‘अनरउबिक’ इंटरनेटचा ऑक्सिजन – वैशाली चिटणीस

{कादंबरी नव्या शतकाची... (शब्द रुची डिसेंबर २०१५ अतिथी संपादक डॉ. वीणा सानेकर) २००० ते २०१५ सालातल्या कादंबऱ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात विचार केला आहे. गेल्या पंधरा वर्षात मराठी कादंबरी कुठे आहे याचं चित्र उभं राहण्यासाठी या अंकाची योजना केली आहे. इतर जेष्ठ लेखकांबरोबर याची निवड करण्यात आली आहे.}

बदलांचे टप्पे नोंदवताना आपल्याकडे १९९१ या वर्षाची दखल घेणं अपरिहार्य आहे. या वर्षी झालेल्या आर्थिक सुधारणांनी पुढच्या काळाची चाकं वेगाने फिरली. त्या सगळ्याचा परिणाम भारतीयांच्या रोजच्या जगण्यावर झाला. हळूहळू जगणं बदलत गेलं. साध्या लॅण्डलाईन फोनसाठी, स्कूटरसाठी नंबर लावावा लागणाऱ्याच्या हातात स्मार्टफोन खेळायला लागेल, देखण्या गाड्यांनी रस्ते व्यापले. चकचकीत मॉल हे मध्यमवर्गीयांचं जगण्याचं वास्तव झालं. टीव्ही वाहिन्यांनी त्यांचा जगातल्या चांगल्यावाईट सगळ्याच गोष्टींशी परिचय करून दिला. एकुणात जगणं बदललं, फक्त तेवढंच नाही तर त्याबरोबर राजकीय, सामाजिक जीवन, जगण्याच्या, नैतिकतेच्या कल्पना बदलत गेल्या. ही सगळी प्रक्रिया कवेत घेऊ पाहणारी कादंबरी म्हणून ‘अनरउबिक’ या कादंबरीकडे पहावं लागतं.

‘अनरउबिक’ ही विवेक कुलकर्णी यांची दुसरी कादंबरी. ‘अनरउबिक ही कादंबरी रूढ अर्थाने अजून प्रसिद्ध झालेली नाही. त्यांची पहिली ‘लातूर पॅटर्न’ ही कादंबरी ‘अक्षरमानव’ ने प्रकाशित केली. ‘अनरउबिक ही कादंबरी प्रकाशित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकाशकांशी संपक साधला, पण वेगवेगळ्या कारणांनी कादंबरी नाकारली गेली तेव्हा त्यांनी ते इंटरनेटवर इ बुक स्वरुपात डेलीहंटवर टाकली आहे.

ही कादंबरी वाचताना मुळात तिला कादंबरी का म्हणायचं असं प्रश्न एखाद्याला पडू शकतो कारण कादंबरी या साहित्यप्रकाराचे आपले म्हणून ठोकताळे ठरलेले असतात. बहुतेकदा त्यातून कुणाची तरी गोष्ट सांगितली जाणं अपेक्षित असतं. त्या गोष्टीला सुरुवात शेवट असावा लागतो. वाचताना आपल्याला पडत गेलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊनच कादंबरी संपली तर आपल्याला त्या वाचनातून हाताला काहीतरी लागलं असं वाटलं. सगळ्या गोष्ठी सुस्पष्टपणे पुढे येणं ही जशी सिनेमाकडून अपेक्षा असते तशीच ती खुपदा कादंबरीकडूनही असते. ‘अनरउबिक ही कादंबरी ती अपेक्षा अजिबात पूर्ण करत नाही. ती इकडून तिकडे, तिकडून तिकडे अशी फिरवत राहते, मध्येच अनाकलनीय घटना घडतात, निवेदनाचा फॉर्म बदलतो, निवेदक बदलतो, वास्तववादी घटना आणि पात्रांच्या जीवनातल्या घटनांचा समांतर ट्रॅक मिसळत जाऊन फँटसीचं रूप घेतो. वास्तववादी कादंबरीत सगळ्या गोष्टी सरधोपटपणे पुढे जातात, त्याला छेद देण्याच्या उद्देशाने लेखक ‘अनरउबिक मध्ये कादंबरीच्या फॉर्मची मोडतोड करत जातो.

