बाजीराव मस्तानी : भन्साळीची चित्रत्रयी
चित्रत्रयी म्हटलं की बऱ्याच चित्रत्रयींचा आठवण होते. सत्यजित
रेंची अपू चित्रत्रयी. रिचर्ड लिंकलेटरची बिफोर चित्रत्रयी. गेल्या काही वर्षात
सुपरहिरोजंना केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या बॅटमॅन आणि स्पायडरमॅन चित्रत्रयी
अनुक्रमे क्रिस्टफर नोलन आणि सॅम रैमीनी दिग्दर्शित केलेल्या. या सर्व चित्रत्रयींमध्ये
एक विषय केंद्रस्थानी होता. अपूमध्ये अपुच्या आयुष्याचा पट होता तर बिफोरमध्ये एका
जोडप्याचा संवाद त्यांच्या जगण्यातल्या अवकाशाला कवेत घेऊन एक प्रातिनिधिक
स्वरुपात मांडून आजच्या काळाचं चित्र उभे करणे असा होता. बॅटमॅन आणि स्पायडरमॅन
मुळात सुपरहिरोज असले तरी चित्रत्रयीद्वारे त्यांना वास्तववादी बनवण्याचा प्रयत्न
होता खासकरून बॅटमॅनमध्ये. त्यामुळे बरेच दिग्दर्शक चित्रत्रयी बनवण्याचं धाडस करत
असावेत. हिंदी सिनेमात चित्रत्रयी हा प्रकार म्हणावा तितका रुळलेला नाही. बासू
भट्टाचार्यनी अनुभव, आविष्कार आणि गृह प्रवेश ही लग्न आणि कुटुंब संस्थेला थीम
बनवलेले सिनेमे चित्रत्रयीच मानले जातात. कथानकात एकमेकांपासून वेगळे असले तरी. सिक्वेल
असणारे सिनेमे असले तरी चित्रत्रयी बनवावं असं हिंदीतील दिग्दर्शकांना वाटत नाही.
या पार्श्वभूमीवर संजय लीला भन्साळीनी बनवलेला सिनेमा बघणं आलं.
बाजीराव बल्लाळ भट (रणवीर सिंग) हा
चित्पावन ब्राह्मण कुटुंबातील विशीचा तरुण साताऱ्याच्या छत्रपती शाहू राजे
भोसलेंकडून (महेश मांजरेकर) मराठा साम्राज्याचा पेशवा म्हणून नियुक्त केला जातो. पत्नी
काशीबाईची (प्रियांका चोप्रा) परवानगी घेऊन लगेचच तो पुढील मोहिमेवर निघतो.
सिरोंजीला निघण्यासाठी त्याची तयारी चालू असते तेव्हा बुंदेलखंडहून एक सैनिक
छत्रसाल राजाचा निरोप घेऊन छावणीत येतो. पेशवाला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणतो.
त्यासाठी पेशवाच्या सैनिकांशी दोन हात करतो. बाजीराव यथावकाश त्याला धूळ चारतो. पण
तो ‘ती’ असते छत्रसाल राजाची अनौरस कन्या मस्तानी (दीपिका पडुकोण). ती त्याला
बुंदेलखंडला येऊन युद्धात मदत करण्याची याचना करते. तिच्या हिमतीची दाद देऊन तो
मदतीसाठी जातो आणि युद्ध जिंकतो. पण मस्तानीला दिल देऊन. तिला स्वतः जवळची कट्यार
देतो. बुंदेलखंडच्या रीतीनुसार एखाद्या राजाने एखाद्या स्त्रीला कट्यार दिली तर ती
त्याची पत्नी होते. आपल्या वडिलांच्या साम्राज्याला बुडताना वाचवणाऱ्या या वीर
योध्याच्या प्रेमात पडलेली मस्तानी रीतीला मानून पुण्यास यायला निघते. ती
शनिवारवाड्यात येते परंतु पेशवाची आई राधाबाई (तन्वी आजमी) तिला यवनी असल्यामुळे व
हिंदू परंपरेत मुसलमान मुलींशी लग्न करणे नसल्यामुळे ती पत्नी नसल्याचे सुनावते.
इथेच मस्तानीला स्वतः पुढे काय वाढून ठेवलंय याची चुणूक लागते.
