प्रेम रतन धन पायो : बडजात्याचं प्रेम

पंच्याहत्तर साली शोले व आणीबाणी एकाच वर्षी आले. आणीबाणीने स्वातंत्र्योत्तर भारताच्या नेहरूंच्या स्वप्नाला तिलांजली देऊन भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला हे दाखवून दिलं. त्याच्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या जंजीरमधील इन्स्पेक्टर विजयने अंग्री यंग मॅन ही नवी प्रतिमा भारतीय नायकाला दिली. सुडानी पेटलेला नायक तेव्हा उचलला गेला तो स्वातंत्र्योत्तर काळात आजूबाजूच्या परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे किंवा एका देशाची वाटचाल कुठे होत चालली आहे याचा भ्रमनिरास झाला असल्यामुळे असेल पण पॅन इंडिअन प्रभाव असणारा हिंदी व्यावसायिक सिनेमा त्याच्या ठरलेल्या साच्यातून बाहेर आला.

शोलेने ब्लॉकबस्टर सिनेमा व दररोजच्या आयुष्यात त्याचे परिणाम काय असतात हे आणीबाणीप्रमाणेच दाखवून दिलं. त्याचबरोबर हम जहाँ खड़े होते हैं लाईन वहीँ से सुरु होती है असे संवाद असणारे सिनेमे येत गेले. ऐंशीच्या दशकाच्या मध्यात या प्रतिमेला गोंजारणं कमी व्हायला लागलं. नव्या नायक-नायिकेच्या प्रतिमेची गरज भासायला लागली होती. आणीबाणीमुळे आलेलं नैराश्य कमी झालं होतं. अंग्री यंग मॅन भूमिका हिट होत होत्या व मधल्या काळात समांतर सिनेमाने चोखंदळ प्रेक्षकांना दिलेला दिलासा सुद्धा कमी होत चालला होता. पण ब्लॉकबस्टर असं काही होत नव्हतं जे चौदा वर्षांपूर्वी शोलेनं केलं होतं. या पार्श्वभूमीवर एकोणनव्वदला सलमान खान-भाग्यश्री पटवर्धन या ताज्या दमाच्या तरुण नायक-नायिकेचा ताज्या दमाच्या सुरज बडजात्या या तरुण दिग्दर्शकाचा मैने प्यार किया आला. लहानपणापासून एकत्र वाढलेले नायक-नायिका वयात आल्यावर प्रेमात पडतात व गरीब-श्रीमंत ही दरी कमी करून प्रेमाचा विजय साजरा करतात असं कथानक असणारा.

नवीन पिढीसाठी नायक-नायिकेने आधी मित्र व्हायला हवे व नंतर प्रेम-प्रेमिका किंवा तत्सम हा विचार पटण्यासारखा व व्यवहार्य होता. त्याला सुश्राव्य संगीत-गाणी, मारामारी असे व्यावसायिक घटकांची यथायोग्य साथ होती. सिनेमाने न भूतो न भविष्यति असा धंदा केला. अमिताभ युग संपणार याची चुणूक या सिनेमाने दाखवून दिली. तिला पुढे डेव्हिड धवन, राजकुमार संतोषी, आदित्य चोप्रा वगैरे दिग्दर्शकांनी, अनिल कपूर, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती, शाहरुख खानसारख्या नायकांनी व जतीन-ललित, आनंद-मिलिंद, अनु मलिक, नदीम-श्रवण या संगीतकारांच्या संगीतात उदित नारायण, कुमास सानू, अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती, अभिजीत व सोनू निगम सारख्या गायकांनी नव्वदचे दशक हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वार्थाने वेगळे ठरेल याची काळजी घेतली.

एक्याण्णवला पंतप्रधान राजीव गांधींची हत्या झाली. देश आधीच गरीब होता त्यात इतक्या मोठ्या घटनेने देश हादरून गेला. पुढे पंतप्रधान झालेल्या नरसिंहराव यांनी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या साथीने नितांत गरजेची असणारी आर्थिक उदारीकरणाची वाट धरली. देशाला खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर येण्यासाठी हे करणे गरजेचे होते. हे होतं न तोच बाबरी मशिदीची वाताहत काही लोकांनी लावली. पाठोपाठ मुंबईत बॉम्बस्फोट व दंगली झाल्या. एका नंतर घडणाऱ्या घटनांनी देशाला पुरतं भांबावून सोडलं. लगेच चौऱ्याण्णवला हम आपके है कौन आला. याने व दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेने ब्लॉकबस्टर सिनेमाच्या व्याख्या बदलल्या.

