वेलकम जिंदगी : अति झालं हसू आलं

चित्रपट समीक्षेचा सतरा-अठरा वर्षांच्यावर अनुभव, फिल्ममेकर्स, सिनेमॅटिक व चौकटीबाहेरचा सिनेमा अशी सिनेमाविषयक तीन पुस्तके, सकाळ साप्ताहिकमध्ये सलग सहा वर्ष चालवलेलं आणि उभ्या महाराष्ट्रात वाचकप्रिय असणारं हॉलीवूड-बॉलीवूड हे सदर ज्यातील लेखांचं दोन भागातलं त्याच नावाचं पुस्तक यावर्षी अपेक्षित, इन्व्हेस्टमेंट या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटाचे सह-दिग्दर्शक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये परीक्षक म्हणून काम, शॉट नावाची लिखित व दिग्दर्शित शॉर्ट फिल्म जी स्टूटगार्ट आणि नुकत्याच झालेल्या मुंबईच्या कशिश शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आली त्याचे निर्माते, खिडक्या अर्ध्या उघड्या या कथा-कादंबरीच्या आत बाहेर असणाऱ्या पुरस्कार प्राप्त कथा-कादंबरीचे लेखक, व्यवसायाने आर्किटेक्ट असे गणेश मतकरी जेव्हा प्रत्यक्ष एका व्यावसायिक सिनेमाच्या पटकथा या अत्यंत महत्वाच्या बाजूने असतात तेव्हा त्याला निश्चितच वजन आणि दृष्टीकोन प्राप्त होतो. बघुयात त्यांनी आणि दिग्दर्शकाने ते कसे पेललं आहे.

मीरा सबनीसच्या (अमृता खानविलकर) हातात झोपेच्या गोळ्यांची बाटली आहे. तिने तळहातावर बकाणाभर गोळ्या घेतल्या आहेत. ती त्या गोळ्या तोंडात टाकणार तेवढ्यात कुणीतरी जोर जोरात तिचा दरवाजा वाजवत असतो. कोण इतक्या महत्वाच्या प्रसंगी आला म्हणून ती वैतागते अन् दरवाजा उघडते. एक पोरगेलासा इसम आत येतो. स्वतःची ओळख पुणे मनपाचा कर्मचारी म्हणून करतो. तिच्याशी अनावश्यक वाद घालून त्या गोळ्या सफाईने फ्लश करून टाकतो. ती रागावते त्याच्यावर. तो आनंद प्रभू (स्वप्नील जोशी) नावाचा हॅपी एंडिंग सोसायटीचा चालक-मालक असतो. ही सोसायटी आत्महत्या करणाऱ्या लोकांना आत्महत्या : तंत्र आणि मंत्र या तीन दिवसांच्या क्रॅश कोर्समध्ये आयुष्याच्या शेवटच्या प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक बळ देण्याचं काम करत असते. त्यामुळे मीराला तिथे नेणं आनंदला क्रमप्राप्त ठरतं. ती तिथे जाते. तीन दिवसांचा कोर्स करते. तिला या तीन दिवसात कशा कशा प्रकारे आत्महत्या करता येईल हे शिकवलं जातं म्हणजे गळफास घेऊन, पिस्तुलाचा चाप ओढून, हाताची शीर कापून की उंच इमारतीवरनं उडी मारून. शिकवलेल्या सर्व गोष्टींचा वापर आत्महत्या करताना कसा करायचा याचा विचार करताना तिला आपण आत्महत्या करू नये असं वाटायला लागतं अन् तिचा निर्णय डळमळायला लागतो...

