आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग २


तिच्या वावराने घरात बदल घडायला लागतात. ती नोकरी करणारी असेल तर अशा काही वस्तूंची घरात प्रवेश होतो ह्या कधी बघितलेल्या नसतात. तिला नवीन कपडे, फॅशन, कानातले घालण्याची सवय असते किंवा सासरी आल्यावर मनसोक्तपणे करावे असे वाटते. वावगं काहीच नसतं त्यात. नवऱ्याला आवडत असेल तर तिने ते करायला काहीच हरकत नाही. पण सासू-सासऱ्यांना ते आवडत नाही. कारण त्यांनी कधीच आपल्या मुलीला फॅशन करू दिलेले नसते. आपल्या मुलामुलींनी आपल्या धाकात, आज्ञेत राहायला पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळे ते तिच्या कपड्यांवर शेरेबाजी करायला लागतात. मुलं सुरुवातीला दुर्लक्ष करायला लागतात. आई-वडील वागायला असेच आहेत म्हणून या बाबींकडे कानाडोळा करतो. पण घरात कुरबुरी वाढायला लागतात तेव्हा तो आई-वडिलांना बोलतो. त्यामुळे वाद व्हायला लागतात. सुनेमुळे वातावरण बिघडायला लागतं. याचं खापर तिच्यावरच ओढलं जातं.
मुलगा-सून व आई-वडील यांच्यात दरी निर्माण होते. बोलणं जुजबी व्हायला लागतं. मुल वाढायला लागतं. तशी आई-वडिलांची लुडबुड वाढते. मुलांच्या संगोपनाचे निर्णय घेण्याचा हक्क त्याच्या/तिच्या आई-वडिलांना असतो पण त्यातही आमच्या पिढीचे आई-वडील लक्ष घालायला लागतात. सोबतच घरातल्या आर्थिक व्यवहारात सुद्धा लक्ष घालायला लागतात. घरात कुठल्या वस्तू आणणे गरजेचे आहे. दररोजची भाजी कुठली घेण्यात यावी. डाळ-तांदूळ कोणते घ्यावेत यावरती वाद व्हायला लागतात. संसार कसा करावा याचे स्वतःचेच दाखले दिले जातात. त्यामुळे मुलगा व सून उरलंसुरलं बोलणं बंद करतात. मॉल, सुपरमार्केटची खरेदी मुलगा-सुनेसाठी सोयीस्कर असते म्हणून ते पारंपारिक घराजवळ असणाऱ्या किराणा दुकानातून खरेदी करायची बंद करतात. आपल्या हक्काच्या, नेहमीच्या दुकानातून महिन्याचं सामान खरेदी न करणारे हे मुलगा-सून कोण लागून गेलेत अशी भावना आई-वडिलांना व्हायला लागते. कारण त्यांच्या भरवश्याच्या दुकानदाराकडे सगळ्याच गोष्टी बजेटमध्ये असतात असं त्यांना वाटत असतं. मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये महागड्या वस्तू असतात. आपण आपलं आयुष्य काटकसरीने घालवलं तसं आपल्या मुलाने व सुनेने ते घालवावे अशी त्यांची मनीषा असते. तसेच मुलगा-सुनेला दरवर्षी उन्हाळ्यात कुठल्यातरी हिलस्टेशनला जायची इच्छा असते किंवा ते ती अमलात आणतात. त्यावेळी आई-वडिलांना घेऊन जायचं ठरतं. आयुष्यात कधी हिलस्टेशन किंवा पर्यटनस्थळाला भेट न देणारे आई-वडील तयार होतात. सोबत जाऊन येतात. आल्या नंतर मग त्यावर खास टीका टिप्पणी होते. तिथले अनुभव मीठमसाला लावून सांगितले जातात. मुलगा-सुनेच्या व्यवस्थापनाचा उद्धार केला जातो. तिथे कुठेतरी स्थानिक स्थळ बघण्यासाठी टुरिस्ट कंपनीने कार/बस ठरवलेली असते. ती वेळेवर येत नाही. नवीन अनोळखी ठिकाण, नवीन लोकांमध्ये वाट बघायला लावली म्हणून राग आलेला असतो. तिथे तो काढता येत नाही म्हणून घरी आल्यावर त्यावर बोललं जातं. मुलगा व सून कसं तरी त्यांना समजावून सांगून वेळ निभावून नेतात. पण दोघांच्या मनात वडिलांच्या वागण्याबद्दल कटुता राहते.
