एबीसीडी २ : ‘नृत्य’ सुखद
हिंदी व्यावसायिक सिनेमात नृत्य आणि संगीत याचा सिनेमाच्या सुरुवातीच्या
काळापासूनचा संबंध. एकवेळ कथा, कथानक, संवाद, अभिनय इत्यादी गोष्टी कमी आणि दुय्यम
असल्या तरी चालतील पण कर्णमधुर संगीत, उत्तम नृत्य बसवलेली गाणी हवीतच. ही गाणी
सिनेमाच्या आशयात मुरली नाहीत तरी चालतील पण ती हवीच. गेल्या कित्येक दशकांपासून
हे चालत आलेलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एबीसीडी २ या पहिल्या एबिसीडीचा
(२०१३) पुढील भाग असणाऱ्या सिनेमात वरील बऱ्याच बाबी अधोरेखित झाल्या आहेत. पुढील
भाग म्हणजे पहिल्या भागाचा सिक्वल असेल असा अंदाज केला असेल तर चित्रपटकर्ते तो
फोल ठरवतात कारण दोन पात्र पहिल्या भागातली असली तरी ही कहाणी त्यांची नाही.
सुरेश (वरूण धवन) आणि विनी (श्रद्धा कपूर) हे हिप हॉप या पाश्चात्य नृत्य
प्रकारात स्वतःचं आयुष्य घडवणारं जोडपं. त्यांचा एक डान्स ग्रुप आहे मुंबई स्टनर्स
नावाचा. ते हम किसी से कम नहीं या टीव्हीवरच्या रिअॅलिटी डान्स शोमध्ये भाग घेतात.
तिथे त्यांचं सादरीकरण होतं. परीक्षक त्यांनी फिलिपिनो ग्रुपचा अॅक्ट जसाच्या तसा
कॉपी केलेला असतो म्हणून त्यांना चिटर्स ठरवून स्पर्धेतनं बाजूला करतात. सुरेशसाठी
हे जास्त क्लेशकारक असतं कारण त्याची आई सुप्रसिद्ध नृत्यांगणा असते. त्यामुळे
त्याच्यासाठी खोई हुई इज्जत परत कमावणे क्रमप्राप्त ठरते. तो विनीला आणि इतर
डान्सर्सना गोळा करून आंतरराष्ट्रीय हिप हॉप स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवतो. यासाठी
तो विष्णू (प्रभू देवा) सरला राजी करतो. पण स्पर्धा असते अमेरिकेत लास वेगासला.
तिथे गेल्यावर विष्णू सर त्यांना धोखा देतो. पण... ते स्पर्धा जिंकतात का? सुरेशला
खोई हुई इज्जत वापस मिळते का? डान्स ग्रुपला भारताचं नाव रोषन करता येतं का? या
सर्व प्रश्नांची उत्तरे मध्यंतरानंतर मिळतात.
मुंबईत नालासोपाऱ्यात ‘फिक्टीशीअस’ नावाचा हिप हॉप डान्स करणारा ग्रुप आहे.
त्यातील सुरेश आणि व्हेर्नोन या दोघांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे असं शेवटी
सांगितलं जातं. जर सिनेमा वास्तवातल्या लोकांवर आधारित असेल तर चित्रकर्त्यांनी
त्यातील वास्तविकता शाबूत ठेवावी हे अपेक्षित असतं. जर दिग्दर्शक आणि पटकथाकार
फक्त आणि फक्त दृश्य कशी नेत्र सुखद व्हावीत या वरच लक्ष केंद्रित करणार असतील तर
ते पडद्यावर जसच्यातसं दिसून येईल. नेमकं संपूर्ण सिनेमात हे झालेलं आहे. अशा
सिनेमात एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे कथा. कथा नाट्यपूर्ण असावी लागते कारण
त्या शिवाय शेवटाकडे जेव्हा नायक, नायिका आणि त्यांचे साथीदार स्पर्धेत
पारितोषिकासाठी जी तोड मेहनतीने बसवलेले प्रकार करत असतात तेव्हा ते विश्वसनीय
वाटायला हवं. त्यांनी केलेली मेहनत नुसती न दिसता त्या सोबत इतर लोकांना कसं
सांभाळावं लागलं ते दिसणं पण गरजेचं असतं. दुर्दैवाने यात ते होत नाही. सिनेमात ते
घेत असलेली मेहनत दिसून येते. पण ते सतत चोवीस तास सराव करणार नाहीत. त्यांना
इतरही गोष्टी आहेत करण्यासारख्या. तसेच अशा स्पर्धांमध्ये रस्सीखेच प्रचंड
प्रमाणात असते. स्वतःला सिद्ध करताना सुद्धा स्वार्थीपणा आणि चुकीच्या मार्गाने
स्पर्धा जिंकण्यासाठी वाममार्गाचा वापर करणारे असतात. ती मंडळी यात कुठेच नाहीत
कारण पटकथाकार आणि दिग्दर्शकाला सगळं गोड गोड दाखवायचं आहे. त्यामुळे समूळ
संघर्षाचे असे प्रसंग येत नाहीत. जे येतात ते अगदीच बालिश वाटतात. पटकथेत थोडी जान
अजून कथानक फुलावाण्यावर पटकथाकार लक्ष केंद्रित करत नाही. त्यांचा फोकस फक्त
दिग्दर्शकाच्या व्हीजनला आधार देणे इतकाच उरतो.
तरीही सिनेमा बघणीय झालाय तो दिग्दर्शक रेमो डी सुझा स्वतः नृत्य दिग्दर्शक
म्हणून अनुभवी असल्याकारणाने. प्रत्येक दृश्याचा अतिशय उत्तम विचार केलेला दिसून
येतो. तांत्रिक भाषेत बोलायचं तर नृत्य आणि गाण्यांची कॉम्पोझिशंस अतिशय अप्रतिम
आहेत. रंगसंगती, कपडे, नाचणाऱ्यांचं शारीरिक चापल्य, कॅमेऱ्याची जागा यांचा
यथायोग्य वापर केला आहे. त्यामुळे हिप हॉप प्रकारातले नृत्य बघताना ते जितके नेत्र
सुखद वाटतात तितकेच नृत्य सुखद पण आहेत. हा प्रभाव डोळ्यांना सुखावणारा आहे मनाला
नाही. सिनेमातली पात्रं ही शेवटपर्यंत कचकड्याची राहतात त्यामुळे हिरमोड होतो.
मानवी भावभावनांची अदृश्यता सिनेमाला वरच्या स्तरावर पोचू देत नाही हे दुर्दैव
आहे.
सरतेशेवटी तुम्ही जर नृत्याचे चाहते असाल आणि हिप हॉप प्रकार शिकत असाल किंवा
निष्णात असाल हा सिनेमा तुमच्यासाठी. बाकीच्यांनी हा नृत्यसुखद अनुभव पडद्यावरील
रिअॅलिटी शो म्हणून बघायला हरकत नाही.
रेटिंग : ३/५
पूर्वप्रसिद्धी : दै. मराठवाड़ा नेता २१-०६-२०१५



Comments