बीकमिंग जेन : अभिजात होण्यापूर्वी

लेखक होण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते. त्याने/तिने एखाद्या घडलेल्या घटनेचा सामाजिक-आर्थिक-राजकीय अंगाने विचार करावा. वाचलेल्या साहित्यकृती, आजूबाजूला वावरणारी माणसं, तिथे घडणाऱ्या भल्याबुऱ्या घटना, प्रसंग, माणसांच्या स्वभावाचे नमुने इत्यादींचा अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण करून ते अभिव्यक्त होणाऱ्या साहित्य प्रकारात बसवावे उदा. कथा, कादंबरी किंवा कविता. आपल्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचं, भावविश्वाचं, अनुभवांचं सखोल चिंतन-मनन करून ते लिखाणात उतरवावं. या अनुषंगाने त्याच्या/तिच्या मूल्यदृष्टीवर काही प्रभाव पडत असेल का की वयागणिक, अनुभवांगणिक त्यात प्रगल्भता यायला हवी.


त्याची/तिची संवेदनशीलता, मानवी जिद्दीची केलेली चिकित्सा, मानवाच्या अस्तित्वाला विचारलेले प्रश्न अशा अंगाने ते यायला हवे! लेखक असणे व लेखक म्हणून स्त्री असणे ही मर्यादा येत असून सुद्धा त्या मर्यादेसहित अभिव्यक्त होणे याला सामाजिक-राजकीय मर्यादा पडतात का. की स्वतःच्या आयुष्याला प्राप्त परिस्थितीत बंदिस्त करून घेऊन येणाऱ्या मर्यादांनाच बलस्थान म्हणून वापरायचं का असे प्रश्न लेखक होण्यासाठी पुरेसे आहेत का! उण्यापुऱ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात सहा अजरामर साहित्यकृती लिहिणाऱ्या जेन ऑस्टेन या ब्रिटीश लेखिकेबद्दल नेहमीच वरील पद्धतीने प्रश्न उपस्थित केले जातात. प्रस्तुत सिनेमात तिच्या आयुष्यात एक महिन्याच्या कालावधीत घडलेल्या घटनांना कथेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

जेन (अॅने हॅथवे) ही रेवरंड जॉर्ज ऑस्टेन (जेम्स क्रॉमवेल) व मिसेस ऑस्टेन (ज्युली वॉल्टर्स) यांची एकवीस वर्षांची तरुण मुलगी. तिच्या लग्नाची बोलणी चालू आहे. तिला मात्र लेखिका व्हायचं आहे. (सिनेमात ऑथरेस असा उल्लेख आहे.) तिच्या नावावर एक कादंबरी पण प्रकाशित आहे. ती आणि तिचे कुटुंबीय स्टीवनटन या हॅम्पशर परगण्यातल्या गावी राहत आहेत. लेडी ग्रिशम (मॅगी स्मिथ) नावाच्या श्रीमंत बाईच्या भाच्या बरोबर तिचं लग्न ठरवायचं घरच्यांनी ठरवलं आहे. मि. व्हीजली (लॉरेन्स फॉक्स) हा ग्रिशम बाईच्या जहागिरीचा एकमेव वारसदार आहे. त्याने जेनला प्रपोज केलं आहे पण तिने त्याच्याबद्दल आत्मीयता नसल्याच्या कारणाने नकार दिला आहे.

तेवढ्यात तिची बहिण व जवळची मैत्रीण कसेन्ड्रा (अॅना मॅक्स्वेल मार्टिन) हिच्या लग्न ठरल्याच्या दिवशी जेन लिहीत असलेल्या कादंबरीतील प्रकरण वाचून दाखवते. तेव्हा तिथे उपस्थित असणारा नुकताच कायद्याचा पदवीधर झालेला लंडनचा टॉमस लेफ्रॉय (जेम्स मॅकअवॉय) झोपलेला असतो. नंतर जेन त्याची तिच्या लेखनाबद्दल ‘खूपच बाळबोध’ अशी कुजकट शेरा ऐकून नाराज होते. तरीही तिच्यात आणि त्याच्यात नंतर जवळीकता निर्माण होते. ही जवळीकता सर्वांना खटकायला लागते. जेनला त्याच्यामुळे इंग्रजी साहित्यातील इतर लेखकांचा परिचय होतो त्यामुळे तिच्या वैचारिक बैठकीला वेगळा आयाम व परिप्रेक्ष मिळतो. टॉमस तिला लग्नाची मागणी घालतो आणि त्याच्या गावी घेऊन जायला तयार करतो. ठरल्यानुसार जेन फक्त कसेन्ड्राला सांगून निघून जाते पण लगेच वापस येते. ती का येते याचं उत्तर तितकसं सोपं नसतं.