भन्साळीच्या पहिल्या सिनेमाचा अपवाद
वगळता नंतरचे सर्व सिनेमे व्हिज्युअली अप्रतिम असतात. प्रत्येक चित्रचौकट अतिशय
मेहनतीने अटेन्शन टू डिटेल्स म्हणतात तशी असते. हा सिनेमासुद्धा त्याला अपवाद नाही.
तरीही त्याचे सिनेमे थिएटर बाहेर पडल्यावर आपल्या हातात काहीच पडलं नाही याची
जाणीव करून देतात कारण त्यात आशयाला दुय्यम स्थान दिलेलं असतं.
इथे सुद्धा ना. स.
इनामदार यांच्या राऊ या कादंबरीवर असलेला हा सिनेमा त्यातील प्रेमाच्या
संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवतो. त्याच्या खोलात शिरत नाही. ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात
हिंदी सिनेमांनी चावूनचोथा केलेल्या प्रेम विषयाला ठेवून तेच दळण दळत बसतो.
त्यासाठी तो कधी आधुनिक साजश्रुंगार यांचा आधार घेतो कधी इतिहासातील घडलेल्या
घटनांचा वापर करतो. प्रेम या संकल्पनेला एक स्त्री व दोन पुरुष (हम दिल दे चुके
सनम), एक पुरुष व दोन स्त्री (देवदास) यांच्या रूपात पेश करतो. तरी परत तोच
त्रिकोण वापरून ही एक वेगळीच चित्रत्रयी सादर झालीय हे नक्की.
बाजीराव मस्तानीमध्ये देवदासचं रूप
वास्तवात घडलेल्या व्यक्तींना लावून तीच कथा मांडतो. यावेळी आधार घेताना ऐतिहासिक
घटनांचा अभ्यास करून त्यावर रचलेली कथा मांडण्याऐवजी इतिहासावर आधारित काल्पनिक
कथा असणारी कादंबरी निवडतो. त्यामुळे कादंबरीत असणारे दोष जसेच्या तसे पटकथेत
प्रतिबिंबित होतात. त्याचं रचलेलं असणं पदोपदी खटकत राहतं. व्यक्तिरेखा जिवंत वाटत
नाहीत. व्यक्तिरेखांच्या जिवंतपणापेक्षा दृश्यचौकटीच डोळ्यात भरायला लागतात. त्यांचे
संवाद कृत्रिम वाटतात. भाषा नेमकं काय असावी याची काही निश्चित योजना इथे दिसत
नाही.
म्हणजे देवदासची कथा बंगाली असल्यामुळे त्यातील पात्रं दर दोन हिंदी वाक्या
नंतर बंगाली शब्द, संवाद मधेमधे पेरत असतात तीच गोष्ट मराठी पार्श्वभूमी असणाऱ्या
व्यक्तिरेखांची. ते सुद्धा मधेच मराठीत बोलतात. हे खटकत राहतं. कथेची पार्श्वभूमी
कुठलीही असली तरी भाषा काय असावी याचं चांगलं उदाहरण म्हणजे बिमल रॉय दिग्दर्शित
देवदास. संपूर्ण सिनेमा बंगाली संस्कृतीचं अथपासून इति पर्यंत दर्शन घडवतो पण ते
पूर्णपणे त्यावेळच्या हिंदी भाषेत. प्रेक्षकांना ते खटकत नाही कारण एकतर आपला
टार्गेट ऑडीयन्स कोण याची पूर्ण जाणीव निर्माता-दिग्दर्शकांना होती. त्यामुळे प्रेक्षक
विनासायास दिग्दर्शकाने दाखवलेल्या वाटेवरनं मार्गक्रमणा करतात. यात ते होत नाही. इथे
बाजीराव शुद्ध हिंदीत बोलला असता तरी बिघडलं नसतं कारण आजही हिंदी भाषिक सिनेमा बघणारा/समजणारा
वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हे दिग्दर्शकाच्या मुल्यदृष्टीतच नसल्यामुळे परत परत
घडत राहतं.
सर्व अभिनेत्यांचा समरसून अभिनय हीच काय ती जमेची बाजू. चित्रपट
समीक्षेत पूर्वी तो नट भूमिका जगलाय असं म्हटलं जायचं. आज ते रणवीरचा बाजीराव बघून
पटतं. बाकी दिग्दर्शकाने घातलेला हा ‘पिंगा’ प्रेक्षकांना भोवळ आणून त्यांची ‘वाट
लावणार’ असंच दिसतंय.





Comments