आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग ३
गेली काही एक हजार
वर्षांपासून आई-वडिलांची थोरवी इथे सांगितली जाते मग आज एकविसाव्या शतकात असा
विरोधाभास का दिसून येतो? पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचे ढोल वाजवत असताना आपण
आजूबाजूला दिसणारं वास्तव का विसरतो आहोत? त्याचं एक कारण आमच्या पिढीच्या
आई-वडिलांना संवाद साधण्याची कलाच अवगत नाही. एक उदाहरण देतो. लातुरातील बऱ्याच समवयस्क
मित्रांशी बोलताना असं लक्षात आलं की खूप जणांना त्यांच्या वडिलांना किती पगार
होता हेच माहिती नव्हतं. वडिलांची निवृत्ती झाली तरी त्यांना ते माहिती नव्हतं.
आता यामागे काय कारण असेल तर आपल्या मुलांना आपल्या पगाराविषयी सांगू नये ही
भावना. पण ही भावना का निर्माण झालेली? आमच्या आई-वडिलांची पिढी ही पुरूषप्रधान
व्यवस्था मानणारी व अवलंबवणारी. त्यामुळे घरात जेव्हा मुलांशी संवाद साधला जायचा
तेव्हा मुलांनी वडीलांचा आदर ठेवूनच बोलायचं असा शिरस्ता असायचा. त्यामुळे वडील
किती पगार घेतात हे कधीच विचारायचं नाही हा दंडक असायचा. मुलांशी पगाराबद्दल बोललं
तर ते कमीपणाचं असतं त्यांना वाटत असावं. हा संस्कार त्यांच्यावर दोन कारणांचा
आहे. पहिला त्यांची जडणघडण झालेला काळ. साधारण १९५० ते ७० या काळात त्यांची वाढ झालेली.
त्यांचे आई-वडील म्हणजे आमच्या आजोबांच्या पिढीचे त्यांच्यावरील संस्कार कर्मठ
होते. पारंपारिकते बरोबर तुटपुंजी मिळकत असणाऱ्या त्या काळात पगाराबद्दल जास्ती
बोललं जायचं नाही बहुदा. त्यामुळे तोच संस्कार आमच्या आई-वडिलांच्या पिढीत होता.
दुसरं कारण आमच्या आई-वडिलांच्या कुपमंडूक वृत्तीत आहे. ही कुपमंडूकता विसंवादाचं
मोठं कारण आहे. ते स्वतःच्या कोषाबाहेर बघायला तयार नसतात. सुखवस्तू आयुष्य जगायची
सवय असल्यामुळे आपल्या विश्वापलीकडे जग आहे हे त्यांना मान्य नसतं. आम्ही कुणीतरी
श्रेष्ठ आहोत ही भावना आमच्या आई-वडिलांच्या पिढीत दिसून येते. बेडूक व बैल या
कथेत मर्यादेच्या पलीकडे स्वतःला फुगवून घेऊन फुटणारा बेडूक म्हणजे आमच्या पिढीचे आई-वडील.
नोकरीतून येणारा पगार हा
आपल्या मेहनतीचा मेहनताना असल्यामुळे त्यामुळे त्याच्यावर आपलाच अधिकार आहे. हा
अधिकार दुसऱ्या कुणालाही अगदी आपल्या मुलांनाही तो मिळता कामा नये असं त्यांना
वाटायचं. त्यामुळे तुम्हाला पगार किती? याचं उत्तर कधीच दिलं जायचं नाही किंवा
दिलं तर दोन वेळचं जेवायला मिळतंय ते उपकार समजा असं उत्तर मिळायचं. तसेच
मिळालेल्या पैशांवर आपलाच हक्क आहे ही भावना घट्ट असणारी. सोबतच आपली मुले आपला
पगार विचारून आपल्याला लुटतील किंवा नको इतके खर्च करायला लावून आपल्याला कंगाल
करतील ही भीती त्यांना असायची. त्यामुळेच पगाराबद्दल अळीमिळी गुपचिळी अशीच अवस्था
असायची. तसेच मध्यमवर्गीय घरात मिळणारा पगार हा दर महिन्याला मिळणारं सोन्याचं अंडं
आहे अशी भावना असते. मध्यमवर्ग हा समाजात अशा स्थानावर असतो की त्याला आपल्याशिवाय
समाजाचं काहीही चालणार नाही अशी भावना असते. ही भावना व घरात आर्थिक निर्णय
घेण्याची मुभा असल्यामुळे त्यांच्यात एकाधिकारशाही उत्पन्न होते. आमच्या
आई-वडिलांची पिढी ही अशी एकाधिकारशाही मानणारी. त्यामुळे पगार किती आहे हे कधीच
स्पष्टपणे न सांगणारी. आपल्या मुलांवरच विश्वास न ठेवणारी पिढी सुसंवाद कशी साधू
शकेल हा एक उपप्रश्न यातून तयार होतो.
