स्टार वॉर्स द फोर्स अवेकन्स : संगमावर

“‘स्टार वॉर्स’ ही या शतकाची प्रातिनिधिक मालिका आहे. ती कोणत्याही एका कथासूत्राकडे फार गंभीरपणे किंवा खोलात जाऊन बघत नाही. पण समाजातल्या चांगल्या-वाईट प्रवृत्ती, विचार, कल्पना, घटना यांचं एक प्रतिबिंब ती आपल्यासमोर उभं करते. तिने निवडलेला पेहराव बालचित्रपटाचा असला, तरी तो केवळ पेहेराव आहे, हे ध्यानात ठेवलं, तर या कहाणीपासून बरंच काही आपण मिळवू शकतो. निदान मानव, देव-दानव, निसर्ग, प्रगती यांच्याशी निगडीत मुलभूत प्रश्नांची मुलभूत उत्तरं तरी.”
-- गणेश मतकरी ल्युकसची पहिली चित्रत्रयी फिल्ममेकर्स

जॉर्ज ल्युकसची पहिली व दुसरी चित्रत्रयी ज्यांनी पाहिली असेल त्यांना वरील परिच्छेदावरून स्टार वॉर्सबद्दल जास्त सांगायची गरज नाही. ज्यांनी मालिकेतला एखादा सिनेमा बघितला असेल त्यांना त्यावरनं संपूर्ण मालिकेची कल्पना येणार नाही. पटकथाकार-दिग्दर्शकाचा दृष्टीकोन कळणार नाही. कदाचित प्रेक्षकांना फँटसी वाटत असली तरी तिला आपण वाचलेल्या, अनुभवलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींचा आधार असल्याकारणाने ते पटू शकेल. पण जे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे ते कसे पचवावे असा प्रश्न पडेल. त्यामुळे अशा प्रेक्षकांना ही मालिका किंवा सिनेमे बाळबोध वाटण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा ढोबळपणा अगदी हिंदी सिनेमासारखा वाटण्याची सोय यात खूप आहे. हेच या मालिकेचं भांडवल आहे. पाठीमागच्या संदर्भांची गरज नसणारी कथा ती ही एपिसोडिक पद्धतीने दाखवायची ही रचनाच याला इतरांपासून वेगळं करते. त्यामुळे स्टार वॉर्सचा जे. जे. अब्रॅम्स दिग्दर्शित नवीन एपिसोड वेगळं काय देतो ते पहावं लागेल.

जाकू गृहावर विरोधकांचा पायलट पोई डेमरोनला (ऑस्कर आयझॅक) जेडाय नाईट ल्यूक स्कायवॉकरबद्दल (मार्क हॅमिल) नकाशा मिळतो. पण तो तिथनं निघणार तेवढ्यात क्यालो रेन (अॅडम ड्रायव्हर) तिथे येऊन त्याला बंदिवासात घेतो. पण त्याच्या स्पेसशीपवर एक स्टॉर्मट्रूपर फिन (जॉन बोयेगा) पोईला सोडवण्यात यशस्वी होतो. इकडे पोईने त्याच्या ड्रॉइड बीबी-८ मध्ये तो नकाशा दिलेला असतो. तो रेला (डेजी रिडली) सापडतो. रे जाकूवर दिवस काढत असते. तिला आपण कोण आहोत व आपल्याला काय पाहिजे याचे प्रश्न पडलेले असतात. फिन पोईला घेऊन जाकूवरच येतो. त्यांच्यामागे डार्क फोर्सचे लोकं असतात. तिथनं पळून जाण्यासाठी रे व फिन हान सोलोच्या (हॅरीसन फोर्ड) मिलेनियम फाल्कन यानाचा वापर करतात. रिनची माणसं तिथेही पोचल्यावर मात्र फिन, रे व सोलोला त्यांना भिडण्यावाचून गत्यंतर उरत नाही.