ही कादंबरी सुरु होते, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करणं, ती मागे घेणं, पुन्हा निवडून येणं, सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवणं या घटनांची चर्चा करत. त्यानंतरची महत्वाची, देशाला हादरवून सोडणारी घटना म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. दिल्लीत त्यांची हत्या झाली, त्याच क्षणी लातूरमध्ये मोहिते पाटलांच्या सधन घरात मुलगाच होणार ही खात्री असताना हर्षा ही मुलगी जन्माला आली. या मुलीची जन्मजात बुद्धिमत्ता बघून धास्तावलेले तिचे आईवडील बालमानसशास्त्रज्ञांना बोलावतात. हा बालमानसशास्त्रज्ञ तिच्या आताच्या वर्तनाचा छडा लावण्याऐवजी पुढच्या तीस वर्षात येणाऱ्या माहितीच्या लाटेवर हे मूल कसं स्वार होणार आहे हेच सांगत राहतो. त्याला अर्थातच इतर डॉक्टर चक्रम ठरवतात.

त्या दरम्यान राजकीय पातळीवर राजीव गांधींची कारकीर्द सुरु झाली आहे. संगणकीकरणाच्या त्यांच्या स्वप्नाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्यांची अल्पजीवी कारकीर्द, त्यांची हत्या, नरसिंहरावांचं सरकार आणि आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया. २४ जुलै १९९१ रोजीचं तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांचं आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेला गती देणारं भाषण जसंच्या तसं देऊन लेखकानं आपल फोकस स्पष्ट केला आहे. राजीव गांधींच्या संगणकीकरणापासून ते डॉ. मनमोहनसिंग यांच्या आर्थिक सुधारणांच्या रेट्यापर्यंत या सगळ्यातून जी घुसळण झाली, तिचे परिणाम आज दिसतात. माहितीच्या त्सुनामीच्या आजच्या काळात हल्लीची लहान मुलं जास्तच स्मार्ट झालीत, ती किती टेक्नोसॅव्ही आहे याची वर्णनं आपण आजूबाजूला सतत ऐकतो, पाहतो, पण काळाची ही तार्किकता लेखाला उलटसुलट करायची आहे. त्यामुळे काम्प्युटरायझेशनला सुरुवात होत असतानाच त्या काळातली हर्षा त्यात एक्स्पर्ट आहे. कॉम्प्युटर बघितल्या बघितल्या ती एक वेबसाईट तयार करून टाकते. तिला भेटायला आलेल्या बख्तावरबरोबर (‘हम’ या सिनेमात डनी डेग्झोंपाने साकारलेलं पात्र) उडत्या कारमध्ये बसून थेट दिल्लीला संसदेत जाते. तिला बख्तावरकडून असा एक गोळा मिळतो, जो विशिष्ट कोनात धरला तर त्यात भविष्यातल्या घटना बघायला मिळतात, पण कोणत्या घटना बघायला मिळतील यावर हर्षाचं नियंत्रण नाही. १९९१ साली तिला अलीकडच्या काळातला बेशरम मोर्चा बघायला मिळतो. तो बघून ती ब्रेसियर का घालायची हा प्रश्न भर वर्गात विचारते. तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर घरी, कॉलेजमध्ये कुठेच मिळत तर  नाहीच, उलट मूर्ख प्रश्न विचारल्याबद्दल बोलणी खावी लागतात.

ही कादंबरी अशा पद्धतीने राजकीय, सामाजिक घटनांबद्दल बोलते, आर्थिक घटनांशी जोडून घेते आणि त्याच वेळी त्या घटनांच्या परिप्रेक्ष्यात चाललेलं सामान्य माणसाचं निरर्थक जगणं अधोरेखित करते. पण म्हटलं तर ते तसं निरार्थकही नाही कारण त्यात फँटसी आहे. ती फँटसीचं कालचक्र फिरवून आज आपण पाहतो ते वीस-पंचवीस वर्षे मागे नेऊन दाखवते. “गेल्या तीस वर्षातले सामाजिक-राजकीय बदल नोंदवणं हा आपला मुख्य उद्देश, पण ते नोंदवताना पारंपारिक फॉर्मच का वापरायचा. मी मला सांगायंचय ते माझ्या पद्धतीने, मला हवं तसं सांगेन.,” असं लेखकाचं म्हणणं आहे. थोडक्यात सांगायचं तर वास्तववादी मांडणीवरची ती प्रतिक्रिया आहे. त्यामुळे कुणा एकाची सरधोपट गोष्ट या पद्धतीने कादंबरी पुढे जात नाही. ती म्हटलं तर हर्षा नावाच्या लातुरात जन्मलेल्या मुलीची गोष्ट आहे, पण म्हटलं तर ती तिची गोष्ट नाही. आजच्या माणसाच्या जगण्यातल्या फ्रॅगमेंटेशनकडे लेखक कसं पाहतो याची ती गोष्ट आहे.