अशा छोट्या छोट्या गोष्टींनी मुलगा-सून त्रस्त व्हायला लागतात. त्यामुळे ते हळूहळू आई-वडिलांना त्यांचे व्यवहार व इतर गोष्टी न सांगता करायला लागतात. त्यामुळे तर अजूनच भडका उडतो. घरात परत वादावादी सुरु होते. सून बोलता बोलता सासऱ्याच्या कुठल्यातरी प्रसंगाची आठवण करून देते अन् आई-वडिलांचा राग मुलावर निघतो. सुनेला बोलता येत नाही कारण ती बोलू देत नाही. त्यामुळे तर आई-वडिलांचा मुलावरचा विश्वासच उडायला लागतो. ते त्याचा दुस्वास करायला लागतात. त्याच्या प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष घालून त्याच्या निर्णयक्षमतेवर अतिक्रमण करायचा प्रयत्न करतात. घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाची अनावश्यक चिकित्सा केली जाते व मुलगा-सूनच कसे वाईट आहेत नातेवाईकात व इतरांच्यात पसरवले जाते. या सर्वाला कंटाळून मुलगा-सून वेगळे राहण्याचा निर्णय घेतात.
स्वभाववैशिष्ट्ये
ह्या पिढीची स्वभाववैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
  • कट्टर जातीयवादी व धार्मिक.
  • संशयी, धूर्त, स्वार्थी वृत्ती.
  • कुपमंडूकता.
  • आढ्यतेखोरपणा.  
  • व्यसनी.
  • भ्रष्टाचारी.
  • खोटारडेपणा अंगात मुरलेले, खोटे बोलण्यात तरबेज. 
  • सामाजिक प्रतिष्ठेला हपापलेले.
  • मध्यमवर्गीय मानसिकतेची लालसा बाळगून असणारे.
  • पाटीलकीचा रूबाब. (जात किंवा धर्म कुठलाही असला तरी)
  • टोकाची अल्पसंतुष्टता.
  • परंपरावादी, कर्मठ, देवभोळेपणा, कर्मकांड, व्रतवैकल्ये न चुकवणारे.
  • नोकरदारी वृती. नोकरीतून आलेली गुलामगिरीची भावना अंगात भिनलेली.
  • ज्ञानाची आस नसणारे. त्यामुळे समोरच्याला ज्ञानी करायला सक्षम नसणारे.
  • साहित्य, संगीत, कलेबाबत उदासीनता.
  • पुरूषप्रधान व्यवस्थेचे निर्लज्ज समर्थक.
  • स्त्री-पुरूष असा स्पष्ट भेद मानणारे.
  • वर्चस्ववादी वृत्तीचे.
  • ढोंगी, दांभिकता अंगात मुरलेले.
  • परंपरेच्या जोखडातून बाहेर पडता न आल्याने त्याची अनामिक भीती मनात बाळगून वागणारे.
  • व्यवहार चतुर.
  • अप्रामाणिक.
  • माजोरडे.
  • हेकेखोर.
वरील ही काही स्वभाववैशिष्टे त्यांच्याबद्दलचं चित्र अजून स्पष्ट करतील. अशा स्वभावाच्या व्यक्ती ह्या दररोजच्या व्यवहारात भेटतात तेव्हा त्यांच्याशी संवाद साधनं अवघड जातं. तसेच आजच्या काळात या व्यक्ती सर्व महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्यांच्या हातात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे वागणे, बोलणे, कामाच्या ठिकाणची भाषा इत्यादींवर खूप प्रभाव पडलेला आहे. तरीही ही पिढी काळानुरूप बदललीय असं दिसून येत नाही. जुन्या नीतीमूल्यांना नवीन साज चढलेला आहे. पण ही मंडळी जुन्या नीतीमूल्यांनाच मानणारी. त्यामुळे एखादा निर्णय घेताना ही मंडळी भविष्याचा किंवा निर्णयाच्या सकारात्मक परिणामाचा विचार न करता तो कसा अमलात आणायचा नाही यावर भर देतात. अशाने दोन्ही बाजूने संवाद होत नाही तर विसंवाद वाढतो.
