तमाशा : व्हाय आल्वेज द सेम स्टोरी!
श्रीमंत नायक-नायिका असूनही त्यांचे सामान्य
माणसांसारखे जमिनीवर वावरणे, हिंदी प्रेमपटांचे टिपिकल संवाद आणि दृश्ये यांची व्यक्तीरेखांकडून
जमेल तितकी, जमेल तशी खिल्ली उडवणे. बहुतांश चित्रपटाच्या केंद्रभागी असणाऱ्या
मुंबईऐवजी आपल्या दिल्ली शहराला कथानकामध्ये प्राधान्य देणे. आणि प्रमुख व्यक्तिरेखांचा
प्रेमाबाबत प्रचंड गोंधळ असणे, या गोंधळामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमधून व्यक्तिरेखांच्या
वैयक्तिक आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणणे, त्यानंतर मग पारंपारिक बॉलीवूडी
मसाल्याचाच शेवटला आधार घेत चित्रपट तारून नेणे, हे त्याच्या चित्रपटांमधील ठराविक
आलेख आहेत.
--इम्तियाज अली, तरुणाईचे
चित्रपट आणि लव्ह आज कल
पंकज भोसले, लोकप्रभा २१ ऑगस्ट २००९
पंकज भोसलेंनी
केलेलं इम्तियाजचं विश्लेषण किती योग्य आहे हे त्याचे सर्व सिनेमे बघून जाणवतं.
थोडा फरक असेल तर तो हायवे या मागच्या वर्षी आलेल्या सिनेमात. स्टॉकहोम
सिंड्रोमचा बळी ठरलेल्या नायिकेची कथा असं त्याचं स्वरूप होतं. निश्चित कळसाध्याय नसल्यामुळे
शेवट प्रभावी नव्हता. तसेच सोचा न थापासून असणारी ट्रेडमार्क शैली त्यात
गायब होती जरी नायक-नायिका वेगळया सामाजिक-आर्थिक थरातले होते हे वैशिष्ट्य कायम
होतं. इम्तियाज आजचा महत्वाचा बॉलीवूडच्या आखीवरेखीव (!) सिनेमांच्या मांदियाळीत वेगळं
काही तरी देणारा दिग्दर्शक समजला जातो. उच्चनिर्मिती मुल्य, तांत्रिक श्रेणीत
इंडस्ट्रीमधले टॉपचे लोक, मोठे नाव असणारे अभिनेते, सुश्राव्य संगीत, प्रोमोशनवर
मेहनत करायची तयारी यामुळे सर्वसामान्य प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतो. सिनेमा
चालण्याची शाश्वती वरील गोष्टींच्या असण्यामुळे शक्य होणारी. तरीही त्याच्या
सिनेमात काहीतरी कमतरता आहे हे सतत जाणवत राहतं.
तमाशा या
पार्श्वभूमीवर बघायला हवा.
वेद साहनी (रणबीर
कपूर) शिमल्यात राहत असतो. लहानपणापासून तो एका गरीब, पैशाच्या मोबदल्यात कथा
सांगणाऱ्या कथेकरी बुवाकडे (पियुष मिश्रा) जात असतो. ते त्याला रामायणाची कथा
सांगत असतात पण त्यात हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिअट, शिरी-फरहाद, पॅरीस-हेलन यांची
सरमिसळ करून तीच कथा परत परत सांगत असतात. त्याला मात्र स्वतःचं आयुष्य हे त्या
कथेतल्या नायकासारखच आहे असं वाटायला लागतं. यथावकाश तो मोठा होऊन इंजिनिअर होतो.
पुढे कोर्सिका, फ्रांसमध्ये तो सुट्टीला गेलेला असतो तेव्हा त्याला तारा माहेश्वरी
(दीपिका पडुकोण) भेटते. एकमेकांबद्दल सर्व खोटं सांगून उरलेले दिवस मटरगश्ती करत घालवायचे असं ते ठरवतात. पण मधेच आयुष्यात
पुन्हा कधीही भेटायचं नाही या आश्वासनावर तारा त्याला सोडून जाते. वेद दिल्लीत त्याच्या
आयुष्याला जुंपून घेतो. एका मोठ्या टेलेकम्युनिकेशन कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर म्हणून
काम करत असतो. दिल्लीत कामाला आला असताना तारा त्याला भेटते अन् परत त्यांच्यात
प्रेमाचे संबंध यायला लागतात. पण ताराच्या एका प्रश्नावरून वेद बिथरतो. हे बिथरणं
त्याचं आयुष्य बदलून टाकतं.
