कट्यार काळजात घुसली : उत्तम रुपांतर

आल्फ्रेड हिचकॉक आणि सत्यजित रे यांच्यात एक साम्य होतं. त्यांचे जवळजवळ सर्व सिनेमे हे कुठल्या ना कुठल्या साहित्यकृतीवर आधारित होते. हिचकॉकचा पहिला हिचकॉकिअन सिनेमा असणारा द लॉजर हा त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता तर रेंचा पथेर पांचाली विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. तरीही अजून एका बाबतीत त्यांच्यात साम्य दिसून येतं ते म्हणजे साहित्यकृतीतून सिनेमासाठी काय घ्यायचं व काय सोडायचं याचं भान. 

दोघांच्या मांडणीत दोन धृवां इतका फरक. हिचकॉक व्यावसायिक परिप्रेक्षात सिनेमे बनवायचा तर रे कलात्मक अंगाने. रेंनी पांचालीत इंदिरा आत्या या पात्राची लांबी वाढवली आहे जी कादंबरीत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे सिनेमापुरता सर्वोजयाच्या पात्राला दुसऱ्या पात्रासोबत संवाद साधायला लावून तिच्यात येणारा एकसुरीपणा त्यांनी घालवला. हिचकॉक त्याच्या सिनेमात त्याला जे आवश्यक वाटेल त्याच गोष्टी घेत असे व उरलेल्या सोडून देत असे. उदा. सायको. त्यामुळे त्याचे सिनेमे कमालीचे प्रभावी वाटायचे.

मराठीत गेल्या काही वर्षांपासून साहित्यकृती/नाट्यकृतींवर आधारित सिनेमे बनवण्याचा ट्रेंड दिसून येतो. निशाणी डावा अंगठा (रमेश इंगळे उत्रादकर), सत ना गत (राजन खान), दुनियादारी (सुहास शिरवळकर) या तीन कादंबऱ्यांवर व माकडाच्या हाती शॅम्पेन (डॉ. विवेक बेळे), श्रीमंत दामोदरपंत (केदार शिंदे) या नाटकांवर आधारित अनुक्रमे बदाम राणी गुलाम चोर व श्रीमंत दामोदरपंत असे सिनेमे आले. पण हे सिनेमे प्रभावी नव्हते. त्यांच्यात दोष तर होतेच त्यापेक्षा त्यांना सिनेमा म्हणून उभं करायला पटकथा-दिग्दर्शक कमी पडले असे म्हणावे लागेल. 

कोणत्याही साहित्यकृतीला सिनेमात रुपांतरीत करताना सिनेमाच्या मर्यादांचा विचार संहितेच्या पातळीवरच व्हायला हवं. काय हवं-काय नको याचा विचार त्याचवेळी करण्यात यावा. एकदा संहिता पूर्ण झाली की पुढे त्यात बदल करता येत नाही. आहे त्या संहितेसहीत चित्रीकरण व इतर सोपस्कार करावे लागतात. संहितेत राहिलेल्या चुका किंवा दोष पडद्यावर दिसायला लागतात ज्या चित्रीकरणात टाळता येणं दुरापास्त होतं. वरील सिनेमातील दोष हे जसेच्या तसे पडद्यावर दिसत होते. चांगल्या रूपांतराचं उदाहरण म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी लिखीत-दिग्दर्शित इन्व्हेस्टमेंट या सिनेमाकडे बघता येईल. मतकरींनी त्यांच्याच कथेवर आधारित पटकथा लिहून त्याचं दिग्दर्शन केलं. ते किती प्रभावी होतं हे राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्याची निवड झाली यावरनं लक्षात येतं. 

पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित-दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या ’६७ सालच्या संगीत नाटकाचं सुबोध भावे दिग्दर्शित असंच एक उत्तम जमलेलं रुपांतर आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश आमदानीत मध्य भारतात विश्रामपूर नावाच्या संस्थानात राजगायक पंडित भानु शंकर शास्त्री (शंकर महादेवन) राहत असतात. राजाने एक कट्यार बनवून घेतलेली असते ज्याच्या एका बाजूवर सप्तसूर कोरलेले असतात. ही कट्यार राज गायकाला त्याने दरवर्षी स्वतःचं स्थान अबाधित राखण्यासाठी जिंकायची असते. कट्यारीतून आत्मरक्षणार्थ केलेला खून त्याला माफ असतो. पंडितजींनी मिरजेत त्यांची कला पेश केल्यावर त्यांना तिथे खाँसाहेब आफताब हुसैन बरेलीवाले (सचिन पिळगावकर) भेटतात. ते त्यांच्यासारखेच उत्तम गायक असतात. पंडितजी त्यांना विश्रामपूरला येण्याचे आमंत्रण देतात. 