याची कारणे कोणती?
याच्या कारणांचा विचार करता आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत याचं मूळ आहे असं दिसून येतं. भारतीय समाजात आई-वडिलांना किती महत्त्व आहे ते वरील दोन कथांमधून सांगितले आहे. या कथा किमान हजार ते दोन हजार वर्ष जुन्या आहेत. भारतात त्या संस्काराच्या नावाखाली लहानपणापासून बिंबवल्या जातात. उद्देश उद्दात असला तरी आजच्या काळात याचं मोल किती आहे ते बघावं लागेल. आमच्या लहानपणी याच कथांचे संस्कार झालेत. त्यामुळे आई-वडील म्हणजे कुणीतरी दिव्य अवतार असणारी व्यक्ती असतात अशी प्रतिमा तयार झालेली. या कथारूपी संस्कारातून कुठली गोष्ट ठळकपणे दिसते ती म्हणजे आई-वडिलांचं सामाजिक संरचनेत असणारं अतोनात महत्त्व.
कुटुंबाची निर्मिती तीच मुळात एक स्त्री-एक पुरूष यांच्या मिलनातून होते. वंशाची निर्मिती करून त्यांचं पालनपोषण करण्याची नैसर्गिक जबाबदारी असते. त्यामुळे सामाजिक संरचनेच्या वर्तुळात ते केंद्रस्थानी असणे अपेक्षितच. तसेच आपल्या समाजात स्त्री-पुरुषांचं समाजातील स्थान हे ठरलेलं आहे. त्यांनी कोणत्या प्रकारची कामे करावीत व कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात याची वहिवाट पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. आज जगातली सर्वात मोठी लोकशाही असणारी व सर्वात प्राचीन संस्कृती असणाऱ्या ह्या देशात ती वहिवाट खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहे असं दिसून येत नाही.
काही जुने संदर्भ
खाली दिलेल्या संस्कृत श्लोकांमध्ये आई-वडिलांबद्दल वर्णन केलेलं आहे. सोबत त्यांचे स्वैर अनुवाद दिले आहेत.
सर्वतीर्थमयी माता सर्वदेवमयः पिता
मातरं पितरं तस्मात् सर्वयत्नेन पूजयेत्[1]
(आई सर्व तीर्थक्षेत्राचं मूर्त स्वरूप आहे तर वडील सर्व देवांचं. त्यामुळे आई-वडिलांची परिश्रमपूर्वक पूजा करणे हे आद्य कर्तव्य आहे.)
उपाध्यायान् दशाचार्य आचार्याणां शतं पिता ।
सहस्रं तु पितॄन् माता गौरवेणातिरिच्यते ॥ १४५ ॥[2]
(दहा उपाध्यायांच्यावर एक आचार्य असतो. शंभर आचार्यांच्यावर एक पिता असतो. तर हजार पित्यांपेक्षा आई श्रेष्ठ असते.)
वरील दोन्ही श्लोक वाचल्यावर किती आदर्शव्रत आपली व्यवस्था आहे (निदान कागदोपत्री तरी) याचा प्रत्यय येतो. आई-वडील हे देवताच आहेत अशा पद्धतीचं त्यांचं वर्णन केलं आहे. पैकी दोन नंबरचा श्लोक हा भारतीय समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था रूढ करणाऱ्या मनुस्मृतीतील आहे. ‘मनुस्मृती’ ह्या ग्रंथात भारतीय समाजातील भेदभाव स्पष्ट अधोरेखित केलेले आहेत. एकीकडे या व्यवस्थेत शूद्रांना कसलंही स्थान न देणारी मनुस्मृती आई-वडिलांची थोरवी गाते हा विरोधाभास आश्चर्य वाटणारा आहे. तसेच वरील स्वभाववैशिष्ठे बघितली तर भारतीय समाज किती टोकाचा दांभिक व विरोधाभासी आहे याचा प्रत्यय येतो. एकीकडे आई-वडिलांच्या स्थानाचं नको इतकं अवडंबर माजवलेलं असताना दुसरीकडे आजच्या काळात आमच्या पिढीचे आई-वडील वरील श्लोकांच्या जवळपासही न जाणारे असावेत यासारखं दुर्दैव ते काय!

Comments