कॅरी ऑन मराठा : दे दणादण प्रेमिक बाणा

भारत स्वतंत्र झाल्यावर सर्व राज्यांची निर्मिती करताना त्या त्या क्षेत्रात बोलली जाणारी भाषा हा निकष मानला गेला आणि भाषावार प्रांत रचना करून स्वतंत्र भारताचे प्रजासत्ताक देशात रुपांतर झाले. भाषावार प्रांत रचना केली असली तरी लोकांच्या संस्कृतीत थोडाच बदल घडणार आहे. खासकरून स्वजातीतल्या विवाहासाठी अशा भाषावार प्रांतांचा अडथळा कधीच येत नाही. पण दोन विभिन्न संस्कृती, भाषा आणि जात असणाऱ्या कुटुंबात मात्र भाषेची अडचण पिढ्यानपिढ्या चालत राहणार हे सुद्धा तितकंच तथ्य आहे. प्रस्तुत चित्रपटात याच विषयाला केंद्रित ठेवून एक कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मार्तंड मराठे (गश्मिर महाजनी) हा मार्तंड डेअरी फार्मचा चालक आणि मालक. कोल्हापूर नजीक माल्हेवाडी गावात त्याचा डेअरी फार्म आहे. त्याचा मोठा भाऊ, आई (उषा नाईक) आणि खंडोबाच्या देवळात सापडलेला मुलगा यांच्या समवेत सुखाचं आयुष्य कंठत असतो. तरी पण नेहमी झोपेत दिसणारी एक गोष्ट त्याचा पिच्छा पुरवत असते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दुध देण्याच्या निमित्ताने दुध संकलन केंद्रावर त्याची ट्रक घेऊन जात असताना एक मुलगी कुसुम (कश्मीरा कुलकर्णी) त्याला लिफ्ट मागते. तिच्या टॅक्सीवाल्याने तिच्या सामनासहीत पळ काढलेला असतो. तिला मराठी न येता फक्त कानडी बोलता येत असतं त्यामुळे त्यांच्यातला संवाद हा एकमेकाला न कळल्यामुळे तसाच घडतो. परत आल्यावर मार्तंडच्या लक्षात येतं तो तिच्या प्रेमात पडलाय पण भाषेच्या अडचणीमुळे ते तिला कसं सांगायचं हे लक्षात येत नाही. त्या अडचणीवर मात केल्यावर एक नवीनच अडचण निर्माण जी त्याच्या भूतकाळाकडे निर्देश करते व गुंता आणखी वाढायला कारणीभूत ठरते.

दिग्दर्शक संजय लोंढे यांच्यासमोर कदाचित दोन गोष्टी असाव्यात. आपल्याला सध्याच्या एका प्रश्नावर भाष्य करायचं आहे. दुसरी गोष्ट ते भाष्य कथेमध्ये बेमालूमपणे मिसळून प्रेक्षकांना त्याची जाणीवसुद्धा होऊ द्यायची नाही. या गोष्टी निसंशय उत्तम आहेत पण सिनेमा तयार होत असताना कथेला चांगल्या पद्धतीने सादर करणारी पटकथा हवी असते ही गोष्ट दिग्दर्शक-पटकथाकार विसरून जातात. त्यामुळे मध्यांतरापर्यंत कसातरी पुढे सरकणारा सिनेमा मध्यांतरानंतर एकदम वेग घेतो अन् प्रेक्षकांना विश्वासात न घेता एका नंतर एक घटना, प्रसंग दाखवले जातात. ज्यातनं कथानक वेगाने पुढे सरकतानाचा भास तयार होतो. प्रत्यक्षात असंख्य प्रश्नांची मालिका प्रेक्षकाच्या मनात तयार होते. मुख्य प्रश्न असा निर्माण होतो जर खलनायक हा सुरुवातीच्या प्रसंगात दाखवलेला असेल तर त्याच्या खलकृत्याची कारणमीमांसा देखील यथावकाशपणे शेवटाकडे समोर यायला हवी. ती नुसती न येता विश्वसनीय पण वाटायला हवी. इथे खलनायक जे काही करतो त्याचे पुरेसे समर्थन पटकथाकार आणि दिग्दर्शक प्रेक्षकांना देण्याचा भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल होते. तीच गत नायक, नायिका, सहनायक व इतर पात्रांची होते. त्यामुळे उत्तम तांत्रिक बाबी असणारा हा सिनेमा सरधोपट पद्धतीने कथानक मांडतो. ज्या सामाजिक भाष्यासाठी कथानकाची निवड करण्यात आली आहे ते दूरदूरपर्यंत दिसून येत नाही. काही संवादांमध्ये उगाच भाष्य केल्याचं जाणवतं पण ते न लक्षात राहण्यासारखं.

चित्रपटकर्त्यांनी यातील कानडी संवाद लिहिण्यासाठी प्रसिद्ध कन्नड नाटककार डॉ. डी. एस. चौगुले यांना ते दिलेले आहेत. त्यांचे संवाद तरी प्रभावी आणि ओघवते वाटायला हवेत. ज्यांना कानडी भाषेचा सहवास आहे त्यांना यातील संवाद कृत्रिम आणि मागणी तसा पुरवठा या पद्धतीने लिहिल्याचं वैषम्य वाटेल. तोच प्रकार मराठी संवादांचा सुद्धा. त्यामुळे कानडी-मराठी वादात सिनेमाची कथा-पटकथा-संवाद सुद्धा भरडले गेले याचं वाईट वाटतं.

गश्मिर महाजनीचा हा पहिला सिनेमा. ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा. वडील त्यांच्याकाळातले देखणे नट म्हणून नावाजलेले त्यामुळे त्यांच्यासारखाच देखणा चेहरा आणि कमावलेलं शरीर यांचा संगम असणारा गश्मिर हिंदीतल्या हृतिक रोशन, अक्षय कुमार किंवा इतरांसारखा पुढील काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काही सिनेमातून त्याचे अभिनयाचे इतर पैलू दिसून येतील अशी अपेक्षा करायला जागा आहे. इतर कलाकारात देविका दफ्तरदार, उषा नाईक आणि अरुण नलावडे उत्तम.

एकूणात भाषिक आणि प्रांतिक वादात एक चांगली संकल्पना वाया गेली असे म्हणावे लागेल.


रेटिंग २/५

Comments