मेट्रिक्सची पंचवीशी
१९९८-९९ हे माझ्या बीकॉम फर्स्ट
ईयरचं वर्ष. कॉलेज राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. १२ सायन्समध्ये ५०%
घेतल्यामुळे पुढे बीएस्सी करण्याची इच्छा नव्हती. मग घरचे म्हणाले बीकॉम करून सीए
हो. (लो ऐम इज क्राईम) तर शाहू कॉलेजात अॅडमिशन घेतलं. सोबतच काहीतरी टेक्निकल
शिकायला हवं म्हणून एनआयआयटीचा कोर्स करायला सांगितलं. तिथे घेतलं अॅडमिशन. तेव्हा
लातुरात नुकताच एनआयआयटी चालू झालेलं. कम्प्युटरबद्दल आकर्षण केशवराज शाळेत
असतानाच निर्माण झालेलं. शाळेत असणाऱ्या मोनोक्रोम मॉनिटरवर ‘प्रिन्स ऑफ पर्शिया’ बघितलेला.
एनआयआयटीत एमएस डॉस व विंडोज शिकायला मिळाले. त्यामुळे कम्प्युटरचं जग काय भानगड
असते ती कळायला लागली होती. त्याच्या पुढच्या अॅडव्हांस कोर्सला अॅडमिशन घेतलेली.
एचटीएमएल, एसक्यूएल, सी, सी++, जावा व इतर गोष्टी शिकायला सुरूवात झालेली. पण ते इन्स्टीट्युट
बंद पडलं त्यामुळे कोर्स तिथेच बंद पडला. (आणि जग एका मोठ्या व श्रेष्ठ दर्जाच्या
प्रोग्रॅमरला मुकलं. नाही तर ‘९९ साला नंतरचे कम्प्युटर प्रोग्रामिंगशी निगडीत
सगळे शोध मीच लावले असते.)
हॉलीवूड सिनेमाचं दालन उघडलं
गेलं ’९३ सालच्या ज्युरासिक पार्कमुळे. कर्नाटकातल्या गुलबर्ग्याला (आता कलबुर्गी)
बघितलेला. छोट्या शहरात हॉलीवूडचा प्रभाव टाकायला हा सिनेमा कारणीभूत ठरलेला. जयंत
नारळीकरांमुळे विज्ञान साहित्याची ओळख तत्पूर्वीच झालेली. वैज्ञानिक संशोधन,
त्यावरील लेख, कथा, कादंबऱ्या, सिनेमे हा माझा व अजून एक समवयस्क मित्राचा कॉमन
दुवा. त्यामुळे मेट्रिक्स रिलीज झाल्यावर तो पाहणे घरचं कार्य होतं. सीजीआयचा
उपयोग सिनेमात करतात हे ज्युरासिक पार्कमध्ये कळलेलं. पण मेट्रिक्सचं जगच निराळं
होतं. त्यातील दृश्ये, अॅक्शन, स्लो-मोशन, कथेचा सूर, पटकथेची वळणे सगळं चित्तचक्षुचमत्कारिक
होती. ज्यांना कम्प्युटरचं जग माहिती होतं त्यांना यातील त्याचा भविष्यातील वापर
समजण्यासारखा होता. मला सिनेमा म्हणून जो अनुभव दिला तो आयुष्यभर पुरणारा होता.
माझी वयाची अठरा वर्ष संपलेली. मतदार
झालेलो. त्यामुळे आपल्या मर्यादित अवकाशाच्या बाहेरचं जग अनुभवण्याची असीम इच्छा
तेव्हा होती. पण त्याला मर्यादा होत्या. ही मर्यादा मोडून निघाली सिनेमांमधून.
हॉलीवूडचं मोठं आणि असीमित, अकल्पित जग तेव्हा हिंदी-मराठी सिनेमांसमोर एखाद्या
मोठ्या कटआऊटसारखं उभं होतं. त्याचं आकर्षण दिवसागणिक वाढतंच चाललं होतं.
मेट्रिक्स याच काळात बघण्यात आला. त्यामुळे त्याचा प्रभाव इतरांपेक्षा अधिक गडद व
न पुसला जाणारा होता.
निओची घालमेल व स्वतःची आयडेंटिटी
शोधण्याची धडपड, ट्रिनिटीच्या निओवरील एकतर्फी प्रेमापेक्षा तिच्यातील मादकतेचं
झालेलं दर्शन हे माझ्या वयाला साजेसं व आकर्षित करणारं, मॉर्फियसचा निओबद्दलचा दुर्दम्य
आशावाद, एजंट स्मिथचा व्हिलन, ऑरकलची भविष्यवाणी आणि सायफरची फितुरी सगळं कसं
सिनेमाच्या जगात हरवून जावं असं. तसेच मला अत्यंत आवडणाऱ्या अॅक्शन सीन्सना स्लो-मोशनची
जोड म्हणजे समाधी लागण्याचीच लक्षणे सगळी. हिरवा, निळा व कपड्यांचा काळा रंग,
त्यातनं तयार झालेली व्हिज्युअल्स ही मी तोपर्यंत जितके हॉलीवूड सिनेमे बघितले
होते त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. हे काय प्रकारचं जग आहे असा प्रश्न थिएटर
बाहेर आल्यावर पडलेला पण अविश्वसनीय असं.
लातुरात तेव्हा यशोदा थिएटरला डॉल्बी
साऊंड सिस्टीम बसवलेली. त्यामुळे मेट्रिक्सचं साऊंड डिझायनिंग व बॅकग्राउंड प्रचंड
भावलेला. पण टेक्निकल गोष्टींचं कसलंच नॉलेज तेव्हा नव्हतं. बुलेट टाईम नावाची
टेक्निक त्यांनी लॉबी शूटआऊट सीनेमध्ये वापरलेली हे २००० साली एका दिवाळी अंकात
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक गणेश मतकरींनी लिहिलेल्या लेखात वाचलं. (तो लेख
त्यांच्याच फिल्ममेकर्स या पुस्तकात वाचौव्स्कीवरील लेखात समाविष्ठ केलाय.) ते
त्यांनी कसं केलं हे मी अनेक वर्षांनंतर युट्युबवर बघितलं.
आज मेट्रिक्स बघताना त्यातील तांत्रिक गोष्टींकडे जास्त लक्ष जातं. अभिनय ते दिग्दर्शन यातील बारकावे बघण्याला जास्त महत्त्व येतं. त्यामुळे पटकथेची वीण कशी असते व पटकथा ही सिनेमाचा जीव की प्राण का आहे जास्त ठळक होत जातं. अॅक्शन व गंभीर चर्चा या दोन ध्रुवांवरील गोष्टी सर्वसामान्य प्रेक्षकांना पटतील अशा पद्धतीने लिहिणं व एक्झिक्युट करणं किती औघड कामय याची प्रचिती येते.
त्यामुळेच मेट्रिक्ससारखे वेगळेपट देणाऱ्या हॉलीवूडचे आभार.

Comments