कुटुंबव्यवस्थेवरचा विश्वास यांनी दृढ केला. सिनेमागृहात सिनेमा बघणाऱ्यांची संख्या चाळीस टक्क्यांनी वाढवली. आजच्या शंभर कोटी क्लबमध्ये सहज खपून जातील इतका धंदा केला. सिनेमा सांस्कृतिक-सामाजिक भावविश्वाचा भाग होऊ शकतो हे शोलेनंतर परत दिसलं. वास्तवात घडणाऱ्या घटनांचा सिनेमातल्या विश्वाशी काहीही देणंघेणं नसतं हे जसं पूर्वी दिसून आलं होतं त्याला यावेळी ब्लॉकबस्टरी अधोरेखितपणा आला. पुढे सुरज बडजात्याने असेच कुटुंबव्यवस्थेवर विश्वास दृढ करावेत असे सिनेमे बनवले. त्याला आर्थिक उदारीकरणानंतर आलेल्या तंत्रज्ञान व मार्केटिंग स्ट्रॅटेजीची जोड देऊन सिनेमा म्हणजे फक्त व्यवसायच हे समीकरण घट्ट केलं.

प्रेम रतन धन पायोची कथा दोन एकमेकांसारखे दिसणाऱ्या नायकांची आहे. प्रीतमपूरचा युवराज विजय सिंगचं (सलमान खान) राजतिलक होणार आहे. सोबत मैथिली देवीशी (सोनम कपूर) ठरलेला विवाह होणार असतो. तिकडे अयोध्येत पुरुषांना स्त्रियांच्या वेशात नाटक करायला लावणारा प्रेम दिलवाले (सलमान खान) मैथिलीच्या प्रेमात असतो. तिला भेटायला म्हणून प्रीतमपूरला जातो. तिथे त्याच्यासमोर वेगळच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं. त्याला युवराजसारखं वागवून त्याच्या विरोधात काम करणाऱ्या अजय सिंग (नील नितीन मुकेश) व चिराग सिंगला (अरमान कोहली) शह द्यायचा प्लॅन दिवाण साहेबांचा (अनुपम खेर) असतो. मधल्या काळात पाच महिन्यांपूर्वी भेटलेल्या युवराजमधला बदल बघून मैथिली त्याच्या प्रेमात पडते. पण तिला तो तिचा खरा युवराज आहे याची भनक सुद्धा नसते. युवराजच्या सौतेल्या बहिणी चंद्रिका (स्वरा  भास्कर) व राधिका (आशिका भाटिया) त्याच्यावर नाराज असतात. त्यांना मनवून परत घरात घ्यायचं काम प्रेम दिलवाले करतो. पण पुढे युवराज वापस आल्यावर वातावरण बदलायला लागतं.

सुरज बडजात्याचा पहिला सिनेमा सोडला तर त्याने अति श्रीमंत असणारी कुटुंबं दाखवणे हम आपके... नंतर सोडलं नाही. चकचकीत श्रीमंती व बाळबोध रुसवे फुगवे दाखवून त्याला सांग्रसंगीत पेश करण्याचा फॉर्म्युला त्यात सापडला. अगदी प्राध्यापक असणारा माणूस एखाद्या उद्योगपतीसारख्यांच्या घरात राहत असतो हे सूरज बडजात्याच दाखवू शकतो. यात वास्तविकता, तार्किकता वगैरे असते याचं ना तेव्हा त्यांनी भान दाखवलं ना आज ते दाखवतायत. कचकड्यांच्या व्यक्तिरेखा, त्यांना वाढीसाठी वाव नाही, दृश्य सुंदर व ती उत्तम वठली पाहिजेत याचा अट्टाहास सिनेमागणिक तसाच राहिलेला. कथा-पटकथा प्रचंड सदोष असणे हे वैशिष्ट्य ठरलं. ते कमी जास्त असण्याने फार काही फरक पडत नाही प्रेक्षकांना माहित असणे. त्यांनी त्याला प्रमाणाबाहेर सकारात्मक प्रतिसाद देणे हे नित्याचं झालेलं. यामुळे सिनेमाच्या ना दर्जात फरक पडला ना प्रेक्षकांच्या आकलनामध्ये.

आज परिस्थिती सहिष्णू-असहिष्णू असण्याच्या, जाती-धर्माच्या कडव्या अस्मितेला जोर येण्याच्या, शासकीय-अशासकीय गोष्टींचा बोलबाला होण्याच्या समकालीन वास्तवात असा कौटुंबिक (अति) गोडपणा उथळ ठरतो.

Comments