दिल धडकने दो : प्लुटोचं कुटूंब
कुठल्याही कथानकाला निवेदक असावा का? असल्यास तो
कोण असावा म्हणजे कथेतलं एक पात्रच ते असावं का? पात्र असेल तर तो कोण असावं मानवी
व्यक्तिरेखा की अजून कुणी? जर निवेदन त्या पात्राच्या दृष्टीकोनातून असेल तर त्याचं
कथानकात स्थान किती असावं? निवेदन करताना त्याने त्याच्या दृष्टीकोनातनं करावं की
सर्वसाक्षी व्हावं. निवेदाकाबद्दल इतके प्रश्न पडायचे कारण या सिनेमाचा निवेदक.
निवेदक हा एक जिवंत मनुष्यप्राणी असावा असा अलिखित नियम झालाय. या सिनेमात निवेदक
एक कुत्रा आहे.
ही कहाणी आहे मेहरा कुटुंबाची. जे पंजाबी आहेत. प्लुटो
त्यांचा कुत्रा कहाणी सांगायला सुरुवात करतो. त्याच्या म्हणण्यानुसार कमल मेहरा
(अनिल कपूर) हे आयका या कंपनीचे मालक, चालक आहेत. ते दिल्लीतल्या अतिश्रीमंत
वस्तीत राहतात. त्यांचा कुटुंब चौकोनी आहे म्हणजे बायको नीलम (शेफाली शाह), मुलगी
आयेशा (प्रियांका चोप्रा) आणि मुलगा कबीर (रणवीर सिंग). पण त्यांच्यात अतिपरिचयात
अवज्ञेमुळे विसंवाद झालाय जो कमी व्हायला तयारच नाही. मेहरांच्या लग्नाचा तिसावा
वाढदिवस जवळ येऊन ठेपलाय. तसेच कंपनीत हलाखीची परिस्थिती आलीय. कंपनीला सावरायचं
असेल तर तिचे ४९% शेअर्स विकावे लागतील जेणेकरून डबघाईला आलेली परिस्थिती सावरता
येईल. त्यासाठी मेहरा दाम्पत्य कबीरचं लग्न बिझनेस मित्र सूदच्या मुलीशी नुरीशी
(रीधिमा सूद) करायचं ठरवून त्यांना क्रुझवर यायला आमंत्रित करतात. आपल्या जवळच्या
मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना मेहरा दाम्पत्याने एका क्रुझवर सेलिब्रेशनसाठी
बोलावलेले असते. क्रुझवर कबीर तिथल्या फारा (अनुष्का शर्मा) नावाच्या स्टेज
डान्सरच्या प्रेमात पडतो. आयेशा आणि तिचा नवरा मानव सामरा (राहुल बोस) यांच्यात
धुसफूस चाललीय. याची परिणीती म्हणजे एका गंभीर प्रसंगी आयेशा तिच्या मनातले
घटस्फोटाचे विचार बोलून दाखवते. मेहरा कुटुंब विचारात पडतं.
कथानकाचा विचार केला तर ती घिसीपिटी कहाणी लगती
है छापाची वाटेल. तशी ती आहेच आहे. तरी पण झोया अख्तरच्या सुस्पष्ट वैचारिक
बैठकीमुळे आणि रीमा कागतीसोबत तिला हे हवं ते लिहिल्यामुळे जिवंत वाटते. तसेच तिचा
एका भारतीय कुटुंबाकडे कमालीच्या आत्मीयतेने बघण्याच्या दृष्टीने कथानकाला खरेपणा
आला आहे. मेहरा कुटुंब, त्यांचे मित्र-मैत्रीण आणि आप्तेष्ट ही मंडळी उगाच पात्र न
वाटता खरोखरची आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कुटुंबासारखी वाटतात. त्यांचं बोलणं,
चालणं, वागणं, स्वभावातले गुण-दोष हे खरे वाटतात. झोयाची दृष्टी ही त्यांना समजून
घेण्याची आहे त्यामुळे निवेदक कुत्रा अधेमधे जे समीक्षात्मक भाष्य करतो ते फक्त
भाष्य वाटतं. उगाच त्याला कुजकटपणाचा वास येत नाही. निवेदक अधेमधे गायब
झाल्यासारखा असतो त्यामुळे प्रेक्षक मेहरा कुटुंबाची तादात्म्य पावू शकतो.
