ज्युरासिक वर्ल्ड : चित्तचक्षुचमत्कारिक राईड

१९९३ साली आलेल्या ज्युरासिक पार्क हा स्टीवन स्पीलबर्गच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा चित्रपट. त्याचा प्रभाव जागतिक सिनेमावर जसा पडला तसा सर्वसामान्य प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगाची सफर त्याने घडवून आणली. डायनोसॉर हे महाकाय प्राणी कधी काळी पृथ्वीवर वावरत होते आणि त्यांचे वंशज म्हणजे आजचे जमिनीवरील आणि पाण्यातील प्राणी इतकी माहिती शाळेतल्या पुस्तकातून सर्वांना होतीच. तरी पण ते दिसतात कसे, ओरडतात कसे, त्यांचं वागणं कसं असेल वगैरे गोष्टींचा अनुभव शालेय पुस्तके देऊ शकत नव्हती. स्पीलबर्गच्या ज्युरासिक पार्कने ते काम केलं. हे प्राणी असतात कसे याची देही याची डोळा सर्वांना प्रचिती आणून दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल असणारं गूढ कमी झालं. अर्थात सिनेमाला असणारा भक्कम कथा-पटकथेचा, शास्त्रीय माहितीचा आधार, स्पीलबर्गची विषय हाताळण्यातली हातोटी यामुळे सिनेमा वारेमाप प्रसिद्ध झाला. पुढे यथावकाश त्याने दुसरा आणि तिसरा भाग काढला. आता नुकताच चौथा भाग प्रदर्शित झाला आहे.

सायमन मसवाणी (इरफान खान) हा एका कॉर्पोरेट कंपनीचा मालक ज्युरासिक पार्क जे की आता ज्युरासिक वर्ल्ड आहे ही थीम पार्क चालवत असतो. जॉन हॅमंडच्या वीस वर्षांपूर्वीच्या स्वप्नाला त्याने या पार्कच्या रुपात सत्यात आणलेलं असतं. पार्कची मॅनेजर क्लेअर डिअरिंगला (ब्रायस डलास हॉवर्ड) घाई झालेली असते ती थीम पार्कमध्ये नव्याने आकर्षण ठरणाऱ्या डायनोसॉरला लवकरात लवकर लोकांसमोर आणण्याची. तो डायनोसॉर असतो ईनडॉमिनोसरेक्स. ती मादी असते. तिला लोकांसमोर आणण्यापूर्वी व्हेलॉसिरॅप्टरचा ट्रेनर ओव्हेन ग्रॅडीने (ख्रिस पॅट) डोळ्यांखालून घालावे असं आदेश सायमन देतो. क्लेअरला ते आवडत नाही पण ती तयार होते. त्याच दिवशी तिचे भाचे झॅक (निक रॉबिन्सन) आणि ग्रे (टाय सिम्पकिंस) पार्कचा आनंद लुटायचा म्हणून भेट द्यायला आलेले असतात. तसेच त्याच दिवशी नेमकं वीस हजार लोकं तिथे असतात. आणि त्यामुळे पुढे येणारी संकटे वाढायला त्यांची मदतच होते.

स्पीलबर्गचा कथेकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि दिग्दर्शक कोलीन ट्रेवोरो (सेफ्टी नॉट गॅरंटीड) यांचा कथेकडे बघण्याचा दृष्टीकोन यात मुलभूत फरक आहे तो म्हणजे प्रेक्षकांना आपण काय दाखवणार आहोत याचा. पहिल्या चित्रपटात कथेसोबत वाहवत न जाता काही निश्चित भाष्य एकूण विषयावर असावं याकडे स्पीलबर्गचा कटाक्ष होता. निसर्ग आणि मानव यात श्रेष्ठ कोण या अनादी काळापासून असणारा वाद केंद्रस्थानी होता. त्याला बाकी तांत्रिक बाबींची जोड होती. दुसऱ्या सिनेमात शास्त्रीय माहिती व वरील मुद्दा बाजूला पडला पण स्पीलबर्ग दिग्दर्शक असल्यामुळे एक उत्तम व्यावसायिक सिनेमा इतपतच त्याचं महत्व राहिलं. तिसऱ्या सिनेमात एका कुटुंबाची इस्ला सोर्ना या बेटावर चुकून अडकलेल्या आपल्या मुलाला सहीसलामत बाहेर काढणे इतकीच कथा होती. त्यामुळे दोन्ही सिनेमात तांत्रिक बाबी उजव्या असल्यातरी अप्रभावी व कमकुवत आशयामुळे ते पहिल्या सिनेमाची उंची गाठू शकले नाहीत.

दिग्दर्शक ट्रेवोरो यांच्यावर तिन्ही सिनेमांचा प्रभाव आहे. त्यांचा पटकथेतला सहभाग बरच काही सांगत असला तरी त्यामुळे प्रेक्षकांना नेमकं काय दाखवायचं आहे याचं गणित जमलेलं नाही. तांत्रिक बाबीत हा सिनेमा पहिल्या तिन्हीपेक्षा वरचढ आहे. डायनोसॉर खूपच जिवंत वाटतात. एकाच वेळी पार्कच्या व्यवस्थापनात असणारी धांदल आणि पार्कला भेट देणारे प्रेक्षक यांच्यात कथानक पुढेमागे होत राहतं ज्याचा शेवटाकडे बसणारा मेल चांगला जमला आहे. तरी पण सिनेमा पटत नाही ते दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनामुळे. दिग्दर्शक कथानकाकडे आपण प्रेक्षकांना एक चित्तचक्षुचमत्कारिक राईडचा अनुभव देऊयात अशा तऱ्हेने बघतो. त्यामुळे कित्येक गोष्टी पटत नसल्यातरी पटवून घ्याव्या लागतात. ती मादी डायनोसॉर बनवण्यामागची शास्त्रीय माहिती पटत नाही. जुजबी कारणं दिल्यासारखी माहिती प्रेक्षकांपुढे सादर केली जाते. बऱ्याच प्रसंगात डायनोसॉरचं वागणं त्यांच्या नैसर्गिक वागण्यासारखं आहे असं वाटत नाही. सिनेमाला दिलेला अॅक्शन थ्रिलरचा लुक उपरा वाटतो.

सिनेमाला तारून नेतात ते उत्तम जमलेले डायनोसॉर आणि ख्रिस पॅट व ब्रायस डलास हॉवर्डचा अभिनय जे डायनोसॉरसमोर कुठेही कमी वाटत नाहीत. खासकरून व्हेलॉसिरॅप्टर आणि ख्रिस पॅट यांच्यात असणारं मित्रत्वाचं नातं उल्लेखनीय.


जाता जाता जर थ्रिल राईडचे चाहते असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी.

रेटिंग ३/५

पूर्वप्रसिद्धी : दै. मराठवाड़ा नेता १४ जून २०१५

Comments