त्यामुळे ती मध्येच आयत आणि सना या निवेदकांच्या मधील चर्चेचा फॉर्म घेते. त्यानंतरही काही निवेदक येतात, ते आपापल्या पद्धतीने हर्षाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतात. मध्येच कादंबरी पटकथेच्या रूपात जाते. मध्येच टीव्हीच्या स्टोरीच्या फॉर्ममध्ये जाते. मराठी साहित्यावर चर्चा करणारी आयत आणि सना ही दोन माणसं नेमकी कोण ते ठरवायचं स्वातंत्र्यही लेखक वाचकांकडेच सोपवतो. त्यांच्या चर्चेदरम्यान मराठी साहित्यातल्या वास्तववादी कादंबऱ्यांवर झालेली टिप्पणी मात्र वाचनीय आहे. वास्तवाला कल्पनेचं रूप देताना पुन्हा वास्तवाचाच आधार घेत केलेल्या मांडणीला रचना म्हणण्यातला विनोद लेखकाने अतिशय कल्पकपणे आणि बोचऱ्या उपहासातून मांडला आहे. जीवनानुभव नेमकं कशाला म्हणायचं, कल्पना आणि सत्य त्याची सीमारेषा कशी असायला हवी, लेखकाने अनुभवांची मांडणी करावी म्हणजे काय करावे, त्यातून रचनेचा जन्म जसा व्हायला हवा हे साठोत्तरी वास्तववादी लेखकांना उद्देशून निवेदकांनी एकमेकांना विचारलेले प्रश्न महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ ‘वासूनाका’ सारख्या कथा मांडणाऱ्या पुस्तकाला कादंबरी का म्हणायचं हा प्रश्न! ‘कोसला’, ‘नातिचरामि’, ‘खूप लोक आहेत’, ‘बाकी शून्य’, सारख्या कादंबऱ्यांवरच्या लेखकाच्या कॉमेंट्स काही वाचकांना झिणझिण्या आणू शकतात. पण त्यातून लेखकाचं चिंतन आणि त्याची साठोत्तरी साहित्याबाबतची भूमिका अगदी एखाद्या वाक्यातूनही स्पष्ट होते. वास्तववादी कादंबरी, कादंबऱ्यांमधली निवेदनशैली, लेखकाची त्याबद्दलची भूमिका ही सगळी वाचनीय चर्चा हर्षाच्या जीवनातल्या यापुढच्या घटनांचं निवेदन कसं ठेवायचं या निकडीतून येते. पुढच्याच प्रकरणात निवेदक बदलतो आणि हर्षाची गोष्ट एकदम वेगळ्या पातळीवर जाते.

दिल्लीतल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये चाललेलं एका मुलीचं आयुष्य कसं असू शकतंम हे वास्तववादी कादंबरीत मांडायचं झालं तर लेखक काय काय करेल, रूढ मराठी कादंबरीचे ठोकताळे कसे वाचाकानुनयी असतात, वास्तव मांडण्याच्या अट्टाहासापायी रचनेला कसा न्याय दिला जात नाही ही सगळ्या बाजूंनी बदलत असताना मराठी कादंबरी मात्र आपल्या घिश्यापिट्या ठोकताळ्यांमधून, टिपिकल व्यक्तिचित्रणातून बाहेर येत नाही, जगण्याला भिडत नाही, वास्तववादाच्या नावाखाली लेखकाला वाटतं तेच वाचकांवर थोपवलं जातं, हे ‘अनरउबिक’ मधून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

‘अॅनारोब’ म्हणजे असे जीव जे ऑक्सिजनशिवाय जगू शकतात. एवढंच नाही तर त्यांना ऑक्सिजन दिला तर त्यांची दमछाक होते. वास्तववादी शैलीच्या प्रेमात असलेल्या मराठी साहित्याचंही असंच झालं आहे असं लेखकाला ‘अनरउबिक’ असं आपल्या कादंबरीचं शीर्षक देऊन कदाचित सुचवायचं आहे. सध्यापुरतं सांगायचं तर या कादंबरीला वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटचा ऑक्सिजन मिळाला आहे.
{वैशाली चिटणीस या लोकप्रभा साप्ताहिकात वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.}

Comments