झोया अख्तर सध्याच्या काळातली कामात सातत्य
असणारी आणि रिलायबल दिग्दर्शिका आहे (की दिग्दर्शक आहे.) तिच्या छोट्याच्या सिने
कारकीर्दीचा आढावा घेतला तर लक्षात येईल तिला मानवी नाते संबंधांमध्ये जास्त
इंटरेस्ट आहे. लक बाय चान्स या पहिल्याच चित्रपटात चित्रपट क्षेत्राची योग्य (की
अयोग्य) ती बाजू कुठलाही आडपडदा न ठेवता तिने दाखवली पण तिचा फोकस होता एक जोडपं
जे या चित्रपटाच्या दुनियेत कशा पद्धतीने वागतं, त्यांच्या स्वाभाविक प्रेरणा काय
आहेत, आपल्याला जे मिळवायचं आहे ते कोणत्या मार्गाने मिळवणं योग्य आहे हे जाणून
घेणं आहे. दुसऱ्या सिनेमात म्हणजे जिंदगी ना मिलेगी दुबारामध्ये बॅचलर्स पार्टी हे
कथानकाला सुरुवात आणि शेवट करून देण्यासाठी असले तरी तिचा फोकस हा परत मुख्य
व्यक्तिरेखांचा त्यांच्या भूतकाळासहित त्यांना समजावून घेणे आणि त्यांच्यात होणारा
बदल तपासणे. हा सूक्ष्म धागा पहिल्या चित्रपटात सुद्धा होता. तिसरा म्हणजे हा
सिनेमा येण्यापूर्वी तिने बॉम्बे टॉकीज या चार शॉर्ट फिल्म्सच्या संग्रहात एक
सेगमेंट दिग्दर्शित केला होता. तिथलं कथानक दुसऱ्याने लिहून दिलेलं असल्यामुळे ते
फक्त दिग्दर्शित करणे इतपतच तिचं काम होतं. मुख्य व्यक्तिरेखात सरतेशेवटी बदल घडणे
हे तिन्ही सिनेमात दिसून येणारी गोष्ट. हा विचार तिच्या मूल्यदृष्टीशी निगडीत आहे.
ती बघत असलेल्या जगात माणसं विसंवादी आहेत. हा विसंवाद त्यांच्या स्वभावाचं
वैशिष्ट्य बनला आहे पण तिचा संवादावर विश्वास आहे. दोन विचारी व्यक्तीत चांगला
संवाद असेल तर त्यांच्यात निश्चित आणि सकारात्मक बदल घडतो जो त्यांच्या आयुष्याला
योग्य दिशा देणारा आहे. हे ते तत्वज्ञान आहे जे याही सिनेमात ठळकपणे दिसून येते.
तिच्या सिनेमात दिसणाऱ्या उच्च निर्मिती मूल्य,
उत्तम अभिनय, गाणी, संवाद, पटकथा, सिनेमॅटोग्राफी, संकलन या उजव्या ठरणाऱ्या बाजू
या ही सिनेमात आहेत. त्यामुळे त्या वर फार बोलणे योग्य नाही.
हा सिनेमा वरील तत्वज्ञानाचा प्रवास दर्शवतं.
विसंवादाकडून सुसंवादाकडे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे. वाईटाकडून
चांगल्याकडे. आर्थिक उदारीकरणानंतर जो एक श्रीमंत आणि अति श्रीमंत वर्ग उदयास आला
आहे तो असाच विसंवादी आहे. त्याच्यात सुसंवाद असावा अशी तळमळीची अपेक्षा असणारा
असा हा सिनेमा आहे.
रेटिंग : ४/५
पूर्वप्रसिद्धी : दै. मराठवाड़ा नेता ०७ मे २०१५



Comments