कुंग फू किलर : डॉनी येनचा अॅक्शन तडका
हाँगकाँग चित्रपटश्रूष्टीने
जगाला खासकरून अॅक्शन वर्गात बसणाऱ्या सिनेमांचे
अनेक कलाकार दिले आहेत. जॅकी चॅन, मिशेल यो, सॅमो हंग, जेट ली वगैरे ज्यांनी ब्रूस
ली नंतर अॅक्शन सिनेमाला वेगळा आयाम
दिला. जगभरात पसरलेला स्वतःचा चाहता वर्ग तयार केला. वरील उल्लेखलेल्या
कलाकारांच्या सिनेकारकिर्दीत एक नाव घ्यावं लागेल ज्याने या कलाकारांसोबत काम केले
आहे तसेच त्याच्या वैशिष्टपूर्ण सिनेमांमुळे स्वतःचा चाहता वर्ग तयार केला आहे. तो
म्हणजे डॉनी येन. डॉनी येनची जवळजवळ संपूर्ण कारकीर्द हाँगकाँग सिनेश्रूष्टीतच
घडली असं म्हणायला काही हरकत नसावी फक्त हॉलीवूडमधले एखादे दोन सिनेमे सोडले तर... ब्रूस लीला मार्शल आर्ट्सचे धडे देणाऱ्या ईप मॅनच्या चरित्रात्मक भूमिकेने तर तो
अजून सर्वदूर पोचला.
प्रस्तुत सिनेमाचा विषय
तसा नेहमीचा आहे. कुंग फू पटांचा साचा ठरलेला असतो. सुष्ट-दुष्ट असे दोन
व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीत पारंपारिक संघर्ष. हाऊ मो (डॉनी येन) हा मार्शल
आर्ट्समध्ये माहीर असणारा आणि पोलिसांना आत्मसंरक्षण शिकवणारा शिक्षक एका केसमध्ये
शिक्षा भोगत असतो. त्याच्या शिक्षेची तीन वर्ष पूर्ण होत असताना हाँगकाँगमध्ये
अचानक काही खून पडायला लागतात. पोलीस तपासात आढळतं की मेलेले सर्वजण मार्शल
आर्ट्सच्या विविध कलाप्रकारात निष्णात असणारे असतात. हाऊ मोला कळताच तो पोलिसांना
खुनी शोधण्यासाठी मदत करायची तयारी दर्शवतो पण एक अट ठेवून की केस सोडवल्यावर
पोलिसांनी त्याच्यावरचे आरोप मागे घ्यावेत.
जॅकी चॅन, सॅमो हंग यांनी
नेहमी गांभीर्याने दाखवल्या जाणाऱ्या आणि ब्रूस लीने प्रसिद्ध केलेल्या अॅक्शन
प्रसंगांना विनोदाची झालर लावून त्यात मस्त खुमारी आणली होती. त्यामुळे अॅक्शनमधलं
गांभीर्य मागे पडलं असा आरोप केला गेला. त्या काळात जेट लीसोबत डॉनी येनने त्याला
परत त्याचं स्थान मिळवून दिलं. त्यामुळे त्यांचं स्वतःचं एक वैशिष्ट ठरलं. डॉनी
येनच्या अॅक्शन प्रसंगांमध्ये विंग चून, मोई थाई, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग व मिक्स्ड मार्शल आर्ट्समधल्या प्रकारांचा सढळ हाताने वापर केलेला असतो. नुसता वापर न करता
त्यांचं असणं कथानकाला बाधक ठरणार नाही याचा विचार केलेला असतो. त्यामुळे असे
प्रसंग पडद्यावर कमी प्रमाणात असले तरी त्यांचा प्रभाव चित्रपट संपल्यावर सुद्धा
राहतो. अशक्य वाटतील असे प्रसंग निव्वळ स्टंट्सवर धकवून न नेता लीलया पडद्यावर
दाखवले जातात.
या चित्रपटात सुद्धा काही
प्रसंग जीवघेणे वाटावे असे आहेत. खासकरून नायक आणि खलनायक यांच्यात हायवेवर तुफान
रहदारीमध्ये काही मिनिटांपर्यंत चालणारा प्रसंग. हा प्रसंग कथानकात एका टप्यावर
येत असला तरी त्याची कोरिओग्राफी, चित्रण, मारामारीतला ठेवलेला वेग, डॉनी येन
इतकाच तुल्यबळ असणारा त्याचा प्रतिस्पर्धी, संकलन यामुळे चित्रपटाचा हायलाईट ठरतो.
अशा चित्रपटात जर खलनायकच तोकडा, अप्रभावी वाटला तर प्रेक्षक नाराज व्हायची दाट
शक्यता असते. नायकाचं नायकत्व हे अधोरेखित होतं ते प्रभावी आणि चिरकाल स्मरणात
राहणाऱ्या खलनायकामुळे. त्यामुळे तो नायकापेक्षा किमान दोन पावलं पुढे असणारा
असावा. यातील खलनायक डॉनी येनसमोर फार काळ येत नाही पण त्याच्या कारनाम्यांमुळे तो
चर्चेत राहतो. त्यामुळे आपसूकच प्रेक्षकाला उत्सुकता राहते ती यांच्यात कोण वरचढ
ठरणार आणि आपल्याला अपेक्षित असलेल्या मारामारीच्या प्रसंगाची उत्सुकता राहते.
अशा प्रेक्षकांच्या सर्व
अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करतो. तुम्ही डॉनी येनचे चाहते असाल किंवा एकूण कुंग
फूपटांचे डायहार्ड फॅन असाल तर तुमच्या फूटपट्टीवर याचं श्रेष्ठत्व जोखून बघा.


Comments