आत्महत्या हे आधुनिक समाजाचं वैशिष्ट्य. औद्योगिक क्रांतीनंतर जशी आजूबाजूला समृद्धी अनुभवायला मिळाली तशी आत्महत्याग्रस्त माणसे सुद्धा. थोर समाजशास्त्रज्ञ एमिल डरखीम आत्महत्या हा औद्योगिक क्रांतीचा सर्वात मोठा दुष्परिणाम मानतात. जेव्हा पटकथाकार आणि दिग्दर्शक इतका गहन आणि गंभीर विषय सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीकोनाला समजून घेणं गरजेचं ठरतं. पटकथेची जमलेली बाजू म्हणजे विषयाचा मेलोड्रामा न करता त्याची बाजू समजून घेऊन त्याला दिलेली विनोदाची डूब. गणेश विषयाकडे मिश्किलीने पाहतात. त्यामुळे आत्महत्या करताना प्रत्यक्ष जेव्हा एखादा व्यक्ती गळफास घेईल तर त्याला कसा कसा त्रास होईल आणि त्याने चुकीच्या पद्धतीने गळफास घेतला तर त्याचे संभाव्य परिणाम काय असतील हे पण ठासून मांडतात. मुद्दा गंभीर असला तरी प्रेक्षक चिक्कार हसतो ते त्यातल्या तार्कीकतेला प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणाऱ्या दृष्टिकोनामुळे. सिनेमात एका नंतर एक असे बरेच प्रसंग येतात. त्यामुळे प्रेक्षकाला उत्सुकता राहते की मीरा कशी आत्महत्या करते ते बघण्याची. विषय विनोदी असला तरी त्यातलं गांभीर्य गणेश सुटू देत नाहीत. उलट काही काही प्रसंगात मीराला विचार करायला भाग पडतात. तिचा निर्णय योग्य आहे का याची कारणमीमांसा तिने करावी या उद्देशाने. इथे त्यांच्यातला लेखक जगाकडे कसा बघतो हे दिसून येतं. लिहिलेले प्रसंग किंवा एकूण कथेचा न ढासळलेला तोल शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवतो.

याचा अर्थ सिनेमा निर्दोष आहे असा होत नाही. द ग्रास इजंट ग्रीनर ऑन द अदर साईड असं म्हणतात ते यालाही लागू होतं. दोष जे आहेत ते तांत्रिक म्हणजे पटकथेत आणि दिग्दर्शनात. उमेश घाडगे यांच्या दिग्दर्शनात नवखेपणा आहे. दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचा पहिलाच सिनेमा त्यामुळे कदाचित विषय कितपत पचेल आणि आपण तो योग्यपणे पेलू का नाही याची साशंकता असावी. तरीही एक चांगला प्रयत्न असल्यामुळे गुलाबाला काटेच असतात असा कुजकट विचार न करता याकडे बघायला हवं. वर विनोदाचा उल्लेख आला आहे तो यातील संवादांमुळे. चुरचुरीत संवाद प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवतात. माय फ्रेंड, विषय एन्ड्ससारखा संवाद तर मजा आणतो. सिनेमा हेमलॉक सोसायटी या बंगाली सिनेमाचा अधिकृत रिमेक आहे.

सर्वच अभिनेत्यांचा प्रसन्न आणि समजूतदार वावर ही अजून एक जमेची बाजू. स्वप्नील जोशींसारखा स्टार अभिनेता स्टारपणा बाजूला ठेवून छान खुलतो खासकरून मीरासोबतच्या पहिल्या प्रसंगात. अमृताचा बाजी नंतरचा मुख्य भूमिकेतला मोठा सिनेमा. तिने अतिशय चोख काम केलेलं आहे. आत्महत्या करावं की न करावं यातील संभ्रम ती योग्यपणे दाखवते. त्यामुळे स्त्री केंद्रित विषय असला तरी ते प्रेक्षकांना भावतं.

एकूणात आत्महत्येचा विचार मनात आला असेल किंवा नसला तरी सिनेमा आवर्जून बघा आणि आपला निर्णय योग्य आहे का नाही तो एकदा पडताळून पहा.


रेटिंग : ३/५


पूर्वप्रसिद्धी : दै. मराठवाड़ा नेता २८-०६-२०१५ 

Comments

Unknown said…
sorry expected better product,,,disappointed sply wt GM