उस्ताद त्या वर्षीच्या राज गायन स्पर्धेत भाग घेतात पण पंडितजीकडून पराभूत होतात. असेच सतत चौदा वर्ष ते पराभूत होतात. एके वर्षी ते जिंकतात पण त्याला शत्रुत्वाची किनार लावून. सदाशिव (सुबोध भावे) नावाचा पंडितजींचा जुना शिष्य वापस येतो. त्याला परत गाणं शिकायचं असतं. पण उस्तादांनी राज गायकाचा वाडा काबीज केला असल्याने तो चिडतो. त्यांना आव्हान देतो पण स्वतःच्या गायन कलेला पैजेत ठेवून. पंडितजींची मुलगी उमा (मृण्मयी देशपांडे) व उस्तादांची मुलगी झरिना (अमृता खानविलकर) त्याला असे करू नको म्हणून विनवतात पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

या नाटकाचं दोनदा पुनरुज्जीवन झालं. पहिल्यांदा ज्येष्ठ गायक चंद्रकात लिमये व आता राहुल देशपांडे यांनी अनुक्रमे खाँसाहेब ही व्यक्तिरेखा साकारली होती/आहे. राहुल देशपांडेंच्या वर्शनमध्ये सुबोध भावेंनीच सदाशिवची भूमिका केली आहे. त्यांना यात व्यावसायिक यशस्वीतेची शक्यता दिसली असावी कारण निश्चित कळसाध्याय असणारं हे कथानक आहे. एका अहंकारी गायकाच्या क्षुद्र लालेसेपायी दुसऱ्या एका श्रेष्ठ गायकाची शोकांतिका कशी होते ही मुळातच मेलोड्रामा असणारी कथा. प्रेक्षकांची सहानुभूती पात्रांना मिळावी अशा ढोबळ व्यक्तिरेखा यात आहेत. त्यामुळे प्रेक्षक चटकन त्यात ओढला जातो. 

दिग्दर्शक सुबोध भावे व पटकथाकार प्रकाश कापडिया यांनी मुळ नाटकात मोठे बदल न करता ते सिनेमाच्या चौकटीत कसे बसेल याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पाहिजे तिथे आवश्यक ते बदल केले आहेत. खासकरून कथेचा वेग व त्या अनुषंगाने येणारी गाणी. मुळ नाट्यपदं आजच्या रुपात संगीतबद्ध करून त्यांना नवीन गाण्यांची जोड देऊन एकमेकात उत्तम मिसळून टाकले आहे. जे सिनेमाच्या रुपांतरासाठी अचूक म्हणावं असं आहे. यासाठी भावेंच्या व्हीजनला पैकीच्या पैकी मार्क्स द्यायला हवेत.

तरीही पटकथेत दोष आहेत. पटकथा काही काही गोष्टींचं स्पष्टीकरण देत नाही. उदा. उमाला पंडितजी कुठल्याश्या देवाच्या उत्सवाला दरवर्षी जात असतात हे माहित असतं. ती सदाशिव भेटेपर्यंत पंडितजी घर सोडून गेलेले असतात तरी त्यांना भेटायला किंवा वापस आणायला जात नाही. तार्कीकतेला थोडं बाजूला सारणारा एक मुद्दा इथे उपस्थित करता येतो तो म्हणजे पंडितजींवर अन्नातून विषप्रयोग केला जातो त्याचा परिणाम स्वरूप त्यांच्या गळ्याला कायमची इजा होते. पण ते अन्न खाल्ल्या नंतर बऱ्याच उशिराने पाणी पितात तेही परतीच्या वाटेवर असताना तो पर्यंत त्यांनी पाणी पिलेलं नसतं हे तार्कीकतेला धरून जात नाही. पण याने एकूण सिनेमाच्या उत्तम परिणामावर ओरखडा उमटवला जात नाही.

उच्च निर्मिती मुल्य, सुबोध भावेंचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न वाटू नये इतकं उत्तम काम, सर्वच कलाकारांचा चांगला अभिनय व तांत्रिक टीमची दिग्दर्शकाच्या व्हीजनला मूर्तरूप देण्याची यथायोग्य साथ हे वाखाणण्यासारखं. यात फक्त खाँसाहेब व झरिना ही दोन जिवंत पात्रे आहेत. त्यातल्या त्यात सचिन पिळगावकरांनी साकारलेला खाँसाहेब त्यांच्या कारकिर्दीला चार चांद लावण्याचं काम करेल इतकं सुरेख काम त्यांनी केलं आहे. परिस्थितीने अगतिक झालेला गायक ते अहंकाराने बरबटलेला पण मनाने कलेला समर्पित गायक त्यांनी त्याच्या सर्व लकबीसह उभा केला आहे. ही व्यक्तिरेखा खलनायकी असली तरी तीच इथे नायक म्हणून सुद्धा येते. त्यामुळे पिळगावकरांची निवड अप्रतिम.

नागराज मंजुळे (फँड्री), चैतन्य ताम्हाणे (कोर्ट), अविनाश अरुण (किल्ला), ऋतुराज धलगडे (स्लॅमबुक), भाऊराव कऱ्हाडे (ख्वाडा) हे पहिल्याच प्रयत्नात चांगले सिनेमे देणारे दिग्दर्शक. त्यांच्या सोबत सुबोध भावे हे नाव आलं ही किती चांगली गोष्ट आहे.

Comments