स्टार वॉर्स रिव्हेंज ऑफ द सीथ नंतर पुढे काय असा प्रश्न चाहत्यांना पडणे साहजिक होते. कारण रिव्हेंज ऑफ द सीथ व त्या आधीच्या दोन एपिसोड्सनी मिळून डार्थ वेडरची कथा सांगितली होती जी पहिल्या चित्रत्रयीशी यथायोग्य जुळणारी होती. तिला परिपूर्णता होती. या एपिसोडमध्ये कथा चालू होते ती रिटर्न ऑफ द जेडाय नंतर तीस वर्षांनी. मधल्या काळात ल्युक स्कायवॉकर पूर्वीच्या युद्धाची जबाबदारी घेऊन कुठेतरी निघून गेला आहे. त्याने स्वतःचा ठावठिकाणा आरटू-डीटूकडे या त्याच्या विश्वासाच्या ड्रॉइडमध्ये अर्ध्या नकाशाच्या रुपात ठेवले आहे ते मिळवून त्याला गाठता येणार असते.

दिग्दर्शक जे. जे. अब्रॅम्स हे स्वतः यात पटकथाकार सुद्धा आहेत त्यामुळे त्यांनी संपूर्ण मालिका बघितली असल्यामुळे कथेची रचना करताना मालिकेतल्या जुन्या गोष्टी नवीन प्रेक्षकांना जुन्या वाटणार नाहीत व नव्या गोष्टी एकदम संदर्भहीन वाटणार नाहीत अशा पद्धतीने केली आहे. त्यामुळे नवीन प्रेक्षक वेळोवेळी पात्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे अॅडव्हेन्चर समजावून घेऊ शकतो. जाकू गृहावर रे जिथे राहत असते ते एक हत्तीसदृश डार्क फोर्स बाजूचा वाहन असते जे आता वाळवंटात पडून आहे. नवीन प्रेक्षकांना गृहावरील बत्तर अवस्था अस्वस्थ करेल तर जुन्यांना ते बघून मागे काय झालं याचा अंदाज येईल. अशा जुन्यानव्याचा संगम हे याचं वैशिष्ट आहे.

तरीही दुसऱ्या एका दिग्दर्शकाच्या कामाचा प्रभाव गेल्या काही वर्षात काही दिग्दर्शकांच्या कामावर दिसून येतोय. तो म्हणजे ख्रिस्टफर नोलन. त्याच्या बॅटमॅन सिरीजचा. इथे सुद्धा रे हे पात्र सुपरहिरो सिरीजमधल्या पहिल्या भागासारखं आहे. तिथे सुपरहिरोला आपण कोण आहोत याची जाणीव पहिल्या भागात होते तशी इथे रेला तिच्यात फोर्सचा प्रभाव आहे हे जाणवतं. कदाचित निर्मात्यांना किंवा अब्रॅम्सला रे पात्र निर्माण करून पुढील भागात त्याला मुख्य नायकत्व देऊन सुपरहिरोसारखं बनवायचं असेल. रेच्या पात्ररेखाटनावरून तरी असंच दिसतं. तसेच डेझी रिडलीचा रेला जिवंत वठवण्याचा अप्रतिम अभिनय सुद्धा नवीन प्रेक्षकांसाठी पुढील भागाची वाट पहायला लावणारा. जर हे अशाच पद्धतीने राहिलं तर या नवीन चित्रत्रयीला योग्य दिशेने ते ठेवील.

आज सुपरहिरोजच्या व इतर ब्लॉकबस्टर सिनेमांच्या भाऊ गर्दीत तंत्रज्ञानाचा यथोचित वापर करून आपला प्रेक्षक तर जपेलच पण नवीनला जवळ करून येणाऱ्या काळात पूर्वाश्रमीच्या मालिकेची आठवण ताजी ठेवेल असा विश्वास नव्या एपिसोडनी दिला आहे.

Comments