एकीकडे स्वतःच्या पगाराबद्दल
न बोलणारी ही मंडळी मुलांच्या व सुनेच्या पगारावर मात्र लक्ष ठेवून असतात. मुलाचा
पगार कुठे खर्च होतो हे खोदून खोदून विचारतात. सुनेचा संपूर्ण पगार आपल्याच घरात
यायला हवा अशी अट लग्नाच्या बोलणीवेळीच घातली जाते. समजा, सुनेच्या आई-वडिलांना
मुलगा नसेल व त्यांची परिस्थिती बेतासबात असेल तरी तिने पगार सासरीच द्यायला हवा
अशी अट घातली जाते. या उपरही तिने पगार घरी दिला तर तिच्याबद्दल वाट्टेल ते बोलले
जाते. नातेवाईकात तिची प्रतिमा मलीन केली जाते. तिच्या प्रत्येक कृतीवर संशय घेतला
जातो अगदी जन्माला येणाऱ्या नातू/नातीवर सुद्धा. अशा वागण्यामुळे मुलगा-सून व्यथित
होतात. त्यांना भरल्या घरात कोंडल्यासारखं वाटायला लागतं. ते वेगळं राहण्याचा
निर्णय घेतात किंवा आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते.
वृद्धाश्रमात आई-वडिलांना
पाठवणे हा खूप मोठा गुन्हा आहे असं आपल्या इथे मानलं जातं. पण हा निर्णय घेणारे
मुलगा-सून हे जितके जबाबदार असतात तितकेच आई-वडीलही असतात हे विसरून जाता कामा
नये. पण आपला समाज परस्पर याकडे दुर्लक्ष करतो याचं कारण चर्चेच्या सुरूवातीला
दिलेल्या दोन कथा. आई-वडिलांची सेवा ही पुण्यप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे किंवा
आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे हा संस्कार या दोन कथांमधून हजारो वर्षांपासून
घालून दिलेला आहे. मधल्या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्था भक्कम केली गेली, मुसलमानी
राजवटीने कित्येक शतके राज्य केलं. त्यानंतर आलेल्या ब्रिटिशांनी प्रशासकीय जरब
बसवून आधुनिक शिक्षण व लोकशाहीची मुल्ये इथे रुजवली. एकोणिसाव्या शतकात शिक्षण
घेतलेल्या पिढीने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शिक्षणाचा उपयोग तलवार म्हणून केला.
विसाव्या शतकाच्या मध्यावर देशाला स्वातंत्र्य मिळालं. लगेचच देश सार्वभौम झाला व
जगातली सर्वात मोठी लोकशाही असं अभिमानाने मिरवायला लागला. या सर्व हजार
वर्षांच्या काळात वरील दोन कथा तावूनसुलाखून तर राहिल्याच पण पिढ्यानपिढ्या संस्कार
करते झाल्या. आई-वडिलांचं महत्त्व अधोरेखित करत्या झाल्या. पण श्रावण बाळ असो किंवा
गणेश असो त्यांचा आई-वडिलांप्रती भक्तीभाव खूप असला तरी विसाव्या शतकात जन्मलेल्या
व एकविसाव्या शतकात वावरणाऱ्या आई-वडिलांच्यामध्ये ते आदर्शवादी गुण नाहीत हे
म्हणावं लागतं. त्याचं एकमेव कारण म्हणजे वर दिलेली चोवीस स्वभाववैशिष्ठे. ही
स्वभाववैशिष्ठे वरील कथांमधील आई-वडील या प्रतिमेला छेद देणारी आहेत. समकालीन
भारतीय आई-वडील हे कथेच्या विरुद्ध टोकांवर असणारी आहेत.