वर त्याच्या सिनेमात
काहीतरी कमतरता जाणवत राहतं असं म्हटलंय ते वेगळ्या संदर्भात. इम्तियाज कथा-पटकथा
स्वतः लिहितो. संवाद खास रचलेले असतात हे सर्वसामान्य प्रेक्षकांना वेगळे वाटतात.
सादरीकरणात तांत्रिक गोष्टींचा यथायोग्य वापर केलेला असतो. त्यामुळे ते फ्रेश असतं
तसेच त्याला काय दाखवायचं हे स्पष्टपणे माहित असल्यामुळे सकृतदर्शनी दोष दिसत
नाहीत. पण शांतपणे विचार करता तो खूप रॅडिकल देतोय असं दिसत नाही. सोचा न थामध्ये
सापडलेला व पुढे जब वी मेटमध्ये यशस्वी ठरलेला सेट पॅटर्न तो परत परत
वापरतोय. यात वेगळेपणा असतो तो सादरीकरणाचा व वर्तमानकालीन प्रेक्षकांना काय
अपेक्षित आहे याचा सूक्ष्म विचार असतो त्यामुळे प्रत्येकवेळी तो वेगळं देतोय याचा
फक्त आभास तयार होतो.
प्रस्तुत सिनेमात
सुद्धा तो त्याच्या ट्रेडमार्क असणाऱ्या गोष्टी बेमालूमपणे मिसळून प्रेक्षकांच्या आठवणी
जाग्या करतो. त्यामुळे बघताना आता परत तेच बघायला मिळणार असं वाटतं. पण ती शक्यता
रहित करून तो आजच्या काळातल्या एका तरुणाची कथा सांगतो ज्याला स्वतःचं स्वत्व
शोधायचं आहे. एका कंपनीत नोकरदार म्हणून जगणं त्याला जीवावर येतंय. हे स्वत्व शोधणं
अतिशय प्रभावीपणे जब वी मेटमध्ये आलेलं आहे. इथे वर्तमानकालीन
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येते तेव्हाच इम्तियाजच्या सिनेमात नेहमी जाणवणारी
कमतरता डोके वर काढायला लागते.
पात्रांची मानसिकतेचा खोलात जाऊन न मांडणे व
वरवरच्या चुरचुरीत, उथळ संवादातनं शाब्दिक चित्र तयार करणे यालाच वेगळेपणा
म्हणण्याची तोशीस दिसून येते जे की कमालीच्या गांभीर्याने बनवलेल्या अशा सिनेमात
अपेक्षित नाही. इथे ते कुठेच दिसून येत नाही. गंभीर म्हणजे तांत्रिक मुलामा दिलेले
चित्रचौकटी भरगच्च दिसणारे प्रसंग असा काहीसा प्रकार इथे आहे. या परिणामापायी सिनेमा
बऱ्याच वेळा कंटाळवाणा होतो. मुख्य नायकाचं नैराश्य प्रेक्षकांना कवेत घेत नाही तर
एका हाताच्या अंतरावर ठेवतं. त्यामुळे एका टप्प्यानंतर तो पुढे काय करेल याचा अंदाज
प्रेक्षक बांधू शकतात. ही कमतरता इम्तियाजच्या सर्वच सिनेमात दिसून येते अपवाद जब
वी मेट.
मग उरतं काय तर... लव्ह
आज कलमध्ये अभिनय न दाखवू शकणारी दीपिका पडुकोण गेल्या सहा वर्षात भलतीच समंजस व
प्रगल्भ वाटत आहे. काही काही प्रसंगात जुगलबंदी असावी असा अभिनय तिने
रणबीरसमोर केला आहे. बाकी तांत्रिक बाबींवर भाष्य करावं असं काही नाही.
एकुणात पडद्यावर प्रभावी वाटणारा हा तमाशा म्हणावा तितका रंगला नाही किंवा
टॅग लाईन सार्थ करणारा इतकच.






Comments