इतिहासातील घटनांनुसार आणि अभ्यासकांनी मांडलेल्या तर्कानुसार जेन व टॉमस यांच्या ज्या काही भेटीगाठी झाल्या त्या ख्रिसमसच्या काळात तिच्या परगण्यात होणाऱ्या बॉल डान्सच्या दरम्यान. त्या दरम्यान त्यांची ओळख होऊन एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झाले. तिने पुढे काही वर्षांनंतर कसेन्ड्राला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. तसेच टॉमस जो पुढे मोठा न्यायाधीश झाला त्याने आपल्या मोठ्या मुलीचं नाव जेन ठेवलं होतं व खाजगीत तो तिची आठवण काढायचा असं नमूद करण्यात आलंय. तरीही काही कारणाने ते एकत्र येऊ शकले नाहीत. त्यांच्यात प्रेम होतं का याचे कुठलेही पुरावे इतिहास देत नाही. जेनने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल लिहून ठेवलेलं नाही. त्यामुळे सिनेमाकर्त्यांना काल्पनिकतेचा आधार घ्यावा लागला आहे.

ही काल्पनिकता जेनने लिहिलेल्या प्राईड अँड प्रीज्युडीज ही कादंबरी लिहिण्याच्या काळाशी मिळतीजुळती ठेवलेली आहे. जेनचं पात्र तिच्या कादंबऱ्यातल्या नायिकेंवरून लिहिण्यात आलंय. याचं कथानक आणि जेनचं आयुष्य यात बऱ्याच सामाईक बाबी आहेत असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पटकथाकारांनी फक्त जेन आणि टॉमस यांच्यात नेमकं काय झालं असेल याची शक्यता कथेत मांडली आहे. यात सत्य किती हा वादाचा विषय झाला पण लेखक जेव्हा लिहिण्यासाठी प्रेरणा घेत असतो तेव्हा त्याला ती प्रेरणा त्याच्या आयुष्यातील घटनांमधून मिळत असते का हे पाहणं यात येतं.

टॉमसची भेट होण्याच्या आधी जेनने एक कादंबरी लिहून बऱ्यापैकी नाव कमावलेले. तरीही ती त्याच्याकडे आकर्षित होते ते त्याचं आयुष्याकडे बघण्याच्या किंवा लेखकाने आपल्या कोशाच्या बाहेर पडून जग बघावं, अनुभव घ्यावेत, लेखनात आयुष्याचा विचार केंद्रस्थानी असावा या त्याने मांडलेल्या विचारामुळे. हा विचार विख्यात इंग्रजी साहित्यिक हेन्री फिल्डींग यांनी लिहिलेल्या टॉम जोन्सवरून प्रेरित झालेला होता. ज्याला पुढे रिअॅलिझम असं नाव देण्यात आलं. आयुष्याचं प्रतिबिंब साहित्यात असावं असा विचार तो पर्यंत रूढ झालेला. जेनचं म्हणणं लेखकाने आपल्या भावविश्वाचा उपयोग पात्र, घटना, प्रसंग उभारण्यात करावा असं म्हणते. थोडक्यात व्हिक्टोरिअन लेखकांनी साहित्यात वास्तववाद आणला याची सुरुवात जेनच्या काळापासून झाली. इथे जेनची मुल्यदृष्टी दिसून येते.

ती त्याच्या काकांना भेटायला जाते तेव्हा तिथे अजून एक इंग्रजी लेखिका मिसेस. अॅन रॅडक्लीफना भेटते. प्रसंग पूर्णपणे पटकथाकारांच्या डोक्यातनं आलेला आहे कारण जेन कधीही अॅन रॅडक्लीफ भेटलेली नाही. हा प्रसंग गांधी सिनेमातल्या गांधीजींनी नदी काठावर कपडे धुवत असलेल्या अर्धवस्त्रांकित स्त्रीला उपरणे काढून देतात तसा आहे. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात असं केलेलं नाही तरीही पटकथाकार-दिग्दर्शकाला त्यातनं गांधीजींची कमी वस्त्रे घालायला हवीत या तत्वाला त्यांच्या कार्याशी जोडायचे होते म्हणून कल्पिला होता. तो किती प्रभावी होता हे सर्वांना माहीतच आहे.

इथे मिसेस. रॅडक्लीफला भेटणे काल्पनिक असले तरी ते सिनेमा चौकटीच्या तार्कीकतेत बसते. उलट तिची भेट घालून देऊन जेनच्या चेहऱ्यावरील हावभाव व मानसिकता जाणण्याचा प्रयत्न पटकथाकार-दिग्दर्शक करतात. प्रसंग खूप छोटा आणि कमी संवादाचा आहे. जेनने आयुष्यभर लेखिका व्हायचं व्रत घेतलं पण मनातली चलबिचलता कमी व्हायला तयार नव्हती व ती निर्णय घेऊ शकत नव्हती. कथानकात सखोलता येते; नाही तर तिने मिसेस. रॅडक्लीफच्या कादंबऱ्या वाचून प्रेरणा घेतली असा संवाद रटाळ झाला असता. यामुळे सिनेमात नसलेली अॅक्शन व एकसुरीपणा कमी झाला आहे.

एका सर्वसामान्य इंग्रजी कुटुंबात जन्मलेली जेन ऑस्टेन अभिजात लेखिका कशी झाली याची कहाणी रंजक असली तरी लेखकांनी आपल्या मर्यादा सुद्धा जाणणं आवश्यक आहे असा संदेश हा सिनेमा देतो. पण अनुभव हेच लेखकाला/लेखिकेला अभिजात करतं असं समजण्याच्या काळात जेन ऑस्टेन समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. 

Comments