मर्डर मेस्त्री : उत्तम संकल्पना पण...
नऊ वर्षांपूर्वी आलेल्या लगे रहो मुन्नाभाई आणि या सिनेमात एक साम्य आहे.
दिलीप प्रभावळकर. तसेच संकल्पनेच्या पातळीवर सुद्धा ते सारखेच आहेत असं म्हणायला
वाव आहे. अर्थात दोन्हींच्या विषयात आणि मांडणीत ते दोन ध्रुवांवर आहेत तरी त्यात
साम्य आहे ते त्यांच्या मुळाशी असणाऱ्या चमकदार कल्पनेसाठी. लगे रहो... मध्ये गांधीजी
आणि त्यांचे विचार आजच्या काळाशी एका गुंडाच्या सद्सद्विवेकबुद्धीशी गुंफून
राजकुमार हिरानीने मजा आणली होती. इथे सुद्धा एक चमकदार कल्पना आहे. एक पोस्टमन चोरून
पत्र वाचण्याच्या खोडीमुळे तीन कुटुंबात कसा गोंधळ उडवून देऊ शकतो ही.
तो पोस्टमन आहे मळगावचा प्रभाकर (हृषीकेश जोशी). पत्र देणे, घेणे, पेटीतनं
पत्र काढून त्यांची छाननी करून ती योग्य जागी पोचवणे ही कामे तो करतो. तरी पण
इमानेइतबारे चालणाऱ्या या कामात त्याला रस नाही. त्याला रस आहे ते ज्यांची पत्रे
तो पोचवतो त्यांना लोकं पत्रातून काय सांगतात याची. यासाठी गावातल्या जवळ जवळ
सर्वांची पत्रे तो वाचत असतो आणि ज्या पत्रात महत्वाचं नाही ते पत्र त्यांचे
त्यांना पोचवत असतो. पण ज्यात महत्वाचं आहे ते मात्र त्यांना न देता पत्र आलंच
नाही असं सांगून त्यांची बोलावण करत असतो. एकदा त्याचं बिंग फुटतं. गावातले सर्व
मिळून त्याला चांगला धुतात. या पुढे पत्र वाचणार नाही आणि ज्याची त्याला पत्र
देण्याच्या कबुलीवर त्याला सोडण्यात येतं. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
म्हणतात तसा तो परत एकदा चोरून पत्र वाचायला लागतो. यावेळी एक पत्र वाचण्यात येतं.
कुणा स्त्रीने आपल्या नवऱ्याला मारण्यात यावं म्हणून ते लिहिलेलं असतं. त्या
माणसाचं नाव असतं माधव मेस्त्री. हा माधव मेस्त्री सावंतवाडीत राहत असतो त्यामुळे
प्रभाकरला ते माहित नसतं. तो शोध घेतो तर त्याला तीन माधव मेस्त्री सापडतात. पहिला
असतो चौऱ्याहत्तर वर्षांचा एक डॉक्टर (दिलीप प्रभावळकर) व त्याची पत्नी मालिनी
(वंदना गुप्ते), दुसरा असतो माजी सरपंच (संजय खापरे) व नेहमी नटलेली त्याची पत्नी सरस्वती
(क्रांती रेडकर), तिसरा असतो नवविवाहित जोडप्यातला माधव (विकास कदम) व त्याची
बायको हेमलता (मानसी नाईक). प्रभाकर या तिघांना वाचवायचं म्हणून ते मूळ पत्र न
देता त्यांना आगाऊ सूचना म्हणून वेगळच पत्र देतो आणि गोंधळ उडायला सुरुवात होते.
सिनेमाचा काळ आहे डाकिया डाक लाया काळचा. तेव्हा आजच्यासारखी संपर्क माध्यमे
नसल्यामुळे पत्र हीच महत्वाची गोष्ट होती. त्यामुळे पोस्टमन हा देवदूतच होता.
पटकथाकार-दिग्दर्शकाने असा विचार केला असावा की समजा पोस्टमन चोरून पत्र वाचत असेल
आणि त्याच्या वाचण्यात काही आक्षेपार्ह आलं तर तो काय करेल. इथे नवऱ्याचा खून करणे
ही आक्षेपार्ह गोष्ट ठरते त्यामुळे पोस्टमनने घेतलेला निर्णय योग्य वाटतो. पण याचे
काय परिणाम होतील याचा विचार तो करत नाही. सिनेमाच्या तार्कीकतेत ते पटतं पण
प्रत्यक्ष ते दिसून येणं गरजेचं असतं.
लेखाच्या सुरुवातीला लगे रहो... चा उल्लेख केला तो यासाठी की चमकदार कल्पना
प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यासाठी योग्यपणे आणि एका निश्चित दिशेने त्याची
मार्गक्रमणा होणे गरजेचे असते नाहीतर प्रेक्षक घड्याळ बघायला लागतो. लगे रहो...
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकाला बांधून ठेवतो त्यातल्या स्पष्टतेमुळे. इथे
मुळात सुरुवातीपासून प्रचंड गोंधळ आहे. कथानक पुढे सरकत नाही कारण पटकथेत ते एका
माळेत गुंफलेले नाही. पटकथेला लक्ष कुठे द्यायचं याचा संभ्रम पडलेला त्यामुळे कथा
पोस्टमनची की त्याने घातलेल्या गोंधळाची हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नाही. पोस्टमनची
मुलगी, त्याचे कुटुंबीय व इतर गावकरी लोकं यांच्यावर सुरुवातीला नको इतका वेळ
घातला जातो. पात्रांची योग्य वाढ नाही. त्यांना वाढीसाठी आणि प्रेक्षकांना त्या
कळण्यासाठी वेळ दिला जात नाही. व्यक्तिरेखा त्रिमिती न राहता कचकड्याच्या राहतात.
पटकथाच विस्कळीत असल्यामुळे प्रेक्षकाचा संभ्रम वाढत जातो.
सिनेमाचा काळ साधारण ७०-८० च्या दशकातला वाटतो. तिसऱ्या माधवच्या कपड्यांवरून तरी
तो तेव्हाचा असावा असं वाटतं. पण दिग्दर्शक (राहुल जाधव) आणि कला दिग्दर्शक तो नको
इतका चकचकीत करतात त्यामुळे त्यातली कृत्रिमता लगेच दिसून येते. तसेच दिग्दर्शकाचा
पटकथा नसलेल्या या कथेत कसा जीव भरायचा याचा गोंधळ उडालेला आहे हे स्पष्ट ओळखू
येतं. त्यामुळे चमकदार कल्पना ही संकल्पनेच्या पातळीवरच राहते. तिला पटण्यासारखा
आकार दिसून येत नाही.
सरतेशेवटी कलाकारांचा उत्तम अभिनय हीच काय ती जमेची बाजू. दिलीप प्रभावळकर
नेहमीप्रमाणे उत्तम करतातच हे सांगणे न लागे. पण इथे त्यांचे प्रसंग कमी असले तरी
कायिक अभिनयाने ते चटकन लक्ष वेधून घेतात आणि लक्षात राहतात. बाकी मंडळीत वंदना,
संजय, विकास आणि मानसी छान. क्रांती रेडकरना तुलनेने जास्त प्रसंग मिळालेत पण त्या
त्याचं सोनं करतात. एकूणात एका चांगल्या संकल्पनेचं न पटणारं रूप इतकंच त्याचं महत्व
राहतं.
रेटिंग : २/५



Comments