आमच्या
पिढीचं दुखणं
मग प्रश्न असा उरतो आमच्या
पिढीचं दुखणं आहे कशात? का आमची पिढी आई-वडिलांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत
आहे. वर्षानुवर्षांचे संस्कार अंगात भिनले असताना त्यांना एका क्षणात नाकारून
स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व मिळवायची घाई का लागलेली आहे? याचं एकमेव कारण म्हणजे
आमच्या पिढीची होणारी कुतरओढ. ही कुतरओढ होण्याचं कारण आमचे आई-वडीलच आहेत. त्यांच्या
उफराट्या स्वभावामुळे आमच्या पिढीतल्या कित्येक जणांना आई-वडील ही ब्याद वाटायला
लागली आहे. कधी एकदा ही ब्याद आपल्या आयुष्यातून दूर करता येईल याचाच विचार ते करत
आहे. पूर्वी मी आई-वडिलांच्या अतीव प्रेमांधळेपणामुळे त्यांच्या वागण्याच्या या
बाजूकडे दुर्लक्ष करत होतो. पण आता सम्यकपणे याकडे बघताना मला आई-वडील या
व्यक्तींबद्दल फार ममत्व राहिलेलं नाही. त्यामुळे माझी सहानुभूती ही माझ्या
समवयस्क मित्रांकडे जाणारी आहे. कारण ही कुतरओढच आम्हाला संवाद साधायला अडचणीची
ठरतेय. सुशिक्षित आई-वडील जर एकाधिकारशाही दाखवणार असतील तर कुठेतरी त्यावर बांध
घालणं गरजेचं आहे. सुसंवादाची तयारी आमची आहे पण आई-वडील आढ्यतेखोरपणे वागणार
असतील तर नाईलाज आहे.
लहानपणी एक घटना नेहमी
ऐकायला मिळायची. त्यात तपशील बदलायचे पण घटनेतील व्यक्ती बदलली नसायची. वारीला
घेऊन जातो म्हणून नेणाऱ्या मुलाने आईला तिथेच सोडून दिली असं ऐकण्यात यायचं.
त्यावर तो कसा वाईट आहे अशी टीका व्हायची. आजकालची मुलंच निर्दयी आहेत.
म्हातारपणाची काठी व्हायची सोडून आईला असं सोडून येणारा माणूस दगडाच्या काळजाचा
असेल असं म्हटलं जायचं. मला सुद्धा त्या मुलाला धरून झोडपून काढावं वाटायचं. कारण
मी फक्त ऐकीव बाजूवरच विश्वास ठेऊन विचार करायचो. मी कधीच विचार केला नाही की त्या
मुलाची मजबुरी काय असेल अशा पद्धतीने वागायची. तो किती वाईट वागला यापेक्षा तो
वाईट वागायला का प्रवृत्त झाला याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण टाळी एका हाताने
वाजत नसते. जर तो या निर्णयाला आला असेल की आईला तिथेच सोडलेली बरी तर जितका
त्याचा दोष आहे तितकाच तिचाही यात दोष आहे. भारतीय आई-वडील ही वरील वैशिष्ठे घेऊन
वागत असतात. वरीलपैकी किमान चार वैशिष्ठे त्या आईच्या स्वभावातही असतीलच. त्यामुळेच
त्याने असा निर्णय घेतला असेल. समाजाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत वाईट गोष्ट आहे
पण आपण आई-वडिलांकडे देवाचे अवतार किंवा तत्सम दृष्टीकोनातून न बघता एक व्यक्ती
म्हणून बघायला हवं. त्याशिवाय अशा घटनेपाठीमागील कारणे दिसणार नाहीत. तसेच
त्यांच्यात जो विसंवाद निर्माण झालाय तो कमी कसा करता येईल ते बघावं लागेल. हा
विसंवाद सुसंवादात बदलवायचा असेल तर आई-वडिलांनी काळानुरूप बदलणे नितांत गरजेचं
आहे. जर ते त्यांचा हेकेखोर स्वभाव सोडणार असतील तरच.
पण हे होणं सध्या शक्य दिसत
नाही. कारण भारतीय आई-वडील पुरूषप्रधान व्यवस्थेत इतके मुरलेले आहेत की ते बदलतील
ही शक्यता नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाही. आमची कुतरओढ मात्र तशीच राहणार असंच
दिसतंय. हे शतक त्याच्यासहीतच निभावावं लागणार असं दिसतंय.
पूर्वप्रसिद्धी :
शब्दायण दिवाळी २०१९
Comments