Posts

Showing posts from November, 2015

कट्यार काळजात घुसली : उत्तम रुपांतर

Image
आल्फ्रेड हिचकॉक आणि सत्यजित रे यांच्यात एक साम्य होतं. त्यांचे जवळजवळ सर्व सिनेमे हे कुठल्या ना कुठल्या साहित्यकृतीवर आधारित होते. हिचकॉकचा पहिला हिचकॉकिअन सिनेमा असणारा द लॉजर हा त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता तर रेंचा पथेर पांचाली विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. तरीही अजून एका बाबतीत त्यांच्यात साम्य दिसून येतं ते म्हणजे साहित्यकृतीतून सिनेमासाठी काय घ्यायचं व काय सोडायचं याचं भान.  दोघांच्या मांडणीत दोन धृवां इतका फरक. हिचकॉक व्यावसायिक परिप्रेक्षात सिनेमे बनवायचा तर रे कलात्मक अंगाने. रेंनी पांचालीत इंदिरा आत्या या पात्राची लांबी वाढवली आहे जी कादंबरीत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे सिनेमापुरता सर्वोजयाच्या पात्राला दुसऱ्या पात्रासोबत संवाद साधायला लावून तिच्यात येणारा एकसुरीपणा त्यांनी घालवला. हिचकॉक त्याच्या सिनेमात त्याला जे आवश्यक वाटेल त्याच गोष्टी घेत असे व उरलेल्या सोडून देत असे. उदा. सायको. त्यामुळे त्याचे सिनेमे कमालीचे प्रभावी वाटायचे. मराठीत गेल्या काही वर्षांपासून साहित्यकृती/नाट्यकृतींवर आधारित सिनेम...

प्रेम रतन धन पायो : बडजात्याचं प्रेम

Image
पंच्याहत्तर साली शोले व आणीबाणी एकाच वर्षी आले. आणीबाणीने स्वातंत्र्योत्तर भारताच्या नेहरूंच्या स्वप्नाला तिलांजली देऊन भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला हे दाखवून दिलं. त्याच्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या जंजीर मधील इन्स्पे क्टर विजयने अंग्री यंग मॅन ही नवी प्रतिमा भारतीय नायकाला दिली. सुडानी पेटलेला नायक तेव्हा उचलला गेला तो स्वातंत्र्योत्तर काळात आजूबाजूच्या परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे किंवा एका देशाची वाटचाल कुठे होत चालली आहे याचा भ्रमनिरास झाला असल्यामुळे असेल पण पॅन इंडिअन प्रभाव असणारा हिंदी व्यावसायिक सिनेमा त्याच्या ठरलेल्या साच्यातून बाहेर आला. शोले ने ब्लॉकबस्टर सिनेमा व दररोजच्या आयुष्यात त्याचे परिणाम काय असतात हे आणीबाणीप्रमाणेच दाखवून दिलं. त्याचबरोबर हम जहाँ खड़े होते हैं लाईन वहीँ से सुरु होती है असे संवाद असणारे सिनेमे येत गेले. ऐंशीच्या दशकाच्या मध्यात या प्रतिमेला गोंजारणं कमी व्हायला लागलं. नव्या नायक-नायिकेच्या प्रतिमेची गरज भासायला लागली होती. आणीबाणीमुळे आलेलं नैराश्य कमी झालं होतं. अंग्री यंग मॅन भूमिका हिट होत होत्या व मधल्या काळात समांतर सिनेमाने च...

चार्ली के चक्कर में : स्टायलिश थ्रिलर; पण...

Image
थ्रिलर सिनेमाचे काही ठोकताळे असतात म्हणजे त्यात रहस्य असावच असं नसतं किंवा कथानक पटकन पुढे सरकत असावं जेणेकरून प्रेक्षकांना शेवटपर्यंत काय चाललय याचा अदमास यायला हवाच असं नाही. त्याची गती धीमी असेल तरी चालेल पण प्रेक्षकांना अंधारात ठेवून काहीतरी दाखवण्यात येतंय याची दिशाभूल नसावी. दिशाभूल करायचीच असेल तर कथा-पटकथा, पात्रांना विश्वासात घेऊन ते तार्कीकतेच्या कसोटीवर जोखता यायला हवे. तसे नाही झाले तर प्रेक्षक चीटिंग केली गेलीय असं समजून सिनेमाबद्दल नकारात्मक बोलायला लागतो. हे व्हायचं नसेल तर कथा-पटकथा तगडी व निर्दोष असावी लागते. चित्रीकरण कसेही का असेना ते बटबटीत, कृत्रिम, अप्रभावी असू नये. सिनेमाग्रहाबाहेर पडताना प्रेक्षक काही एक विचार करून त्याच्या आकलनानुसार कथा समजून घ्यायचा प्रयत्न करतो. चार्ली के चक्कर में या सिनेमाबद्दल असंच काहीसं झालंय. सिनेमाची सुरुवात काही गन शॉट्सनी होते. त्यात एकजण दुसऱ्याला गोळी घालून मारतो. एक स्त्री या बद्दल पाठीमागनं बोलत असते. लगेच नंतर पोलीस स्टेशनमध्ये इन्व्हेस्टीगेटींग ऑफिसर संकेत पुजारी (नसिरुद्दीन शाह) त्याची सहकारी समीरा पटवे (औरोशिखा...

बीकमिंग जेन : अभिजात होण्यापूर्वी

Image
लेखक होण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते. त्याने/तिने एखाद्या घडलेल्या घटनेचा सामाजिक-आर्थिक-राजकीय अंगाने विचार करावा. वाचलेल्या साहित्यकृती, आजूबाजूला वावरणारी माणसं, तिथे घडणाऱ्या भल्याबुऱ्या घटना, प्रसंग, माणसांच्या स्वभावाचे नमुने इत्यादींचा अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण करून ते अभिव्यक्त होणाऱ्या साहित्य प्रकारात बसवावे उदा. कथा, कादंबरी किंवा कविता. आपल्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचं, भावविश्वाचं, अनुभवांचं सखोल चिंतन-मनन करून ते लिखाणात उतरवावं. या अनुषंगाने त्याच्या/तिच्या मूल्यदृष्टीवर काही प्रभाव पडत असेल का की वयागणिक, अनुभवांगणिक त्यात प्रगल्भता यायला हवी. त्याची/तिची संवेदनशीलता, मानवी जिद्दीची केलेली चिकित्सा, मानवाच्या अस्तित्वाला विचारलेले प्रश्न अशा अंगाने ते यायला हवे! लेखक असणे व लेखक म्हणून स्त्री असणे ही मर्यादा येत असून सुद्धा त्या मर्यादेसहित अभिव्यक्त होणे याला सामाजिक-राजकीय मर्यादा पडतात का. की स्वतःच्या आयुष्याला प्राप्त परिस्थितीत बंदिस्त करून घेऊन येणाऱ्या मर्यादांनाच बलस्थान म्हणून वापरायचं का असे प्रश्न लेखक होण्यासाठी पुरेसे आहेत का! उण्यापुऱ्या...