चार्ली के चक्कर में : स्टायलिश थ्रिलर; पण...

थ्रिलर सिनेमाचे काही ठोकताळे असतात म्हणजे त्यात रहस्य असावच असं नसतं किंवा कथानक पटकन पुढे सरकत असावं जेणेकरून प्रेक्षकांना शेवटपर्यंत काय चाललय याचा अदमास यायला हवाच असं नाही. त्याची गती धीमी असेल तरी चालेल पण प्रेक्षकांना अंधारात ठेवून काहीतरी दाखवण्यात येतंय याची दिशाभूल नसावी. दिशाभूल करायचीच असेल तर कथा-पटकथा, पात्रांना विश्वासात घेऊन ते तार्कीकतेच्या कसोटीवर जोखता यायला हवे. तसे नाही झाले तर प्रेक्षक चीटिंग केली गेलीय असं समजून सिनेमाबद्दल नकारात्मक बोलायला लागतो. हे व्हायचं नसेल तर कथा-पटकथा तगडी व निर्दोष असावी लागते. चित्रीकरण कसेही का असेना ते बटबटीत, कृत्रिम, अप्रभावी असू नये. सिनेमाग्रहाबाहेर पडताना प्रेक्षक काही एक विचार करून त्याच्या आकलनानुसार कथा समजून घ्यायचा प्रयत्न करतो. चार्ली के चक्कर में या सिनेमाबद्दल असंच काहीसं झालंय.

सिनेमाची सुरुवात काही गन शॉट्सनी होते. त्यात एकजण दुसऱ्याला गोळी घालून मारतो. एक स्त्री या बद्दल पाठीमागनं बोलत असते. लगेच नंतर पोलीस स्टेशनमध्ये इन्व्हेस्टीगेटींग ऑफिसर संकेत पुजारी (नसिरुद्दीन शाह) त्याची सहकारी समीरा पटवे (औरोशिखा डे) बरोबर तिथे सापडलेल्या कॅमेऱ्यातील फुटेज पाहत असतात. त्यात सुरुवातीला काही जणांच्या खुनाचे चित्रीकरण झालेले असते तर उर्वरित त्या पूर्वी शूट झालेले फुटेज असते. त्यानुसार दीपक कुमार उर्फ डीब्स (आनंद तिवारी), नीना (मानसी रच), सॅम (अमित सीअल) व इतर एकाच वयाचे ही ड्रग्स घेणारी गँग असते. ड्रग्स घेणे, पबमध्ये ऐश करणे व त्यातील एकाने याचे व्हिडीओ शुटींग करणे यातच दिवस-रात्र वेळ घालवत असतात. पबमध्ये एके रात्री एका मुलीवरून सॅमची कुणा राहील (सनम सिंग) सोबत पंगा होतो. त्या पंग्याचं रुपांतर रस्त्यावरील भांडणात होते. पण राहिलला बाजूने जाणाऱ्या गाडीने उडवलेले असते. तो जागीच खलास होतो. ही गँग घाबरते. प्रकरणाचं काय करायचं म्हणून चिंतेत असतात तर सॅमला एक फोन येतो. एका पार्सलची डिलीव्हरी करायची असते. काम केलं नाही तर पोलिसांना अॅक्सिडेंटबद्दल सांगून अडकवतो म्हणून धमकावतात. गँग मात्र आपण गाळात रुतत चाललोय हे लक्षात येत असून काम स्वीकारते.

कथा-पटकथा अमित सीअल व मनीष श्रीवास्तव यांची आहे. कथा दोन पातळ्यांवर घडते एक संकेत पुजारीने पोलीस स्टेशनात बसून पकडलेल्या माणसाची चौकशी करून माहिती काढून घेणे. दुसरं कॅमेरात मिळालेल्या फुटेजमधील चित्रीकरणातून माहिती मिळवणे. फुटेज एकदा संपलं की चौकशी हेच कथेचं निवेदन राहतं. सिनेमाचा मोठा दोष हा अशा दोन पद्धतीचं निवेदन वापरल्यामुळे नेमकं कुठे लक्ष केंद्रित करायचं हे प्रेक्षकांच्या समजत नाही. पात्रांची रचना एक मितीत केली असल्यामुळे त्यांना वाढायला पुरेसा वाव मिळत नाही. एका नंतर एक प्रसंग प्रेक्षकांसमोर पेश केले जातात त्यामुळे ही लोकं अशी का वागतायत हे कळायला मार्ग राहत नाही. 

पात्रांच्या बोलण्यातून जी माहिती मिळते तिलाच प्रमाण मानून प्रेक्षक तर्क लढवायला लागतो. त्यामुळे यात लूपहोल्स बरेच राहतात. उदा. डीब्स या पात्राचं वागणं संशयास्पद राहतं. तो या  गदारोळात बाजूला का असतो याचं स्पष्टीकरण मिळत नाही. कथानक ठोस नसल्यामुळे व धक्क्याचा विचार केल्यामुळे या सर्व गोष्टींचा उद्देश काय असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो. पटकथाकार व दिग्दर्शक संकल्पनेला असंख्य पात्र व त्यांच्या भोवती घडणारे प्रसंग याला कथा मानून एकूण पटकथेची रचना करतात. त्यामुळे कथा म्हणून ती उभं न राहता प्रसंगांची मालिका होते. कथेचा फक्त आभास तयार होतो पण प्रभावित करत नाही.

कलाकारांचा बाळबोध व कृत्रिम वावर खासकरून ड्रग्स गँग हे अंतिमतः सिनेमाला अप्रभावी ठरवतात. ज्यांच्यावर संपूर्ण कथानक अवलंबून असेल व कथानकातला जवळ जवळ सर्व भाग व्यापणारा असेल तर तिथे अभिनय करणारे अभिनेतेच हवेत. आनंद तिवारी काही प्रमाणात प्रभाव पाडतो पण तोही काही काही प्रसंगात नुसते संवाद म्हणतोय असं वाटतं. नसिरुद्दीन शाह व त्याची सहकारी झालेली औरोशिखा डेच काय तो अभिनय करतात.

एकुणात संकल्पना चांगली असली व काळाला पुढे मागे करत कथानक रचलं तर प्रभावी ठरतं हा दिग्दर्शकाचा अंदाज असेल तर तो या ठिकाणी अपवाद म्हणायला हवा. संदोष पटकथांचे सिनेमे तात्कालिक प्रभाव टाकतात पण नंतर विसरून जायला वेळ लागत नाही.

रेटिंग : २.५/५

पूर्वप्रसिद्धी: दै. मी मराठी live ०८/११/२०१५

Comments