फोलपणा जाणवून देणारा.

















ब्राँक्स बार्ब्स (२००० Bronx Barbes) :

चित्रपट कळलाच नाही. मुळात विषय कोणता आहे हेच कळत नव्हतं. चित्रपटातून उठून आलो. फक्त एक प्रसंग आठवतो. नायकाचे मित्र रात्री वापस घराकडे परतताना एका मुलीवर बलात्कार करतात. बलात्काराचा प्रसंग अगदी सहज दाखवला जातो. बघवत नाही.
















द प्रिन्स रेस्पाईत (The Prince's Respite २००६) :

चित्रपट एखाद्या विज्ञान कथेसारखा शक्यता गृहीत धरायला लावतो पण मुळात तो ख्रिश्चन मायथॉलॉजी आहे. त्यामुळं कळायला अवघड वाटला. पण दिग्दर्शकाची विषयाची समज व दाखवण्याची शैली सुंदर होती. काही प्रसंगात पुढे काय होणार याचा ताण निर्माण होतो. बाकी शेवट यथातथाच आहे.





किस्ड बाय विंटर (Kissed by Winter २००५) :

खूप छान चित्रपट. मला आवडलेले दिग्दर्शन आणि छायाचित्रण. नार्वेमधला हिवाळा अप्रतिम दाखवलाय. निसर्गाच्या बदलाला नायिकेच्या भूतकाळाशी जोडून छान परिणाम साधलाय. कथानक रहस्यकथेसारखे पुढे सरकत जाते व अंताला आपल्याला विचारात पाडते. नायिकेचं काम करणाऱ्या अभिनेत्रीचं काम वाखाणण्याजोगं. फक्त एक गोष्ट खटकली नग्न दृश्य व सेक्सचे प्रसंग हे वेगळ्या पद्धतीनं दाखवता आले असते.












समर इन बर्लिन (Summer in Berlin २००४) :

अजून एक चांगला चित्रपट पण परत तेच नग्न दृश्य व सेक्सचा भरपूर वापर. त्यामुळं तेवढेच प्रसंग चटकन लक्षात राहतात. बाकीच्या सिनेमासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो. कथानक सरळ व साध्या पद्धतीने दाखवलं आहे. कलावंतांचा उत्तम अभिनय व दिग्दर्शनात सफाईदारपणा. एक गोष्ट नाही आवडली विदेशी चित्रपटात पटापट लोकं प्रेमात कसं पडतात?














हिरो-नायकन (Nayagan १९८७) :

कमल हासनचा एकट्याचा तांडवनृत्य. मणीची माध्यमावरची पकड दिसून येते पण सफाईदारपणा रोजा मध्ये दिसतो. टिपिकल कर्मशियल धाटणीचा चित्रपट. काही प्रसंगात तामिळी टच जाणवतो. बाकी फक्त कमल हासन अजून काही नाही.















अ पेक ऑन द चिक (A Peck on the Cheek Kannathil Muthamittal २००२) :

मणी रत्नमचा आजपर्यंतचा नितांत सुंदर सिनेमा. फ्रेम न् फ्रेम मणीच्या अभिरुचीनी व्यापलीय. रोजा, बॉम्बे नंतर परत तीच थीम इथे पण वापरलीय. रोजासारखा सफाईदारपणा इथं पण जाणवतो. तसंच कुटुंबव्यवस्थेबद्दलचा जिव्हाळा दिसून येतो. सिमरन व आर. माधवनचं काम खूपच छान आहे.















A Short Film About Killing (१९८८) :

कियालोवास्कीचा गंभीर व डार्क सिनेमा. आशयाच्या बाबतीत सत्यजित रेंसारखा. चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत डॉक्युमेंटरीसारखा शूट केलाय. तसंच व्यक्तीचित्रणापेक्षा घटनेला महत्त्व आल्यामुळे शेवट चांगला असला तरी पटत नाही. टॅक्सी ड्रायव्हरच्या खुनाचं चित्रण बघण्यासारखं व शिकण्यासारखं आहे. या प्रसंगात दोन्ही कलावंतांचा अभिनय तोडीस तोड.














कॅमेरा बफ (Camera Buff १९७९) :


माझा आवडता. एका हौशी कॅमेरावाला मिळालेल्या कॅमेरातून मिळेल ते शूट करतो. त्यातच त्याला त्याच्या कंपनीकडून चित्रपटाची ऑफर येते. मला आवडलेला भाग म्हणजे कियालोवास्कीचं अफलातून दिग्दर्शन. त्याला काय सांगायचं आहे ते तो फारच कमी पण महत्त्वाच्या छोट्या प्रसंगांमधून सांगतो. प्रत्येकानं पहावा असा चित्रपट.
















डेकालॉग वन (Decalogue One १९८८) :

डेकालॉग सिरीज मधला पहिला चित्रपट. नेहमीसारखं उत्तम दिग्दर्शन, अभिनय सर्वच आघाड्यांवर. या सिरीजमधून कियालोवास्की खूप काही सांगतो. त्याची दाखवण्याची पद्धत टिपिकल मसाला चित्रपटात खासकरून थ्रिलरमध्ये वापरता येईल.



डेकालॉग टू (Decalogue Two १९९०) :

यातला गंभीर आशय मनात बरेच दिवस होता. ती बाई त्या डॉक्टरला देवासंबंधी प्रश्न विचारते तेव्हा. या पूर्वीच्या डेकालॉग सिरीजच्या पहिल्या चित्रपटातसुद्धा तो लहान मुलगा आपल्या वडिलांना देव संबंधीच प्रश्न विचारतो. हा चित्रपट किंवा या दिग्दर्शकाचे इतर चित्रपट संथ गतीने जात असतात. त्यामुळे बघताना शांत पण मन एकाग्र करून बघावे लागतात.




नीलकुयील (The Blue Koel १९५४) :


नितांत सुंदर. कृष्णधवल जमान्यात सामाजिक विषय हाताळल्याबद्दल दिग्दर्शकाचे धन्यवाद. फक्त एकाच गोष्ट सांगावीशी वाटते अर्काईव्जमध्ये मी अन् अजून एक जण असे दोघच अख्खा चित्रपट एन्जॉय करत होतो.













वेयील (Veyil २००६) :

अजून एक चांगला चित्रपट पण टिपिकल भडक, बटबटीत, ओंगळवाणा तामिळ चित्रीकरण असणारा. उत्तम विषय, अभिनय, दिग्दर्शन. काही प्रमाणात मी याच्याशी रिलेट झालो होतो.







पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट फेस्टिवल हा माझ्या अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. इतके दिवस पेपरमधून वाचलेलं प्रत्यक्षात पाहण्यात आलं. माझा बकासूर केला या लोकांनी. चित्रपट किती वेगवेगळ्या प्रकारे दाखवता येऊ शकतो व या माध्यमाला मर्यादा कशा नाहीत याची आठवण नेहमी मनात राहिल.

Comments